मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय ३२ वा

काशी खंड - अध्याय ३२ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥
षण्मुख म्हणे गा मुनिवरा ॥ गंगामाहात्म्य प्रिय ईश्वरा ॥ परिसावें आतां परात्परा ॥ सांगेन आतांचि ॥१॥
तीर्थे असती अन्यत्र स्थानीं ॥ परी इच्छा पूर्ण करी ऐसें नव्हे कोणी ॥ साक्षात कामधेनु उत्तरवाहिनी ॥ मंदाकिनी जे ॥२॥
इयेसी उपमा न धडे ॥ कामधेनूपाशीं कल्पिलें जोडे ॥ परी कल्पनेविण रोकडें ॥ पाविजे तत्काळ मोक्षपद ॥३॥
म्हणोनि कल्पतरु चिंतामणी ॥ पाहातां न्यूनता कोटिगुणीं ॥ ते भोगिजेती अमरगणी ॥ परी मानवां अप्राप्त ॥४॥
म्हणोनि पिपीलिका विहंगमादि चराचर ॥ नाना जागी जळीं स्थळीं अपार ॥ सर्व जीवां मोक्ष साचार ॥ युगानुयुगीं संभवे ॥५॥
जैसें स्वातीतोयें विशेष ॥ रत्नें मुक्तें निपजती सुरेख ॥ त्याचि खाणीसारिखें देख ॥ पृथक पृथक ॥६॥
व्याळमुखीं होय हलाहल लिप्त ॥ शुक्तिगभी होतसे मुक्त ॥ पात्रासारिखी होत जात ॥ परी न करवे अन्यथा ॥७॥
तैशी नव्हे स्वर्गतरंगिणी ॥ ते जीवनमात्रांसी करी मुक्तमणी ॥ युगानुयुगी शोभायमान अग्रणी ॥ होती शिवसभेसी ॥८॥
स्वामी म्हणे जी कुंभजा ॥ या जीवनाचिया थोर पैजा ॥ कृमि जंतु वृषभध्वजा ॥ समान तुळती स्नानेंसी ॥९॥
एकवीस नभमंडळी ॥ सप्तद्वीप नवखंड भूतळीं ॥ धुंडितां सप्तही पाताळीं ॥ नाहीं ऐसें पुण्यजळ ॥१०॥
स्वामी म्हणे हो अगस्तिऋषी ॥ शंकरें वर दिधला गंगेसी ॥ म्हणूनि स्वर्ग-मृत्यु-पाताळजंतूंसी ॥ होतसे प्राप्त मुक्तिपद ॥११॥
ऐसें शंकराचें जें मत ॥ तें कल्पांतीं नव्हे विपरीत ॥ तेथें जाहालें एक वृत्त ॥ तें परिसावें अगस्तिमुनी ॥१२॥
या उत्तरवाहिनीचिया नीरें ॥ पातकें प्रक्षाळिलीं अघोरे ॥ भवानीसे निरुपिलें शंकरें ॥ ते कथा परिसा गंगेची ॥१३॥
जंबुकाचा केसरी होणें ॥ कीं कपोताचा होतसे संपुर्ण ॥ महापापी जाहाला त्रिनयन ॥ हा नवलावो गंगेचा ॥१४॥
जैसा मृत्तिकेचा घट ॥ अग्निमुखें होतसे शुद्धवट ॥ मग पुढें तरी एकवट ॥ नव्हे कीं मृत्तिकेसीं ॥१५॥
ऐसें मंदाकिनीचें स्नान ॥ एक जरी घडे जन्मा येऊन ॥ तो महादोषी परी त्रिनयन ॥ होऊनि ठाके ॥१६॥
तो दोषासी न मिळे मागुता ॥ अगस्ति म्हणे जी शिवसुता ॥ कोण उद्भरला स्नान करितां ॥ तें सांगावें मज ये वेळीं ॥१७॥
मग बोलिला शिवनंदन ॥ म्हणे परिसें आतां पूर्ण कथन ॥ रेवातटी ऋग्वेदी ब्राह्मण ॥ होता कोणी एक ॥१८॥
तो जन्मांतरींचा महादोषी ॥ कुष्टलांछन होतें तयासी ॥ तेणें कामातुर शूद्रदासी ॥ गृहीं असे पाळिलीं ॥१९॥
तो वृषलीलंपट कामातुर ॥ ऐसा प्रवर्ते सदा घराचार ॥ ब्राह्मणवीर्ये ते गरोदर ॥ जाहाली दासी व्यभिचारिणी ॥२०॥
ऋतुकाळीं नव्हतें शुद्ध नक्षत्र । ते वृषलीसी झाला पुत्र ॥ प्रसूतकाळीं हें घडलें सूत्र ॥ कुयोग अष्टम चंद्राचें ॥२१॥
त्याचें न केलें गर्भाधान ॥ कैचें मग नामकरण कर्णवेधन ॥ जन्मापासाव तेल जीवन ॥ नाही न्हाण तयासी ॥२२॥
त्यासी नाहीं व्रतबंध ॥ कैंचा असावा मंत्रसिद्ध ॥ तो जन्मापासूनि पूर्ण विरुद्ध ॥ झाला तस्कर विशेषें ॥२३॥
लौकिक नाम ठेविलें कुटीर ॥ तोही व्यभिचारी कामातुर ॥ चारी वर्णगृहीं आहार ॥ करीतसे स्वेच्छा तो ॥२४॥
तो पित्यापासूनि विभक्त व्यभिचारी ॥ झाल सप्तव्यसनी परदारी ॥ महाकुटिल हिंसा करी ॥ नाना जीएवजंतूंची ॥२५॥
ऐसें वर्ततां व्याभिचारिया ॥ बहुत ब्रह्महत्या घडल्या तया ॥ गोहत्यातरी सुरापानाचिया ॥ कोण शंका करुं पाहे ॥२६॥
ऐसें वर्ततां वर्षे छत्तीसवरी ॥ मग स्त्री केली जातीची चांभारी ॥ ते घातली होती जातीबाहेरी ॥ दोषास्तव गोत्रजांनीं ॥२७॥
ऐसी ते व्यभिचारिणी दारा ॥ घेऊनि निघाला तो देशांतरा ॥ रेवेचिया दक्षिणतीरा ॥ जातसे दंडकारण्यासी ॥२८॥
तों विंध्याद्री ओलांडून ॥ पावला सह्याद्रीचे वन ॥ तंव तेथें उठिला पंचानंन ॥ मागीं जातां तयावरी ॥२९॥
तो व्याघ्रें भक्षिला दोषी ब्राह्मण ॥ तंव धांविन्नले यमगण ॥ त्यांही नेला तो ब्राह्मण ॥ बांधूनि यमपुरीसी ॥३०॥
त्यासी जाचिती महा घोरीं ॥ रौरवादिकीं नानापरी ॥ कुंभीपाकी तो दुराचारी ॥ घातला यमगणीं नेऊनी ॥३१॥
प्रेत पडिलें दंडकारण्यीं ॥ तेथें घारी गीध आले धांवूनी ॥ प्रेताची केली विदारणी ॥ नानापरी न देखवे ॥३२॥
चरण छेदूनि चंचुपुटीं ॥ घेऊनि निघाले व्योमपुटीं ॥ तंव ते देखिलें दृष्टी ॥ आणिक गीधांनी तेधवां ॥३३॥
तेही धांविन्नले झडपीत ॥ एकमेकां त्राणें झोंबत ॥ चरण हांसडोनियां घेत ॥ एकमेक बलात्कारें ॥३४॥
ऐसें करीत भांडण ॥ गेले तीन शत योजन ॥ पातले ते आनंदवन ॥ मंदाकिनीतीरासी ॥३५॥
ऐसे भांडतां गगनोदरीं ॥ तो चरण पडला भागीरथीमाझारीं ॥ मग निवारलें त अवसरी ॥ भांडण तया गीधांचे ॥३६॥
तंव आश्चर्य वर्तलें गंगातटा ॥ कैलासीं वाजिन्नल्या दिव्य घंटा ॥ भेरी मृदंगांचिया बोभाटा ॥ गर्जई एकवीस नभमंडळें ॥३७॥
उतरली शत एक विमानें ॥ सवें अप्सरा शिवगण ॥ मुख्यनायक गजानन ॥ लंबोदर विघ्नहर्ता ॥३८॥
गोकर्ण आणि घंटाकर्ण ॥ विरुपाक्ष आणि शैलादि गण ॥ इतुक्यांसहित गजानन ॥ निघता जाहाला समीरगती ॥३९॥
अप्सरा करिती गायन ॥ वाद्यध्वनी रसाळ पूर्ण ॥ तेथें अपार रुद्रगण ॥ शिवनामें गर्जती ॥४०॥
कोटी विद्युल्लतांचिया तेजा ॥ विमानीं मिरवती दिव्यध्वजा ॥ धन्य धन्य तो कैलासराजा ॥ निजभक्तकैवारी ॥४१॥
धन्य धन्य ते शुभोदंका ॥ जे उत्तरवाहिनी मणिकर्णिका ॥ उद्धरीतसे त्रिलोका ॥ आपुले प्रतापेंकरुनी ॥४२॥
चिंतामणि आणि गारगोटी ॥ हें भिन्नत्व नाहीं तियेच्या पोटीं ॥ एक बिल्वदलासाठीं ॥ प्राप्त करी कल्पवृक्ष ॥४३॥
परीस देखतां लोहाचें सुवर्ण ॥ आपणांसारिखें करी काष्ठ चंदन ॥ गंगेकारणें ते शिवगण ॥ धांविन्नले यमपुरीसी ॥४४॥
गणेशें पाठविला आज्ञादूत ॥ धर्मासे म्हणावें बहुत ॥ आमुचा देई शिवभक्त ॥ गंगास्थाननिवासी जो ॥४५॥
त्यासी कराल यमजाचणी ॥ तुम्हांसी कोपेल शूळपाणी ॥ मग दूत पावले भद्रस्थानी ॥ धर्मरायाचे तेधवां ॥४६॥
तंव तो सिंहासनीं राजेश्वर ॥ दक्षकन्यापती सूर्यकुमर ॥ त्यासी कथिते झाले शिवकिंकर ॥ आज्ञा गणाधीशाची ॥४७॥
धर्मासी म्हणते शिवदूत ॥ गा तुज दोषीदंडणीं प्रभुत्व ॥ तें केवीं करितोसी विपरीत ॥ शिवाआज्ञेविरहित ॥४८॥
तुज शिवाअज्ञा ठाऊक असतां ॥ अमान्य कां करितोसी कृतांता ॥ पुण्यशील कैसा नेतां ॥ यमपुरीसी काय हें ॥४९॥
तुज कोपला रे लंबोदर ॥ तुवां आणविला पुण्यवंत नर ॥ त्यासे नाम जो कुटरि ॥ तो देई गा आमुचा ॥५०॥
यावरी बोले तो कृतांत ॥ विपरीत करितो गा शिवसुत ॥ महादोषी तो शिवभक्त ॥ म्हणतां तुम्ही कैसें हें ॥५१॥
तरी मी पापपुण्याचा देखणार निर्दोष ॥ पापपुण्यांचे मी सांगे गुणदोष ॥ कासया आले गणाधीश ॥ दोषी नेदीं सर्वदा ॥५२॥
मग शिवदूत म्हणती हो गजानना ॥ कृतांत दोषिया नेदी जाणा ॥ तंव कोप आला शिवनंदना ॥ विघ्नहरासी ॥५३॥
माझिया स्वामीचें स्मरण ॥ जयासी धडे गंगंचें स्नान ॥ तें अंत्यजादिक पावन ॥ होती कैलासपदासी ॥५४॥
ऐसी आज्ञा कथी विश्वनाथ ॥ एतदर्थी कोणाचा रे पुरुषार्थ ॥ हे अमान्य करावया समर्थ ॥ ऐसा कोण असे न कळे ॥५५॥
म्हणोनि हातीं घेतला त्रिशूळ ॥ मग वेगें निघाला गौरीचा बाळ ॥ तंव तो पळाला महाकाळ ॥ धर्म जो म्हणवीतसे ॥५६॥
मग ते यमपुरी महानगर ॥ नगरातळीं लाविलें त्रिशूलाग्र ॥ तेणें उत्पाटलें समग्र ॥ लोकांसहित ते वेळीं ॥५७॥
द्वादश लक्ष योजनें क्षिती ॥ इतुकी यमपुरीं वस्ती ॥ ते अधोमुख करुं पाहे गणपती ॥ मृत्युलोकामाझारी ॥५८॥
मग त्या लोकींचे नरपाळ ॥ जे सदाचारी पुण्यशीळ ॥ ते शरण आले जी सकळ ॥ गनाधीशाप्रती तेधवां ॥५९॥
म्हणती जयजयाजी विनायका ॥ तूं थोर प्रिय त्र्यंबका ॥ तुवांचि स्थापिलें या यमलोका ॥ अक्षय वर देऊनियां ॥६०॥
माता जरी जाहाली क्रोधायमान ॥ आणि बाळकासी करी ताडण ॥ तरी गणाधीशा शरण ॥ कोणासी रिघावें सांग पां ॥६१॥
कीं शिवालयीं पूजितां जाश्वनीळ ॥ जरी तो होऊनि काळ ॥ जीवजंतु भक्षी तत्काळ ॥ तरी काय कीजे अनाथें ॥६२॥
हें त्रैलोक्य तुझी रचना ॥ कोण उत्थापी जगज्जीवना ॥ तूं कृपाळू भक्तजनां ॥ विघ्नहरा गजेंद्रा ॥ ६३॥
तूं भक्तांची विघ्नें हरिसी ॥ म्हणोनि विघ्नहर नाम तुजसी ॥ तरी आम्हां शरणागतांसी ॥ न करी विघ्न स्वामिया ॥६४॥
तूं सकळ सुरवरां मान्य ॥ शिवगणांमाजीं तूं अग्रगण्य ॥ तुमचा शरणागत सूर्यनंदन ॥ धर्मराज रक्षावा ॥६५॥
त्यासी देईं नाभीकार ॥ तुमचा घेऊनि जाइंजे कुटीर ॥ मग बोलिला परशुंधर ॥ नाभीं नाभीं यमा तूं ॥६६॥
ऐसा प्रार्थिला लंबोदर ॥ लोकीं भेटविला सूर्यकुमर ॥ तो म्हणे जी मी असें किंकर ॥ तुमचा म्हणवितो स्वामिया ॥६७॥
स्वामीची आज्ञा जाण ॥ हे भृत्यासी असे हो प्रमाण ॥ आतां कुटीराचे शुभ गुण ॥ तेही तुम्हीं परिसावे ॥६८॥
तो हा महादोषीं कुटीर ॥ चित्रगुप्त लिहिलें जन्मांतर ॥ आतां त्याचें पुण्य अपार ॥ तेंही तुमचिया वचनमात्रें ॥६९॥
धर्म म्हणे हो धुंडराजा ॥ आशाविनायका हरात्मजा ॥ चतुर्दंता आदिपूज्या ॥ सुरवरांसी तूं एक ॥७०॥
ऐसें धर्माचें स्तुतिवचन ऐकून ॥तो कृपाळू गजवदन ॥ समर्पीत यमभुवन ॥ कृतांतासी ॥७१॥
मग तो आणिला कुटरि ॥ त्यासी भेटला विघ्नहर ॥ म्हणे तूं कैलासवासी रे बंधुवर ॥ गंगेनें केला आमुचा ॥७२॥
तो वंदिला शैलादिगण ॥ अप्सरा करिती अक्षय गायन ॥  करीं कनकदंड पूर्ण ॥ चामरादि उपचार जाण्वितो ॥७३॥
दिधलीं दिव्यांबरें भूषणें ॥ सर्वही शिवाचींच आभरणें ॥ दशभुज पंचाननें ॥ त्रिनेत्री नीलकंठ ॥७४॥
ऐसा सर्वाभरणीं शंकर ॥ जैसे नंदी भृंगी लंबोदर ॥ तैसाचि तो केला कुटीर ॥ शिवगणीं तेधवां ॥७५॥
ऐसें आश्चर्य देखोनि थोर ॥ विस्मित जाहाले यमकिंकर ॥ म्हणती ऐसें गंगानीर ॥ प्राप्त कैंचें आम्हांसी ॥७६॥
ऐसा श्रृंगारुनि कृटीर ॥ विमानीं घाली लंबोदर ॥ तो केला जी साक्षात शंकर ॥ कैलासभुवनीं अतिपूज्य ॥७७॥
तेथें शिवसभेचे उपचार ॥ युगें क्रमूनि जाती अपार ॥ एक वेळां धडे पीयूषाआहार ॥ मग क्षुधा तृषा न लागेचि ॥७८॥
स्वामी म्हणे हो अगस्तिमुनी ॥ महा आश्चर्य केलें सर्व गणीं ॥ मोठ्या दोषिया कैलासभुवनीं ॥ परम पावन केलें पैं ॥७९॥
समूळ हे यमनगरी ॥ टाकिली होती पृथ्वीवरी ॥ एवढा महाप्रताप निर्धारीं ॥ उत्तरवाहिनीचा ॥८०॥
धर्म म्हणे गा चित्रगुप्ता ॥ तुम्ही जंतूंची जन्मांतरें लिहितां ॥ त्या भूतभविष्यांच्या वार्ता ॥ कां हो न कथा आम्हांसी ॥८१॥
तंव चित्रगुप्त म्हणती यमा ॥ त्रैलोक्यजंतूंची वार्ता सांगों तुम्हां ॥ परी पंचक्रोशीचा जो महिमा ॥ तो आम्हांसी अगभ्य ॥८२॥
तेथें जें वसे जंतुकुळ ॥ त्याचें भविष्य आम्हां अकळ ॥ तें देवांसी वंद्य सकळ ॥ ऐसें बोलती पुराणें ॥८३॥
महदोषी ब्रह्मघातकी ॥ तयांच्या अस्थि पडल्या उदकीं ॥ तयाकरितां यमलोकीं ॥ युगान्त केला शिवगनीं ॥८४॥
पहा पहा युगानुयुगी सत्यार्थ ॥ गंगोदकीं अस्थि पडतां यथार्थ ॥ कैलासपद प्राप्त करी उमानांथ ॥ जंतूंलागीं समर्थ तो ॥८५॥
अस्थि पडल्याचें हें फळ ॥ तरी जे सेविती गंगाजळ ॥ ते काशीनिवासी जीव सकळ ॥ देवांहूनि श्रेष्ठ पैं ॥८६॥
या गंगेचा प्रादुर्भाव ऐसा ॥ सगरभूपती पडले अग्नीवळसां ॥ ते नेले जी कैलासा ॥ साठ सहस्त्र गंगेनें ॥८७॥
ऐसें चित्रगुप्त आणि सूर्यनंदन ॥ कथिती गंगेचें महिमान ॥ मदादोषी तो यमपुरीहून ॥ नेताती जाण कैलासीं ॥८८॥
म्हणूनि दोषिया नेइजे यमगणीं ॥ अस्थि पडतां गंगाजीवनीं ॥ तरी सत्याचि तयाचे चरणीं ॥ यमादि करिती नमस्कार ॥८९॥
महादोष ब्रह्महत्येचें लांछन ॥ फिटे समूळ गंगाजीवनेंकरुन ॥ जैसा परीस करी सुवर्ण ॥ लोहाचें स्पर्शमात्रे ॥९०॥
ऐसें मंदाकिनीजळ उद्भट ॥ या शरीरासी करी पालट ॥ कर्मकाळिमा फेडूनि शुद्धवट ॥ करी सत्वर हिरण्यापरी ॥९१॥
स्वामी म्हणे गा अगस्तिमुनि ॥ मृत्युलोकीं हे स्वर्गतरंगिणी ॥ जनां उद्धारावयालागुनी ॥ प्रकटली ते विश्वमाता ॥९२॥
हे जाहाली सहस्त्रमुखी ॥ महिमा न सांगवे षण्मुखीं ॥ तरी परियेसीं महाऋषी ॥ महाप्रभाव  या गंगेचा ॥९३॥
करितां गंगेचे एक आचमन ॥ देतसे कल्पतरुचें उपवन ॥ उदक नव्हे तें अमृतपान ॥ तया मंदाकिनीचें ॥९४॥
अनेक तीर्थांची स्नानें सहस्त्र एक ॥ आणि मंदाकिनीचें आचमन सम्यक ॥ परी तेंही कथिलें अधिक ॥ सहस्त्रगुणें विशेष पैं ॥९५॥
गंगाकूलींचा मृत्तिका ॥ करीं चर्चूनि गंगोदका ॥ जो भाळीं लावी तिलका ॥ तयाचें सामर्थ्य परिसावें ॥९६॥
तो तिलक देखोनि सूर्यनंदन ॥ भाळीं वंदितो चरण ॥ दोषतम नाशावया पूर्ण ॥ मार्तंड जैसा ॥९७॥
गंगेची वालुका जळीं ॥ मुष्टी एक अर्पी जो मौळीं ॥ तरी तयासी म्हणावें चंद्रमौळी ॥ साक्षात अवतार शिवाचा ॥९८॥
ती वालुका नव्हे गभस्ती ॥ कीं ते मुकुटीं जडिले तारापतीं ॥ कीं व्योमींची नक्षत्रें होती ॥ मौळीमेरु प्रदक्षिणेसी ॥९९॥
मध्यान्हीं रविकिरण वरी ॥ वाळू उष्ण होय तेणें भारी ॥ तेथें शयन पळें चारी ॥ करी जरी नर साक्षेपें ॥१००॥
तरी शतसंवत्सर अग्निस्नान ॥ आणि सहस्त्र वर्षे धूम्रपान ॥ इतुकें फल धडे वालुकाशयन ॥ केलिया पुरुषानें ॥१०१॥
स्वामी म्हणे मुनि अगस्ती ॥ जी नक्षत्रें जळीं बिंबती ॥ ना तीं तेथेंचि असती ॥ सर्वकाळ गंगेमाजीं ॥१०२॥
वैशाखपौर्णिमेचे दिनीं ॥ शीतकर प्रकाश गगनीं ॥ तेथें जे बैसती जाऊनी ॥ गंगाकूलावरी पैं ॥१०३॥
तेथें क्रीडती चक्रवाकें ॥ ध्वनीं वदती अनेकें ॥ तरी त्यांचिया सरी ब्रह्मादिकें ॥ न तुळती जाण सर्वथा ॥१०४॥
दृष्टीं अवलोकी गंगाजळ ॥ मुखें वदे कैसें हें रम्य स्थळ ॥ ऐसें वदोनि तुकी जो मौळ ॥ मनोभावेंकरोनी ॥१०५॥
तेणें तुकिलिया मुंड ॥ तैं हेलावे तेथेंचि जी ब्रह्मांड ॥ ऐसा प्रादुर्भाव असे प्रचंड ॥ तया गंगाजळाचा पैं ॥१०६॥
सविता आणि तारापती ॥ जळीं बिंबलें दिसती ॥ कीं तेथेंचि असती ॥ सर्वकाळ गंगोदकीं ॥१०७॥
मेरुप्रदक्षिणेचें कारण ॥ षोडश कळा करिती भ्रमण ॥ मुख्यत्वें असोनि संपूर्ण ॥ गंगाजळीं ऐक्यभावें ॥१०८॥
ऐसा जो बैसे गंगाकूलासी ॥ दक्षिण करें दाखवी आणिकासी ॥ तरी त्याचिया सामर्थ्यासी ॥ न तुळता ब्रहमादिक ॥१०९॥
तो न म्हणिजे बैसला गंगाकूलीं ॥ तरी सिंहासनीं बैसला शिवाजवळी ॥ जयाच्या वामांगीं शैलबाळी ॥ शिव जैसा साक्षात ॥११०॥
उपचार जाणविती गण ॥ तो साक्षात बोलिजे त्रिनयन ॥ तयाच्या सामर्थ्या चतुरानन ॥ अगम्य म्हणतसे ॥१११॥
नातरी गंगोदकीं गगन ॥ प्रतिबिंबले दिसे संपूर्ण ॥ कीं तें स्वर्गमोक्षस्थान ॥ गंगागर्भीचें असे पैं ॥११२॥
कीं ते स्वर्गमोक्षांचे द्वार ॥ म्हणोनि दावीतसे अभ्यंतर ॥ तेथें स्नान केलिया साचार ॥ उद्धरती जडजीव संपूर्ण ॥११३॥
सप्त स्वणांची ओवरी ॥ तेथें बैसिजे कवण्यापरी ॥ चरण ठेवूनिया सोपानावरी ॥ रिघावें तेथें सर्वथा ॥११४॥
तैशा या सप्तस्वर्गीचिया ॥ गंगालहरी त्या सोपानिया ॥ त्या दाखवीतसे स्नान केलिया ॥ उत्तरवाहिनी जळामाझारी ॥११५॥
नातरी ते ऐसी गमली कुडी ॥ गंगा ते स्वर्गमोक्षांची शिडी ॥ लहरी सोपानिया उभयदरडी ॥ गंगा जाहाली आणि आपण ॥११६॥
चहूं युगींच्या मुक्ती ॥ या तूं परियेसीं गा अगस्ते ॥ पार्वतीप्रती पशुपती ॥ कथित होता पूर्वीच ॥११७॥
कृतयुग मुक्तिपावन ॥ होय केलिया महायजन ॥ महाभूपती शूरगण ॥ आदिकरुनि समस्तही ॥११८॥
त्रेतायुगीं केलय पूर्ण भक्ती ॥ मनोभावें पूजिजे पशुपती ॥ मग पाविजे महामुक्ती ॥ सायुज्यता संपूर्ण ॥११९॥
द्वापारिं शास्त्रें कथितां संपूर्ण ॥ योगाभ्यास आणि आत्मज्ञान ॥ तेव्हां होइजे मुक्ती पावन ॥ हाच जाणा निश्चयो ॥१२०॥
कलियुगीं सायुज्यता मुक्ती ॥ भवानीसी कथी पशुपती ॥ गंगेविना प्राप्त मुक्ती ॥ नाहीं सहसा त्रिभुवनीं ॥१२१॥
ऐसें चहूं युगांचे आचरण ॥ जाणिजे मानवी देहापासून ॥ मग मुक्ती होइजे पावन ॥ आनंदवन काशी ते ॥१२२॥
मुक्तीस्तव यज्ञ दान ॥ तीर्थे व्रतें देहदमन ॥ नाना भक्ती तपसाधन ॥ कीजेति योगाभ्यासादि ॥१२३॥
षट्‌कर्मांचा तो लवलेश ॥ मुक्तीकारणें विद्याभ्यास ॥ श्रवणपठणें महेश ॥ वोळंगिजे मुक्तिस्तव ॥१२४॥
तरे ते मुक्ती म्हणिजे कवण स्थान ॥ हें अगस्ती तुज करितों श्रवण ॥ जेथें धरिलें महामौन ॥ वेदपुरुषीं ॥१२५॥
सांडूनिया सर्व आशापाश ॥ मुक्तीचा निपजे प्रयास ॥ काशीस्थळीं जाऊनि महेश ॥ पूजावा आदरें गंगोदकीं ।१२६॥
म्हणोनि याचि देहीं याचि नयनीं ॥ मुक्तीदात्री देखिजे मंदाकिनी ॥ अन्यत्र मुक्तिदात्री नाहीं त्रिभुवनीं ॥ धुंडिताअ गंगेऐसी ॥१२७॥
साक्षात श्रीगुरु महेश ॥ करीतसे तारक उपदेश ॥ याविण धुंडी तो पशुविशेष ॥ देव मानव आदिकरुनी ॥१२८॥
हे अद्यापि आहे साक्षात प्रतीती ॥ तारकमंत्र उपदेशितो पशुपती ॥ जीवनाम तितुका पावे मुक्ती ॥ मणिकर्णिकेतीरीं सर्वथा ॥१२९॥
आणिक आयासें धुंडितां मुक्ती ॥ परी मानव अल्पायुषी अशक्त होती ॥ आतां शरीरीं जंव आहे शक्ती ॥ तंव सेवीं आनंदवन ॥१३०॥
न लगे षट्‌कर्म साधन ॥ जप तप ना देहदमन ॥ तीर्थे व्रतें यज्ञ दान॥ न लगे वेदपठण ध्यान धारणा ॥१३१॥
न लगे तप ना योगाभ्यास ॥ लौकिकाचार दिवसेंदिवस ॥ हें सर्वही प्रहरोनि करिजे निवास ॥ काशीक्षेत्रामाजीं ॥१३२॥
न लगे इतुकें सायासकरण ॥ एकचि कीजे सीतेचें स्नान ॥ तेंही न होय तरी दर्शन ॥ करावे मणिकर्णिकेचें ॥१३३॥
त्या मणिकर्णिकेच्या तटीं ॥ विष्णु झाले पद्मकोटी ॥ वाळुकेपरी असंख्य करिती सृष्टी ॥ ऐसे झाले विरिंची असंख्य ॥१३४॥
स्वामी म्हणे गा अगस्ती ॥ ऐसी हे गंगा शिवाची शक्ती ॥ त्रैलोक्यात इची ख्याती ॥ अगाध अनुपम ॥१३५॥
आणिक वदे शिवसुत ॥ या गंगेचें असे एक व्रत ॥ तें तुजकारणें करु श्रुत ॥ घटोद्भवा अगस्ती ॥१३६॥
वैशाख शुद्ध प्रतिपदेपासून ॥ जंव येत दशम दिन ॥ तंववरी उपवास पारण ॥ करावें दहा दिवसपर्यंत ॥१३७॥
मग दशम दिनीं पूजायुक्तीं ॥ करावी गंगेची सुवर्णमूर्ती ॥ मग आरंभिजे पूजास्थिती ॥ गंगेमध्यें जाऊनियां ॥१३८॥
गंगातीरीं स्थापिजे घट ॥ त्यासी चढविजे वस्त्रपट ॥ औटहस्त शुद्धवट ॥ जैसें मिळे जे काळी ॥१३९॥
मेळ्विजे अष्टसुगंध ॥ घटासी समर्पिजे अक्षतागंध ॥ घटीं घालिजे मूर्ति शुद्ध गंगारुप जी ॥१४०॥
सुगंध  सुमनांचिया माळा ॥ घालिजे कुंभचिया गळा ॥ ऐशा विधीनें शैलबाळा ॥ पूजिजे गंगा निरंतर ॥१४१॥
दश दीपक दश ज्योती ॥ प्रदीप्त कीजे गा शीघ्रगती ॥ तेणें ओंवाळिजे मूर्ती ॥ गंगारुप जाणुनी ॥१४२॥
घट शरपंजरीं ठेवूनी ॥ प्रदक्षिणा करावी वस्त्रें गुंडाळोनी ॥ दीप ठेविजे अष्ट कोनीं ॥ पृथक पृथक ॥१४३॥
मग प्रवाहिजे गंगाजळीं ॥ त्या दशम दिनीं सायंकाळी ॥ मग स्तवी बद्धांजळीं ॥ गंगासहस्त्रनाम जपोनियां ॥१४४॥
तंव अगस्ति म्हणे द्वादशभुजा ॥ हें तंव सांगितली गृहस्थपूजा ॥ दीनानाथें शैलात्मजा ॥ कैसी पूजावी कोणभावें ॥१४५॥
सुवर्णमूर्ति जे गंगेची ॥ स्वामी ते अनाथासी कैंची ॥ जे जन्मवरी अष्टसुंगधांची ॥ वार्ताही नेणतीं सर्वथा ॥१४६॥
तयांसी सुगंध कैंचा प्राप्त ॥ धन नेणती जन्मपर्यंत ॥ मग बोलिला शिवंसुत ॥ परिसावें आतां अगस्ती ॥१४७॥
एकीं समर्पिजे चिंतामणि कोटी ॥ एकीं समर्पिजे काचवटी ॥ परी तो शैलात्मजेचे पोटीं ॥ समान असे सर्वदा ॥१४८॥
एकें नाना पुष्पीं कीजे सेवा ॥ एकें चढविले कनकदूर्वा ॥ परी ते गंगा विषमभावा ॥ न धरी कोणेकाळीं ॥१४९॥
जैसा प्रजापालक राज्याधीश ॥ एकासी कृपा एकासी द्वेष ॥ राजमानसीं हा अंश ॥ हे केवीं घडों शकें ॥१५०॥
मूर्ति न मिळे सुवर्णाची ॥ तरी मूर्ति कीजे धान्यपिष्टाचीं ॥ ऐशा भावें पूजा गंगेची ॥ करिजे राव अथवा रंक ॥१५१॥
ऐसें केलिया गंगाव्रत ॥ तरी तयासी होय काय प्राप्त ॥ दश दोष होती गलित ॥ मानवीदेहापासूनियां ॥१५२॥
तरी ते दोष ऐक ॥ कायिक वाचिक मानसिक ॥ करवी करी सांसर्गिक ॥ इत्यादि दश दोष जाणावें ॥१५३॥
ऐसे दश दोष नासती गा मुनिवरा ॥ म्हणोनि तीर्था नाम दशहरा ॥ आपुले स्वेच्छेन प्रियकरा ॥ शिवें ठेविलें हें नाम ॥१५४॥
ऐसें गंगाव्रत जाण ॥ जयाचें मनोभावें होय श्रवण ॥ तरी दश दोष होती हरण ॥ निमिषार्धे ॥१५५॥
ऐसें हें गंगामाहात्म्य ॥ श्रवण पठण होय उत्तम ॥ तरी त्यासी नमस्कारी धर्म ॥ सोर्यकुमर यमरावो ॥१५६॥
या अध्यायाची सांगों फलश्रुती ॥ पूर्वजां होय सायुज्यमुक्ती ॥ व्हावया पुनरावृत्ती ॥ उरी कैंची असेल ॥१५७॥
ऐसी हे गंगेची मूळ कथा ॥ उद्धरावया आली मर्त्यपंथा ॥ आणिक महिमा सांगों तरी वृथा ॥ वाढेल कथा बहुत ॥१५८॥
ऐसी हे वाणी आवरितो ॥ उगीच न राहावें बोलतां ॥ कोप न करावा जी श्रोतां ॥ अभयवर देइंजे ॥१५९॥
तरी धर्मशास्त्र जेवीं सिंहाची हांका ॥ म्हणोनि न धरी कोणाची शंका ॥ येर शास्त्रें जी जंबुका-॥ समान केलीं असतीं तीं ॥१६०॥
तैसीं हीं शास्त्रें पुराणें जाण ॥ यांचेनि हांके दोषप्रक्षालन ॥ परी एका शिववज्रावांचून ॥ न भेदे हा दोषगिरी ॥१६१॥
हे काशी सिंधूची लहरी ॥ दोषशोषणें सांडावया बाहेरी ॥ हे कथा मार्तंडाऐसी प्रकाश करी ॥ विध्वंसूनि दोषतमा ॥१६२॥
हे कथा असे सुखश्रव ॥ श्रवण होताचि नुरे किल्मिषठाव ॥ येर पुराणें कथाकाव्य ॥ मृगेंद्रापुढें जंबुक जैसे ॥१६३॥
नातरी हे कथा अध्वरं ॥ येथें श्रोते ते ऋत्विज परम पवित्र ॥ नाना द्रव्यें पद्यरचना मधुर ॥ अंतीं मोक्षपुरोडाशा भोगिती ॥१६४॥
कुलांचल असती अष्टकोनीं ॥ परी सर्वांठाये कैंचे मुक्तमणी ॥ तैसी काशीखंडकथेवांचोनी ॥ नाहीं कथा भवतारक ॥१६५॥
नाना तीर्थांमाजीं काशी ॥ व्रतांमाजीं जाण एकादशी ॥ कीं कथांमाजीं पुण्यकथा तैसी ॥ काशीखंड हें विशेष ॥१६६॥
हाही दृष्टांत एकदेशी ॥ गारा आणि चिंतामणीची स्पर्धा कायसी ॥ हालाहल आणि सुधारसासी ॥ अंतरं महदंतरं ॥१६७॥
काशीखंडकथामृतगोडी ॥ ब्रह्मादिकीं घेतली आवडी ॥ काशीखंड तोडी बांदवडी ॥ चौर्‍यायशीं लक्षांची तत्काळ ॥१६८॥
ऐसिया कथामृता ॥ दृष्टांत नव्हेचि सर्वथा ॥ एक मुखें वर्नितां ॥ केवीं येईल ॥१६९॥
आतां असो हें काय वाखाणणें ॥ सांगतां षडानन शिणे ॥ मी तंव मतिमंद अल्पगुणें ॥ काय वानूं सर्वथा ॥१७०॥
स्वामी म्हणे गा अगस्तिमुनी ॥ कथा परिसावी त्रिभुवनतारिणी ॥ शिवदास गोमा करी विनवणी ॥ कथा आदरें परिसावी ॥१७१॥
इति श्रीस्कंडपुराणे काशीखंड गंगामाहात्म्यवर्णनं नाम द्वात्रिंशाध्यायः ॥३२॥
श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥
॥ इति द्वात्रिंशाध्यायः समाप्तः ॥


N/A

References : N/A
Last Updated : September 29, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP