मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय २९ वा

काशी खंड - अध्याय २९ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥श्रीगणेशाय नमः ॥
ऐसें दारुण युद्ध दोघांचे होत ॥ दोघेही वीर बळवंत ॥ सावधान श्रोते हो एकचित्त ॥ पारसीवी कथा सादर ॥१॥
आतां शिवसुतें त्वरित ॥ अस्त्र योजिलें पाशुपत ॥ तेणें तारकाचे बाण बहुत ॥ पाताळगत केले पैं ॥२॥
बाण भेदूनि पाताळविवरो ॥ आदळलेले कूर्मपृष्ठीवरी ॥ तेणें ते दिग्गज चारी ॥ डोलवितो मस्तकांतें ॥३॥
ऐसे तारकासुरावरीं बाण ॥ तो निक्षेपी शिवनंदन ॥ जैसा वातस्पर्शेकरुन ॥ मालवतसे दीप ॥४॥
ऐसें देखोनि समरंगणीं ॥ तारकासुर क्रोधावला मनीं ॥ शिवसुत कोपला तयाहुनी ॥ दशगुणें अधिक ॥५॥
मग तारकासी वदला वचन ॥ आतां तुजपासूनि घेईन अमरस्थान ॥ जैसे मृगाचे करुनि खंडन ॥ घेइजे मृगमदासी ॥६॥
जैसी कर्दळी पाडिती क्षितितळा ॥ मग हात लाविती तियेचिया फळा ॥ तैसा आधीं कापीन तुझा गळा॥ मग घेईन अमरावती ॥७॥
पाहें पां वृक्ष जैसा वंदन । परिमळास्तव तयाचें कीजे खंडन ॥ कीं जैसा इक्षुदंड मिळोन ॥ घेइजे रसधारा ॥८॥
मुंक्तें घेइजे मारुनि मातंग ॥ शैल भूदूनि काढिजे पद्मराग ॥ तैसा हरोनि तुझा राज्यभोग ॥ घेईन मग अमरपुर ॥९॥
रत्नें होतीं क्षीरसागरीं ॥ म्हणोनि पीडिला सुरासुरीं ॥ तैसें तुज मारुनि अमरपुरी ॥ रत्न काढीन निश्चयें ॥१०॥
अठ्ठावीस युगेंवरे पूर्ण । युद्ध केलें तुवां पुरुषार्थकरुन ॥ आतां सत्यचि आलें अवसान ॥ तुझिया मृत्युचें ॥११॥
येथें पवित्र असे मंदाकिनी ॥ तुम्ही अशोभ्य रे अमरभुवनीं ॥ जैसा सुवर्णाचिया भूषणीं ॥ जडितां षाषाण ॥१२॥
लक्ष यज्ञ कीजे वाराणसी ॥ तेव्हां पाविजे अमरपदासीं ॥ तेथींचिया प्रेमसुखासी ॥ सुरेंद्राचि असे भोक्ता ॥१३॥
जैसीं सुवर्णमंदिरें तेजाळ ॥ त्यांमाजी भरिजे हालाहल ॥ तैसे तुम्ही दाटलेती दैत्यकुळ ॥ अमरभुवनीं सर्वही ॥१४॥
कीम सगुण सुलक्षण बाळा ॥ षंढाप्रति होत सोहळा ॥ कीं महादान द्यावयाला ॥ अंत्यज जैसा अयोग्य ॥१५॥
तैसी हे परम पवित्र अमरपुरी ॥ केवीं भोगिजे सदोषीं अप्सुरी ॥ जैसी रत्नमाळा मृगाघरीं ॥ शोभेल जाण कोठूनियां ॥१६॥
ऐसें वदला शिवकुमर ॥ मग प्रत्युत्तर देत तारकासुर ॥ जैसा पर्वकाळी राहुमुखीं शीतकर ॥ सांपडलासी मज तैसा ॥१७॥
तारक म्हणे शिवनंदना ॥ कोणें पढविलें ऐसिया वचना ॥ मजवांचूनिया अमरभुवना ॥ भोक्ता नसेचि त्रिभुवनीं ॥१८॥
स्त्रिया केवीं प्रहरिती कामभूत ॥ मृत्यूसी सांडी केवीं कृतांत ॥ तुम्हांसी करवीन रे कल्पान्त ॥ सर्व सुरांसमवेत पैं ॥१९॥
आरोग्य नाहीं मात्रेविरहित ॥ भोजनाविण जठरीं नव्हे तृप्त ॥ जंव नाहीं जिंकिला शिवसुतं ॥ तंववरी नेणा रे मज तुम्ही ॥२०॥
जैसा विझतेसमयीं दीपक ॥ प्रभा दावीतसे अधिक ॥ तैसा पंचत्वसमयी तारक ॥ वदतसे स्वामीसी ॥२१॥
ऐसें म्हणोनि काढिले नव बाण ॥ तेजें परमतीव्र मुखीं तीक्ष्ण ॥ त्यांचे दक्षिणांगी दारुण ॥ वसतसे हालाहल ॥२२॥
ते तो आकर्ण ओढी ॥ महात्राणें तारक सोडी ॥ ते व्योमीं संचरले झडाडी ॥ चंडावाताहूनि विशेष ॥२३॥
तरी ते अनिवार संधानें ॥ दिधले होते चतुराननें ॥ ते मोकलिले महात्राणें ॥ तारकें तेव्हां स्वामीवरी ॥२४॥
मग स्वामीनें प्रहरिले दहा शर ॥ निशी विध्वंसी जेवीं दिवाकर ॥ उभयतांचे संधान देखोनि सुरासुर ॥लपत जाहाले धरातळीं ॥२५॥
ऐसें संधान करी शिवकुमर ॥ तोडाक्या तारकाचे शर ॥ परी ते न खंडता अनिवार ॥ स्वामीअंगी प्रवेशले ॥२६॥
ऐसें तारकाचें संधान विकट ॥ षड्‌बाणीं भेदिलें सहा मुकुट ॥ तीन बाणीं केला शतकूट ॥ रथ स्वामीचा ते वेळीं ॥२७॥
ऐसें देखिनियां अनन्यसंधानं ॥ मस्तक तुकविती देवगण ॥ असुर योद्धा महाकठिण ॥ स्वामीसी केवीं आटोपे ॥२८॥
तंव तो सेनाधीशशार्दूळ ॥ शिव-हैमवतींचा बाळ ॥ क्रोधें लक्षूनियां भूगोळ ॥ पाडूं पाहे आकाश ॥२९॥
जेव्हां येतसे मृत्यूची घटिका ॥ तेव्हां विहंगमचालीं चालता पिपीलिका ॥ असो ऐसें खवळिलें त्या रुद्रकुमारका ॥ तारकासुरें प्रतापें ॥३०॥
ऐसें थोर आश्चर्य ते काळीं ॥ मानिलें देवदिक्पाळों ॥ तंव कृशानु आला तत्काळीं ॥ स्वामीजवळी ॥३१॥
तेणें दुसरा रथ आणिला ॥ तो केवळ भासे अग्नीचाचि ओतिला ॥ विरिंचिहस्तें होता निर्मिला ॥ मंत्रसिद्ध यागांतुनी ॥३२॥
ऐसा तो दिव्य स्यंदन ॥ कोणेपरी झाला निर्माण ॥ जेव्हां त्रिपुर दैत्यानें त्रिभुवन ॥ घातलें असे आकणांमाजी ॥३३॥
तैं कुरुक्षेत्रीं केला अध्वर ॥ यागीं बैसला होता सृष्टिकर ॥ अष्टही दिक्पतींचा साकार ॥ निपजला रथ तेधवां ॥३४॥
तंव अगस्ति म्हणे प्रियसुंदरी ॥ त्या हवनीम होतों मी आचार्य अध्वरीं ॥ सूर्य पूर्णाहुती घातली अवधारीं ॥ आकाशाहोनी शिवें ॥३५॥
तैं विष्णुआयुष्याची झाली संख्या पूर्ण ॥ म्हणूनि गर्विष्ठ झाला होता नारायण ॥ हेंचि जाणावें निमित्तकारण ॥ विपरीत बुद्धि ॥३६॥
तैं कोपरुढ झाला काशीश्वर ॥ उपायें छेदिलें विष्णूचें शिर ॥ मग युद्धास्तव रहंवर ॥ काढिला शिवें साक्षेपें ॥३७॥
मग अश्वमुख लावूनि हरी ॥ शिवें उठविला झडकरी ॥ सविता स्थापिला गगनोदरी ॥ विष्णुशीराचा करुनियां ॥३८॥
ऐसा अग्निदत्त नामें रहंवर ॥ त्यासी पंचमहाभूतांचा आधार ॥ तोही दिक्पतींचा सत्त्वांकुर ॥ निपजला दिव्य रथ ॥३९॥
रथचक्र जाहाले दिशाकुंजर ॥ पृथ्वी जाहालीसे रहंवर ॥ मेरु ध्वजस्तंभ जाहालास थोर ॥ आकाशाचा पताका ॥४०॥
सूर्य-अग्नींचीए दीप्ती ॥ समीरें समर्पिली आपुली गती ॥ धैर्य गांभीर्य युक्ती ॥ समर्पिली तेव्हां अंबुधीनें ॥४१॥
दिक्पता जाहाले रथाधिकारी ॥ रथरक्षण जाहाला वज्रधारी ॥ शस्त्रें घेऊनि रहंवरीं ॥ बैसला तो यमराज ॥४२॥
नैऋते घातलीं राक्षसभूतें ॥ विदारवया दैत्यांचीं प्रेतें ॥ पुष्परागरत्नीं बहुतें ॥ श्रूगारिला वरुणें तो ॥४३॥
रजनीकरें दिधली प्रभाज्योती ॥ ईशानरुद्रे महाशक्ती ॥ ऐसे रथाधिकारी जाहाले दिक्पती ॥ सर्वही तेथें मिळूनियां ॥४४॥
मग त्या रथीं बैसोनि शंकरें ॥ कापिलीं त्रिपुरदैत्यांची शिरें ॥ मग रथ ठेविला भवानी वरें ॥ अग्नीजवळी ॥४५॥
तो रहंवर अग्निदत्त पूर्ण ॥ शिवाआज्ञेनें आणी हुताशन ॥ त्यावरी आरुढला षडानना ॥ जैसा त्रिपुरवधीं शिव तो ॥४६॥
ऐसा देखिनि रहंवर ॥ खेदातें पावला तारकासुर ॥ मग कोपला शिवकुमर ॥ प्रलयकृतांतासारिखा पैं ॥४७॥
मग काढिला निर्वाण शर ॥ पंचमुख जैसा रुद्र ॥ कीं तो महाप्रलयींचा अंगार ॥ दाहीतसे त्रिभुवन ॥४८॥
तो बाण होता शिवनिर्मित ॥ चतुःपक्षीं धुंधावत ॥ स्वामीचिया आज्ञें होत ॥ मनापरीस वेग त्याचा ॥४९॥
मग चाप सज्जिलें ते अवसरीं ॥ कार्मुक बोले गगनोदरीं ॥ गोंफा टेंकूनि मेरुपाठारें ॥ घेतली ओढी आकर्ण ॥५०॥
मग रुद्रास्त्र जपोनि मूलमंत्री ॥ दिधलें बाणाचिया वक्रीं ॥ तो बाण देखूनि धरित्री ॥ जाऊं पाहे रसातळा ॥५१॥
अकरा रुद्रांचा पराक्रम ॥ तो घेऊनि उद्भवला शरोत्तम ॥ तो हा तारकाचा संग्राम ॥ न भूतो न भविष्यति ॥५२॥
मग बाण ओढिला जी गुणीं ॥ उद्भवली प्रळयमेघांची ध्वनी ॥ तेणें बधिरत्व श्रवणीं ॥ आलें दिग्गजांचिया ॥५३॥
सीमा सांडिली सप्त सागरें ॥ दुमदुमलीं सप्त पाताळविवरें ॥ कीं उद्भवलिया एकसरें ॥ लक्षकोटी विद्युल्लता ॥५४॥
मग तारकाचें कंठस्थान ॥ दृष्टीं लक्षीतसे शिवनंदन ॥ बाण सुटला धनुष्यापासून ॥ प्रळयचपळा जैसी कां ५७॥
त्राणे आदळला तारककंठी शर ॥ तेणें भेदितांचि शरीर ॥ पडला तो भूमीवर ॥ जैसा पर्वत वज्रहत ॥५८॥
कीं चंडवातें पडे तरुवर ॥ समूळ उन्मळूनि सत्वर ॥ कीं मेरुचि पडिला पर्वतवर ॥ स्वामीचा कर निवाला तेव्हां ५९॥
शिर तोडूनियां सप्तपाताळें ॥ बाणें भेदिली ते महाबळें ॥ तेणें संहारिलीं असुरकुळें ॥ एकादश कोटी पैं ॥६०॥
ऐसा तो महाबाणनायक ॥ जो तारकाचा पूर्ण अंतक ॥ कीं तो प्रळयींचा थोर पावक ॥ जो वसे तृतीयनेत्रीं ॥६१॥
ऐसा तो पडिला तारकसुर ॥ कीं तो नंदिकेश्वरे उचलिला मेरु समग्र ॥ रणस्थानीं लोटला सागर ॥ शोणिताच ॥६२॥
तारकासुराचें तें शिरकमळ ॥ जैसा प्रलयमेघ ढिसाळ ॥ कीं समुद्रमथनीं मंदराचळ ॥ मागीं टाकिला देवांनी ॥६३॥
ऐसा तारक पडिला भूतळीं ॥ शेषं असुर पळाले पाताळीं ॥ तेव्हां सुरगण ते वेळीं ॥ करिते जाहाले सुमनवृष्टी ॥६४॥
अठ्ठावीस युगेंवरी क्षत्रियाचार ॥ प्रौढीं झुंजला तारकासुर ॥ अमरावतीये वज्रधर ॥ स्थापिला तेव्हां स्वामीनें ॥६५॥
मग सर्व देवांसह सुरपती ॥ स्वामीची करिता जाहाला स्तुती ॥ म्हणे जयजयाजी विकटाकृती ॥ षडानना बलार्णवा तूं एक ॥६६॥
स्वामी तुझिया क्रीडाविनोदें ॥ महासंतोषी भक्तवृंदे ॥ प्रमथ सुखें भोगिता पदें ॥ तुमचे प्रसादेंकरुनी ॥६७॥
आतां असो हे स्तुती ॥ हा अध्याय जे श्रवण करिती ॥ तयांसी प्राप्त होय अविमुक्ती ॥ अतीं धडे कैलासवास ॥६८॥
हा प्रसंग भावें जे परिसिती ॥ तयांच्या पुण्या नाहीं मिती ॥ स्कंदपुराणीं व्यासमूर्ती ॥ वदले तेंचि प्राकृत बोलिलो ॥६९॥
अगास्ति लोपामुद्रेकारण ॥ तो हा कार्तिकेय शिवनंदन ॥ याचें समूळ उत्पत्ति कथन ॥ तुज असे हें निरुपिलें ॥७०॥
तो ह शिवसुत षडानन । चला घेऊं तयाचें दर्शन ॥ श्रोतीं होइजे सावधान ॥ पुढलिया कथेसी ॥७१॥
आतां स्वामी आणि अगस्तीची भेटी ॥ परिसतां प्रसन्न होय धूर्जटी ॥ आणि पराभवती कल्मषकोटी ॥ म्हणे शिवदास गोमा ॥७२॥
इति श्रीस्कंदपुराणे काशाखंडे तारकासुरवधो नाम एकोनत्रिंशाध्यायः ॥२९॥
श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥


N/A

References : N/A
Last Updated : September 29, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP