|
अ.क्रि. १ निसरणें ; निसटणें ; घरळणें ; सुळकणें ; उतरणीवरून , घसरडयावरून खरकत , गरंगळत जाणें . २ ( ल . ) एखाद्याच्या अंगावर जोरानें , त्वेषानें तुटून पडणें , चाल करून जाणें , चढाई करणें ; एखाद्यास रागें भरावयाला , निंदायला आवेशानें पुडें सरसावनें ; अखाद्यावर जोराचा शाब्दिक हल्ला चढविणें ; एखाद्याच्या तोंडास लागणें . जोत्याजी त्याच्यावर घसरून पडला . - स्वप ३१ . दोघांना फसविण्याचा त्यानें बेत केला पण दोघे त्याजवर घसरले . - विवि ८ . ६ . ११० . ३ एखाद्या कामास आवेशानें , जोरानें लागणें , जुंपून घेणें . तें काम मी चार दिवस घसरून तडीस नेलें . ४ चुकणें ; चळणें ; च्यवणें . बोलत होता ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी , मग जो घसरला तो रांडबाजीच्या गोष्टी सांगू लागला . ५ अधिकार , हुद्दा , आश्रय इ० कांपासून च्युत होणें ; ( नोकरींतून ) कमी होणें ; बडतर्फ होणें ; तो त्या मामलतीवरून घसरला . ६ ( शरीर इ० ) क्षीण होणें ; झडणें ; ( शरीरप्रकृति ) ढांसळणें ; अलीकडे त्याची प्रकृति बरीच घसरली आहे . ७ मूळ स्वरूप नष्ट होणें , र्हास पावणें ; उच्चपदावरून ढळणें ; उतरती कळा लागणें . चांदीचा भाव घसरला आहे . - के १० . ६ . ३० . ( व्यवहारांत , व्यापारांत खोंच बसल्यानें ) खालीं येणें ; डबघाईस येणें . त्या व्यापारांत पांच हजाराची खोंच येतांच तो घसरला . ८ ( धैर्य , आत्मविश्वास ) गलित होणें , गारठणें , पार निघून जाणें , नष्ट होणें , ढळणें , डगमगणें , डळमळणें . ९ ( मनुष्य ) खचणें ; डगमगणें ; कचरणें ; हटणें . १० ( व . ) पळून जाणें ; पोबारा करणें ; हातावर तुरी देणें . [ घ्व . घस + सं . सृ - सर ; किंवा सं . घर्षण , म . घासणें , सिं . गीसिरणु ]
|