जनक म्हणतो आहे कीं, संपूर्ण उपाधिरहित जें माझें निरंजनस्वरुप आहे त्यामध्यें पंचमहाभूतें, सूक्ष्म कार्य करणारीं इंद्रियें, मन, शरीर व शून्यावस्था इत्यादि कल्पित गोष्टी मनच नाहींसें झाल्यानें कशा असूं शकतील ? मीच त्यांचा साक्षी आहें. ॥१॥
हे गुरो ! मला शास्त्राशीं वा शास्त्रजन्य ज्ञानाशीं काय करायचें आहे ? आत्मविश्रांतीशीं, सर्व वासना गळून गेल्यानें वासनेशीं वा वासनाविरहितेशीं, तृप्ति किंवा तृष्णा, द्वंद्व यांच्याशीं काय करावयाचें आहे ? कारण मी शांतरस ब्रह्म आहें. ॥२॥
मला विद्या किंवा अविद्या कुठें ? अहंकार कुठला ? बाह्य वस्तु कुठली ? ज्ञान कसलें ? माझा कुणाशीं संबंध आहे ? संबंध दुसर्याशीं असतो. मला दुसरा कुणी नाहीं. बन्ध आणि मोक्ष मला नाहींत. माझ्या निर्विशेष स्वरुपाला धर्म नाहीं आणि निधर्मक माझ्या स्वरुपाला विद्येचाही धर्म नाहीं. ॥३॥
निर्विशेष, निराकार, निरवयव अशा माझ्या आत्म्याला प्रारब्धकर्म कुठलें ? जीवन्मुक्ति व विदेहमुक्ति कुठली ? ॥४॥
सदा स्वभावरहित अशा मला कर्तेपण कुठलें ? आणि भोक्तेपण कसलें ? निष्क्रियता वा स्फुरण, प्रत्यक्ष ज्ञान अथवा विषयाकार वृत्तीनें मिळणारें फळ हीं सारीं मला कशीं असणार ? ॥५॥
अद्वैत आत्मस्वरुपांत लोक कुठले ? मुमुक्षु कुठला ? योगी वा ज्ञानवान, बद्ध वा मुक्त कसा असेल ? केवळ अद्वैत आत्माच असेल. ॥६॥
अद्वैत अशा आत्मस्वरुपाला सृष्टिनिर्माण वा संहार, साधन आणि साध्य व साधक व सिद्धि इत्यादि गोष्टी कशा
असतील ? ॥७॥
सर्वदा निर्मलरुप मला प्रमाता, प्रमाण व प्रमेय आणि प्रमा, कमी वा अधिक अशा गोष्टी कुठल्या ? ॥८॥
सर्व क्रियारहित असें जें माझें आत्मरुप आहे त्याला विक्षेप वा एकाग्रता, कुठलें ज्ञान वा मूढता, कसला हर्ष अथवा खेद असणार ? ॥९॥
सर्वथा निर्मळ अशा आत्मस्वरुपाला कुठला व्यवहार वा परमार्थ, सुख वा दुःख असूं शकेल ? ॥१०॥
सर्वार्थानें विमल अशा आत्मस्वरुप मला कुठली माया वा संसार, प्रीति अथवा द्वेष, जीवभाव किंवा ब्रह्मभाव असणार ? ॥११॥
सर्वदा स्थिर, कूटस्थ आणि विभागरहित अशा मला प्रवृत्ति किंवा निवृत्ति, बंधन आणि मुक्ति या गोष्टी कुठल्या ? ॥१२॥
उपाधिरहित, कल्याणरुप आत्मस्वरुप अशा मला कसला उपदेश वा कसलें शास्त्र, कुठला शिष्य अथवा कुठला गुरु आणि कुठला मोक्ष असूं शकेल ? ॥१३॥
मला आहे अथवा नाहीं असें स्फुरण नाहीं, न अद्वैत न द्वैत आहे. फार सांगण्याचें प्रयोजन नाहीं. चैतन्यस्वरुप माझ्यांत कांहींच अहं स्फुरण नाहीं. ॥१४॥