अष्टावक्र म्हणला
केलेलीं आणि न केलेलीं कर्में व सुख-दुःख द्वंद्व कुणाची कधीं शांत झालेलीं आहेत ? हें समजून घेऊन या संसारांत उदासीन-निर्वेद होऊन अव्रती (अनाग्रही) व त्यागपरायण हो. ॥१॥
हे प्रिय, लोकव्यवहार, उत्पत्ति आणि विनाश पाहून कुणा भाग्यशालीचीच जगण्याची कामना, भोगण्याची वासना व ज्ञानाची इच्छा शांत झाली आहे. ॥२॥
हें सारें अनित्य, तीन तापांनीं दूषित, सारहीन, निंदित व त्याज्य आहे, असा बोध अवलोकनानें होऊन निश्चय होतांच तो शांतीला प्राप्त होतो. ॥३॥
असा कोणचा काळ आहे, कोणचें वय-अवस्था आहे कीं, जेव्हां मनुष्याला द्वंद्व नव्हतें, सुखदुःख नव्हतें ? म्हणून त्यांची उपेक्षा कर. यथाप्राप्त----जें मिळालें त्यांत----परिस्थितींत संतोष मानणारा मनुष्य सिद्धीला प्राप्त होतो. ॥४॥
महर्षींचीं, साधूंचीं, योग्यांचीं अनेक भिन्नभिन्न मतें आहेत, हें पाहून बुद्धिमान मनुष्य त्यांच्या मतांची उपेक्षा करतो. त्यांच्या मातांच्या गुंत्यांत अडकत नाहीं व शांति मिळवितो. ॥५॥
जो उपेक्षा, समता आणि युक्तिद्वारा चैतन्याच्या सत्यस्वरुपाला जाणतो तो काय गुरु नाहीं ? (तोच स्वतःचा स्वतः गुरु आहे. गुरु आंत आहे. बाहेरचा गुरु केवळ प्रतीकरुप आहे.) ॥६॥
भूतमात्रांचे विकार (इंद्रियादिक) यथार्थरुपानें पाहा म्हणजे शरीरादिकांपासून अलग होऊन तूं आत्मस्वरुपांत स्थित होशील आणि साक्षीभूत आत्मा तुला प्रतीत होईल. ॥७॥
वासना हाच संसार आहे म्हणून वासना गेली कीं संसार गेला, असें जो जाणतो तो सर्वांपासून मुक्त झाला. मग आतां जें आहे, जसें आहे, त्या सर्वांचा स्वीकार आहे. ॥८॥