अष्टावक्र म्हणाला
हे प्रिय ! अनेक प्रकारांनीं नाना शास्त्रें ऐक वा सांग, परंतु तें सर्व ज्ञान विसरल्याशिवाय तुला शांति मिळणार नाहीं. ॥१॥
हे ज्ञानवान, वाटलें तर तूं भोग भोग, समाधींत राहा किंवा कर्म करीत राहा, पण आत्मज्ञानाच्या प्रभावानें ज्या वेळीं तूं सर्व आशांपासून दूर राहाशील तेव्हांच तुझें चित्त स्वस्थ होऊन तूं सुखावशील. ॥२॥
हे शिष्या ! शरीराच्या निर्वाहा(सुखा)करितां अतिसायास-श्रम केल्यानें सर्व जण दुःखी होतात हें कोणी जाणत नाहीं, म्हणून महापुरुष सहजप्राप्त असेल त्याचा स्वीकार करुन स्वस्थ राहातात. ॥३॥
जो ज्ञानवान जीवन्मुक्त पुरुष आहे त्याला डोळ्यांच्या पापण्या उघडणें मिटणेंही खेदकारक वाटतें. इतका जो प्रवृत्ति-क्रियांबद्दल आळशांतला आळशी आहे व सर्व व्यवहार-संसारवृत्तींपासून निवृत्त झाला, त्यालाच सुखाची प्राप्ति होते, इतर कुणाला नव्हे. ॥४॥
हें काम केलें, साधलें, तें केले नाहीं-यशस्वी झालें नाहीं, या मनाच्या वासनाद्वंद्वांतून जो मोकळा झाला त्याला मग धर्म, अर्थ, काम व मोक्षाच्याही इच्छांतून सुटतां येतें. ॥५॥
जो मुमुक्षु विषयांचा राग करुन त्याग करतो तो विरक्त व जो विषयांवर लोलुप झाला त्याला विषयासक्त म्हणतात, पण जो इच्छारहित होऊन विषयांचा त्याग व भोगाचा विचारच करीत नाहीं तो जीवन्मुक्त असतो. ॥६॥
जोंपर्यंत तृष्णा आहे तोंपर्यंत संसारवृक्षाला हें घ्यावें, तें टाकावें असे अंकुर सतत फुटतच राहातात. साक्षी वृत्तीनें राहाणार्या जीवन्मुक्ताला प्रारब्धवश जें काय होईल त्याचा व जें नष्ट होईल त्याचा हर्षखेद होत नाहीं. ॥७॥
मन विषयांकडे जाऊं लागतांच विषयांबद्दल मोह निर्माण होतो, विषयांचा वीट आल्यावर त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण होतो. परंतु मुक्त पुरुष रागद्वेषांचा त्याग करुन, जें दैवयोगानें प्राप्त होतें त्याचा साक्षीभावानें स्वीकार करीत असल्यानें विकाररहित असतो. ॥८॥
हे शिष्या ! दुःखांच्या अनुभवानें विषयी-संसारी मनुष्य संसाराचा त्याग करण्याची कामना ठेवतो, तसा प्रयत्न करतो. पण ज्याचे सर्व विकार शमले आहेत व त्यामुळें दुःखताप गेले आहेत तो संसारांत असूनही त्याचा खेद करीत नाहीं. ॥९॥
ज्याला मोक्षाची तीव्र हाव आहे, तो मिळवीनच अशी जिद्द आहे व देहाबद्दल तशीच तीव्र ममता आहे तो ज्ञानी व योगी होऊं शकत नाहीं. तो केवळ दुःखाचा वाटेकरी असतो. ॥१०॥
हे जनका ! तुला महादेव उपदेश करो कीं विष्णु उपदेश करो अथवा ब्रह्मा उपदेश करो ! जोंपर्यंत तुझ्या मनाच्या सर्व क्रिया थांबून, भूत व भविष्याचा विचार सुटून तूं वर्तमानकाळांत निर्विचार, साक्षी होऊन राहात नाहींस तोंपर्यंत तुला शांतता लाभणार नाहीं. ॥११॥