गुरुपदेशानें कृतार्थ झालेला जनकराजा आपला अनुभव श्रीगुरुंना धन्यतापूर्वक सांगत आहे.
जनक म्हणाला
शिष्य श्रीगुरुंच्या मुखानें तत्त्वज्ञानी पुरुषाच्या स्वाभाविक शांतीचें श्रवण करुन, स्वतःला कृतार्थ समजून, आतां श्रीगुरुंना आपली गुरुपदेशानें झालेली अवस्था वर्णन करीत आहे.
हे श्रीगुरो ! आपण परमकृपेनें आपल्या अमोघ वाणीनें माझ्या हृदयांतील नाना प्रकारचीं शल्यें, संकल्प व विकल्प दूर केल्यानें आतां मी कृतार्थ झालों आहें व आतां माझी स्थिति अशी झाली आहे. ॥१॥
स्वतःच्या महिम्यांत स्थित झाल्यानें मला आतां धर्म, काम, अर्थ, विवेक, द्वैत-अद्वैत हें कांहींच उरलें नाहीं. ॥२॥
आपल्या कृपेनें लाभलेल्या स्वमहिम्न्यांत सदैव स्थित झाल्यानें आतां मला भूतकाळ वा भविष्यकाळ किंवा वर्तमानकाळ, तसेंच अमूक एक देश असा राहिला नाहीं. ॥३॥
स्वमहिम्यांत स्थित झाल्यानें आतां मला आत्मा-अनात्मा, शुभ-अशुभ, चिन्ताअचिन्ता अशा कुठल्याच गोष्टी राहिल्या नाहीत. ॥४॥
आतां मला स्वप्न नाहीं वा सुषुप्ति नाहीं, जागृति नाहीं वा तुरीय अवस्था नाहीं, भयही उरलेलें नाहीं. आतां मी स्ववैभवांत आहे. ॥५॥
स्वमहिम्यांत निमग्न झालेल्या मला आतां दुरचें काय वा जवळचेम काय, बाहेरचें काय नि अंतरांतील काय ? स्थूल वा सूक्ष्म असें काय राहाणें शक्य आहे ? ॥६॥
’स्व’ रुपांत राहाणार्या मला मृत्यु कुठला नि जीवित कुठलें ? लोक आणि लौकिक कुठला किंवा लय अथवा समाधि कुठली ? ॥७॥
आत्म्यांत विलीन झालेल्या मला धर्म, अर्थ, काम, योगाबद्दलच्या गोष्टी अथवा विज्ञानकथा आतां पुरे झाल्या-त्यांची आवश्यकता नाहीं. ॥८॥