जनक म्हणाला
हे श्रीगुरो ! मी सर्व शारीरिक कर्मांचा त्याग, जप-पाठादि वाणीच्या कर्मांचा त्याग करीत शेवटीं मनांत येणार्या विचारांचाही त्याग करुन साक्षीभावांत राहूं लागल्यानें मी आत्मस्वरुपांत लीन झालों आहें.॥१॥
अदृश्य अशा आत्म्याचें, तो ध्यानाचा विषय होऊं शकत नसतांनाही, शब्द, विचार व रुप यांच्या संवयीनें, त्यांच्या द्वारां ध्यानाची क्रिया करणें हाच विक्षेप-बाधा आहे. त्यामुळें ध्यान करण्याच्या क्रियेविरहित होऊन, मी स्व-रुपांत स्थिर आहे. ॥२॥
जड समाधी साधण्याकरितां मनानें संकल्पाची व इतर योगक्रिया करणें हा नियम, हाच अध्यास आहे व मनाच्या व्यापाराची सहजसमाधीला आवश्यकता नाहीं. त्यामुळें त्या समाधीशिवाय मी आत्मानंदांत आहें. ॥३॥
हे प्रभो, टाकण्यायोग्य आणि घेण्यायोग्य वस्तूंचा अभाव असल्यानें, अर्थात् आत्मज्ञानाची प्राप्ति झाल्यानें मला टाकण्यासारखें किंवा घेण्यासारखें कांहीं राहिलें नाहीं व त्यामुळें हर्षविषादही गेले व आतां मी आपल्या स्वरुपांत स्थिर झालों आहें. ॥४॥
आश्रमधर्म व त्याचीं फळें, त्यागी संन्याशाचा अनाश्रमीचा दंडधारणादि धर्म व योग्याचा धारणध्यान इत्यादीचा धर्म या विरहित मी आहें. या सर्वांचा मी साक्षी चिद्रूप आहें. ॥५॥
कामनेमुळें कर्माचें अनुष्ठान करणें किंवा कामनापूर्ति होणार नाहीं हें जाणून तिचा त्याग अज्ञानामुळें होतो, हें नीट ठाऊक असल्यानें मी कर्म करण्याची वा टाकण्याची इच्छा करीत नाहीं व स्वतःच्या नित्यानंदस्वरुपांत स्थिर राहातों. ॥६॥
अचिंत्य अशा ब्रह्माचें चिंतन करतांना, मनानें चिंतनाची क्रिया केली जाते म्हणून मनाच्या त्या क्रियेचा -विचाराम्चा त्याग करुन, मी ’स्व’भावांत राहातों ॥७॥
ज्या पुरुषानें या प्रकारें शरिराच्या व मनाच्या सर्व सर्व क्रियांचा त्याग करुन आपल्या ’स्व’ रुपाला जाणलें तोच कृतार्थ म्हणजेच जीवन्मुक्त होतो. अशा क्रियारहित सहज अवस्थेंत जो राहातो तोच या देहांत असूनही विदेहमुक्ति अनुभवत असतो. ॥८॥