जनक म्हणाला
मी आकाशाप्रमाणें आहें. संसार घडयाप्रमाणें प्रकृतिजन्य आहे (बनतो व पुष्ट होतो, आकाशावर याचा कांहीं परिणाम होत नाहीं. कारण साक्षी तर आकाशासारखा अलिप्त आहे.) यामुळें याचा न त्याग करायचा आहे, न स्वीकार करायचा आहे, न लय करायचा आहे असें मी जाणतों. ॥१॥
मी समुद्रासारखा आहें. हा संसार तरंगासारखा आहे. म्हणून याचा त्याग किंवा स्वीकार करायचा नाहीं असें मी जाणतों. ॥२॥
मी शिंपल्यासारखा आहें. विश्वाची कल्पना शिंपल्यावरच्या चांदीसारखी आहे, असें ज्ञान आहे. म्हणून न त्याचा त्याग आहे, न स्वीकार आहे, न लय आहे. ॥३॥
मी सर्व भूतांत आहें व सर्व भूतें माझ्यांत समाविष्ट आहेत त्यामुळें कशाचा न त्याग आहे, न ग्रहण आहे, न लय आहे. ॥४॥