अष्टावक्र म्हणाला
आत्मज्ञानाचें फळ त्याच पुरुषाला मिळतें आणि त्याच पुरुषाचा योगाभ्यास सुफलित होतो, ज्यानें विषयवासनांचा त्याग करुन आपलीं इंद्रियें निर्मळ केलीं व ’स्व’ मध्येंच जो राहिला आहे. ॥१॥
हे जनका, या संसारांत तत्त्ववित् ज्ञानी कधीं खेदाला प्राप्त होत नाहीं. कारण तो जाणतो कीं, माझ्या एकटयानेंच हें सर्व विश्व व्यापलें आहे. खेद द्वैतानें होत असतो. अद्वैत असल्यावर खेद कसला ? ॥२॥
मधुर रसाच्या सल्लकी नांवाच्या वेलींचा चारा खायला मिळाल्यावर कडू असलेला कडुलिंबाचा पाला हत्ती खात नाहीं त्याप्रमाणें जो आत्मानंदांत रममाण झाला त्याला विषयांचा आनंद आनंदित करुं शकत नाहीं. ॥३॥
हे जनका, ज्या पुरुषाला गतकालांत भोगलेल्या भोगांबद्दल आसक्तिपूर्ण स्मरण होत नाहीं किंवा न भोगलेल्या भोगांबद्दल आकांक्षा निर्माण होत नाहीं, परंतु जो आपल्या आत्म्यांतच तृप्त आहे असा पुरुष संसारसागरांत विरळाच असतो. ॥४॥
या जगांत मुमुक्षु-आकांक्षा करणारे अनेक प्रकारचे पाहायला मिळतात परंतु भोग आणि मोक्ष यांच्या आकांक्षारहित आणि परब्रह्माच्या बाबतींत कामनारहित स्थित असा पुरुष क्वचितच सांपडतो. ॥५॥
हे शिष्या, जगांत असा पुरुष दुर्लभ आहे कीं जो धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, तसाच जगणें आणि मरणें, या सर्वांबद्दल उदासीन----कामनारहित असा आहे. ॥६॥
विश्वाचा लय व्हावा अशी इच्छा ज्या ज्ञानी पुरुषाला नाहीं किंवा विश्व स्थिर राहिल्याबद्दल ज्याला राग नाहीं, अर्थात् प्रपंच राहो वा नष्ट होवो, याबद्दल जो उदासीन आहे व यथाप्राप्त आजीविकेद्वारा संतुष्ट राहात असतो तो धन्य होय. ॥७॥
मी अद्वैत आत्मज्ञानानें कृतार्थ झालों आहें अशीही जाणीव ज्या पुरुषाला शिवत नाहीं व बाह्य इंद्रियांचें पाहाणें, ऐकणें, स्पर्श करणें, वास घेणें, खाणें इत्यादि व्यवहार तो सामान्य संसारी माणसाप्रमानें करीत असला तरी आत्मवृत्तीचा भंग---व साक्षी अवस्था सुटणें या गोष्टी होत नाहींत. ॥८॥
ज्या पुरुषाचा संसारसागर क्षीण झाला आहे, त्याला विषयांची इच्छाही होत नाहीं किंवा विरक्त होण्याचीही इच्छा होत नाहीं. त्या ज्ञानी पुरुषाचें मन, शरीर व इंद्रियें बालकाप्रमाणें किंवा उन्मत्ताप्रमाणें व्यापारशून्य होतात व त्याच्या शरिराची हालचालही उद्दशहीन व वृथाच होत असते. ॥९॥
ज्ञानी पुरुष सामान्य माणसाप्रमाणें बाह्य विषयांकडे डोळे उघडून जागा राहात नाहीं. कारण त्याला बाह्य विषय न दिसतां परब्रह्मच दिसतें. तसाच तो डोळे बंद करुन झोपतही नाहीं. कारण झोपलेल्याची बाह्य विषयांची जाणीव संपते पण ज्ञानी पुरुषाचें अनुसंधान झोपेंतही सुटत नाहीं, आणि त्यामुळें ज्ञानी पुरुष केवढी मुक्तदशा अनुभवतो तें आश्चर्यजनक आहे. ॥१०॥
सर्व वासना गळून पडल्यानें, निर्मळ , प्रसन्न व शांत झालेला जीवन्मुक्त सर्व अवस्थांत एकरस ब्रह्मरुपानें सर्वत्र प्रकाशमान होतो. ॥११॥
सर्वत्र पाहातांना, ऐकतांना, स्पर्श करतांना, वास घेतांना, खातांना, घेतांना, बोलतांना, चालतांनाही ज्ञानी इच्छाद्वेषरहित असतो. कारण त्याची ब्रह्मानंदीं टाळी लागलेली असते. ॥१२॥
मुक्त पुरुष कोणाची निंदा करीत नाहीं, कोणाची स्तुतीही करीत नाहीं, हर्षही पावत नाहीं व रागावतही नाहीं, कुणाला कांहीं देत नाहीं, कुणाकडून घेत नाहीं; तो सर्वत्र रसहीन-आसक्तिहीन वृत्तीनें असतो. ॥१३॥
कामुक स्त्रियांना पाहून वा मृत्यु जवळ उभा ठाकला असतां ज्याचें मन कासावीस होत नाहीं तोच मुक्त पुरुष होय. ॥१४॥
ज्याचें चित्त सुखांत आणि दुःखांत, संपर्कांत आलेल्या स्त्रीपुरुषाबद्दल, संपत् आणि विपत् कालांत समतोल राहातें त्या धीर पुरुषालाचा जीवन्मुक्त म्हणतात. ॥१५॥
जीवन्मुक्त पुरुष कोणाची हिंसा करीत नाहीं तसेंच कोणावर दया करण्याकरितां हपापत नाहीं. तो कुणाशीं उर्मटपणानें वागणार नाहीं तसाच कोणापुढें दीन होणार नाहीं. त्याला कशाचें आश्चर्य वाटत नाहीं तसाच कशानें त्याला क्षोभ-राग येत नाहीं. ॥१६॥
जीवन्मुक्त पुरुष विषयांचा द्वेष करीत नाहीं तसाच तो विषयलोलुपही असत नाहीं. प्रारब्धवशात् जें प्राप्त होतें वा अप्राप्त असतें त्या परिस्थितीचा तो आसक्तिरहित बिनतक्रार स्वीकार करतो. ॥१७॥
कुठल्या गोष्टीच्या प्राप्तीनें समाधान होणें, न मिळण्यानें असंतोष होणें, हें हिताचें आहे, हें नुकसानकारक आहे अशा विकल्पना शून्यचित्त पुरुष जाणत नाहीं. तो कैवल्यांत स्थित असतो. ॥१८॥
हे जनका ! अंतरंगांतील सर्व आशा-ममता-अहंकार गळून पडल्यानें जो केवळ अस्तित्वमात्र उरला आहे, तो सर्व करुनही त्यांत लिप्त होत नाहीं. ॥१९॥
हे जनका ! मनाच्या प्रकाशांत विचारलहरी उत्पन्न झाल्यानें निर्माण होणारा मोह, कल्पना-स्वप्नें, मनोराज्यें व जडता या सर्व गोष्टी-मनाचे सर्व व्यापारच गळून पडल्यानें व मनाचें अस्तित्वच गेल्यानें जीवन्मुक्त सदा अनिर्वचनीय अशा दशेंत राहात असतो. ॥२०॥