अष्टावक्र गीता - अध्याय २

अष्टावक्र गीता म्हणजे आयुष्यातील महत्वाचे जीवनसार होय. या गीतेत अद्वैत वेदांत असून, यात अष्टावक्र आणि मिथील नरेश जनक यांमधील संवाद आहे.

Ashtavakra gita is a perfect moral of life.


जनक म्हणाला

आश्चर्य ! आपण काय सांगत आहां ? मी निर्दोष आहें, शान्त आहें ! बोध आहें ! प्रकृतीच्या पलीकडचा आहें ! आश्चर्य आहे कीं इतके दिवस मी मोहानें फसलों होतों. ॥१॥

जसा या देहाला एकटा मी प्रकाशित करतों, तसाच सार्‍या संसारालाही प्रकाशित करतों. म्हणूनच एक तर हें सर्व जगत्‌ माझें आहे किंवा माझें कांहींच नाहीं. ॥२॥

आश्चर्य आहे कीं, शरीरासुद्धां सार्‍या जगाचा त्याग करुन कुठल्या तरी कौशल्यानें अर्थात्‌ अष्टावक्राच्या केवळ उपदेशानेंच मी परमात्मा पाहात आहें. ॥३॥

जशा पाण्यावर लाटा-लहरी उठतात, बुडबुडे व फेस उठतो पण ते पाण्यापेक्षां वेगळे नाहींत, त्यावरच उठतात व त्यांतच नाहींसे होतात. त्याप्रमाणेंच आत्म्याहून भिन्न इथें काहीं नाहीं. सर्व अभिन्न आहे. ॥४॥

विचार केला असतां वस्त्र म्हणजे तंतूंचा समुदाय-तंतूच; तसेंच, विचार केला असतां हा संसारही आत्मसत्ताच आहे. ॥५॥

उसाच्या रसापासून बनलेल्या साखरेंत जसा उसाचा रस असतोच, तसा माझ्यांतून निर्माण झालेल्या विश्वांत मी आहेंच.

॥६॥

आत्म्याबद्दलच्या अज्ञानानें संसार भासतो पण त्याचें ज्ञान झालें तर तो भासत नाहीं. जशी दोरी अज्ञानामुळें----माहीत नसल्यानें----सापासारखी भासते, पण ती दोरी आहे असें ज्ञान होतांच तशी वाटत किंवा भासत नाहीं. ॥७॥

प्रकाश माझें स्वरुप आहे. मी त्याहून वेगळा नाहीं. जेव्हां विश्वसंसार प्रकाशित होतो तेव्हां तो माझ्या प्रकाशानेंच प्रकाशित होतो. ॥८॥

आश्चर्य आहे कीं, कल्पित संसार अज्ञानामुळें मला असा भासतो-जशी शिंपल्यांत चांदी, दोरीवर साप व सूर्यकिरणांवर पाणी (मृगजळ) भासतें. ॥९॥

माझ्यापासून निर्माण झालेला हा संसार माझ्यांत तसाच लय पावेल. जसा मातींत घडा, पाण्यांत लहर (लाट) व सोन्यांत दागिना विलीन होतो. ॥१०॥

मी आश्चर्यमय आहें ! मला नमस्कार असो ! ब्रह्मयापासून ते तृणापर्यंतच्या सार्‍या जगाचा नाश झाला तरी मला नाश नाहीं. मी नित्य आहें. ॥११॥

मी आश्चर्यकारक आहें. मला नमस्कार असो. मी देहधारी असूनही अद्वैत आहें. न कुठें जातों, न येतों; आणि सार्‍या विश्वाला निराकार, साक्षीरुप, द्रष्टामात्र असा होऊन मी व्यापून उरतों. ॥१२॥

मी आश्चर्यमय आहें. मला नमस्कार असो. माझ्यासारखा निपुण कोणीच नाहीं. कारण शरीराला स्पर्श न होतां या विश्वाला कायम धारण करुन असतों. ॥१३॥

मी आश्चर्यमय आहें. मला नमस्कार असो. एका अर्थी माझें कांहींच नाहीं. कारण मीच नाहीं आहें. ’मी’ च शिल्लक उरलों नाहीं, मग माझें काय असणार ? तेव्हां एका अर्थानें माझें कांहींच नाहीं आणि एका अर्थानें सर्व कांहीं माझें आहे. कारण जेव्हां मी शिल्लक राहात नाहीं तेव्हां परमात्माच फक्त उरतो आणि याचें तर सर्व कांहीं आहे-जें वाणी आणि मनाचा विषय आहे. ॥१४॥

ज्ञान, ज्ञेया आणि ज्ञाता हे तीनही यथार्थ----सत्य नाहींत. ज्याच्यावर हे तीन भासतात तो मी निरंजन-शुद्ध आहे. ॥१५॥

अहो, दुःखाचें मूळ द्वैत आहे, व त्यावर कांहीं औषध नाहीं. (कारण आजार खोटा आहे.) हीं सर्व दृश्यें खोटीं आहेत आणि मी एक अद्वैत शुद्ध चैतन्य रस आहें. ॥१६॥

मी शुद्ध बोध आहें. माझ्या अज्ञानामुळें उपाधीची कल्पना मीं केली आहे, असें नित्य मनन करुन मी निर्विकल्प स्थितींत आहें. ॥१७॥

मला बंध अथवा मोक्ष नाहीं. बंधन जर भ्रम आहे तर मोक्ष कुठें ? आश्रयरहित होऊन भ्रांति शांत झाली. आश्चर्याची गोष्ट आहे कीं, हें सर्व जग आहे तरी मी अकलुषित-निरंजन व सर्वांच्या पलीकडचा आहें. ॥१८॥

शरीरासहित हें जग कांहींच नाहीं-म्हणजे न खरें न खोटें आहे आणि आत्मा शुद्ध चैतन्यमात्र आहे. हें जाणल्यानंतर कल्पना कसली करायची ? ॥१९॥

हें शरीर, स्वर्ग, नरक, बन्ध, मोक्ष आणि भय या गोष्टी केवळ कल्पनाच आहेत. त्यांच्याशीं मला काय करायचें आहे ? मी तर शुद्ध चैतन्य आहें. ॥२०॥

आश्चर्य आहे कीं, मला द्वैत-दुजाभाव दिसतच नाहीं. एवढा जनसमूह पाहूनदेखील मला द्वैत न दिसतां तो एकजीव अरण्यासारखा झाला आहे. मग मी कसा, कसला, कशाचा मोह करुं ? ॥२१॥

मी शरीर नाहीं, मला शरीर नाहीं, मी जीव नाहीं. नक्कीच मी चैतन्य आहें. जगण्याची इच्छा हाच माझा बंध होता. ॥२२॥

आश्चर्य आहे कीं, हवेचे झोत जसे पाण्यावर तरंग उठवतात तसे अनंत समुद्ररुप अशा माझ्या शांत आत्म्यावर चित्ताच्या हवेनें हजार-हजार लहरी उठतात. त्या लहरी माझ्या नाहींत. त्या लाटा चित्ताच्या हवेमुळें उठतात. ॥२३॥

अनंत समुद्ररुप माझ्यांत चित्तरुपी हवा शांत झाल्यावर, जीवरुपी वणिकाच्या-व्यापार करणाराच्या-अभाग्यानें जगरुपी नौका नष्ट होऊन जाते. ॥२४॥

आश्चर्य आहे कीं, अनंत समुद्ररुप माझ्या आंत जीवरुपी तरंग आपल्या स्वभावधर्मानुसार उठतात, परस्परांशीं लढतात, खेळतात व लय पावतात. ॥२४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 31, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP