जनक म्हणाला
ज्यांच्या आंत मी-अहंकार-शिल्लक उरला नाहीं, सहज वाटयाला आलेले सुखदुःखाचे भोग भोगणार्या आत्मज्ञानी धीर पुरुषांची बरोबरी संसाराचें ओझें डोक्यावर घेणार्या मूढ पुरुषांना कधींही करतां येणार नाहीं. ॥१॥
ज्या पदाच्या प्राप्तीच्या इच्छेनें सर्व देवताच काय पण इंद्रही दीनवाणा होतो, त्या पदावर, त्या परमोच्च पदावर पोहोंचूनही-त्या सिंहासनावर बसूनही-योगी हर्ष करीत नाहीं--तेथेंही तो साक्षी बनून राहातो. ॥२॥
जसा आकाशाशीं संबंध आहे असें भासवणार्या धुराशीं आकाशाचा संबंध नसतो, तसाच पापपुण्याचा त्या पदावर आरुढ झालेल्या पुरुषाच्या अंतःकरणाशीं संबंध नसतो. ॥३॥
ज्या महात्म्यानें या सर्व जगाला स्वतःच्या आत्म्याप्रमाणेंच जाणलें, त्या वर्तमान क्षणाच्या साक्षी बनलेल्या महात्म्याला जसें स्फुरेल तसें वागण्यापासून कोण रोखूं शकेल ? ॥४॥
ब्रह्यापासून मुंगीपर्यंतच्या चार प्रकारच्या जीवांच्या समूहापैकीं ज्ञान्यालाच इच्छा व अनिच्छा थांबण्याचें निश्चित सामर्थ्य आहे. तो दोन्हीपासून मुक्त आहे. ॥५॥
कधीं कुणी विरळाच आत्म्याला अद्वय आणि जगदीश्वररुपांत जाणत असतो-एकरुप होतो. मग त्याची मर्जी राहात नाहीं-मग तो तेंच करतो जें प्रभु करवून घेतो आणि मग विश्वाशीं एकरुप झालेल्या अशा अद्वय पुरुषाला कशाचें भय वाटणार ? कारण भय वाटायला त्याला पर कोणीच नाहीं.॥६॥