अष्टावक्र म्हणाला
सात्त्विक बुद्धीचा पुरुष थोडयाशा उपदेशानेंच कृतार्थ होतो. पण संसारासक्त, असद्बुद्धीचा पुरुष आयुष्यभर जिज्ञासु असूनही पुन्हा पुन्हा मोह पावतो व मुक्तीला मुकतो. ॥१॥
विषयांबद्दल वैराग्य म्हणजे मोक्ष व विषयांविषयीं रस-आवड असणें हाच बन्ध आहे, एवढेंच ज्ञान आहे. जसें वाटेल तसें तूं कर. ॥२॥
तत्त्वबोधवादविवादकुशल, पंडितालाही मूक व जड, व आळशी वाटण्याइतका, कर्मापासून (शारीरिक व मानसिक) परावृत्त करतो व सहजावस्थेंत ठेवतो, त्यामुळें भोगाभिलाषी लोकांनीं या मार्गाचा त्याग केला आहे. ॥३॥
हे जनका ! तूं शरीर नाहींस, भोक्ता नाहींस, किंवा कर्ता नाहींस. तूं निखळ चैतन्य आहेस, यांचा साक्षी आहेस. त्याच निरपेक्ष, साक्षी वृत्तींत राहून तूं सुखानें राहा. ॥४॥
राग व द्वेष हे मनाचे धर्म आहेत. तें मन म्हणजे तूं नव्हेस तर विकल्परहित, निर्विकार असा बोधरुप आत्मा तूं आहेस, हें जाणून सुखानें राहा. ॥५॥
सर्व भूतांमध्यें तो चैतन्यरुप आत्मा आहे व भूतें त्यांत सामावलीं आहेत ह्या बोधानें निरहंकारी व ममतारहित असा तूं सुखी अस. ॥६॥
समुद्रावर उठणार्या तरंगाप्रमाणें हें विश्व ज्यावर स्फुरण पावतें तें तूंच आहेस याबद्दल संदेहच नाहीं म्हणून हे चिन्मय ! तूं विगतज्वर हो ॥७॥
हे सौम्य ! श्रद्धा ठेव, याबद्दल संशय ठेवूं नकोस. श्रद्धा ठेव कीं, तूं ज्ञानस्वरुप, भगवान्, परमात्मा, प्रकृतीहून वेगळा आहेस. ॥८॥
गुणांनीं लपेटलेलें शरीर जड आहे. तें येतें आणि जातें. आत्मा न जाणारा आहे न येणारा आहे, मग त्या शरीराबद्दल एवढा खेद करण्याचें काय कारण आहे ? ॥९॥
तुझा हा देह कल्पांतापर्यंत राहो अथवा या क्षणीं त्याचा नाश होवो, पण तूं चिन्मात्रस्वरुप असल्यानें तुला वृद्धि कुठली व नाश कुठला ? ॥१०॥
अनंत महासागरावर विश्वरुप तरंग स्वभावतः उत्पन्न होतात व अस्त पावतात. परंतु तुझी (चिन्मय आत्म्याची) न वृद्धि होते न नाश होतो. ॥११॥
हे तात, तूं चैतन्यस्वरुप आहेस, त्यामुळें तुला कुठल्याही वस्तूचा त्याग वा गृहण करणें शक्य नाहीं. कारण हें जगत् तुझ्याहून वेगळें नाहीं. ॥१२॥
हे जनका ! भेदशून्य, अविनाशी, शांत, निर्मल अशा तुझ्या चैतन्याकाशांत न जन्म, न मृत्यु, न कुठलें कर्म, न अहंकार शिल्लक असूं शकेल. ॥१३॥
ज्याप्रमाणें एकाच सोन्यानें घडविलेली बांगडी, बाजूबंद व घुंगरु आकारानें वेगळे वाटले तरी एकाच सोन्याचे आहेत, त्याप्रमाणें तूं जें जें पाहात आहेस त्या त्या ठिकाणीं जरी बाह्य आकार वेगळा दिसला तरी तूंच आहेस : ॥१४॥
हे जनका ! हा तो (परका) आहे, हा मी (माझा) आहे, हा मी (माझा) नव्हे, या भेदबुद्धीचा त्याग करुन मी सर्वरुप आत्माच आहें या निश्चित बोधानें व कामनारहित होऊन सुखी हो. ॥१५॥
हे शिष्या ! तुझ्याच अज्ञानामुळे हें जग भासतें, व तुझ्याच आत्मज्ञानानें त्याचा नाश होतो. ज्ञानाचा उदय झाल्यावर तूंच एकटा एकच उरतोस; परमार्थंतः संसारी व असंसारी हे भेद तुला नाहींत. ॥१६॥
हें जगत् भ्रांतीमुळें दिसत आहे. त्याचें स्वतःचें त्याशिवाय अस्तित्व नाहीं, असा बोध ज्याच्या अनुभूतींत आला तो वासनारहित होऊन, स्फूर्तिमात्र उरुन, शान्तीला प्राप्त होतो. ॥१७॥
अष्टावक्र म्हणतो कीं, हे जनका, या संसाररुपी महासागरांत सदा एकटा एक तूंच असंग व साक्षीरुपानें होतास व राहाशील. आतां तुला न कुठला बंध आहे, न कुठला मोक्ष आहे. तूं आतां कृतकृत्य, धन्य झाला आहेस. ॥१८॥
हे चिन्मय ! संकल्पविकल्पानें तूं आपलें चित्त क्षोभित करुं नकोस तर संकल्पविकल्परहित होऊन आपल्या आनंदस्वरुपांत राहा. ॥१९॥
ध्यान करणें ही मनाची क्रिया आहे म्हणून ध्यानाचा व हृदयांत कांहींही प्रतिमा ठेवण्याची क्रिया हेंही ध्यान असल्यानें त्याचाही त्याग कर; आत्मा स्वयमेव मुक्तच असल्यानें तूं विचार करुन काय साधणार आहेस ? ॥२०॥