अंगाई गातें राजस बाळा
जोजवितें बाईं लाल सावळा
नीज म्हणीतें तुला वेल्हाळा
जो बाळा जो जो रे जो
पाळणा बांधिला राजमंदिरीं
पांचू मोतीं यांचा खेळणा वरी
माझीया हातीं सोन्याची दोरी
जो बाळा जो जो रे जो
मळा शिंपांचा बाळा धुंडूनी
मोतीं जमविन टिपुन टिपूनी
अंगड्या टोपड्या दिला लावूनी
जो बाळा जो जो रे जो
सरी बिंदली घातली बाळा
डूल कानींचा हालूं लागला
नईच्या वाक्यांनीं दंड सजला
जो बाळा जो जो रे जो
राघू मैनांचा नाच अंगणीं
चिऊ काऊंचा साद गगनीं
घुंगुरवाळा वाजे सदनीं
जो बाळा जो जो रे जो
चांद आभाळींचा घरासि आला
मामा लाडका बाई बाळाचा झाला
शेला चंदेरी घेऊनी आला
जो बाळा जो जो रे जो
काजळ तीट बाळाची केली
मीठ मोहर्यांनीं दृष्ट काढिली
शंका मनींची निघून गेली
जो बाळा जो जो रे जो
माझिया घरीं आनंद झाला
वर्षाराणीचा जन्म जाहला
पेढे बर्फी मी देतें सर्वांला
जो बाळा जो जो रे जो
बाई ग माझं बाळ गुणाचं
कां ग रडतं बाई लाडाचं
नीजतं बाई बाळ मैनाचं
जो बाळा जो जो रे जो