पहिल्या दिवशीं आनंद झाला । मोत्या पवळ्यांनीं धर्म वो केला ।
हत्तीवरी ती अंबारी घाला । जू जू रे जू जू जू ॥
दुसर्या दिवशीं खांदली न्हाणी । पाणी घालीती बारा ग जणी ।
पुत्र राज्याला झालावो धनी । जू जू रे जू जू जू ॥
तिसर्या दिवशीं तिसरडं करिती । हातीं सोन्याची आरती घेती ।
घडोघडीला शरण जाती । हरिनामाची पूजा करिती । जू जू रे जू जू जू ॥
चवथ्या दिवशीं डाग धडविती । वाक्या बिंदल्या बाळा आणीती ।
कानींचा डूल सरी घडविती । आपुल्या घरीं सोनार बोलवीती । जू जू रे जू जू जू ॥
पांचव्या दिवशीं वाजली घंटा । बळीराम बसले चांदीच्या पाटा ।
आनंद झाला पंचांग वाचा । जू जू रे जू जू जू ॥
सहाव्या दिवशीं करिती सहावं । येण्या जाण्याला असावा भाऊ ।
माय बापाचं राखावं नांव । जू जू रे जू जू जू ॥
सातव्या दिवशीं सटवीचा फेरा । अक्षरं पाडिती सखी सुंदरा ।
तेत्तीस कोटी देवा मारी हाकारा । जू जू रे जू जू जू ॥
आठव्या दिवशीं आठवी चौकी । गोपा बाळाला न्हाऊं घालीती ।
तान्या बाळाला नवती खुलती । सख्या जमुनी जागृत करीती । जू जू रे जू जू जू ॥
नवव्या दिवशींचा बाळ ग राजा । दहा खंडीचा होईल राजा ।
चंद्र सूर्याचा लावील तेजा । धन्य माऊली पुत्र ग तुजा । जू जू रे जू जू जू ॥
दहाव्या दिवशींचा माझा ग बाळ । बाई वंशाला आलंया फळ ।
मायबापाला क्षेत्र दावीलं । जू जू रे जू जू जू ॥
अकराव्या दिवशीं अकरावा थाट । उदबत्त्या लावील्या तीनशेंसाठ ।
सडा रांगूळी केलीया दाट । बाळ खेळला सारंग पाट । जू जू रे जू जू जू ॥
बाराव्या दिवशीं बारसं करिती । गोरगरीबां आवातनं देती ।
थोरा मोठ्यांच आहेर येती । हौसेनं नांव श्रीकृष्ण ठेविती । जू जू रे जू जू जू ॥
तेराव्या दिवशीं पाळणा बांधा । मोत्या पवळ्यांच्या झालरी सोडा ।
माय बापांनीं झोका ग दिला । नऊ महिन्यांचा शीण तो गेला । जू जू रे जू जू जू ॥