पहिल्या दिवशीं जन्मलें बाळ । कळस सोनीयाचा देतो डहाळ । पडला उजेड तिनी त्रिकाळ ।
दिपलीं नेत्र दोनी प्रेमळ । करी भक्तांचा प्रतीयापाळ । किष्ण जन्मला बंदीया शाळ । जो बाळा जो जो जो
दुसर्या दिवशीं दुसरा रंग । रूप सावळं बाई गोरं हें अंग । जसं झळकतं ग आरशाचं भिंग ।
येती गवळणी ग बाळाच्या संगं । नारा पद्मीनी झाल्यात्या दंग । यश्चदा फेकिती किष्णावर रंग । जो बाळा जो जो जो
तिसर्या दिवशीं आनंद मोठा । सीता सावित्री बायानू उठा । खारीक खोबरं साखर वाटा ।
धर्म केलाया धावीस पेठा । आयेव नारीचा आयोर लुटा । जो बाळा जो जो जो
चवथ्या दिवशीं बोलली बाळी । अनुसयाची वाजली टाळी । किष्ण जन्मला यमुना तळीं ।
सोन्याची दोरी पाळण्या बांधिली । जो बाळ जो जो जो
पांचव्या दिवशीं पांचवीचा राडा । रानसटवीन वेडीला वाडा । येश्वदां मातेचा जीव झाला थोडा ।
लिंबू नारळ देवाला फोडा । तान्ही वासरं गाईला सोडा । तान्ह्या बाळाची दिष्ट ग काडा । जो बाळ जो जो जो
सहाव्या दिवशीं कळीचा वारा । बाळ जन्मला फुलांचा गजरा । जशी मोत्यांनीं गुंफावी तारा ।
राधा किष्णाला घालीती वारा । चल येश्वदा अपुल्या घरा । जो बाळा जो जो जो
सातव्या दिवशीं सातवीचा म्हाल । मधीं चांदणं पडलं गोल । चहूं बाजूंला तोरण हालं ।
सोनेरी मंडप घातीला लाल । किष्ण मांडीवर येश्वदा डुल । जो बाळा जो जो जो
आठव्या दिवशीं आठवीचा थाट । भुलल्या गौळणी तीनशें साठ । चुकूनी गेल्या पाण्याची वाट ।
मोहिनी टाकीली धा वीस पेठ । ताकाचे डेरे फोडील चट । श्रीकृष्णाची पहाती वाट । जो बाळा जो जो जो
नवव्या दिवशीं नवतीचा फंद । तान्हा बाळानं बाई घेतला छंद । वासुदेवाचे सोडीले बंद । जो बाळा जो जो जो
दहाव्या दिवशीं दहावीची रात । तेहतीस कोटी देव मिळून येते । मुखीं त्यांच्या ग चंदनज्योत । उतरून टाकीती माणीक पोत । जो बाळा जो जो जो
अकराव्या दिवशीं नारद बोल । देवा तुम्ही किती झोप वो घ्याल । श्री किष्णाचे ग पताक लाल । जो बाळ जो जो जो
बाराव्या दिवशीं जमल्या नारी । पाळणा बांधिला येश्वदे घरीं । त्याला बांधिली ग रेशमी दोरी । जो जो म्हनीत हालवीती नारी ।
पाळणा गायिला नाना या परी । बाळाचें नांव ठेवीलें हरीं । जो बाळा जो जो जो