पहिल्या मासीं पैला मासुळा । गर्भनारीचा ग रंग पिवळा ।
पिंड घडवीतो हरी सावळा । जू बाळा जू जू रे जू
दुसर्या मासीं पदर बंद । हिरव्या चोळीवर काढीला चांद ।
मायबापाला झाला आनंद । जू बाळा जू जू रे जू
तिसर्या मासीं कंताला ठावं । हळदीकुंकवा लल्लाटीं ल्यावं ।
वटी भरूनी खोबरं घ्यावं । जू बाळा जू जू रे जू
चवथ्या मासीं कुसवा चढ । अन्नपाणी तिला लागला गोड ।
पिकल्या पानाच बांदाव विड । जू बाळा जू जू रे जू
पांचव्या मासीं पांच फेरानं । बाळ देवीला जातं शरन |
सांडल मोतीं घ्यावं भरून । जू बाळा जू जू रे जू
सहाव्या मासीं सायास करितें । चोळी पातळ इच्छा पुरवीतें ।
पोटीं पुत्र मी मागून घेतें । जू बाळा जू जू रे जू
सातव्या मासीं नवस केला । खेळणा पाळणा वाहीन तुला ।
सोन्याचीं घुंगरं वाहीन तुला । जू बाळा जू जू रे जू
आठव्या मासीं आठवी प्रीती । पंचारती घेऊन देवीला जाती ।
बाळाचा नवस फेडूनी येती । जू बाळा जू जू रे जू
नवव्या मासीं हुरदं दुखती । दाईला बोलावून आणा म्हणती ।
पोलादी इळा दाईच्या हातीं । कडू लिंबाचा काडा पाजीती ।
जू बाळा जू जू रे जू
दहाव्या मासीं जायफळ सोळा । बालाच्या मुखांत अफूचा गोळा ।
बाळा लागलाय कलीचा वारा । जू बाळा जू जू रे जू
आकराव्या मासीं म्हायारीं जाती । अंगडं टोपडं घेऊनी येती
पोटीच्या पुत्रानं इच्छा पुरवीती । जू बाळा जू जू रे जू
बाराव्या मासीं बारसं करीती । थोरामोठ्यांना आवातनं देती ।
पोथीपुस्तक वाचून पहाती । बाळाचं नांव गोविंद ठेवीती ।
जू बाळा जू जू रे जू