जो जो रे जो जो श्रीकृष्ण बाळा । पालखीं निद्रा करी घननीळा ।
जो जो रे जो जो जो
श्रावणमासीं कृष्णाष्टमीसी । देवकीकुशी येशी जन्मासी
जो जो रे जो जो जो
कंस भये तो वसुदेव बाळा । नेऊनी गोकुळीं ठवी तयाला
जो जो रे जो जो जो
मध मुखीं घालुनी मधुसूदनासी । नंद बघे निजसुत वदनासी ।
जो जो रे जो जो जो
गर्ग मुनींनी जातक केलें । दुसर्या दिवशीं हेलकरी आले ।
जो जो रे जो जो जो
तिसरे दिवशी माय उसंगा । घेउनि पान्हा पाजी श्रीरंगा ।
जो जो रे जो जो जो
चवथे दिवशीं साखर पेढे । वांटिले नगरीं बहु भरुनी गाडे ।
जो जो रे जो जो जो
पांचवे दिवशीं पंचमी पूजा । बाळबाळंतीण रक्षावळी जा ।
जो जो रे जो जो जो
सहावे दिवशीं सटवीचा फेरा । लिहितसे भाळीं गोरस चोरा ।
जो जो रे जो जो जो
सातवे दिवशीं ये सप्तऋषी । रक्षाबंधने बांधिती खाशीं ।
जो जो रे जो जो जो
आठवे दिवशीं आठी वाणें । दिधलीं नदानें गो-भू-दानें ।
जो जो रे जो जो जो
नववे दिवशीं नौबत बाजे । हेलकर्या इनाम दिलें नंद राजे ।
जो जो रे जो जो जो
दहावे दिवशीं तिमण ( बुजगावणे ) करा हो । सुईणीची मोत्यानें ओटी भराहो । जो जो रे जो जो जो
ऋतूवरी नारी बळीराणा घेती । त्यायोगें त्यांना होत संतती ।
जो जो रे जो जो जो
बारावे दिवशीं बारसें झालें । परब्रह्म श्रीकृष्ण पालखीं निजलें ।
जो जो रे जो जो जो
वर्णन करीती हरि नामकारणं । उद्धरी बा धरी कृष्णचरण ।
जो जो रे जो जो जो