विरहीं मी बहुपरी मनोमय चित्रें रचिं सुंदरी ध्रु०
चित्रकला ती काय बिचारी
सदा व्यग्र जरि दिसे विचारी !
तिला जखडिती बेड्या भारी,
काय करिल ती तरी ? १
अडखळोनिया जड रंगांतुनि,
झगडुनिया गे जड कलमांतुनि
चिन्मय ह्रद्गत ये ठेचाळुनि
अर्धे मेल्यापरी. २
मला सुंदरी, असें न बंधन;
ब्रह्मांडातुनि भरारि मारुन
माधुर्या गे सांठवूनि मन
अर्पी चित्रांतरीं. ३
उत्कंठेचा गोड रक्तिमा
खुलवि तुझें मुख, तया न उपमा,
प्रभातिंचा त्यापुढे न महिमा,
न ये गुलाबा सरी ! ४
स्वप्नभूमिंतिल अगाध माधुरि,
चर्मविश्विं का दिसे कुठे तरि ?
भरुनि तुझ्या ती नयनीं अधरीं
चित्र उभें मन करी. ५
ह्रदयाच्या गे तरंगरंगीं
शृंगारुनि नवनव्या प्रसंगीं
उभी करुनि मन तुला शुभांगी,
विरहखेद गे हरी. ६
कधिं रुसतेशी, कधिं हसतेशी,
लेकरांमधें कधिं रमतेशी,
दुःखीं जशि का पाउस पाडिशि
सौख्याचा मजवरी ! ७