मग विसर हवा तर हा क्षण गे !
क्षण हाच जवळ ये तूं पण गे ! ध्रु०
अनंत जन्मांचें शुभ संचित
क्षणीं याच गे होवो कुसुमित,
स्वर्गपणा या क्षणास आणुत,
ये परिस मूक मम भाषण गे. १
सूर्य, चंद्र, सारे तारकगण,
यक्ष, देव, दानव, सारेजण,
क्षणा याच देवोत सैरपण,
थांबवोनि वळवळ वणवण गे. २
पूर्ण विश्वलयिं अति एकांतीं
तुझी ज्योति पसरो स्थिर, कांती
मिळो त्यांत मम, फिटुनी भ्रांती,
ये करुं दे आत्मसमर्पण गे ! ३
हो ध्रुव धरणी चरणाखालीं,
वितळुनि जावो नच पाताळीं
तुझि माझी जों ग्रंथि न झाली;
मग उधळो तीचा कण कण गे ! ४