मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह २|
लोकमान्यांस

लोकमान्यांस

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


राजराजेश्वरा हो दयाळा,

तातडी कां असे हो निघालां ? ध्रु०

अंधकारीं पहातां नभांत

किर्र बोले अजूनीहि रात

देह कष्टामधीं रोड झाला,

रात्र सारी न निद्रा तुम्हांला,

कुक्कुटाचा नसे शब्द झाला,

पाहटेचा न तारा उदेला;

केवि ऊठाउठी हो निघालां ? १

काय झालें असें हो दयाळा ?

हाक कोणीं दिली हो तुम्हाला ?

तातडी कां असे हो निघाला ?

व्यापसंताप सोसूनि सारा,

वैरियांचाहि साहूनि मारा,

लाथ हाणोनिया हो सुखाला,

कष्टवीलें सदा कीं जिवाला;

घास नाहीं सुखाचाहि ठावा,

नाहिं ठावा शरीरा विसावा.

व्याप ज्यासाठिं हा थोर केला

नाहिं भानू अजूनी उदेला,

काय याहूनि ओढी तुम्हांला ?

तातडी कां असे हो निघाला ? २

शांत या जाहल्या पाउलांला

नाहिं संधी चुराया मिळाला;

नाहिं पत्रें फुलें पूजण्याला

वेळ आम्हां मिळाली दयाळा !

कोठ आतां बघूं त्या मुखाला ?

वंदुं कैसें अतां पाउलांला ?

नाहिं मार्गार्थ केली शिदोरी,

नाहिं हातांत तांब्या, न दोरी;

गूढ संदेश कोठूनि आला ?

तातडी कां असे हो निघालां ? ३

आमुच्या हो जरी काळिजाचे,

आमुच्या हो जरी आंतड्याचे

दोर बांधू पहाती पदांला

नाथ, तत्रापि कां हो निघालां

शीघ्र सारा त्यजोनी पसारा

कांहि केल्याविना हो विचारा ?

काळिजातील सार्‍याहि गीती

आडव्या कीं तुम्हां साश्रु येती;

पाहुनीया तरीही न त्यांला

तातडी कां असे हो निघालां ? ४

कोणतें हो असें शिंग दूरी

घोर रात्रीं तुम्हां हांक मारी ?

कोणता हो तरी मंत्र नाथा,

भूल घाली महाराज, आतां ?

कोठली हो स्मृती होय जागी ?

केवि वारें भरे शीघ्र अंगीं ?

दुर्ग कोठील, कोठील वाडे,

बाग कोथील, कोठील झाडें

मोह घालोनि नेती तुम्हांला ?

तातडी कां असे हो निघालां ? ५

N/A

कवी - भा. रा. तांबे

वृत्त - भामिनी

राग - जोगी

ठिकाण - प्रतापगढ

दिनांक - १२ सप्टेंबर १९२०


Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP