उद्यांची काय कळे रे गती ?
पळपळ पळतो काळ पिळित जन, करी प्रीति संप्रती, ध्रु०
कुठे ते थोर वीर भूपती ?
राख करुनि मिळविली, निघाली त्यांसह का भूमि ती ?
तुझी मग दमडी, दिडकी, टका
गळे पिळुनि मिळविशी तुझ्या तो संगें येइल का ?
नाच तूं, काळ गालिं हासतो
पाहुनी पिंगा हळु खासतो;
निमिष हो भीतीचा भासतो,
तरी बंधुशिरिं लाथ हाणुनी फुगुनी होशी कृती ! १
जगत हा प्रीतीचा फुलवरा,
अनंत रंगीं फुलें ठुमकती, बाग कशी बघ जरा.
तुडुंबे मधु त्यांच्या द्रोणीं,
वेडी होइल बघुनि शारदा, वर्णावी कोणीं ?
पहा ही खरी कशी वैखरी !
ह्रदयाच्या भाषेंत फुला पुस, उत्तर देतिल तरी.
कुणावरि शस्त्र उचलशी तरी ?
पुढें फुलें रे तुझ्या जिवाचीं, आत्मघात नच करी.
चहुंकडे तुझीच नाडी उडे,
चहुंकडे तुझेंच हसणें-रडें,
नीट बघ, दूर पळे सांकडें.
स्वयें मृत्यु निज शस्त्र चरणि तव अर्पिल करुनी नती. २
कशाची तळमळ हळहळ तरी ?
स्वयें निर्मुनी गरळ भोवरी, धडकी घेशी उरीं.
कळे रे काय कधीं पामरा,
प्रीतिदूत किति तुझ्या रक्षणीं करिति खडा पाहरा ?
तयांच्या दयार्द्र दृष्टीविना
पळभर तरि जगशील काय रे ? उघड जरा लोचनां.
सूर्य जरि निमिश झाकि लोचन,
निजे जर वायू एक क्षण,
जळ न दे पळभर जरि दर्शन,
कुणीकडे तूं ? कुठे धरा रे ? कोण पुसे दुर्गती ? ३
खळखळे प्रीतीची वाहिनी,
चहूंकडे मधु मंजुळ निघतो कसा जीवनध्वनी !
रडशि कां तूच गान भंगुनी ?
घे धुउनी गंगेंत वाहत्या हात तूंहि रंगुनी.
पळाचा काय भरवसा तरी ?
या गंगेचें मूळ शोध जा, ऊठ तातडी करी.
अहाहा ! वानूं कवण्या मुखें ?
होइल सरस्वतीमुख मुकें !
त्यावरी ओवाळीं भवसुखें !
रंग रतिरसीं, मृत्युंजय हो ! काळ काळ तो किती ? ४