मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|एकादशी महात्म्य|

विष्णुदास नामा विरचित एकादशी माहात्म्य

एकादशी व्रताचे नुसते श्रवण केल्यासही श्रोत्याला या जगात अनेक सुखोपभोग मिळतात व शेवटी त्याला विष्णुलोकात स्थान प्राप्त होते.  


॥ श्रीगणेशायनम: ॥
ॐ नमोजी गणनाथा ॥ नमियेली शारदा माता ॥ त्यांचेनी प्रसादें आतां ॥ एकादशी व्रत सांगेन ॥१॥
पूर्वीं हस्तिनापुरीं कृष्ण पांडवांचा सहकारी ॥ गोत्रवधाचिया हत्या थोरी ॥ घडली राया धर्मासी ॥२॥
धर्में स्मरिलें कृष्णासी ॥ धांव पाव गा हृषीकेशी ॥ तूं सोयरा आम्हांसी ॥ आणि विश्वासी तारक ॥३॥
ऐसें स्मरण करितां ॥ पावला श्रीकृष्ण त्वरिता ॥ द्रौपदी चरणीं ठेवी माथा ॥ त्राही त्राही म्हणोनि ॥४॥
धर्मरायें केलें नमन ॥ येरें दिधलें आलिंगन ॥ तैसेच चौघेजण ॥ करिती साष्टांग नमस्कार ॥५॥
कुंतीसी कृष्णें केला नमस्कार ॥ तंव पांडवीं शार्ड्गधर ॥ पूजिला षोडशोपचार ॥ नवविधा भक्ति करोनी ॥६॥
तंव बोले पांडवांसी कां स्मरिलें आम्हांसी ॥ कवणें गांजिलें तुम्हांसी ॥ तें त्वरित आम्हां सांगावें ॥७॥
तंव पांडव म्हणती स्वामिया ॥ तूं आम्हां असतां कोण गांजील धर्मराया ॥ परी उत्कंठा आमुच्या हृदया ॥ ते तुम्हांसी द्रौपदी करील श्रुत ॥८॥
तंव द्रौपदी म्हणे श्रीकृष्णासी ॥ हे दीनानाथा हृषीकेशी ॥ गोत्रवधदोषनाशासी ॥ कवण उपाय सांगावा ॥९॥
मग हांसोनि श्रीपती ॥ काय बोले द्रौपदीप्रती ॥ जेणें ब्रह्महत्या नासती ॥ तें व्रत तुम्हांसी सांगेन ॥१०॥
तें व्रत असे आम्हांसी ॥ तेणें राखिलें देवांसी ॥ तिये नाम एकादशी ॥ ते त्रिभुवनी विख्यात ॥११॥
एकादशीचें महिमान ॥ श्रीकृष्ण सांगे आपण ॥ हें व्रत आचरितां जाण ॥ महापातके नासती ॥१२॥
ऐसें श्रीकृष्ण बोलिले ॥ धर्म अर्जुन चरणांसी लागले ॥ देवा तुम्ही जें बोलिलें ॥ तें नवलची दातारा ॥१३॥
ते कवणाची कुमारी ॥ जन्मली कवणाचे उदरीं ॥ देवांसी रक्षिलें कवणेपरी ॥ तें श्रीहरी सांगिजे ॥१४॥
मग हांसोनि बोले श्रीहरी ॥ तुम्ही चित्त द्यावें ये अवसरीं ॥ मी सांगेन बरवेपरी ॥ एकादशीची कथा ॥१५॥
एकादशी जे ऐकती ॥ त्यांची पातकें नासती ॥ श्रीकृष्ण सांगे पांडवांप्रती ॥ तें श्रोते परिसा हो ॥१६॥
पूर्वीं कुंभदैत्याचा सुत ॥ मृदुमान्या नामा अद्भुत ॥ वनामाजी तप करित ॥ त्यानें प्रसन्न केला त्रिपुरारी ॥१७॥
तंव येरें दिधलें वरदान ॥ तूं पुरुषार्थी होसी थोर गहन ॥ तुज कवणाचे हातीं नाहीं मरण ॥ ऐसा वर दीधला ॥१८॥
दैत्य हर्षनिर्भर जाहला ॥ उन्मत्त मदें मातला ॥ पुनरपि बोलिला ॥ ईश्वर तयासी ॥१९॥
ईश्वर विचारी मानसीं ॥ हा पीडा करील विश्वासी ॥ तरी याचिया मृत्यूसी ॥ कांहीं प्रकार करावा ॥ आम्ही ज्यासी वर देतों ॥ तोचि फिरोनियां पडतो ॥ मग विष्णु आम्हांते रक्षितो ॥ तयातें वधुनियां ॥२१॥
तरी यासी मारील विष्णु ॥ आणिक नाहीं यासी प्रश्नु ॥ आम्ही यासी वर देऊन ॥ फशीं पडलों देवा ॥२२॥
पुन: ईश्वर म्हणे दैत्यांते ॥ ऐक माझ्या वरदानातें ॥ तूं पावशेल मृत्यूतें ॥ एके नारीचेनि हस्तें ॥२३॥
मायबापावीण उपजेल नारी ॥ ते मृदुमान्या तूंतें संहारी ॥ तूं जिंकिसी ब्रह्मा विष्णु त्रिपुरारी ॥ इंद्रादि देव समस्त ॥२४॥
इतुका वर लाधला ॥ ईश्वर अदृश्य जाहला ॥ मग देवांसी आरंभिला ॥ प्रळयसंग्राम ॥२५॥
मग दैत्य क्रोधें निघाला ॥ तो इंद्रावरी चालिला ॥ इंद्र दैत्य भयें पळाला ॥ दैत्य पाठी न सोडी ॥२६॥
इंद्र गेला सत्यलोकासी ॥ मृदुमान्य लागला पाठीसी ॥ तो पावला वेगेंसी ॥ महागर्जत पातला ॥२७॥
तंव तेथें गजरु झाला ॥ ब्रह्मा वैकुंठासी पळाला ॥ सावित्रीसहित द्वारीं पडला ॥ चतुर्मुख ब्रह्मा ॥२८॥
मग विष्णु धांवोनी ॥ चतुराननासी पुसोनी ॥ कवणें गांजिलें म्हणोनि ॥ मग तत्क्षणीं सावध केला ॥२९॥
ब्रह्मा सांगे वृत्तांत ॥ देवा सत्यलोकी आलां दैत्य ॥ आम्हां भाविन्नला आकांत ॥ तें सांगतां उरी कैंची ॥३०॥
आम्ही पळालों त्वरित ॥ तंव पाठी लागला दैत्य ॥ तेहतीस कोटी देवांसहित ॥ तुम्हांपाशीं आलों ॥३१॥
तूंतें स्मरतां श्रीहरी ॥ आम्हां दैत्यें घातलें बाहेरी ॥ आपण सत्यलोकामाझारीं ॥ सुखें राज्य करीतसे ॥३२॥
दैत्य सत्यलोकी गर्जिन्नला ॥ तेणें तेथें कंप सुटला ॥ घोर भयातें पावला ॥ म्हणोनि शरण आलों स्वामिया ॥३३॥
तूं भक्तकाजकैवारी ॥ त्रिभुवनव्यापक मुरारी ॥ काय होईल सत्यलोकामाझारीं ॥ तें नेणवेची दातारा ॥३४॥
ऐसी करितां मात ॥ दैत्य पातला त्वरित ॥ बोभाट झाला वैकुंठांत ॥ सकळ देव गजबजिले ॥३५॥
मृदुमान्यें विष्णु देखिला ॥ दैत्य उन्मत्त मदें मातला ॥ मग गर्जोनि म्हणे गोपाळा ॥ काय बोले देवासी ॥३६॥
दैत्य म्हणे विष्णूसी ॥ मज तूं जरी शरण येसी ॥ तरी कांही न करीं वैकुंठासी ॥ मज शरण यावें ये वेळें ॥३७॥
तंव बोलिला शार्ग्डधरु ॥ तूं कवणें वंशीचा वारु ॥ कवणें कैसा दिधला वरु ॥ तो मजप्रती सांग पां ॥३८॥
मी जन्मलों कुंभदैत्याचे उदरीं ॥ म्यां प्रसन्न केला त्रिपुरारी ॥ तुम्हांसी घालोनि बाहेरी ॥ राज्य करीन त्रिभुवनीचें ॥३९॥
ऐसा मृदुमान्य बोलिला ॥ मग क्रोधें बहु आवेशला ॥ गदा घेवोनि धांविन्नला ॥ संग्रामा ठाकला ते समयीं ॥४०॥
ते वेळीं देव समस्त ॥ दैत्यावरि उठावले त्वरित ॥ येरु निर्वाण झुंजत ॥ राहे साहे म्हणोनी ॥४१॥
मग विष्णूने चक्र घेऊनि करीं ॥ टाकिलें ते दैत्यावरी ॥ युध्द करितां शिणला भारी ॥ दैत्य निर्धारीं नाटोपे ॥४२॥
विष्णु मृदुमान्यें धरिला करीं ॥ झाली मल्लयुध्दझुंजारी ॥ युध्द करितां शिणला भारी ॥ दैत्य निर्धारीं नाटोपे ॥४३॥
देव दैत्याच्या हातींहूनि निसटला ॥ जीवा प्राण असे उरला ॥ तंव हाहा:कार झाला ॥ अंत:पुरामाझारी ॥४४॥
मग सोडोनि सकळांतें ॥ लक्ष्मी झोंबली विष्णूतें ॥ मग टाकते झाले वैकुंठातें ॥ थोर कष्टें करोनियां ॥४५॥
ब्रह्मा सावित्रीसहित ॥ विष्णु लक्ष्मीसमवेत ॥ तेहतीस कोटी देव समस्त  ॥ इंद्रादी ऋषीश्वर ॥४६॥
तंव तयें अवसरीं ॥ वोळंगे बैसला त्रिपुरारी ॥ म्हणे काय जाहले वैकुंठाभीतरीं ॥ दैत्यफौजा येताती ॥४७॥
आले ब्रह्मा विष्णू इंद्र ॥ सिंहासनीं बैसले थोर ॥ तै केला षोडशोपचार ॥ सत्कारपूर्वक पूजियेला ॥४८॥
तैसाचि ब्रह्मदेवे ईश्वरु ॥ नानाविधि षोडशोपचारु ॥ करुनि पूजासंभारु यथोक्त झालें भोजन ॥४९॥
कर्पूर विडे दिधले जाणा ॥ मग आदरें बोले कैलासराणा ॥ कवणेंप्रसंगें नारायणा ॥ येथें आगमन झालें जी ॥५०॥
तंव बोलिला नारायण ॥ आतां कराल काय पुसोन ॥ अंतपुराला येथून ॥ समस्त देवलोकींचा ॥५१॥
अविचारी कर्म करितां दैत्यांसी वर देतां ॥ ते प्रवर्तती आकांता ॥ देवलोकीं समस्तांसी ॥५२॥
मृदुमान्यासी वरदान दिधले ॥ त्याने त्रैलोक्य त्रासिलें ॥ सत्यलोका विभांडिले ॥ धादी पातली वैकुंठी ॥५३॥
तंव तो प्रवर्तला ये अवसरी ॥ तुमचे वरें मातला भारी ॥ येथें गजबज कैलासद्वारीं ॥ ऐकूं येईल स्वामिया ॥५४॥
तंव बोलिले शंकरु ॥ दैत्यें उपद्रव केला थोरु । त्या भेणें पळालेति सुरवरु ॥ शार्डगधरांसहित कीं ॥५५॥
तंव बहुमान्य तत्क्षणीं ॥ आला कैलास ठाकोनी ॥ आतां कोठें पळसी चक्रपाणी ॥ मजविण तें सांग पां ॥५६॥
दैत्य आला रे आला ॥ ईश्वरासी कंप सुटला ॥ आकांत प्रळय मांडिला ॥ तये वेळीं अवधारा ॥५७॥
लक्ष्मी धरी विष्णूतें ॥ पार्वती झोंबे ईश्वरातें ॥ सावित्री न सोडी ब्रह्मयातें ॥ भयभीत होऊनियां ॥५८॥
अवघा झाला हाहा:कार ॥ पळती देवसुरवर ॥ न सांभाळती ऋषीश्वर ॥ थोर अनर्थ मांडिला ॥५९॥
तंव दैत्यें धरोनि कैलासातें ॥ हालविलें एके हस्तें ॥ तंव धीर धरोनि कैलासनाथें ॥ दैत्यासी युध्द मांडियेलें ॥६०॥
नंदीवरी आरुढ होवोनी ॥ साठीसहस्त्र गण मिळवोनी ॥ क्षेत्र मांडिलें त्रिशूल घेवोनी ॥ संग्रामासी निघाला ॥६१॥
तंव एकीकडे विष्णु उभा राहिला ॥ अवघा हाहा:कार झाला ॥ दैत्यावरी ईश्वर चालिला ॥ दैत्य वेढिला तये वेळीं ॥६२॥
तंव उठिला निशाचर ॥ सिंहनाद केला थोर ॥ म्हणे कोठें लपला शार्डगधर ॥ वैकुंठीचा निवासी ॥६३॥
तो आणि गा त्रिपुरारी ॥ नातरी संहारीन कैलासपुरी ॥ विष्णु सुदर्शन घेवोनि करीं । दैत्यावरी चालिले ॥६४॥
मग दैत्यें क्रोधें थोर ॥ हिरोनि घेतलें हतियार ॥ तंव धांवोनि आला ईश्वर ॥ त्रिशूळें दैत्यें हाणिला ॥६५॥
दैत्ये क्रोधें पातला ॥ ईश्वर धरोनि आपटिला ॥ तये वेळीं मूर्च्छागत झाला ॥ कैलासराणा ॥६६॥
मग उजू फिरला ब्रह्मयावरी ॥ तोमर हाणिला उरावरी ॥ तेथें थोर झाली झुंजारी ॥ आकांत झाला महाप्रळय ॥६७॥
पुढें पळे परमेष्ठी ॥ तंव मागें फिटे कासोटी ॥ दैत्य न सोडी पाठी ॥ ब्रह्मा करी हाहा:कारु ॥६८॥
तंव दैत्य म्हणे ब्रह्मयातें ॥ तुम्ही ब्राह्मणीं भक्षावा कढीभात ॥ युध्दाची रीति तुम्हांते ॥ कोण मात परियेसा ॥६९॥
पुनरपि मृदुमान्य धांविन्नला ॥ तंव ईश्वर काकुळती आला ॥ म्हणे तूं भला रे भला ॥ राख राख तूं आमुतें ॥७०॥
तंव दैत्य बोलिला वचन ॥ तुम्ही तिघे मज या शरण ॥ तुम्हांसी देईन प्राणदान ॥ नाहीं तरी संहारीन मी ॥७१॥
ऐसें ऐकोनियां वचन ॥ मग पळाले तिघेजण ॥ सावित्री लक्ष्मी पार्वती आपण ॥ आणि समस्त सुरवर ॥७२॥
मग सांगातें घेवोनि स्त्रियांतें ॥ पावले त्रिकूट शिखरातें ॥ तंव दैत्य लागला पाठीतें ॥ कोणेंपरी सोडीना ॥७३॥
स्वर्ग मृत्यु पाताळीं ॥ दैत्य न सोडी तये वेळीं ॥ मग आली कळवळी ॥ तिन्ही देवांसी ॥७४॥
पळतां झाली हिंपुटी ॥ श्वास न समायेपोटीं ॥ त्रिलोकीं नाहीं सुटी ॥ मग प्रकृति राहिल्या ॥७५॥
सांडिलीं अलंकार भूषणें ॥ आणखी अलंकार लेणें ॥ उघडी पळतीं साही जणें ॥ गिरिपर्वती रिघोनियां ॥७६॥
तंव तया पर्वतावरी ॥ महाअरण्याभीतरीं ॥ होती धात्री वृक्षाची पोखरी ॥ तया भीतरीं प्रवेशले ॥७७॥
साही जणें एकांतीं राहिली तेथें ॥ आम्ही पळावें कवणें पंथे ॥ आतां भलतें हो कां येथें ॥ म्हणोनि श्वास घातला ॥७८॥
तंव त्या पोखरीमाझारी ॥ श्वासासरसी जन्मली कुमारी ॥ ते निघाली बाहेरी ॥ देवीं दृष्टी देखियेली ॥७९॥
तंव होता पर्जन्यकाळू ॥ साही जणां स्नानें झालीं तत्काळू ॥ उपहास निराहार केवळू ॥ घडला साही जणांसी ॥८०॥
ऐसीं साही जणें कष्टी निद्रिस्थें ॥ तंव देखिलें कुमारीतें ॥ मग चेतना आली तयांतें ॥ कुमारी देखोनियां ॥८१॥
कर जोडोनि तत्क्षणी ॥ तियेसी केली विनवणी ॥ तुवां रक्षावें स्वामिणी ॥ शरणागत आपुलीया ॥८२॥
आम्ही साही तुज आलों शरण ॥ आम्हांसी तुवां द्यावे प्राणदान ॥ तियेसी ऐसी विनवणी करुन ॥ त्या दैत्यातें मारावया ॥८३॥
मग तेचि अवसरीं ॥ ब्रह्मा विष्णु त्रिपुरारी ॥ तियेचि वर्णिती थोरी ॥ तये वेळीं अवधारा ॥८४॥
तंव तिने अंगाभीतरी ॥ लपविले ब्रह्मा विष्णु त्रिपुरारी ॥ मग विचारी मनाभीतरीं ॥ आतां बाहेरी निघावें ॥८५॥
तंव ते पोकळीचे तोंडाशी ॥ दैत्य उभा परियेसी ॥ एक दाढ आकाशीं ॥ एक पाताळीं लावलीसे ॥८६॥
देखोनियां ते कुमारी ॥ दैत्येंद्र विस्मय करी ॥ मागुती म्हणे सुंदरी ॥ कवण तूं येथे ॥८७॥
हें एवढें महाअरण्य ॥ तुज येथें यावया काय कारण ॥ तुजसारिखें निधान ॥ या त्रिभुवनीं न देखो ॥८८॥
तुझें नाम काय ते सांगिजे ॥ तुवां कोठोनि केलें बीजे ॥ कवणें वंशी जन्म तुझें ॥ तें मजपाशीं सांगपां ॥८९॥
अरे माझे नाम तुज काय व्हावें ॥ म्यां तुज दैत्यांतें संहारावें ॥ ऐसें वरदान देवें ॥ दिधलें मजलागीं ॥१०॥
म्हणोनि तूं येथें आलासी ॥ आतां कवणें ठायीं पळसी ॥ तंव कोप आला दैत्यासी ॥ तेणें सिंहनाद पैं केला ॥९१॥
मग खड्ग घेवोनि करी ॥ चालिली दैत्यावरी ॥ शिळा उचलोनियां शिरीं ॥ तियेवरी टाकिता झाला ॥९२॥
तंव तेचि अवसरीं ॥ अदृश्य झाली सुंदरी ॥ तेज फांकलें अंबरीं ॥ त्रिभुवनामाजी न समाये ॥९३॥
मग खड्ग घेवोनियां हातीं ॥ सवेंचि उभी ब्रह्ममूर्ती ॥ दैत्य विचारी चित्ती ॥ म्हणे थोर ख्याती इयेची ॥९४॥
म्हणे मी काय कैसें करुं ॥ ब्रह्ममूर्तीसी संहारुं ॥ म्हणोनी तो निशाचरु ॥ चिंताक्रांत बैसला ॥९५॥
तंव तत्काळ ते वेळीं ॥ आली शरणागताची माउली ॥ म्हणे तूं उभा ते वेळीं ॥ खड्ग टाकिलें अभिमंत्रोनि ॥९६॥
तें सोडिलें दैत्यावरी ॥ संहार करी झडकरी ॥ त्वरें चिंतोनियां सुंदरी ॥ खड्ग सोडिती पैं झाली ॥९७॥
स्वयें पडली देवीसी चिंता ॥ कैसे संहारुं दैत्यनाथा ॥ हा न मरे तरी सर्वथा ॥ मज शाप देतील ॥९८॥
तिचे हातांतून शस्त्र सुटलें ॥ भुजदंड तोडोनि पाडिले ॥ सवेंचि शिरकमळ छेदिलें ॥ आपण गेली आकांशीं ॥९९॥
दैत्य पाडिला धरणीं ॥ उदो उदो म्हणती योगिनी ॥ तुवां रक्षिलें स्वामिणी ॥ शरणागतां आपुलिया ॥१००॥
मृदुमान्यातें संहारिलें ॥ तिन्ही देव विजयी झाले ॥ तिचे चरणांसी लागले ॥ त्राहि त्राहि म्हणोनियां ॥१॥
लक्ष्मी सावित्री पार्वती ॥ तिच्या चरणीं लागती ॥ तुवां रक्षिले आमुचे पती ॥ जीवदान दीधलें ॥२॥
तवं तये अवसरीं ॥ काय बोलिली सुंदरी ॥ चौदा भुवनें माझे उदरीं ॥ मनीं विचारा आपुले ॥३॥
मज नाहीं जनक जननी ॥ मज नाहीं स्वामी स्वामिणी ॥ माझा रहिवास त्रिभुवनीं ॥ माझें नाव एकादशी ॥४॥
मी ठाउकी नाहीं कवणासी ॥ होतें अदृश्य वनवासी ॥ प्रगट झाले तुम्हांपासी ॥ कृपादान मागावया ॥५॥
तुमच्या सहाजणांच्या श्वासापासोनि ॥ मी जन्म पावलें मेदिनी ॥ पातकें नष्ट होतील माझे स्मरणीं ॥ माझें व्रत आचरितां ॥६॥
आजिचा माझा जन्म जाण ॥ तुम्हां पडिलें निराहार उपोषण ॥ तरी तुम्हीं हे व्रत करा आचरण ॥ महादोष नासती ॥७॥
तुम्हां सहज अनायासें ॥ व्रत घडलें अप्रयासें ॥ त्रिलोक तारावयासरिसें ॥ प्रगट करावें या व्रतासी ॥८॥
तुम्ही नदीपूर तरतां ॥ स्नानें घडलीं समस्तां ॥ निराहार प्रेमव्रता ॥ एकादशी पैं घडली ॥९॥
तंव बोले हृषीकेशी ॥ तुवां न तोडावें आम्हांसी ॥ आम्ही पंधरावें तिथीसी ॥ एकादशी व्रत आचरुं ॥११०॥
तंव बोले लक्ष्मीपती ॥ हें माझें व्रत जे आचरती ॥ तयांसी नाहीं पुनरावृत्ती ॥ ते संसारीं जीवन्मुक्त ॥११॥
तंव बोलिला शार्ड्गधरु ॥ तुझिया व्रताचा बडिवारुं ॥ तो सांगेन मी विचारु ॥ चित्त देऊनि परियेसी ॥१२॥
मातृगमन सुरापान ॥ ब्रह्महत्या गोवध जाण ॥ परस्त्रीवेश्यागमन ॥ हीं महापातकें हरतील ॥१३॥
एक यातिभ्रष्ट झाला ॥ एकें गोत्रवध केला ॥ एकें अतिथी दवडिला ॥ एकीं वधिला भ्रतारु ॥१४॥
एक व्रतभंग करिती ॥ एक ब्राह्मणाचें घर मोडिती ॥ एक कन्याद्रव्य घेती ॥ एक करिती विश्वासघात ॥१५॥
एक तीर्थयात्रा न करिती ॥ एक नेमभाक मोडिती ॥ एवं पातकें नासती ॥ एकादशीव्रत केलिया ॥१६॥
पूर्वजांसी कष्ट करिती ॥ एक कन्याद्रव्य घेती ॥ एवं पातकें नासती ॥ एकादशीव्रत केलिया ॥१७॥
तंव पांडव म्हणती हृषीकेशी ॥ कन्याद्रव्याचा दोष परियेसी ॥ तो कळों द्यावा आम्हांसी ॥ सविस्तर स्वामिया ॥१८॥
यावरी बोले लक्ष्मीपती ॥ ऐक धर्मा भूपती ॥ जे कन्याद्रव्य घेती ॥ ते चार युगें कृमि होती निश्चयें ॥
मग भोगिती चौर्‍यांयशी लक्ष योनी ॥ महानरकीं अघोर वनीं ॥ त्यांसी करितां जाचणी ॥ शीण पावला यमधर्म ॥१२०॥
जेव्हां कन्येचें द्रव्य घेतलें ॥ पित्यानें कन्येचें काळीज भक्षिलें ॥ मातेनें रुधिर प्राशिलें ॥ बंधुनें अस्थि भक्षिल्या ॥२१॥
इतर लोक मंडपीं जेविती ॥ ते सूकरविष्ठा भक्षिती ॥ आणि पशुयोनीस जन्मती ॥ वीस सहस्त्र वर्षे परियेसा ॥२२॥
याकारणें धर्मा भूपाळा ॥ कन्याद्रव्याचा मानावा कंटाळा ॥ श्रीखंड लावोनि द्यावी बाळा ॥ दुबळ्या ब्राह्मणासी ॥२३॥
धर्म म्हणे पुरुषोत्तमा ॥ सांग पां एकादशेचा महिमा ॥ जेणें भंग महापातकद्रुमा ॥ ते कथा सांगा स्वामिया ॥२४॥
एकादशी जे न करिती ॥ त्यांसी काय बोले श्रीपधी ॥ मजवरी न कोपावें श्रोतीं ॥ हें वचन श्रीहरीचें ॥२५॥
एकादशीच जो घेईन अन्न ॥ तो मातृभोगी दोष दारुण ॥ ऐशा पातकाचें निस्तरण ॥ एकादशी व्रत आचरतां ॥२६॥
जो न करी एकादशी ॥ कीटक पडिले गोमांसी ॥ ते मांस भक्षी एवं पातक त्यासी ॥ आणि वाराणसीं पिता वधी ॥२७॥
जो न करी एकादशी ॥ एवं पातक जडे त्यासी ॥ ऐसें बोलिले हृषीकेशी ॥ एकादशीजवळीके ॥२८॥
तंव विष्णु बोले आपण ॥ ऐसें तुज दिधलें वरदान ॥ महेश म्हणे सत्य वचन ॥ आतां चला कैलासी ॥२९॥
तंव घंटायुक्त विमानेंसी ॥ ते भ्रमत आले आकाशीं ॥ त्यांत बैसविली एकादशी ॥ त्वरें गजरेंसी निघाले ॥१३०॥
चामरें आनंदे ढाळिती ॥ लक्ष्मी सावित्री पार्वती ॥ ऐसें कैलासा येती ॥ देवांसहित ईश्वर ॥३१॥
साठी सहस्त्र गणांसी ॥ आनंद झाला कैलासीं ॥ आणि देव महेशासी ॥ षोडशोपचारें पूजिलें ॥३२॥
तंव कर जोडोनि हृषिकेशी ॥ विनविते झाले महेशासी ॥ आज्ञा द्यावी आम्हांसी ॥ वैकुंठासी जावया ॥३३॥
षोडशोपचारीं पूजा ॥ करिता झाला कैलासराजा ॥ म्हणे एकादशीसंगे गरुडध्वजा ॥ मी येईन वैकुंठासी ॥३४॥
देवोनि वस्त्रालंकार ॥ बोळवित निघाले ईश्वर ॥ सवें गंधर्व यक्ष किन्नर ॥ आले नगराबाहेर परियेसा ॥३५॥
एकादशी वाहोनि गरुडावरी ॥ मग निघाले श्रीहरी ॥ टाकिली कैलासपुरी ॥ जयजयकारीं प्रवर्तलें ॥३६॥
सांगाते आले ऋषी देव ॥ आणि चतुर्मुख ब्रह्मा सोम वासव ॥ इतर योगेश्वर महानुभाव ॥ वैकुंठपुरीस दाटले ॥३७॥
गरुडावरोनि उतरोनि ॥ एकादशी बैसविली सिंहासनीं ॥ पूजा मधुपर्कादि करोनी ॥ नवविधा भक्ति करिताती ॥३८॥
तंव संतोषोनि हृषीकेशी ॥ काय बोलिले गरुडासी ॥ डांगोरा पिटवा नगरासी ॥ एकादशी व्रत करावया ॥३९॥
बाळकासी स्तनपान ॥ एकादशीस न देणे जाण ॥ घोडियांसी चारा पाणी ॥ एकादशीस न द्यावे ॥१४०॥
ब्राह्मण वैश्य शूद्र क्षत्री ॥ अन्न वर्जावें सर्वत्रीं ॥ निराहार कीजे समस्तीं ॥ अणुमात्र अन्न न घ्यावे ॥४१॥
मग गरुडें जागोनि झडकरी ॥ डांगोरा पिटला वैकुंठपुरीं ॥ एकादशी करावी निराहारी ॥ जागरण करुनियां ॥४२॥
ऐशा तिन्ही तिथी उत्तम ॥ विष्णूने केला असे नेम ॥ तें नारदें ऐकिले सप्रेम ॥ तो झडकरी मग आला ॥४३॥
नारद म्हणे भगवंता ॥ हें कोण व्रत आचरता ॥ यावरी विष्णु झाला बोलता ॥ नारदाप्रती ॥४४॥
नारदासी म्हणे हृषीकेशी ॥ इचें नाम एकादशी ॥ इणें रक्षिलें आम्हांसी ॥ थोर आकांतास पावली ॥४५॥
इणें दिधलें प्राणदान ॥ वांचविले आमुचे प्राण ॥ इंद्र मुख्य सुरवरगण ॥ इणें रक्षिलें नारदा ॥४६॥
मग इंद्रमुख्य सुरवर ॥ समस्त गण ऋषीश्वर ॥ करिती मंत्रघोष उच्चार ॥ एकादशीजवळी पैं ॥४७॥
तेथें आनंद थोर जाहला ॥ ब्रह्मा विष्णु संतोषला ॥ तंव नारद चरणीं लागला ॥ देवा विनंति एक अवधारीं ॥४८॥
नारद म्हणे मुरारी ॥ हे व्रत आचरावे कवणेपरी ॥ तंव बोलिला मुरारी ॥नारदा परियेसीं ॥४९॥
दशमीस एकभुक्त रहावें ॥ तक्र भोजन अर्धे करावें ॥ मग हरिकथेसी जावें ॥ कीर्तन ऐकावया ॥१५०॥
लावोनि द्वादश टिळा ॥ शंख चक्र तुळसीमाळा ॥ ऐसे सांगतसे सकळां ॥ नारायण स्वमुखानें ॥५१॥
येरे दिवशीं करुनि स्नान ॥ एकादशीस उपोषण ॥ निराहार राहोन ॥ व्रत उत्तम आचरावें ॥५२॥
आणि करावें जागरण ॥ हरिकीर्तन पुराणश्रवण ॥ करावें आवाहन विसर्जन ॥ हरिचरण लक्षावे ॥५३॥
चार प्रहर एकादशीस ॥ निद्रा येऊं नये प्राणिमात्रास ॥ आणि करावे द्वादशीस ॥ एकभुक्त आदरे ॥५४॥
करोनि एकादशीस निराहार ॥ जागरण करी चारी प्रहर ॥ मी विष्णु त्याचा किंकर ॥ त्याचे चरणरज झाडीन ॥५५॥
लोक एकादशीस निराहार ॥ न सेविती फळाहार ॥ आषाढी कार्तिकमासीं मात्र ॥ उदक वर्जांवे तियेसी ॥५६॥
एकादशीसी जे जेविती भात ॥ तें राक्षसकाळीज निभ्रांत ॥ त्या अनासवें उदक घेत ॥ ते राक्षसरुधिर सेविले जाण ॥५७॥
एकादशीस जे जेविती शाका ॥ ते पाणियांतील श्वापदे देखा ॥ घृत घेती बहु कौतुका ॥ तें सूकररुधिर जाणावे ॥५८॥
एक अशक्तदेही असती ॥ अन्नानिमित्त प्राण जाऊं पाहती ॥ तिहीं फळे भक्षावीं काकुळती ॥ देहरक्षकाकारणें ॥५९॥
एकादशीस जे पोहे भक्षिती ॥ ते मार्जारयोनीस जन्मती ॥ ते तव जाणावें निरुती ॥ श्रोते जन हो ॥१६०॥
जे करिती धान्य आहार ॥ ते भोगिती नरक घोर ॥ पुनरपि योनिद्वार ॥ भोगिती चौर्‍यायशीं ॥६१॥
प्रीतिपूर्वक एकादशी करिढी ॥ त्यांचीं पापें सर्व जाती ॥ त्यांचा दारवंटा मी लक्ष्मीपती ॥ दिवसरात्री राखीन ॥६२॥
पंधरा दिवस कर्मे करिती ॥ त्यांची पापें सर्वे हरिती ॥ प्राप्त होय धनपुत्रसंतती ॥ एकादशीव्रत केलिया ॥६३॥
ऐसा एकादशीस वरु ॥ देतां झाला शार्ड्गधरु ॥ महापुण्यवंत थोरु ॥ सहस्त्र यज्ञ घडतील ॥६४॥
ऐसें ऐकोनियां वचन ॥ पातकें उभीं राहिलीं कर जोडून ॥ विनविती श्रीनारायण ॥ आम्हीं काय करावें ॥६५॥
त्रिलोकीं करितील एकादशी ॥ मग आम्हीं कोठें रहावें परियेसी ॥ तव बोलिले हृषीकेशी ॥ तयां पातकांप्रती ॥६६॥
जो एकादशीस भषील अन्न ॥ तेथें तुम्ही रहावी दडोन ॥ तयासी तुम्हीं नेवोन ॥ कृमीयोनीस घालावें ॥६७॥
जे एकादशी भावें आचरती ॥ त्यांची महापातके नासती ॥ विष्णु सांगे नारदाप्रती ॥ ऐसे व्रत आचरावें ॥६८॥
पातकांसी रहावया ठावो ॥ देता झाला देवरावो ॥ यावरी काय झाला अभिप्रावो ॥ ते ऐका श्रोते हो ॥६९॥
ऐकोनि श्रीहरीचे वचन ॥ संतोषले नारदाचे मन ॥ हृदयीं व्रत हें धरोनि पूर्ण ॥ मग चरणासी लागला ॥१७०॥
नारद म्हणे पुरुषोत्तमा ॥ हे व्रत द्या आम्हां मेघश्यामा ॥ देव म्हणे करावें ब्रह्मोत्तमा ॥ व्रत हें तुम्हां दीधलें ॥७१॥
तंव बोले हृषीकेशी ॥ हेंचि सांगतों तुम्हांसी ॥ जो न करील एकादशी ॥ त्यासी नीचयोनी जन्म असे ॥७२॥
नेवोनियां यमपुरीसी ॥ दंड करावा तयासी ॥ नरककुंडांत परियेसी ॥ एक युगपर्यंत घालावे ॥७३॥
मग काढोनि निरबुजविती ॥ चौर्‍यायशीं नरक भोगविती ॥ नरकामाजीं कीटकमूर्ती ॥ तयासी जन्मा घालावें ॥७४॥
गरुडा पाठविले नगरासी ॥ जो न करील एकादशी ॥ तुवां धरोनियां त्यासी ॥ नगराबाहेर घालावे ॥७५॥
ऐसे व्रत जे आचरती ॥ त्यांचीं महापातकें नासती ॥ कृष्ण सांगे पांडवांप्रती ॥ कुंतीद्रौपदी आदिकरुनी ॥७६॥
इतुका वैकुंठीं वृत्तांत झाला ॥ विष्णु व्रत आचरुं लागला ॥ तव ईश्वर तेथें आला ॥ कैलासी सांडूनी पैं ॥७७॥
विष्णूनें केली पूजा ॥ तंव बोलिला कैलासराजा ॥ माझी विनंती गरुडध्वजा ॥ लक्षपूर्वक अवधारिजे ॥७८॥
तूं आचरितोसी एकादशीव्रत ॥ मजसी द्यावें जी किंचित ॥ तव संतोषे गोपीनाथ ॥ तये वेळीं अवधारा ॥७९॥
मग ईश्वराचा मान वाढविला ॥ सर्व दिवस त्यासी दिधला ॥ आपण शेष घेतला ॥ दुसरी तिथी ॥१८२॥
या निमित्त दोन एकादशी वैकुंठीं ॥ झालीया परियेसी ॥ स्मार्त वैष्णव दो पक्षीं ॥ आपुलाल्या तिथीं करिती ॥८१॥
जे सदाशिवाचे भक्त ॥ ते प्रथम दिवशीं आचरत ॥ आणि कोणी विष्णुभक्त ॥ ते आचरती दुसरी तिथी ॥८२॥
ब्रह्मा तेहतीस कोटी सुरवर ॥ आणि नारदादि ऋषीश्वर ॥ समस्त आचरती व्रताचार ॥ एकादशी पूर्ण तिथि ॥८३॥
मी बोलिलों नाहीं आपुलें मतीं ॥ सांगितली भागवतीं ॥ श्रीकृष्ण सांगे पांडवांप्रती ॥ ऐसें व्रत आचरती ॥८४॥
ही कथा जे ऐकती ॥ ते भक्ति मुक्ति पावती ॥ विपुल धनसंपत्ती ॥ ऐसें श्रीपती बोलिले ॥८५॥
हें स्वर्गी व्रत झालें ॥ आणि पाताळीं कैसें प्रगटलें ॥ मृत्युलोकासी केवि आलें ॥ तें सांग रे विष्णुदास नामया ॥८६॥
सहा जणांचे श्वासीं ॥ जन्म पावली एकादशी ॥ याचा विचार नामयासी ॥ प्रसन्न जाहली एकादशी ॥ विघ्नें बांधोनि चरणांसी ॥ वैकुंठासी पैं गेला ॥१८८॥
इति एकादशीमाहात्म्यं संपूर्णम् ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2021

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP