एकादशी महात्म्य - पापमोचनी एकादशी

एकादशी व्रताचे नुसते श्रवण केल्यासही श्रोत्याला या जगात अनेक सुखोपभोग मिळतात व शेवटी त्याला विष्णुलोकात स्थान प्राप्त होते.



युधिष्ठिराने विचारले,
‘हे कृष्णा, फाल्गुन वद्य पक्षातील एकादशीचे नाव काय, पूजाविधी कोणता व त्यापासून काय फळ मिळते ? कृपा करुन मला सर्व सांग.’
श्रीकृष्ण म्हणाले,
‘मी तुला पापमोचनी एकादशीचे व्रत सांगतो ते ऐक. हे व्रत पूर्वी चक्रवर्ती मांधाता राजाला त्याने विचारल्यावरुन लोमश ऋषींनी सांगितले होते.
मांधात्याने विचारले,
‘हे भगवन्, फाल्गुन वद्य एकादशीचे नाव काय, पूजाविधी कसा आहे व त्याचे फल काय ? लोकांच्या कल्याणाकरिता विचारत आहे, कृपा करुन सांग.’
लोमश ऋषी म्हणाले,
‘या एकादशीचे नाव पापमोचनी आहे. ही एकादशी पिशाचत्वाचा नाश करणारी म्हणून प्रसिध्द आहे. राजा, त्या एकादशीची कथा सांगतो ती ऐक. ही कथा सर्व इच्छा पूर्ण करणारी, सर्व सिध्दी देणारी, कल्याण करणारी, धर्म वाढवणारी, पापनाश करणारी, व आश्चर्यकारक आहे. पूर्वी एकदा कुबेराच्या चैत्ररथ नावाच्या क्रीडा-उद्यानात किन्नरांसह गंधर्वकन्या क्रीडा करीत होत्या. इंद्राच्या पुढाकाराने स्वर्गातील सर्व देवही तेथे क्रीडा करीत होते. अप्सरांचे समुदाय त्या क्रीडावनात नेहमीच असत. वसंतऋतू जवळ आल्याने ते वन फुलांनी भरुन गेले होते. या चैत्ररथ वनाइतके सुंदर दुसरे कोणतेच वन नाही. तेथे पुष्कळ मुनी तपश्चर्या करीत होते. तेथे इंद्र देवांसह क्रीडा करीत होता. त्या वनातच मेधावी नावाचा श्रेष्ठ मुनी होता. मंजुघोषा नावाची अप्सरा या मुनी मेधावीला मोहीत करण्याचा प्रयत्न करु लागली. त्याचे मन जाणून घ्यायला ती त्याच्या आश्रमाकडे गेली, पण शापाच्या भीतीने आश्रमापासून एक कोस अंतरावर थांबली. तेथे थांबूनच ती सतारीच्या साथीने पंचमस्वर आळवून मधुर गीत गाऊ लागली. मंजुघोषेने चंदनाची उटी लावली होती, फुलांचे हार घातले होते व ती गात होती. तिला पाहून पूर्वीचे शंकराबरोबरच्या वैराचे स्मरण करुन मदन तिच्या शरीरात शिरला. मदनाच्या मनात त्या शिवभक्त मुनीला जिंकण्याची इच्छा होती. त्या मदनाने जणू मंजुघोषेच्या भिवयांचे धनुष्य सज्ज केले. त्यावर तिच्या नेत्रकटाक्षाची दोरी चढवली. अशा या धनुष्यावर पिसार्‍याप्रमाणे काळ्या भोर पापण्यांनी शोभून दिसणारे तिच्या नेत्रांचे बाण चढवले, तिचे स्तन, म्हणजे विजययात्रेच्या प्रवासातील तंबू आहेत असे त्याने मानले व तो मदन विजय मिळवायला निघाला. त्या वेळी ती मंजुघोषा मदनाच्या सैन्यासारखी दिसू लागली. मेधावी मुनीला पाहून मंजुघोषा कामपीडित झाली. मेधावी ऋषी अगदी तरुण होता. त्याचे पांढरेशुभ्र यज्ञोपवीत व हातातील दंड यामुळे तो दुसर्‍या मदनाप्रमाणे शोभत होता. अशा त्या मुनीश्रेष्ठाला पाहून मदनाला वश झालेली ती मंजुघोषा मंदमधुर स्वरात गाऊ लागली; नृत्य करु लागली. त्यामुळे तिच्या हातातील कंकणांचा मधुर ध्वनी होऊ लागला. त्यातच पायांतील पैजणांचा व कमरेवरील मेखलांचा सुंदर आवाज मिसळ्त होता. प्रेमभाव व्यक्त करीत ती गात होती. तिला पाहून तो श्रेष्ठ मुनी त्या सर्व मदनाच्या सैन्याने मोहीत झाला. मदनाच्या तडाख्यात सापडलेल्या त्या मुनीजवळ मंजुघोषा गेली आणि तिने आपल्या नेत्रकटाक्षांनी आणि हावभावांनी त्याला मोहून टाकले. तिने आपली वीणा खाली ठेवली आणि त्या श्रेष्ठ मुनीला आलिंगन दिले. वार्‍याच्या वेगाने व्याकुळ होऊन कापणारी वेल ज्याप्रमाणे वृक्षाला वेढून बसते, त्याप्रमाणे त्या ऋषीला मंजुघोषेने दृढ आलिंगन दिले. तो मेधावी मुनीसुध्दा मंजुघोषेबरोबर क्रीडा करु लागला. त्या सुंदर वन-उद्यानात तिचा सुंदर देह पाहून तो ऋषी शिवतत्त्व विसरला आणि कामतत्त्वाच्या आहारी गेला. मंजुघोषेबरोबर क्रीडा करताना त्या कामुकाला आता रात्र आहे की दिवस हेही समजेनासे झाले. अशाप्रकारे त्या उभयतांचा बराच काळ गेला. या काळात त्या मुनीने स्नान-संध्या वगैरे नित्य कर्मेही केली नाहीत. नंतर मंजुघोषा स्वर्गलोकाला जायची तयारी करु लागली.
ती जाण्याच्या इच्छेने आपल्याबरोबर क्रीडा करणार्‍या त्या श्रेष्ठ मुनीला म्हणाली,
‘हे ब्राह्मणा, आता मला माझ्या घरी परतण्याची आज्ञा द्यावी.’
मुनी मेधावी म्हणाला,
‘हे सुंदर स्त्रिये, आता संध्याकाळीच तू माझ्याकडे आलीस, आता प्रभातकाळ होईपर्यंत तरी मजजवळ राहा.’ मुनीचे हे बोलणे ऐकून ती घाबरली. ‘हे राजा, मुनी शाप देईल या भीतीने ती त्याच्याबरोबर पुन: कित्ये वर्षे क्रीडा करीत राहिली. अशा प्रकारे क्रीडा करताना ५७ वर्षे ९ महिने व ३ दिवस गेले. पण त्या मुनीला मात्र आपण अर्धी रात्रच क्रीडा केली आहे असे वाटले. इतका काळ गेल्यावर ती मुनीला पुन: म्हणाली, ‘आता मला घरी गेले पाहिजे. तरी अनुज्ञा द्यावी.’
मेधावी मुनी म्हणाला,
‘आता कुठे प्रात:काल व्हायला सुरुवात झाली आहे. माझे ऐक. माझी स्नान-संध्या होईपर्यंत तरी येथेच राहा.’ मुनीचे हे बोलणे ऐकून तिला आश्चर्य वाटले व भीतीने तिला वेढले. किंचित स्मितहास्य करुन मंजुघोषा त्याला म्हणाली,
‘हे श्रेष्ठ विप्रा, तू माझ्यावर कृपा केलीस, तेव्हापासून किती संध्याकाळ झाले आणि किती काळ लोटला, याचा जरा विचार कर.’
तिचे हे बोलणे ऐकून तो श्रेष्ठ मुनी चकित होऊन विस्फारलेल्या नेत्रांनी मनात कालगणना करु लागला. त्याने ध्यान केले तेव्हा त्याला समजले की आपली ५७ वर्षे हिच्याबरोबर क्रीडा करण्यात गेली. तो फार संतापला. त्याच्या डोळ्यांतून जणू ठिणग्या पडू लागल्या. आपल्या तपाचा नाश हिनेच केला असे त्याला वाटले. ती त्याला काळरुपी भासू लागली. आपण कष्टाने मिळवलेले तप हिनेच नष्ट केले, अशा विचाराने त्याला राग आला आणि त्याचे ओठ थरथर कापू लागले, इंद्रिये व्याकुळ झाली.
तो मंजुघोषेला म्हणाला,
‘हे पापिणी, दुराचारिणी, कुलटे, तुला पापच प्रिय आहे !’ असे म्हणून त्याने तिला शाप दिला. ‘तू पिशाच्ची हो’ त्याच्या शापामुळे निस्तेज झालेली मंजुघोषा विनयाने नम्र होऊन उभी राहिली.
मुनीच्या कृपाप्रसादाची इच्छा करुन ती सुनयना मुनीला म्हणाली,
‘हे श्रेष्ठ मुने, माझ्यावर कृपा कर आणि या शापातून माझी मुक्तता कर. सज्जनांच्या सात पावले चालले तरी मैत्री जडते, मग हे ऋषिश्रेष्ठा, तुझ्यासंगतीत तर माझी कित्येक वर्षे गेली आहेत. स्वामी, या कारणासाठी तरी माझ्यावर कृपा-प्रसाद कर.’
मुनी म्हणाला,
‘हे कल्याणी, शापातून सुटका होण्यासाठी मी काय सांगतो ते ऐक. मी काय करु ? अग पापिणी, मी केलेले महान तप तू नष्ट करुन टाकलेस. आता पापमोचनी नावाची सर्व पापांचा क्षय करणारी एकादशी येईल. हे सुंदरी, तू त्या कल्याणकारी एकादशीचे व्रत कर. म्हणजे तुझे पिशाच्चत्व नाहीस होईल.’ तिला असे सांगून तो मेधावी ऋषी आपल्या पित्याच्या आश्रमाकडे परत आला.
तो आलेला पाहून च्यवन ऋषी त्याला म्हणाला,
‘बाळा, तू हे काय केलेस ? तुझे सर्व पुण्य नष्ट होऊन गेले ना ?
मेधावी म्हणाला,
‘बाबा, मी अप्सरेसह रमलो, हे मी मोठेच पाप केले. या पापाचा क्षय कोणते प्रायश्चित्त केल्याने होईल, ते मला सांगा.’
च्यवन ऋषी म्हणाला,
‘पापमोचनी नावाची एकादशी आहे. तिचे व्रत केल्यास पापांच्या राशीही नष्ट होतात.’ पित्याचे हे बोलणे ऐकून मेधावीने पापमोचनी एकादशीचे व्रत केले, त्यामुळे त्याचे पाप नष्ट झाले आणि तो पुण्यवान झाला. अप्सरा मंजुघोषेनेही पापमोचनी एकादशीचे व्रत केले. त्यामुळे तिची पिशाच्चयोनीतून मुक्तता झाली. आणि पुन: ती तिच्या रुपाची अप्सरा होऊन स्वर्गात गेली.
लोमश ऋषी म्हणाले,
‘राजा, पापमोचनी एकादशीचे व्रत या प्रमाणे प्रभावशाली आहे. जे मानव हे व्रत करतील, त्यांचे जे काही पाप असेल, ते सर्व नष्ट होईल. जो हे माहात्म्य वाचेल किंवा ऐकेल त्यालाही हजार गाई दान केल्याचे पुण्य मिळेल. ब्रह्महत्या करणारे, सोने चोरणारे, मद्यपी, गुरुच्या पत्नीवर भाळणारे, असे सर्व महापातकीसुध्दा या व्रतामुळे त्या त्या पापांतूण मुक्त होतात हे उत्तम व्रत अशा प्रकारे खूप पुण्य मिळवून देणारे आहे.
॥ भविष्योत्तर पुराणातील पापमोचनी एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 20, 2021

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP