युधिष्ठिराने विचारले,
‘हे भगवंता मधुसूदना, आश्विन शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय व तिचा व्रतविधि कोणता हे मला कृपा करुन सांगा.’
श्रीकृष्ण म्हणाले,
‘हे धर्मराजा, आश्विन शुक्ल पक्षाच्या एकादशीचे माहात्म्य सांगतो ते ऐक. हे माहात्म्य पाप नष्ट करणारे आहे. ही एकादशी पाशांकुशा या नावाने प्रसिध्द आहे. ही श्रेष्ठ एकादशी सर्व पापांचा नाश करते. या एकादशीच्या दिवशी व्रत करणाराने आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून स्वर्ग व मोक्ष मिळवून देणार्या पद्मनाभ भगवंताची पूजा करावी. मनुष्य इंद्रिये स्वाधीन ठेवून व चिरकाल तपश्चर्या करुन जे फल मिळवतो, तेच फळ गरुडध्वज भगवंताला नमस्कार केल्याने मिळते. एखाद्या मनुष्याने अज्ञानामुळे खूप पाप केले तर नंतर त्याने पापनाश करणार्या विष्णूला पश्चात्तापपूर्वक नमस्कार केल्यास तो नरकाला जात नाही. पृथ्वीवर जितकी तीर्थे आहेत व पुण्य़स्थाने आहेत, तेथील सर्व पुण्य भगवान विष्णूचे नामस्मरण केल्याने प्राप्त होते. शारंग धनुष्य धारण करणार्या व दुष्टांना शासन करणार्या विष्णूला जे शरण जातात, त्यांना कधीही यमलोक प्राप्त होत नाही. मनुष्याने भयंकर पाप केले असले तरी देखील जर त्याने या एकादशीचे व्रत केले तर त्या मनुष्याला यमलोकातील यातना कधीही भोगाव्या लागणार नाहीत. जो मनुष्य वैष्णव असून शिवाची निंदा करतो, किंवा जो शैव पंथाचा असून वैष्णवांची निंदा करतो, तो अवश्य नरकाला जातो. हजारो अश्वमेध यज्ञ व शेकडो राजसूय यज्ञ यांना एकादशीच्या उपवासाच्या सोळाव्या हिश्याइतकीही योग्यता नसते. एकादशी सारखे पुण्य या भूलोकावर दुसरे कोणतेही नाही. पद्मनाभ विष्णूचा एकादशीचा दिवस पापनाशक आहे. एकादशीच्या व्रतासारखे पापनाशक व्रत त्रैलोक्यात दुसरे नाहीच. मनुष्य जोपर्यंत कल्याणकारक एकादशीचे उपोषण भक्ती भावाने करीत नाही, तोपर्यंत त्याच्या देहात पातके राहणारच. एखाद्याने ढोंग करुन जरी एकादशीचे उपोषण केले तरीही त्याला यमाचे दर्शन होत नाही व तो विष्णुलोकालाच जातो. ही पाशांकुशा एकादशी स्वर्ग व मोक्ष मिळवून देते. ती शरीराला आरोग्य मिळवून देते. ही एकादशी केल्याने उत्तम पत्नी मिळते. ही एकादशी धनधान्याची समृध्दी करणारी आहे. या पाशांकुशा एकादशीच्या व्रतापेक्षा गंगा, गया, काशीक्षेत्र पुष्कर तीर्थ व कुरुक्षेत्र हे जास्त पुण्यकारक नाहीत. धर्मराजा, या एकादशीच्या दिवशी उपोषण करुन जागरन केल्यास वैष्णवपद अनायासे मिळते. हे राजा, पाशांकुशा एकादशीचे व्रत करणारा मनुष्य आपल्या आईच्या कुलातील दहा पुरुष, पित्याच्या कुलातील दहा पुरुष आणि पत्नीच्या कुलातील दहा पुरुष अशा तीस पुरुषांचा उध्दार करतो. हे सर्व तीस पुरुष दिव्यरुप धारण करतात. ते पीतांबर परिधान करतात व गळ्यात माळा घालून गरुडावर बसून वैकुंठाला जातात. धर्मराजा, बालपणी, तरुणपणी किंवा वृध्दपणी जो पाशांकुशा एकादशीचे उपोषण करतो, तो कितीही पातकी असला तरी दुर्गतीला जात नाही. पाशांकुशा एकादशीचे उपोषण करणारा सर्व पापांतून मुक्त होऊन हरीलोकाला जातो. जो या दिवशी सोने, तीळ, भूमी, गाय, उदक, जोडा, वस्त्र, छत्री अशी दाने देतो, त्याला यमाचे दर्शन कधीही घडत नाही. जो मनुष्य पुण्यकर्म केल्याशिवाय आयुष्याचे दिवस घालवतो, तो श्वासोच्छ्वास जिवंत असला तरी लोहाराच्या भात्याप्रमाणे त्याचे जीवन व्यर्थच म्हटले पाहिजे. धर्मराजा, एखादा मनुष्य दरिद्री असला तरी त्याने आपल्या शक्तीनुसार स्नान-दान वगैरे पुण्यकर्मे करुन आपले आयुष्य सफल करावे. जे लोक तलाव, उद्याने, देवालये बांधतात व अन्नछत्रे चालवतात, त्या सर्व पुण्य करणार्या धैर्यवान लोकांना यमयातना कधीच सहन कराव्या लागत नाहीत. अशी पुण्यकर्म करणारे लोक या भूलोकी दीर्घायुषी, ऐश्वर्यवंत, कुली व निरोगी झालेले पाहायला मिळतात. धर्मराजा, आणखी काय सांगू ? अधर्म करणारे दुर्गतीला जातात आणि धर्म करणारे स्वर्गारुढ होतात, हे तर सर्वांना माहीतच आहे. तू विचारल्याप्रमाणे मी तुला पाशांकुशा एकादशीचे माहात्म्य सांगितले आहे. तुला आणखी काय ऐकण्याची इच्छा असेल, ते विचार.
॥ याप्रमाणे ब्रह्मांडपुराणातील पाशांकुशा एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥