युधिष्ठिराने विचारले, ‘हे जगन्नायका श्रीकृष्णा, अधिक महिन्याच्या कृष्णपक्षातील एकादशीचे नाव काय आणि तिचा व्रतविधी कसा असतो ते मला सांगा.’
श्रीकृष्ण म्हणाले, ‘युधिष्ठिरा, अधिक महिन्याच्या महिन्याच्या कृष्णपक्षातील एकादशीला परमा एकादशी म्हणतात. ही एकादशी पवित्र व पापनाशक आहे. ती स्त्री-पुरुषांना ऐश्वर्य व मुक्ती मिळवून देते. यापूर्वी सांगितलेल्या अधिक महिन्याच्या शुक्ल एकादशीच्या विधीप्रमाणे याही एकादशीचे व्रत करावे. या एकादशीच्या दिवशी नरोत्तम देवाची पूजा भक्तिभावाने करावी. या एकादशीच्या बाबतीत कांपिल्य नगरात घडलेली कथा मी सांगतो ती ऐक. मी ती ऋषींमध्ये बसून ऐकली होती. पूर्वी मुमेधा नावाचा श्रेष्ठ व धर्मशील ब्राह्मण होता. त्याच्या पत्नीचे नाव पवित्रा. ती पतिव्रता म्हणून प्रसिध्द होती. एकदा तो ब्राह्मण कोणत्यातरी कर्मामुळे दरिद्री झाला. त्याच्याजवळ धनधान्य राहिले नाही. त्याने अनेक ठिकाणी याचना केली. तरी त्याला कोठेही भिक्षा मिळत नसे. त्याला भोजन, वस्त्र, अलंकार यांपैकी काहीच मिळेना. त्याची पत्नी पवित्रा केवळ रुप आणि तारुण्य या गुणांनीच पतीची सेवा करीत होती. ती आपल्या घरी स्वत: उपाशी राहूनही अतिथीला भोजन देत असे. विशाल नेत्राची ती पतिव्रता उपाशी राहत असली तरी तिने कधी आपले मुखकमल सुकले आहे असे पतीला दाखवले नाही. घरात अन्न शिल्लक नाही असेही ती कधी पतीला म्हणाली नाही. आपली पत्नी अशातर्हेने प्रेमबंधनाखातर देह झिजवीत आहे, हे पाहून तो ब्राह्मण मनात खिन्न झाला. आपल्या दुर्भाग्याची निंदा करीत नेहमीच प्रिय बोलणार्या आपल्या पत्नीला तो म्हणाला, ‘प्रिये, मी पुष्कळ प्रयत्न करतो; पण मला धन मिळत नाही. मी पुष्कळ श्रीमंतांच्याकडे याचना केली पण ते मला धन देत नाहीत. हे शोभने, आता मी काय करु ? कोठे जाऊ? द्रव्याशिवाय तर घर चालू शकत नाही. आता तू मला परवानगी दे म्हणजे द्रव्य मिळवण्यासाठी मी परदेशी जातो. आपल्या नशिबात परदेशीच अन्न असेल. शिवाय उद्योग केल्याविना काहीच साध्य होत नाही. नशिबावर भरवसा ठेवून काय मिळणार ? म्हणूनच शहाणे लोक उद्योगाचीच प्रशंसा करीत असतात.’
आपल्या पतीने हे बोलणे ऐकून त्या हुशार स्त्रीच्या नेत्रांत अश्रू उभे राहिले. तिने हात जोडले आणि नम्रपणे मस्तक वाकवून ती आपल्या पतीला म्हणाली, तुमच्याइतका सुजाण पुरुष दुसरा कोण असेल ? पण तुमच्या परवानगीनेच मी थोडे बोलते. कारण हित इच्छिणार्याने स्पष्ट बोलले पाहिजे, मग ते ऐकून बरे वाटो किंवा वाईट वाटो. या पृथ्वीवर कोठेही गेला तरी पूर्वजन्मीच्या भाग्याने जे मिळणार असेल, तितकेच आपल्याला मिळेल. भाग्यात नसेल तर सुवर्णमय मेरु पर्वतावर मिळवलेली विद्या, पूर्वजन्मी मिळवलेले धन, पूर्वजन्मी मिळवलेली भूमी या जन्मात आपल्याला मिळत असते ब्रह्मदेवाने जो लेख कपाळावर लिहिला असेल, त्याप्रमाणेच मनुष्याला मनुष्याला मिळत असते. भाग्यात नसेल तर पृथ्वीच्या पाठीवर कोठेही गेलो तरी आपल्याला काहीही मिळणार नाही. हे श्रेष्ठ ब्राह्मणा, आपल्या पूर्वजन्मात तू आणि मी सत्कर्माने मिळवलेले धन दान दिले नसावे. आपण या देशात किंवा परदेशात राहिलो तरी पूर्वजन्मात जे दान दिले असेल, तेच आपल्याला प्राप्त होणार आहे. आपण पूर्वी दान दिल्याशिवाय तो परमदयाळू भगवान् अन्नाशिवाय दुसरे काही देत नाही. म्हणून हे श्रेष्ठ ब्राह्मणा, परदेशी कशाला जायचे ? आपण येथेच राहू या. मी तुम्हाला सोडून क्षणभरही राहणार नाही. पती नसेल तर आई, बाप, भाऊ, सासरा, सासू वगैरे निकटचे नातेवाईकही त्या स्त्रीला विचारीत नाहीत. मग इतर लोक कसे विचारतील ? ज्या स्त्रीचा नवरा तिला सोडून परदेशी गेला आहे, त्या स्त्रीची सर्वजण निंदा करतात. तिला अभागिनी म्हणतात. म्हणून तुम्ही परदेशी जाऊ नका. येथेच राहा. आहे त्या परिस्थितीच आनंद मानून आपण सुखाने राहू. तुमच्या नशिबात असेल तर आपल्या मनातील इच्छा येथेच पूर्ण होतील.’ आपल्या पत्नीचे हे बोलणे ऐकून तो हुशार ब्राह्मण परदेशी न जाता तेथेच राहिला. इतक्यातच मुनिश्रेष्ठ कौंडिण्य तेथे आला. त्याला पाहून सुमेधा ब्राह्मणाला फार आनंद झाला. त्याने आपल्या पत्नीसह कौंडिण्य ऋषीला अनेक साष्टांग नमस्कार घातले.
तो ब्राह्मण ऋषीला म्हणाला,
‘माझ्या भाग्यानेच आज मला तुमचे दर्शन घडले आहे. मी धन्य आहे. तुमचे दर्शन झाल्यामुळे मला माझे जीवन सफल झाले आहे असे वाटते.’ नंतर त्या सुमेधा ब्राह्मणाने त्या ऋषीची पूजा केली. व त्याला भोजन दिले.
भोजनानंतर त्या पतिव्रतेने विचारले, ‘हे श्रेष्ठ ब्राह्मणा, आमच्या दारिद्र्याचा नाश कोणत्या उपयांनी होईल ? आमच्यासारख्या संसारी माणसांना विद्या आणि धन, दानाशिवाय दुसर्या कोणत्या उपायांनी मिळतील ? माझा पती मला येथेच ठेवून परदेशी धन मिळवण्यासाठी याचना करायला जाण्याचा विचार करीत आहे. मी पतीला विनंती केली आणि दिल्याशिवाय काही प्राप्त होत नाही असा युक्तीवाद करुन त्याला येथेच रोखून धरले आहे. हे मुनिश्रेष्ठा, माझ्या भाग्यानेच तू आज येथे आला आहेस. तुझ्या कृपेने माझे दारिद्रय खात्रीने नष्ट होऊ दे. हे कृपासागरा ब्राह्मणश्रेष्ठा, माझे दारिद्र्य खरोखर नष्ट होईल, असे व्रत, तीर्थ किंवा तप असेल तरे ते मला सांगा.’ उत्त्म शीलाच्या त्या ब्राह्मणपत्नीचे हे बोलणे ऐकून कौंडिण्य ऋषीन मनात विचार केला आणि नंतर सर्व पापे नष्ट करणारे दु:ख-दारिद्र्याचा नाश करणारे उत्तम व्रत तिला सांगितले.
कौंडिण्य ऋषी तिला म्हणाले, ‘अधिक महिन्याच्या कृष्ण पक्षात परमा नावाची एकादशी आहे. या एकादशीच्या दिवशी उपोषण करावे व रात्री विधीपूर्वक जागरण करुन भक्तिगीते गावीत, म्हणजे व्रत करणार्याला ऐश्वर्य मिळते. व धनधान्याने तो समृध्द होतो. कुबेराने हे उत्तम व्रत केले होते, त्यामुळेच शंकर संतुष्ट झाला आणि त्याने कुबेराला धनाचा अधिपती केला. तसेच पूर्वी राजा हरिश्चंद्राने आपली पत्नी व पुत्र विकल्यानंतर हे परमा एकादशीचे व्रत केले होते. त्यानंतरच त्याला प्रिय पत्नी व पुत्र परत मिळाले व निष्कंटक राज्यही प्राप्त झाले. म्हणून हे शोभने पवित्रे, परमा एकादशीचे हे कल्याणकारक व्रत तू विधिपूर्वक व जागरणासह कर.’ असे सांगून कौंडिण्य ऋषीने पवित्रेला व्रताचा विधी सांगितला. त्याशिवाय त्याने सुमेधा ब्राह्मणाला पंचरात्रव्रताचा विधी सांगितला. अधिक मासात हे पंचरात्रव्रत केले असता ऐश्वर्य प्राप्त होते व मुक्ती मिळते.
परमा एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान वगैरे कृत्ये उरकून पंचरात्रव्रताचा संकल्प करावा. या पंचरात्रव्रतात पाच दिवस पर्यंत सकाळी स्नान करुन जो मनुष्य उपोषण करतो, तो आईबाप व पत्नी यांच्यासह विष्णुलोकाला जातो. या एकादशीपासून अमावास्येपर्यंत पाच दिवस जो मनुष्य एक वेळ भोजन करतो, तो सर्वं पापांतून मुक्त होऊन स्वर्गात जातो. तेथेही त्याला मान मिळतो. जो सकाळी स्नान करुन हे पाच दिवस ब्राह्मणाला भोजन घालतो, त्याने देव, दैत्य व मनुष्यांसह सर्व विश्वालाच भोजन घातल्यासारखे होते. या पाच दिवसात जो मनुष्य चांगल्या पाण्याने भरलेला कुंभ रोज ब्राह्मणाला देतो त्याने जणू सर्व चराचर ब्रह्मांडच दान दिल्यासारखे होते. हे पवित्रे, या पंचरात्रव्रतात जो मनुष्य विद्वान ब्राह्मणाला तिलपात्राचे दान देतो तो मनुष्य त्या तिलपात्रात जितके तीळ असतील तितकी वर्षे स्वर्गलोकात राहतो. जो मनुष्य हे पाच दिवस स्नान करुन दह्याचे भांडे रोज दान देतो, त्याला या पृथ्वीवर ऐश्वर्य प्राप्त होते व नंतर सूर्यलोकातही त्याचा महिमा गाजतो. जो मनुष्य या पाच दिवसात ब्रह्मचर्य पाळतो तो मोठ्या आनंदाने स्वर्गलोकातील सुखे अप्सरांसह उपभोगतो.’
कौंडिण्य ऋषी म्हणाले, ‘हे पवित्रे, तू पतीसह हे पंचरात्रव्रत विधिपूर्वक कर. म्हणजे तुला धनधान्यासह ऐश्वर्य मिळेल आणि शेवटी आपल्या पतीसह तू स्वर्गलोकाला जाशील.’ कौंडिण्य ऋषीने सांगितल्याप्रमाणे पवित्रेने पतीसह स्नान केले व भक्तिभावाने विधिपूर्वक अधिक मासातील एकादशीव्रत व पंचरात्रव्रत केले. ते व्रत पूर्ण होताच राजपुत्र राजवाडयातून बाहेर पडून आपल्याकडेच येत आहे असे तिला दिसले. त्या दांपत्याच्या भाग्यानेच राजपुत्राला जणू प्रेरणा केली होती. राजकुमाराने त्या दोघांना संसारासाठी लागणार्या सर्व साहित्याने भरलेला वाडा दिला. संसारखर्चासाठी एक गाव दिला व त्या वाड्यात त्यांचे विधिपूर्वक वास्तव्य करवले. त्या ब्राह्मणाच्या तप:श्चर्येने राजा प्रसन्न झाला व त्याची स्तुती करुन आपल्या राजवाडयात परतला.
अधिक महिन्याच्या कृष्णपक्षातील परमा किंवा परा नावाच्या एकादशीचे भक्तिभावाने उपोषण केल्यामुळे व पंचरात्रव्रत केल्यामुळे सुमेधा ब्राह्मण सर्व पापांतून मुक्त झाला. त्याला सौख्य व ऐश्वर्य लाभले. त्याने पत्नीसह या इहलोकातील सर्व सुखे भोगली आणि शेवटी तो वैकुंठलोकाला गेला.
श्रीकृष्ण म्हणाले, ‘धर्मराजा, अधिकमासातील कृष्णपक्षाच्या एकादशीपासून जे हे पाच दिवसांचे पंचरात्रव्रत सुरु होत त्याचे पुण्य किती आहे याचे वर्णन करण्यास मी असमर्थ आहे. तरीही थोडके सांगतो. परमा एकादशीचे व्रत केल्याने पुष्कर वगैरे सर्वच तीर्थांत स्नान केल्याचे पुण्य लाभते, तसेच गंगा वगैरे पवित्र नद्यांत स्नान केल्याचे व गोप्रदान वगैरे सर्व दाने दिल्याचे पुण्य मिळत असते. शिवाय, गयेत श्राध्द करुन पितरांनाही संतुष्ट केल्याचे फळ या एकादशीव्रताने मिळते. व्रतखंड प्रकरणात सांगितलेली सर्व व्रते केल्याचे पुण्यही त्याला लाभते. मनुष्यात जसा ब्राह्मण श्रेष्ठ, चतुष्पाद जनावरांत जशी गाय श्रेष्ठ, सर्वं देवांत इंद्र श्रेष्ठ, त्याप्रमाणे सर्व महिन्यांत अधिकमास श्रेष्ठ असतो. त्यातही या अधिक महिन्याचे शेवटचे पाच दिवस महापतकांचाही नाश करणारे आहेत. या पंचरात्रातील परमा एकादशी व शुक्लपक्षातील पद्मिनी एकादशी पापांचा नाश करणार्या आहेत. ज्ञानी व हुशार मनुष्याने यातील एक एकादशी तरी अवश्य करावीच. मनुष्याचा जन्म मिळूनही ज्यांनी अधिक महिन्यात प्रात:स्नान केले नाही व एकादशीचे उपोषण केले नाही ते खरोखर आत्मघात करुन घेणारेच म्हटले पाहिजेत. प्राणी चौर्यांशी लक्ष योनीत फिरत असताना अनेक पूर्वजन्मांत साठवलेल्या पुण्यामुळे त्याला दुर्लभ मनुष्यजन्म मिळत असतो. म्हणून अशा दुर्लभ मनुष्यजन्मात परमा एकादशीचे कल्याणकारक व्रत अवश्य केले पाहिजे.
श्रीकृष्ण म्हणाले, ‘धर्मराजा, तू विचारल्यावरुन मी परमा एकादशीचे माहात्म्य तुला सांगितले आहे. या पृथ्वीवर अधिकमासात जे लोक भक्तिभावाने व विधिपूर्वक परमाएकादशीचे व्रत करतात ते स्वर्गात इंद्राप्रमाणे ऐश्वर्य भोगतात व नंतर त्रिभुवनांनी वंदन केलेल्या वैकुंठलोकात जातात. म्हणून हे धर्मराजा, तू या परमाएकादशीचे शुभ व्रत कर. या परमा एकादशीव्रताचे माहात्म्य वाचले किंवा ऐकले असता हजार गाई दान दिल्याचे पुण्य लाभते.
॥ अधिक महिन्यातील परमा-एकादशीचे
माहात्म्य संपूर्ण झाले ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
॥ सर्व एकादश्यांची माहात्म्ये संपली ॥