एकादशी महात्म्य - विजया एकादशी

एकादशी व्रताचे नुसते श्रवण केल्यासही श्रोत्याला या जगात अनेक सुखोपभोग मिळतात व शेवटी त्याला विष्णुलोकात स्थान प्राप्त होते.


युधिष्ठिराने विचारले,
हे दयासागरा वासुदेवा, आमच्यावर प्रसन्न होऊन माघ वद्य एकादशीचे नाव व तिचे माहात्म्य सांग.’
श्रीकृष्ण म्हणाले,
‘राजेन्द्रा, या एकादशीचे नाव विजया आहे. कारण तिचे व्रत करणाराला निरंतर विजय मिळतो. या एकादशीच्या व्रताचे माहात्म्य सर्व पातकांचा नाश करणारे आहे. पूर्वे नारदाने ब्रह्मदेवाला विचारले, ‘हे देवातील श्रेष्ठा, ब्रह्मदेवा, या विजया नावाच्या एकादशीचे व्रत काय आहे, ते कृपाकरुन सांग.’
नारदाने विचारल्यावर पितामह ब्रह्मदेव म्हणाले,
पापाचा संपूर्ण नाश करणारी या एकादशीची मी कथा सांगतो ती ऐक. विजया एकादशीचे हे व्रत फार प्राचीन व पापनाशक आहे. मी हे व्रत आजवर कोणाला सांगितले नाही. ही एकादशी व्रत करणाराला नि:संशय जय मिळवून देते. पूर्वी रामचंद्र चौदा वर्षे तपोवनात (वनवासात) गेले असता सीता आणि लक्ष्मणासह पंचवटीत राहत होते. तेथे राहत असता थोर मनाच्या राघवाची तपस्विनी पत्नी सीता रावणाने हरण करुन नेली. त्या दु:खाने रामचंद्र जणू बेशुध्द झाले. त्यावेळी भटकत असता थोडेसेच आयुष्य राहिलेला जटायू त्यांनी पाहिला. रामाला सर्व वृत्तांत सांगून जटायू मरण पावला. नंतर वनात फिरत्त असता रामाने कबंध राक्षस मारला. त्यानंतर रामाची व सुग्रावाची अतुट मैत्री जडली. त्याने रामाला मदत करण्याकरता वानरांचे सैन्य जमवले. नंतर हनुमंताने लंकेत जाऊन अशोक-वनात जानकीला पाहिले. तेथे मारुतीने खुणेच्या गोष्टी सांगून रामाने दिलेली अंगठी सीतेला दिली. नंतर त्याने लंका-दहनासारखी अचाट कृत्ये केली आणि परत येऊन रामाला सर्व वृत्तांत सांगितला. तो ऐकून सुग्रीवाची अनुमती घेऊन रामाने लंकेकडे प्रस्थान ठेवले. वानरांचा आवडता झालेला राम त्या वानरांसह समुद्रतीरावर येऊन पोचला. ओलांडण्यास कठीण असलेला तो समुद्र पाहून रामाला आश्चर्य वाटले.
मग नेत्र विस्फारुन राम लक्ष्मणाला म्हणाला,
‘लक्ष्मणा, वरुणाचे निवासस्थान असलेला हा समुद्र कोणत्या पुण्याने तरुन जाता येईल बरे ? या समुद्राच्या पाण्याला अंत नाही. भयंकर मगर, मासे यांनी हा व्यापलेला आहे. हा समुद्र ओलांडता येईल, असा कोणताच उपाय मला दिसत नाही.’
लक्ष्मण म्हणाला,
‘हे पुराण-पुरुषा रामा, तू तर आदिदेव आहेस. येथे जवळच एका बेटावर बकदाल्भ्य ऋषी आहेत. आपल्या या ठिकाणापासून त्यांचा आश्रम दोन कोसांवर आहे. हे रघुनंदना, या बकदाल्भ्य ऋषीने कित्येक ब्रह्मदेव पाहिले आहेत. हे राजेंद्रा, अशा पुरातन ऋषीश्रेष्ठाकडे जाऊन त्याला समुद्र ओलांडण्याचा उपाय विचारावा.’ लक्ष्मणाचे हे कल्याणकारक बोलणे ऐकून रामचंद्र श्रेष्ठ मुनी बकदाल्भ्याच्या दर्शनाला गेला. ज्याप्रमाणे देव विष्णूला नमस्कार करतात; त्याप्रमाणे रामाने बकदाल्भ्याला नमस्कार केला. राम म्हणजे काही कारणाने मनुष्य-अवतार घेतलेला पुराणपुरुष परमेश्वर आहे; हे त्या ऋषीने जाणले.
तो रामाला म्हणाला,
‘रामचंद्रा, तुझे इकडे आगमन कशासाठी झाले आहे ?’
श्रीरामचंद्र म्हणाला,
‘श्रेष्ठ विप्रा, मी सैन्यासह राक्षसांनी भरलेली लंका जिंकून घेण्यासाठी आलो आहे. तुझ्या प्रसादाने मी हे कार्य पार पाडीन. तू अनुकूल झालास तरच मला हा सागर ओलांडता येईल. तेव्हा आमच्यावर कृपा कर आणि सागर तरुन जाण्याचा उपाय सांग. याच कामासाठी मी तुझ्या दर्शनाला आलो आहे.’
मुनी म्हणाले,
‘रामचंद्रा, सर्व व्रतांत उत्तम असलेले व्रत मी तुला सांगतो. ते व्रत केलेस तर तुझा सहज विजय होईल. तूअ राक्षसांना जिंकशील व लंकेवरही जय मिळवशील. त्यामुळे तुला दीर्घकाळ टिकणारी कीर्ती मिळेल. म्हणून हे रामा, मन एकाग्र करुन तू हे व्रत पाळ. माघ कृष्ण पक्षात विजया नावाची एकादशी आहे. या एकादशीचे व्रत तू केलेस म्हणजे तुझा विजय होईल. वानरांसह तू हा सागर ओलांडून नि:संशय जाशील. उत्तम फल देणार्‍या या एकादशीचा विधी आता ऐक.
दशमी तिथीला एक कलश तयार करावा. तो शक्तीप्रमाणे सोन्याचा, चांदीचा, तांब्याचा किंवा मातीचा करावा. तो कलश पाण्याने पूर्ण भरुन त्यान पाने घालून तो सप्तधान्यांनी केलेल्या स्थंडिलावर चौकोनी बैठकीवर ठेवावा. त्या कलशावर जव भरलेले पूर्ण पात्र ठेवावे. त्यावर सोन्याची नारायणाची मूर्ती स्थापन करावी. एकादशी उजाडल्यावर सकाळी स्नान करावे. दशमीचे दिवशी स्थापन केलेल्या कलशातील नारायणाची षोडशोपचार पूजा करावी. तो कलश गंध, माला, फुले यांनी सुशोभित करावा. गंध धूप, अर्पण करावे नाना प्रकारचे नैवेद्य दाखवावे. डाळिंब, नारळ, वगैरे फळे अर्पण करावी. श्रीरामा, तो दिवस पूजन केलेल्या कलशापुढेच भक्तिभावाने घालवावा. व्रत करणाराने कलशासमोरच रात्री जागरण करावे. राजा द्वादशीच्या दिवशी सूर्योदयाचे वेळी तो कलश नदी, झरा, तलाव अशा कोणत्याही जलतीरावर न्यावा. तेथे त्याची स्थापना करुन विधिपूर्वक पूजा करावी. नंतर तो कलश नारायणाचे मूर्तीसह वेदपारंगत ब्राह्मणाला द्यावा. त्या कलशाबरोबर महादाने द्यावीत. रामचंद्रा, तू वानरसैन्याच्या अधिपतींसह हे व्रत प्रयत्नपूर्वक कर. तुझा विजय होईल.’ दाल्भ्य ऋषीचे हे बोलणे ऐकून, श्रीरामचंद्राने त्याने सांगितलेल्या विधीप्रमाणे व्रत केले. ते व्रत केल्यावर त्या रघुनंदनाला विजय मिळाला.
राजा, जे मानव या विधीप्रमाणे हे व्रत करतील, त्यांना या पृथ्वीवर विजय मिळेलच, शिवाय अक्षय स्वर्गलोक लाभेल. म्हणून हे राजा, याकरिता विजया-एकादशीचे व्रत सर्वांनी करावे. या विजया-एकादशीचे माहात्म्य सर्व प्रकारच्या पातकांचा नाश करते. हे माहात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने वाजपेय-यज्ञाचे फळ मिळते.
॥ याप्रमाणे स्कंदपुराणातील कृष्ण-युधिष्ठिर संवादातील विजया नावाच्या एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 20, 2021

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP