एकादशी महात्म्य - परिवर्तिनी एकादशी

एकादशी व्रताचे नुसते श्रवण केल्यासही श्रोत्याला या जगात अनेक सुखोपभोग मिळतात व शेवटी त्याला विष्णुलोकात स्थान प्राप्त होते.  


युधिष्ठिराने विचारले,
‘हे श्रीकृष्णा, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय ? तिची देवता कोणती ? व्रताचा विधी कसा आहे ? व हे व्रत केल्याने काय पुण्य मिळते ? सर्व सांग.’
श्रीकृष्ण म्हणाले,
‘हे धर्मराजा, ही स्वर्ग व मोक्ष मिळवून देणारी महापुण्यकारक वामन एकादशी आहे. याच एकादशीला जयंती एकादशी असेही नाव आहे. शिवाय आषाढी एकादशीला झोपी गेलेले भगवान या एकादशीच्या दिवशी एका कुशीवरुन दुसर्‍या कुशीवर वळतात. म्हणून या एकादशीला लोक परिवर्तिनी एकादशी असेही म्हणतात. अशा या एकादशीचे माहात्म्य मी तुला सांगतो ते ऐक.
या एकादशीची कथा ऐकल्यानेही सर्व पापांचा नाश होतो. या एकादशीचे व्रत सर्व पापी लोकांच्या पापाचे शमन करते. ही एकादशी मोक्ष मिळवून देणारी आहे. म्हणून ज्याला मोक्षाची इच्छा असेल, त्याने हे व्रत केले पाहिजे. माझे भक्त व वैष्णव यांनी तर हे व्रत अवश्य करावे. या एकादशीचे दिवशी जे वामनाची पूजा करतात ते जणू तिन्ही लोकांची पूजा करतात. अशी पूजा करणारे लोक शेवटी विष्णूच्या निकट जाऊन राहतात. जो या जयंती एकादशीचे दिवशी कमलासारखे नेत्र असलेल्या वामनाची पूजा करतो व त्यावेळी कमळे अर्पण करतो. त्याला सर्व जगाची पूजा केल्याचे आणि सनातन देव, ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांचीही पूजा केल्याचे फळ मिळते. हे व्रत केल्यानंतर सर्व त्रैलोक्यात दुसरे काही कर्तव्य शिल्लकच उरत नाही.’
युधिष्ठिराने विचारले,
‘हे जनार्दना, माझ्या मनात एक मोठी शंका आहे. तू या चातुर्मासात कशासाठी झोपतोस ? आणि या एकादशीच्या दिवशी का म्हणून एका कुशीवर वळतोस ? तू तर देवांचा देव आहेस. मग बळीला तू बंधनात कशासाठी टाकलेस ? सर्व सविस्तर सांगून माझी शंका दूर कर.’
श्रीकृष्ण म्हणाले,
‘राजश्रेष्ठा धर्मराजा, पापाचे हरण करणारी कथा मी सांगतो ती ऐक. पूर्वी त्रेतायुगामध्ये बळी नावाचा दैत्य होता. तो माझी नित्य पूजा करीत असे. तो केवळ मत्परायण असून माझा अनन्य भक्त होता. तो माझ्या नामाचा मंत्र जपत असे आणि विविध प्रकारची सूक्ते म्हणून माझी भक्ती करीत असे. तो ब्राह्मणांचा पूजक होता. आणि नित्य यज्ञकर्म करण्यात त्याने मन घातले होते; परंतु तो इंद्राचा द्वेष करीत असे. मी इंद्राला दिलेला स्वर्गलोक त्याने जिंकला. त्या महात्म्या बलीने हा सर्व भूलोकही जिंकला होता. हे सर्व पाहून सर्व देव एकत्र जमले आणि त्यांनी विचार केला की, ‘आपण सर्व नारायणाला शरण जाऊ या.’ नंतर सर्व देव व ऋषी यांच्यासह इंद्र मला शरण आला. त्याने मला शीरसाष्टांग नमस्कार घातला व माझी स्तुतिस्तोत्रे म्हटली. गुरुनेही सर्व देवांसह माझी अनेकप्रकारे पूजा केली. तेव्हा मी देवांसाठी पाचवा वामन अवतार धारण केला आणि बटू झालेल्या वामन रुपानेच अतिशय उग्र असे विराट रुप धारण करुन बळीला जिंकले. पण तरीही बळीने आपले सत्यवादीपण सोडले नाही. मी पुन्हा ब्रह्मांड रुप घेतले आणि बळीचे सर्वस्व हरण करुन ते इंद्राला दिले आणि बळीला पाताळाचे राज्य दिले.
युधिष्ठिराने विचारले,
‘देवाधिदेवा, तू वामनरुप धारण करुन बलीला कसे जिंकलेस ? मी तुझा भक्त आहे म्हणून ती कथा मला सविस्तर सांग.’
श्रीकृष्ण म्हणाले,
मी कपटाने बटू वामनरुप धारण केले आणि बलीची प्रार्थना केली की, ‘मला तीन पावले भूमी दान दे. म्हणजे तू त्रैलोक्याचे दान केल्याप्रमाणे होईल. यात काशी शंका बाळगू नकोस.’ हे धर्मराजा, मी बलीची अशी प्रार्थना केली तेव्हा त्याने माझ्या हातावर त्रिपाद भूमीदानाचे उदक सोडले. त्याने दानाचा असा संकल्प केल्याबरोबर माझा देह एकदम मोठा वाढला. माझा पाय पृथ्वीवर राहिला. भूवर्लोकावर गुडघे पोचले. स्वर्ग लोकापर्यंत कंबर पोचली. महर्लोकापर्यंत पोट पोचले. जनलोकापर्यंत हृदय, तपोलोकात गळा, सत्यलोकात मुख, व मस्तक तर त्याच्याही वर गेले. त्यावेळी चंद्र, सूर्य, योगांसह नक्षत्रगण, इंद्रांसह सर्व देव, शेषासह सर्व नाग या सर्वांनी वेदातील विविध सूक्तांनी व नानाप्रकारच्या स्तोत्रांनी माझी स्तुती केली. त्यावेळी बलीला हातांनी धरुन मी म्हणालो, ‘निष्पाप बलीराजा, मी एका पायाने पृथ्वी व्यापली व दुसरा पाय टाकून तुझा स्वर्ग व्यापला. आता भूमीदानातील तिसरा पाय टाकायला मला जागा दाखव.’ मी असे म्हणताच त्याने मला आपले मस्तक अर्पण केले. त्यावेळी मी माझा एक पाय त्याच्या मस्तकावर ठेवला आणि माझे पूजन करणार्‍या त्या भक्त बलीला रसातळात स्थापन केले. विनयाने नम्र झालेल्या त्या बलीला पाहून मी म्हणालो, ‘हे निरंतर तुझ्या सन्निध राहीन.’ धर्मराजा, मी त्या भाग्यशाली बलीला- विरोचनाच्या पुत्राला असे वचन दिले म्हणून शयनी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत माझी मूर्ती बलीच्या जवळ पाताळात राहते व दुसरी मूर्ती श्रेष्ठ क्षीरसागरात शेषाच्या आसनावर झोपते. ती मूर्ती भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला एका कुशीवरुन दुसर्‍या कुशीवर वळते.
हे राजा, या परिवर्तिनी एकादशीचे व्रत सर्वांनी प्रयत्न करुन केले पाहिजे. कारण ही एकादशी महापुण्यकारक, पवित्र आणि पापांचा नाश करणारी आहे. या एकादशीचे दिवशी त्रैलोक्याचा पितामह असलेल्या वामनाची पूजा करावी. चांदी, तांदूळ व दही यांचे दान करावे. रात्री जागरण करावे. राजा, हे व्रत केल्याने मनुष्याला मुक्ती मिळते. जयंती एकादशीचे हे कल्याणकारक, पाप नाहीसे करणारे, भोग व मुक्ती देणारे व्रत जो मनुष्य करतो, तो स्वर्गलोकाला जातो आणि चंद्राप्रमाणे तेज:पुंज होऊन शोभतो. सर्व पापे हरण करणारी या एकादशीची कथा जो ऐकतो त्याला हजार अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते.

॥ याप्रमाणे स्कंदपुराणातील परिवर्तिनी किंवा जयंती नावाच्या
एकादशीची कथा संपूर्ण झाली ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2021

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP