एकादशी महात्म्य - पुत्रदा एकादशी

एकादशी व्रताचे नुसते श्रवण केल्यासही श्रोत्याला या जगात अनेक सुखोपभोग मिळतात व शेवटी त्याला विष्णुलोकात स्थान प्राप्त होते.


धर्मराजाने विचारले,
‘श्रीकृष्णा, तू सफला एकादशीचे माहात्म्य सांगितलेस. आता पौष महिन्यातील शुक्ल एकादशीचे माहात्म्य सांग. या एकादशीचे नाव काय ? तिचा पूजाविधी कोणता ? आणि कोणत्या देवाची पूजा या एकादशीला करतात ? हे पुरुषोत्तमा, या एकादशीला हृषीकेश कोणावर संतुष्ट झाले ? ते सर्व सांग.
श्रीकृष्ण म्हणाले,
पौष महिन्यातील शुक्ल एकादशीचे माहात्म्य व पूजाविधी मी सर्व लोकांच्या कल्याणासाठी सांगतो तो ऐक. पूर्वी सांगितलेल्या विधीप्रमाणे या एकादशीचे उपोषण व पूजा प्रयत्नपूर्वक करावी. सर्व पापांचा नाश करणार्‍या या श्रेष्ठ एकादशीचे नाव पुत्रदा असे आहे. सर्व इच्छा पूर्ण करणारा व सर्वसिध्दि देणारा नारायण या एकादशीचा देव आहे. या सर्व चर आणि अचर विश्वात या एकादशीसारखी सर्व पापे नष्ट करणारी दुसरी श्रेष्ठ तिथी नाही. हे व्रत केल्यामुळे मनुष्य विद्यावान, यशस्वी व ऐश्वर्यवंत होतो. राजा यासंबंधी सर्व पापे नष्ट करणारी मी एक श्रेष्ठ कथा सांगतो ती ऐक. भद्रावती नावाच्या नगरीत सुकेतूमान नावाचा राजा होता. त्याला शैब्या नावाची पट्टराणी होती. तो राजा पुत्रहीन होता. पुत्र होईल अशी मनोराज्य करीत तो राजा काळ घालवीत असे. पण तरीही त्या राजाला वंश पुढे चालवणारा पुत्र लाभला नाही. कोणत्या धर्ममार्गांमुळे मला पुत्र होईल, याविषयी चिंतन करण्यात राजाने खूप काळ घालविला. ‘मी काय करावे ? कोठे जावे म्हणजे पुत्रप्राप्ती होईल ?’ अशी तो नित्य चिंता करीत असे. या चिंतेमुळे सुकेतूमान राजाला व संपूर्ण राष्ट्राला चैन पडेना व सुख लाभेना. आपली पत्नी शैब्या हिच्यासह तो नेहमी दु:ख करीत असे. हे जोडपे आता नित्य चिंतेत व दु:खात बुडून राहू लागले. त्या सुकेतूमान राजाचे पितरही दु:खी झाले. या राजानंतर पुढे आपल्याला कोण उदक देणार, याची चिंता त्यांना वाटू लागली. या चिंतेमुळे राजाने त्यांना दिलेले उदक थंड पाण्याप्रमाणे संतोष न देता गरम पाण्यासारखे तापदायक होऊ लागले. पुत्र नसल्यामुळे त्या राजाला नातेवाईक, मित्र, मंत्री, जिवलग दोस्त रुचेनासे झाले. हत्ती, घोडे, पायदळ यात त्याला रस वाटेना. निराश झालेल्या त्या राजाच्या मनात विचार येत असे, ‘पुत्र नसलेला मनुष्य जन्माला येऊनही व्यर्थच असतो. पुत्रहीनाचे घर भयाण व ओसाड असते, तर त्याचे हृदय नेहमी दु:खाने भरलेले असते. पुत्राशिवाय पितर, देव व मनुष्य यांच्या ऋणातून मुक्तता होत नाही. म्हणून मनुष्याने सर्व प्रयत्न करुन पुत्रलाभ करुन घ्यावाच. ज्या पुण्यवानाचे घरी पुत्रजन्म होतो, त्याला या जन्मी यश व किर्ती लाभते आणि परलोकीही शुभगती प्राप्त होते. अशा पुण्यवानांचे घर म्हणजे आयुष्य, आरोग्य, संपत्ती यांचे निवासस्थानच होते. पुण्यवान लोकांनाच पुत्र, पौत्र व नंतर उत्तम लोक प्राप्त होत असतात. पुण्याशिवाय किंवा विष्णुभक्ती केल्याशिवाय पुत्रसंतती, ऐश्वर्य व विद्या प्राप्त होत नाहीत, असे मला वाटते.’ याप्रमाणे तो राजा नेहमी चिंता करीत असल्याने त्याच्या मनाला शांतता लाभत नसे. संध्याकाळी, मध्यरात्री, सकाळी राजा हीच चिंता करीत असे. रात्रंदिवस अशी चिंता करता करता राजाच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले. पण आत्महत्या केली तर पुढे दुर्गती प्राप्त होते, असे मनात येऊन त्याने आत्महत्येचा विचार सोडून दिला. आपला देह दिवसेंदिवस क्षीण होत आहे आणि आपल्याला अजून पुत्र नाही, असे पाहून राजाने स्वत:च्या बुध्दीने हितकारक होईल असा विचार केला. आणि तो घोडयावर बसून गहन वनात निघून गेला. राजा कोठे गेला आहे हे मंत्री, पुरोहित यांपैकी कोणालाही माहीत नव्हते. जेथे पशु-पक्षीच राहतात, अशा गहन अरण्यात राजा गेला. तेथे रानातील वृक्षांचे अवलोकन करीत तो फिरु लागला. त्या वनात वड, पिंपळ, खजूरी, फणस, बकूळ, पिंपरणी, तिवस, शाल, ताल, तमाल व सरळ असलेले देवदार असे अनेक वृक्ष त्याने पाहिले. त्या वनात हिंगणबेट, अर्जुनवृक्ष, भोकरी, बेहेडे, राळेचे वृक्ष, करवंदी, पाडळ, खैर, पळस, या प्रकाराचेही शोभा देणारे वृक्ष त्याने पाहिले. त्याचप्रमाणे हरिण, वाघ, रानडुक्करे, सिंह, वानर, गवे, काळवीट, कोल्हे, ससे, क्रूर रानमांजरे, साळ चमर अशी अनेक प्रकारची जनावरे राजाने त्या वनात पाहिली. वारूळातून सरपटत बाहेर पडणारे सर्पही त्याने पाहिले. तेथे माजलेले हत्तींचे कळप होते. त्या कळपांबरोबर हत्तींचे छावे होते. हत्तिणींच्या समुदायामध्ये कळपांचे पुढारी असलेले चार दातांचे हत्ती त्याने पाहिले. ते हत्ती पाहून राजाला आपल्या हत्तीदलाची आठवण झाली. त्या श्वापदांत फिरताना राजा शोभून दिसू लागला. अनेक आश्चर्यांनी भरलेले ते घोर वन राजाने पाहिले. कोठे कोल्ह्याचा आवाज ऐकू येई तर कोठे घुबडांचा शब्द कानी पडे. असे आवाज ऐकत आणि पशु-पक्षी पाहत राजा त्या गहन वनात फिरत होता. इतक्यात सहस्त्ररश्मी सूर्य आकाशाच्या मध्यभागी पोचला. आता राजा तहानेने आणि भुकेने व्याकुळ झाला व इतस्तत: भटकू लागला. तहानेमुळे त्याला अगदी कंठकोष पडला. त्याच्या मनात आले, ‘मी असे कोणते कर्म केले की त्यामुळे मला अशा तर्‍हेचे दु:ख भोगावे लागत आहे ? मी यज्ञ करुन आणि पूजा करुन देवांना संतुष्ट केले, ब्राह्मणांना मेजवान्या व दाने देऊन संतुष्ट केले. त्याचप्रमाणे काळ-वेळ पाहून प्रजेचे पुत्राप्रमाणे पालन केले. असे असूनही मला अशा तर्‍हेचे दारुण दु:ख का बरे भोगावे लागत आहे ?’ तो राजा असा विचार करीत त्या वनात पुढे जात होता. इतक्यात पूर्वजन्मीच्या पुण्याच्या प्रभावामुळे त्याला समोरच एक मनोरम सरोवर दिसले. ते सरोवर कमळांच्या थव्यामुळे फार शोभून दिसत होते. ते जणू मानससरोवराशी स्पर्धा करीत होते. त्या सरोवराचा आसमंत कारंडव पक्षी, चक्रवाक, राजहंस, यांच्या शब्दांनी भरुन गेला होता. त्या सरोवराच्या पाण्यात मासे, मगर व दुसरे अनेक जलचर प्राणी होते. सरोवराच्या जवळच राजाला मुनींचे अनेक आश्रम दिसले. त्यावेळी राजाला अनेक शुभसूचक शकुन झाले. राजाचा उजवा डोळा, उजवा हात स्फुरण पावू लागला व पुढील कल्याणकारी फळ सुचवू लागला. सरोवराच्या तीरावर ऋषी वेदमंत्रांचे पठण करीत आहेत हे पाहून राजा घोडयावरुन उतरला आणि त्या व्रतस्थ मुनींसमोर हात जोडून उभा राहिला. प्रत्येक ऋषीला त्याने वेगळा वेगळा साष्टांग नमस्कार घातला. ऋषींचे दर्शन झाल्यामुळे त्या श्रेष्ठ राजाला फार हर्ष झाला.
मुनी त्याला म्हणाले, ‘
‘राजा, आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो आहोत. तुझ्या मनात काय आहे ते आम्हाला सांग.’
राजा म्हणाला,
‘असे कठोर तप करणारे तुम्ही कोण आहात ? तुम्ही या जगात कोणत्या नावाने प्रसिध्द आहात ? तुम्ही येथे एकत्र कशासाठी जमला आहात ? मला सर्व सांगा.
ऋषी म्हणाले,
‘राजा, आम्ही विश्वदेव आहोत. आम्ही पुढच्या माघ स्नानासाठी येथे एकत्र आलो आहोत. राजा, आज पुत्रदा नावाची एकादशी आहे. ज्याला पुत्राची इच्छा असेल, त्याने या शुक्ल एकादशीचे व्रत केल्यास पुत्र मिळतो.’
राजा म्हणाला,
‘मुनींनो, मीही पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून फार प्रयत्न करीत आहे. जर आपण माझ्यावर संतुष्ट झाला असाल तर मला कल्याण करणारा पुत्र द्या.’
मुनी म्हणाले,
राजा, आजच पुत्रदा या नावाने प्रसिध्द असलेली एकादशी आहे. आज तू हे एकादशीचे व्रत कर. आमच्या आशीर्वादाने आणि विष्णूच्या प्रसादाने तुला नक्कीच पुत्रप्राती होईल.’ ऋषींच्या म्हणण्याप्रमाणे राजाने पुत्रदा एकादशीचे शुभ व्रत केले. द्वादशीचे पारणे करुन आणि मुनींना पुन्हा पुन्हा वंदन करुन राजा घरी परत आला. मुनींच्या आशीर्वादामुळे आणि पुत्रदा एकादशीच्या प्रसादामुळे राणी गर्भवती झाली आणि पुढे योग्य काळी तिला तेजस्वी व पुण्यकर्मे करणारा पुत्र झाला. पुढे त्या पुत्राने आपल्या पित्याला संतुष्ट केले आणि प्रजेचेही पालन केले. हे राजा, म्हणून पुत्रदा एकादशीचे हे व्रत करणे सर्व लोकांचे कर्तव्य आहे. सर्व लोकांचे हित व्हावे म्हणून मी हे व्रत तुला सांगितले आहे. जे कोणी मर्त्य मानव हे पुत्रदा एकादशीचे व्रत करतात त्यांना इहलोकी पुत्र प्राप्त होतो व मृत्यूनंतर ते स्वर्गलोकी जातात. पुत्रदा एकादशीचे हे माहात्म्य जे वाचतात किंवा ऐकतात त्यांना अश्वमेध यज्ञाचे फळ मिळत असते.

॥ याप्रमाणे पुत्रदा नावाच्या पौष शु. एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 20, 2021

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP