एकादशी महात्म्य - निर्जला एकादशी

एकादशी व्रताचे नुसते श्रवण केल्यासही श्रोत्याला या जगात अनेक सुखोपभोग मिळतात व शेवटी त्याला विष्णुलोकात स्थान प्राप्त होते.


भीमसेनाने विचारले, ‘हे पितामह व्यासा, तुम्ही महाबुध्दिवंत आहात. मी काय म्हणतो ते ऐका. युधिष्ठिर, कुंती, द्रौपदी, अर्जुन, नकुल, सहदेव हे सर्वजण एकादशीला कधीही भोजन करीत नाहीत. ते मला म्हणतात की, ‘हे वृकोदरा, तुम्ही एकादशीला जेवू नकोस.’ ‘आजोबा, मी त्यांना म्हणतो की, मला भूक सहन होत नाही. ‘मी दाने देईन, केशवाची विधीपूर्वक पूजा करीन. पण उपवास केल्याशिवाय एकादशी व्रताचे फळ कसे लाभेल ते सांगावे.’
भीमसेनाचे हे बोलणे ऐकून व्यास म्हणाले, ‘भीमसेना, तुला नरक अनिष्ट वाटत असेल, व स्वर्गाची इच्छा असेल तर शुक्ल आणि वद्य पक्षातील एकादशीच्या दिवशी तू भोजन करु नकोस.’
भीमसेन म्हणाला,
‘आजोबा, तुम्ही तर महाबुध्दिवंत आहात. मी तुम्हाला खरे सांगतो की मला एकभुक्त राहणेही शक्य नाही. मग माझ्याकडून उपवास कसा होणार ? माझ्या पोटात वृक नावाचा अग्नी नेहमी प्रज्वलित असतो. मी खूप अन्न खातो तेव्हा तो थोडा वेळ शमतो. मला वर्षातून एकच उपवास कसातरी करता येईल. तेव्हा मला नक्की करुन सांगा की मी हा एकच उपवास कोणता करावा. ज्या एकाच उपवासाने मला सर्व एकादशींच्या उपवासाचे फल मिळेल असा उपवास सांगा.’
व्यास म्हणाले, ‘भीमा, तू मनुष्याने पाळायचे नियम ऐकले आहेस. वैदिक धर्म काय आहे, हेही तू ऐकले आहेस. पण हे राजश्रेष्ठा, हे धर्म कलियुगात आचरणे शक्य नाही. थोडया उपायात, थोडया खर्चात, व अगदी कमी श्रमाने महाफल देणारे सर्व पुराणांचे सार मी तुला सांगतो. ऐक. शुक्ल व कृष्ण या दोन्ही एकादशांना भोजन करु नये. जो एकादशीला उपवास करतो, तो कधीही नरकाला जात नाही.’
व्यासांचे हे बोलणे ऐकून भीमसेन खूप घाबरला. आणि पिंपळाच्या पानासारखा थरथर कापू लागला. तो म्हणाला, ‘आजोबा, मी उपवास करण्यास समर्थ नाही. म्हणून पुष्कळ फळ देणारे एकादशी व्रत मला सांगा.’
व्यास म्हणाले,
‘ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षात सूर्य़ वृषभ किंवा मिथुन राशीत असताना जी एकादशी येते, तिचा उपवास पाणीही न पिता प्रयत्नपूर्वक करावा. स्नान किंवा आचमन या कामापुरताच पाण्याचा उपयोग करावा. तसे न केल्यास व्रतभंग होईल. हे व्रत करणार्‍याने एकादशीच्या सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत पाणी वर्ज्य करावे. त्याने हा नियम पाळला तर त्याला प्रयत्न केल्याशिवाय बारा एकादशी केल्याचे फळ मिळते.
द्वादशीच्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करावे, ब्राह्मणाला विधीपूर्वक जलदान किंवा सुवर्णदान द्यावे. नंतर आवश्यक कृत्ये करुन आणि इंद्रिये व मन ताब्यात ठेवून ब्राह्मणांसह भोजन करावे. भीमसेना, अशा प्रकारे व्रत केल्यामुळे कोणते पुण्य मिळते ते ऐक. सर्व वर्षात ज्या एकादशा येतात त्या सर्व एकादशांचे फल ही एकादशी केल्यामुळे मिळते, यात संशय नाही. कारण तसे मला शंखचक्रगदाधारी केशवानेच सांगितले आहे. या एकादशीचा उपवास पाणीही न घेता केल्यास त्याचे फळ काय मिळते ते ऐक.
हे वृकोदरा, सर्व तीथांचे जे पुण्य, सर्व दानांचे जे पुण्य ते या एकादशीने मिळते. सर्व वर्षातील शुक्ल व वद्य पक्षातील ज्या धनधान्य देणार्‍या पुण्यकारक, पुत्र व आरोग्य वगैरे फळे देणार्‍या अशा सर्व एकादशांचे उपोषण केल्याचे एकत्र फळ या एकच एकादशीच्या उपवासाने मिळते. हे नरव्याघ्रा भीमा, मी तुला हे अगदी सत्य सांगत आहे. या एकादशीचे उपोषण करणार्‍याला त्याचे अंत:काळी मोठ्या शरीराचे अक्राळ-विक्राळ, काळे, पिंगट दंड व पाश धारण करणारे भयंकर यम दृष्टीस पडत नाहीत. हे नरव्याघ्रा, याच्या उलट त्याच्या अंत:काळी पीतांबर धारण करणारे, सौम्य, शंखचक्र धारण करणारे व मनोवेगाने जाणारे विष्णुदूत येतात आणि त्याला विष्णुलोकाला घेऊन जातात. म्हणून सर्व प्रयत्न करुन या एकादशीचे व्रत पाणी न पिता करावे व गाईचे दान करावे. म्हणजे मनुष्य सर्व पापांतून मुक्त होतो.’
हे जनमेजया, व्यासाचे हे बोलणे ऐकून सर्व पांडवांनी या एकादशीचे उपोषण विधीपूर्वक केले. भीमानेही त्या दिवसापासून या कल्याणकारक एकादशीचे व्रत केले. म्हणून तेव्हापासून ही निर्जला एकादशी ‘पांडव एकादशी’ किंवा भीमसेनी एकादशी’ या नावाने सर्व लोकात प्रसिध्द झाली.
हे पृथ्वीच्या राजा, भीमसेनाने ज्यावेळी निर्जला एकादशीचे व्रत सुरु केले, त्यावेळी तो भुकेने व तहानेने व्याकुळ झाला. त्याने दिवसाचे दोन प्रहर कसेतरी काढले. तिसर्‍या प्रहरी भीमाला उपोषण व तहान सहन होईना. तेव्हा तो गंगेत जाऊन पुष्कळ वेळ पडून राहिला. नंतर त्याने खूप वेळ स्नान केले. तेव्हा त्याला थोडीशी हुषारी वाटली. उपवासाची रात्र तर त्याने फार कष्टात काढली याप्रमाणे त्याने व्यासाने सांगितल्याप्रमाणे व्रत पाळले. या निर्जला एकादशीला भीमाने केलेल्या स्नानाचे स्मरण म्हणून दिवसाच्या तिसर्‍या प्रहरी पुन्हा एकदा स्नान करावे. हे राजा, तूही सर्व पापाचे शमन व्हावे म्हणून हा उपवास प्रयत्नपूर्वक कर. आणि भगवंताची आराधना कर.
एकादशीच्या दिवशी सकाळी शुध्द होऊन पुढीलप्रमाणे संकल्प करावा. ‘हे देवेशा. आज हरिदिन आहे म्हणून मी पाणीही प्राशन न करता उपोषण करीन व दुसर्‍या दिवशी पारणे करीन.’ असा संकल्प करुन सर्व पापांच्या नाशासाठी इंद्रियांचे संयमन करुन श्रध्दायुक्त अंत:करणाने उपवास करावा. स्त्रियांचे किंवा पुरुषांचे पाप मेरु किंवा संहार पर्वताएवढे जरी मोठे असले तरीया एकादशीच्या प्रभावाने भस्म होऊन जाते. हे राजा, ज्याला धेनू दान करण्याचे सामर्थ नसेल त्याने घटात सुवर्ण घालून आणि तो वस्त्राने गुंडाळून दान द्यावा.
या एकादशीला पाणी न पिण्याचा जो नियम करतो तो मोठाच पुण्यवान होतो. कारण त्याला उपवासाच्या प्रत्येक प्रहरागणिक चार कोटी तोळे सोने दान दिल्याचे पुण्य मिळते. जो मनुष्य या एकादशीच्या दिवशी स्नान करुन दान, जप, होम वगैरे कर्मे करतो त्याचे पुण्य कधीही नष्ट होत नाही, असे श्रीकृष्णानेच सांगितले आहे. निर्जला एकादशीचे उपोषण भक्तीने केले असता वैष्ण्वपद प्राप्त होते. मग इतर नेम, नियम हवेतच कशाला ? उपोषण करुन जो मनुष्य या एकादशीच्या दिवशी सोने, अन्न व वस्त्र दान देतो, त्याला त्याचे फळ अक्षय मिळते. या एकादशीच्या दिवशी जो अन्न जेवतो तो जणू पापच भक्षण करतो व त्याला शेवटी दुर्गती मिळते. जे एकादशीला उपवास करुन द्वादशीला दाने देतात, ते अंती मोक्ष मिळवतात.
ब्रह्मघातकी, मद्यपान करणारे, चोर, गुरुचा द्वेष करणारे, नित्य खोटे बोलणारे असे सर्व पातकी या निर्जला एकादशीचे व्रत करतील तर ते सर्व पापांतून मुक्त होतील.
निर्जला एकादशीच्या दिवशी इंद्रिय-निग्रह करुन श्रध्दायुक्त अंत:करणाने स्त्री-पुरुषांनी आणखी काय करावे ते मी सांगतो, ऐक. त्या दिवशी जलशायी नारायाणाची पूजा करावी आणि धेनू दान द्यावी. किंवा त्याऐवजी तुपाचे दान द्यावे. मोठ्या दक्षिणा देऊन व मिष्टान्न देऊन ब्राह्मण संतुष्ट करावे हे धर्मश्रेष्ठ राजा, ब्राह्मण संतुष्ट झाले म्हणजे त्यामुळे मोक्ष देणारा नारायण संतुष्ट होतोच.
जो हे निर्जला एकादशीचे व्रत करीत नाही, तो आत्मद्रोही असतो. तो पापी, दुराचारी व दुष्ट असतो, यात संशय नाही. जे शांत, दानपर लोक जागरण करुन हे उपोषण करतात, व त्या दिवशी वासुदेवाची पूजा करतात ते आपल्या शंभर पूर्वजांसह विष्णुलोकाला जातात. या एकादशीचे पारणे करताना अन्न, पाणी, शय्या उत्तम आसन, कमंडलू व छत्र ही दाने द्यावीत. जो मनुष्य पारण्याच्या दिवशी सत्पात्र ब्राह्मणाला जोडा दान देतो, तो निश्चितपणे सुवर्णाचे विमानात बसून स्वर्गाला जातो. जे कोणी या एकादशीची कथा सांगतात किंवा भक्तिभावाने ऐकतात ते सर्व स्वर्गलोकाला जातात, याविषयी शंका नाही. कुरुक्षेत्रामध्ये सूर्यग्रहणात श्राध्दविधी केल्याने जे पुण्य मिळते, तेच पुण्य हे माहात्म्य ऐकल्याने मिळते.
॥ श्रीभारतातील व पद्म पुराणातील निर्जला एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले. ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2021

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP