एकादशी महात्म्य - सफला एकादशी

एकादशी व्रताचे नुसते श्रवण केल्यासही श्रोत्याला या जगात अनेक सुखोपभोग मिळतात व शेवटी त्याला विष्णुलोकात स्थान प्राप्त होते.


धर्मराजाने विचारले, ‘मार्गशीर्ष कृष्ण एकादशीचे नाव काय ? त्या एकादशीचे व्रत कसे करावे व त्या दिवशी कोणत्या देवाची पूजा करावी ? हे जनार्दना, मला हे सर्व सविस्तर सांगा.’
श्रीकृष्ण म्हणाले,
‘राजा, तुझ्या प्रेमामुळे मी सांगतो. ऐक तर. राजा, एकादशी व्रत केल्यामुळे मी जसा प्रसन्न होतो व संतुष्ट होतो तसा संतोष मला खूप दक्षिणा देऊन केलेल्या यज्ञानेही होत नाही. म्हणून या एकादशीचे व्रत काय आहे व माहात्म्य काय आहे, ते एकाग्र मन करुन ऐक.
‘राजा, सर्व वर्षात ज्या एकादशा असतात त्यामध्ये लहान-मोठी असा फरक करु नये. मार्गशीर्ष कृष्ण पक्षात जी एकादशी आहे तिचे नाव सफला आहे. या दिवशी नारायणाची पूजा खूप खटपट करुन करावी. पूर्वी सांगितलेल्या विधीप्रमाणे याही एकादशीचे व्रत व उपवास करावा. नागामध्ये जसा शेष श्रेष्ठ आहे, पक्ष्यामध्ये जसा गरुड श्रेष्ठ आहे, त्याप्रमाणे सर्व व्रतांत एकादशी व्रत श्रेष्ठ आहे. ज्याप्रमाणे सर्व देवांत विष्णू श्रेष्ठ, सर्व यज्ञांत अश्वमेध यज्ञ श्रेष्ठ, सर्व नद्यांत भागीरथी श्रेष्ठ, सर्व मानवांत ब्राह्मण श्रेष्ठ, त्याप्रमाणेच सर्व व्रतांत ही एकादशी श्रेष्ठ आहे. म्हणून हे भरतश्रेष्ठा, जे लोक या एकादशी व्रतामध्ये आसक्त झालेले असतात, ते माझे फार आवडते असतात. व मला पूज्य असतात. या सफला नावाच्या एकादशीचा पूजाविधी आता ऐक.
या एकादशीच्या दिवशी त्या त्या प्रदेशात त्या काळी उत्पन्न होणारी उत्तम फळे मला अर्पण करुन माझी पूजा करावी. चांगले नारळ, आवळे, लिंबे, डाळिंबे, सुपार्‍या, लवंगा, अनेक प्रकारची धान्ये व दुसरी उत्तम फळे देवाला अर्पण करावी. व धूप व दीप लावून नारायणाची पूजा करावी. या सफला एकादशीला दीप-दानाचे माहात्म्य विशेष सांगितले आहे. रात्री प्रयत्नाने जागरण करावे व त्यावेळी भगवंताचे कीर्तन करावे. राजा, या एकादशीच्या रात्री डोळे उघडे ठेवून जो जागरण करतो, त्याचे पुण्यफल काय आहे ते चित्त एकाग्र करुन ऐक.
या जागरणाची बरोबरी करील असा एकही यज्ञ नाही. त्या जागरणाच्या बरोबरीने एकही तीर्थ नाही. हे राजा, या जगात या जागरणाच्या बरोबरीचे एकही व्रत नाही. पाच हजार वर्षे तपश्चर्या करुन जे फळ मिळते तेच फळ या सफला एकादशीच्या दिवशी केलेल्या जागरणाने मिळते. हे राजश्रेष्ठा, आता सफला एकादशीचे कथानक ऐक.
माहिष्मत नावाच्या राजाची चंपावती नावाची नगरी प्रसिध्द आहे. माहिष्मत राजाला चार पुत्र होते. त्या पुत्रांतील सर्वांत मोठा मुलगा महापापी होता. तो परस्त्रीगमन करीत असे, ध्यूत खेळत असे आणि वेश्यांच्या घरी पडून राहत असे. अशा तर्‍हेने त्याने पित्याचे सर्व द्रव्य उधळले. त्याची वागणूक वाईट होती आणि तो नेहमी देवाब्राह्मणांची निंदा करीत असे. विष्णुभक्त आणि वेद यांची निंदा करण्यात तर त्याला फारच आनंद होत असे. त्या राजपुत्राचे नाव लुंपक होते. आपला पुत्र असा दुर्गुणी झाला आहे, हे पाहून माहिष्मत राजाने त्याला राज्यातून बाहेर हाकलून दिले. नंतर नातेवाईकांनीही त्याचा त्याग केला. व सर्व नोकर-चाकरही राजाच्या भीतीने त्याला सोडून गेले. आईबापांनी आणि नातेवाईकांनी त्याग केलेला लुंपक आता पुढे काय करावे या विषयी विचार करु लागला. पण असे चिंतन करुन त्याने पापच करायचे ठरवले. त्याने मनात विचार केला की, ‘मी पित्याचे नगर सोडून वनात जाऊन राहीन. रात्री शहरात येऊन दरोडे घालीन आणि दिवसा वनात राहीन.’ असा विचार करुन दुदैवाच्या फेर्‍यात सापडलेला तो लुंपक नगरातून निघून गहन वनात गेला. पापी कर्मे करणरा तो राजपुत्र अरण्यात प्राण्यांना ठार करीत असे व रात्री चोर्‍या करीत असे. हळूहळू त्याने सर्व नगर लुटून काढले. चोर्‍या करताना तो पकडला गेला तरी नागरीक त्या राजपुत्राला राजाच्या भीतीने सोडून देत. पूर्वजन्मीच्या पापामुळे राज्यभ्रष्ट झालेला तो पापी लुंपक अरण्यातील प्राणी मारुन त्यांचे मांस खात असे व रानातील फळेही खात असे. परंतु त्या दुष्टाचा निवास असलेला आश्रम मात्र वासुदेवाला मान्य होण्यासारख्या शुभ जागी होता. त्याच्या आश्रमाजवळ फार दिवसांचा जुना पिंपळाचा वृक्ष होता. त्या वनात या वृक्षाच्या ठिकाणी मोठे देवत्व आलेले होते. त्या वृक्षाखालीच हा पापबुध्दी लुंपक राहत असे. अशाप्रकारे निंदास्पद दुष्टकर्मे करुन तो पापी त्या वृक्षाखाली राहून कालक्रमणा करीत होता. त्यावेळी एकदा कृष्णपक्षातील सफला एकादशीचा आदला दिवस म्हणजे दशमी तिथी उजाडली. हे राजा, दशमीच्या दिवशी रात्री तो वस्त्रहीन लुंपक थंडीने गारठला आणि बेसावध होऊन पडला. त्या पिंपळाखाली थंडीने गारठून पडला असता त्याला झोप आली नाही की सुख लाभले नाही. थंडीने कापत असता त्याने दातावर दात आवळून धरले आणि प्राण गेल्याप्रमाणे पडून राहून ती रात्र कशीबशी काढली. सकाळी सूर्योदय झाला तरी त्याला शुध्द आली नाही. हा दिवस सफला एकादशीचा होता. माध्यान्ह समय झाल्यावर त्याला शुध्द आली. काही क्षणांनी तो आसनावरुन उठला आणि पंगू माणसाप्रमाणे पुन्हा पुन्हा अडखळत चालू लागला. त्या वनात फिरताना तो तहान भुकेने व्याकुळ होऊन गेला होता. आता त्या दुष्ट लुंपकाला प्राण्याची शिकार करण्याइतकी शक्ती राहिली नव्हती. आता त्याने झाडाखालची गळून पडलेली फळे गोळा केली आणि तो आश्रमाकडे परत आला. इतक्यात रवीचा सूर्याचा अस्त झाला. ‘बाबा, आता माझे कसे होईल !’ असे म्हणून त्याने दु:ख होऊन विलाप केला. नंतर त्याने गोळा करुन आणलेली सर्व फळे पिंपळाच्या वृक्षाखाली मुळाजवळ ठेवली. नंतर तो म्हणाला, ‘या फळांनी भगवान नारायण संतुष्ट होवोत !’ लुंपक तेथे बसून राहिला. त्याला त्या रात्री झोप लाभली नाही. त्यामुळे भगवान विष्णूने त्याला एकादशीचे जागरण घडले असे मानले आणि त्याने अर्पण केलेल्या फळांमुळे सफला एकादशीचे पूजनही पूर्ण झाले असे मानले. राजा लुंपकाने हे उत्तम व्रत केल्यामुळे त्या व्रताच्या प्रभावाने त्याला निष्कंटक राज्य प्राप्त झाले. लुंपकाचा हा पुण्याचा अंकुर वाढून त्याला हे फळ कसे प्राप्त झाले ते आता ऐक.
दुसर्‍या दिवशी सकाळी सूर्याचा उदय होतो तोच एक दिव्य अश्व त्याच्याजवळ आला. त्या घोडयाच्या अंगावरील वस्तूही स्वर्गीय होत्या. तेथे घोडा येताच पुढीलप्रमाणे आकाशवाणी ऐकू आली,- ‘हे राजपुत्रा, सफला एकादशीच्या प्रभावामुळे तुझ्यावर वासुदेवाचा कृपाप्रसाद झाला आहे. आता तू निष्कंटक झालेले आपले राज्य प्राप्त कर. तू पित्याजवळ जा आणि शत्रू नसलेल्या त्या राज्याचा उपभोग घे !’ लुंपक ‘तसेच करीन’, असे म्हणाला. लागलीच त्याला दिव्य रुप प्राप्त झाले. त्यावेळीच त्याची दुष्ट बुध्दी गेली आणि त्याचे मन विष्णुभक्तीने भरुन गेले. नंतर दिव्य अलंकारांनी शोभून दिसणारा तो लुंपक पित्याकडे गेला आणि पित्याला नमस्कार करुन उभा राहिला. आपला पुत्र विष्णुभक्त झाला आहे, हे जाणून पित्याने त्याला निष्कंटक राज्य देऊन टाकले. नंतर त्याने खूप वर्षे राज्य केले. तो लुंपक नेहमी एकादशी व्रतात व विष्णुभक्तीत तत्पर राहत असे. विष्णुप्रसादामुळे त्याला सुंदर स्त्रिया मिळाल्या व सुंदर पुत्र प्राप्त झाले पुढे तो वृध्द झाल्यावर त्याने आपले राज्य पुत्रावर सोपवले आणि तो तप करायला वनात निघून गेला. तेथे तो विष्णुभक्तीत मग्न राहिला. याप्रमाणे त्याने आपला जन्म कारणी लावला आणि तो शेवटी विष्णुलोकाला गेला. याप्रमाणे जे कोणी सफला एकादशीचे व्रत करतील त्यांना इहलोकी यश व कीर्ती मिळेलच आणि ते शेवटी मोक्ष मिळवतील, हे नि:संशय. जे लोक सफला एकादशीचे व्रत करतात, ते या जगात धन्य आहेत. कारण त्यांना याच जन्मी मोक्ष लाभत असतो. हे सेनानायक असलेल्या राजा, सफला एकादशीचे हे माहात्म्य ऐकून राजसूय यज्ञाचे फळ मिळते आणि तो मनुष्य शेवटी स्वर्गात राहतो.

॥ याप्रमाणे सफला एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 20, 2021

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP