एकादशी महात्म्य - षट्तिला एकादशी

एकादशी व्रताचे नुसते श्रवण केल्यासही श्रोत्याला या जगात अनेक सुखोपभोग मिळतात व शेवटी त्याला विष्णुलोकात स्थान प्राप्त होते.


वाल्भ्य पुलस्त्य ऋषींनी विचारले,
‘या मुत्युलोकात आलेले प्राणी अनेक प्रकारचे पाप करतात. कुणी ब्रह्महत्या करतो तर कुणी दुसर्‍याच्या द्रव्यावर दरोडा घालतो. अशी अनेक प्रकारची दुष्ट कृत्ये करण्याच्या मोहात ते पडतात. या पापामुळे ते नरकात जाणार नाहीत; असा काही उपाय आहे काय ? त्या उपायात फारसा त्रास नसावा. आणि थोडेसे दान केल्याने पापांचा नाश व्हावा. असा काही उपाय माहीत असल्यास आपण सांगा.’
पुलस्त्य ऋषी म्हणाले,
‘हे महाभाग्यवाना, तू चांगले विचारलेस. पण हा उपाय फार दुर्लभ आणि गुप्त आहे. तो विष्णू, ब्रह्मदेव, इंद्र इत्यादी देवांनाही कुणी सांगितला नाही. पण हे श्रेष्ठ ब्राह्मणा, तू विचारलेस म्हणून मी तुला सांगत आहे. पौष महिना आल्यानंतर सकाळी स्नान करुन शुध्द व्हावे. नंतर काम, क्रोध, अभिमान, मत्सर, लोभ व कपट यांचा त्याग करुन आपली इंद्रिये ताब्यात ठेवावी. नंतर सर्व देवांचा देव असलेल्या विष्णूचे स्मरण करावे. पुष्य नक्षत्राजवळ चंद्राची पौष पौर्णिमा पूर्ण होईल त्यावेळी गाईचे शेण गोळा करावे. आणि त्यात तीळ व कापूस घालून त्याचे होमाकरता एकशेआठ पिंड करावे. अन्य विचार मनात येऊ देऊ नये. कृष्ण-पक्ष सुरु झाला की, पूर्वाषाढा नक्षत्र किंवा मूळ नक्षत्र असेल त्या दिवशी एकादशीच्या या व्रताचा आरंभ करावा. पुण्य फल मिळवून देणार्‍या या व्रताचा विधी मी सांगतो तो ऐक.
एकादशीच्या दिवशी अगदी लौकर सकाळी स्नान करुन शुध्द व्हावे आणि देवाधिदेव विष्णूचे पूजन करावे. विष्णुनामाचे स्मरण करीत एकादशीचा उपवास करावा. रात्री जागरण करावे व होम करावा. विष्णूचे नाम उच्चारत होमात तुपाची व इतर आहुती द्यावी. दुसर्‍या दिवशी पुन्हा चंदन, अगरु, कापूर वगैरेनी देवाधिदेव विष्णूचे पूजन करावे. खिचडीचा नैवेद्य दाखवावा. कृष्णनामाचे वारंवार भजन करुन देवाचे स्तवन करावे. अशी पूजा करुन जनार्दनाला कोहळा, नारळ किंवा महाळुंग यांचा अर्घ्य द्यावा. ही फळे न मिळाली तर सुपार्‍यांचा अर्ध्य द्यावा. अर्घ्य देताना पुढीलप्रमाणे प्रार्थना करावी. ‘हे कृष्णा, तू कृपाळू आहेस. आम्हां अगतिकांचे तूच रक्षण कर. आम्ही संसाररुपी सागरात बुडत आहोत. आमच्यावर प्रसन्न होऊन आम्हाला तार. हे कमलनेत्रा विश्वचालका, तुला प्रणाम ! हे जगत‍पते, मी दिलेला अर्घ्य लक्ष्मीसह ग्रहण करावा !’ पूजा संपल्यानंतर ब्राह्मणाची पूजा करावी. आणि त्याला पाण्यासाठी कुंभ, छत्री व जोडा यांचे दान द्यावे. ‘या दानाने कृष्ण माझ्यावर प्रसन्न होवोत’. असे म्हणून त्यावर उदक सोडावे. ज्याला शक्ती असेल त्याने काळी गाय ब्राह्मणाला दान द्यावी. बुध्दिमान व्रतकर्त्याने ब्राह्मणाला तिळपात्र द्यावे. पांढरे तीळ स्नानाच्यावेळी अंगाला लावायला चांगले असतात आणि काळे तीळ खायला चांगले असतात. हे श्रेष्ठ ब्राह्मणा, व्रत करणाराने हे तिळाचे दान शक्तीप्रमाणे द्यावे. दान दिलेले तीळ शेतात पेरले असता त्या तिळाच्या झाडांना जितके तीळ येतील तितकी हजार वर्षे तिळाचे दान करणारा स्वर्गात राहतो. तीळ पापाचा नाश पुढील सहा प्रकारांनी करतात.
(१) तिलमिश्रित पाण्याने स्नान करावे.
(२) तीळ अंगाला लावावे.
(३) तिळांनी हवन करावे.
(४) तिलमिश्रित पाण्याने तर्पण करावे.
(५) तीळ भक्षण करावे.
(६) तिळाचे दान द्यावे.
या सहा प्रकारांनी तीळ पाप नष्ट करतात. ही सर्व कृत्ये या एकादशीला करतात म्हणूनच या एकादशीला षट्तिला एकादशी असे नाव पडले आहे.
नारदाने विचारले,
‘हे महाबाहो, हे विश्वचालका कृष्णा, तुला नमस्कार. षट्तिला एकादशीचे कोणते फल मिळते ते मला सांग. जर तू माझ्यावर प्रसन्न असशील तर ते एखाद्या आख्यानासह स्पष्ट कर.’
श्रीकृष्ण म्हणाले,
‘हे नारदा, मी पूर्वी प्रत्यक्ष पाहिलेला एक वृत्तांत जसा घडला तसा तुला सांगतो. ऐक तर -
नारदा, या मृत्यूलोकात पूर्वी एकदा एक ब्राह्मण जातीची स्त्री होती. ती नानाप्रकारच्या व्रतांत मग्न राहत असे व देवपूजेत तत्पर असे. ती माझी भक्त होती. ती प्रत्येक महिन्याचे सर्व उपवास करीत असे आणि विष्णुव्रताचेही सर्व उपवास करुन माझे पूजन करण्यात तत्पर राहत असे. हे नारदा, असे नित्य उपवास करुन आणि ब्राह्मण, दीनदुबळे आणि कुमारिका यांची भक्तिभावाने सेवा करुन तिने आपले शरीर कष्टवले. हे बुध्दिवंता, तिने घराचेही दान दिले आणि कष्ट करण्यातच सर्व काल घालवला. पण हे नारदा, तिने अन्नदान करुन ब्राहमणांना व देवतांना संतुष्ट केले नाही. तिचा असा पुष्कळ काल गेल्यानंतर मी मनात असा विचार केला की, ‘व्रते केल्यामुळे या स्त्रीचे शरीर शुध्द झाले आहे, यात संशय नाही. आपले शरीर कष्टवल्यामुळे तिने वैकुंठलोक मिळवला आहे. पण ज्यामुळे परमतृप्ती होते असे अन्नदान मात्र तिने केलेले नाही.’ नारदा, असा विचार करुन ती मृत्युलोकी आली. मी कापालिकाचे रुप घेतले आणि त्या ब्राह्मण स्त्रीकडे जाऊन भिक्षा मागितली. ती ब्राह्मणी म्हणाली, ‘अरे तापसा, तू कोणत्या हेतूने येथे आला आहेस ? माझ्यासमोर सत्य तेच सांग.’ मी पुन्हा म्हणालो, ‘हे सुंदर स्त्रिये, मला भिक्षा वाढ.’ तेव्हा ती स्त्री संतापली आणि तिने माझ्या पात्रात मातीचे ढेकूळ टाकले. नारदा, त्यानंतर मी स्वर्गात निघून गेलो. पुष्कळ काळ गेल्यानंतर महाव्रते करणारी ती तापसी व्रताच्या प्रभावाने सदेह स्वर्गाला गेली. तिने मातीच्या ढेकळाचे दान केले होते म्हणून स्वर्गात तिला मनोरम घर मिळाले. पण हे नारदा, त्या घरात धान्याचे कोठार मात्र नव्हते. तिने त्या घरात प्रवेश केला आणि घरात काहीच नाही हे पाहिले. ती घराच्या बाहेर पडली आणि माझ्याकडे येऊन भयंकर संतापून मला म्हणाली, ‘मी अनेक प्रकारची व्रते, प्रायश्चित्ते व उपवास केले. जगच्चालक परमात्म्याची पूजा केली व आराधना केली. हे जनार्दना, असे असूनही मी येथे येऊन पाहिले तेव्हा माझे घर अगदी रिकामेच आहे, असे मला दिसले. हे कसे काय ?’ मी तिला म्हणालो, ‘ तू आलीस तशीच तुझ्या घरी परत जा. तुझ्यासारख्या तपस्विनीला पाहायला दिव्य रुपसंपदा असलेल्या देवांच्या अनेक बायका कुतूहलाने तुझ्याकडे येतील. त्यावेळी षट्तिला एकादशीचे पुण्य काय आहे, हे त्यांच्याकडून ऐकल्याशिवाय त्यांना दार उघडू नकोस.’ मी असे सांगितल्यानंतर ती ब्राह्मण स्त्री आपल्या घरी परतली. नारदा, नंतर देवांच्या बायका तिच्याकडे आल्या. त्या म्हणाल्या, ‘हे कल्याणमुखी, तुला पाहायला आम्ही आलो आहोत. तेव्हा दार उघड.’
ब्राह्मण स्त्री म्हणाली,
‘तुम्ही जर खरोखरी मला पाहायला आला असाल तर मला तुम्ही षट्तिला एकादशीचे व्रत सांगा व त्यापासून काय पुण्य मिळते तेही सांगा. तरच मी दार उघडीन.’ पण हे व्रत सांगायला कोणीही तयार होईना. पण एक देवपत्नी म्हणाली, मला मानवी स्त्री कशी असते ते पाहायचे आहे. म्हणून तिने व्रत सांगितले. मग दार उघडले गेल्यावर देवांच्या बायकांनी ती मानवी स्त्री पाहिली. हे श्रेष्ठ ब्राह्मणा, त्यांनी पाहिले की, ही देवी नाही किंवा गंधर्व-स्त्री, असुर-स्त्री, किंवा नाग-स्त्री यापैकी कोणीही नाही. त्यांनी पूर्वी जशा स्त्रिया पाहिल्या होत्या, तशीच ही होती. देव स्त्रियांच्या उपदेशाप्रमाणे त्या ब्राह्मण स्त्रीने भोग व मुक्ती देणारे षट् तिला एकादशीचे व्रत केले. षट्तिला एकादशीच्या व्रतप्रभावाने एका क्षणातच ती ब्राह्मण स्त्री रुपवान आणि तेजस्वी कांतीची झाली. तिचे घर, धन, धान्य, वस्त्रे, सुवर्ण, चांदी यांनी भरुन गेले. हे व्रत करणार्‍याने अतिलोभ करु नये व कद्रूपणा करु नये. आपल्याजवळील संपत्तीनुसार व शक्तीप्रमाणे तिळांचे व वस्त्रांचे दान करावे. त्यामुळे पुढील प्रत्येक जन्मात आरोग्य लाभते. दारिद्र्य येत नाही, कष्ट पडत नाहीत व दुर्भाग्यही येत नाही.’ हे श्रेष्ठ ब्राह्मणा, षट्तिला एकादशीच्या उपवासाने व विधीप्रमाणे तिळाचे दान केल्याने अशी उत्तम फळे प्राप्त होतात, यात संशय नाही. या व्रतामुळे मनुष्य सर्व पापापासून मुक्त होतो, याविषयी शंकाच नको. हे व्रत करायला फारसे धन खर्च होत नाही व देहाला फार आयास पडत नाहीत. हे नारदा, षट् तिला एकादशीचे माहात्म्य असे आहे.
॥ याप्रमाणे षट्तिला एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 20, 2021

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP