एकादशी महात्म्य - कामिका एकादशी

एकादशी व्रताचे नुसते श्रवण केल्यासही श्रोत्याला या जगात अनेक सुखोपभोग मिळतात व शेवटी त्याला विष्णुलोकात स्थान प्राप्त होते.  


युधिष्ठिराने विचारले,
‘हे देवा गोविंदा, तुम्हाला माझा नमस्कार ! शयनी एकादशीचे व्रत व चातुर्मासाचे व्रत मी ऐकले. आता आषाढ वद्य एकादशीचे नाव व व्रत सांगा.’
श्रीकृष्ण म्हणाले,
‘राजा, पूर्वी नारदाने विचारले असता ब्रह्मदेवाने पापाचा नाश करणारे जे व्रत सांगितले तेच व्रत मी तुला सांगतो, ऐक.
नारदाने विचारले,
‘हे प्रभो, कमलासना ब्रह्मदेवा, आषाढ कृष्णपक्षातील एकादशीचे नाव काय ? तिची देवता कोणती ? व्रताचा विधी कसा आहे ? त्यापासून काय फळ मिळते ? हे सर्व मी तुमच्या तोंडून ऐकू इच्छितो. तेव्हा सांगावे.’
तेव्हा ब्रह्मदेव म्हणाला,
‘लोकांच्या हितासाठी मी सांगतो, ते ऐक. या एकादशीचे नाव कामिका आहे. हिचे माहात्म्य ऐकल्यानेही वाजपेय यज्ञाचे फळ मिळते. या एकादशीच्या दिवशी शंख, चक्र, गदा, पद्म धारण करणार्‍या लक्ष्मीपती विष्णूचे पूजन करावे व ध्यान करावे. या दिवश्सी मधू नावाच्या दैत्याचा वध करणार्‍या माधवाचे, विष्णूचे जो पूजन व ध्यान करतो, त्याला त्यापासून काय फळ मिळते ते ऐक. या एकादशीच्या दिवशी श्रीविष्णूचे पूजन केले असता जे पुण्य-फळ मिळते ते गंगेमध्ये, काशीमध्ये, नैमिषारण्यात किंवा पुष्कर क्षेत्रातही मिळत नाही. या पूजेमुळे जे फळ मिळते ते केदार-क्षेत्रात स्नान केल्याने किंवा सूर्यग्रहणाच्या वेळी कुरुक्षेत्रात स्नान केल्यानेही मिळत नाही. तसेच या पूजेमुळे मिळणारे फळ गोदावरी नदीत सिंह राशीत गुरु आला असता, व्यतिपात किंवा गंडक योगावर स्नान केल्यानेही मिळत नाही. जो मनुष्य समुद्र आणि वनांसहित सर्व पृथ्वीचे दान करतो त्याला मिळणारे पुण्यफळ सारखेच असते. जो मनुष्य सर्व साहित्यासह प्रसवकाली गाईचे दान करतो, त्या गोदानाचे पुण्यफळ कामिका एकादशीचे व्रत करणार्‍याला मिळते. या एकादशीला जो श्रीधर नाव धारण करणार्‍या विष्णूचे पूजन करतो, त्याला सर्व देव, गंधर्व, नाग व पन्नग यांचे पूजन केल्याचे फळ मिळते. म्हणून सर्व पापभीरु मनुष्यांनी या दिवशी श्रीधराची पूजा यथाशक्ति केली पाहिजे. जे संसाररुपी सागरात बुडाले आहेत किंवा पापरुपी चिखलात रुतले आहेत, त्यांच्या उध्दाराकरिता हे कामिका एकादशीचे व्रत फार चांगले आहे.
‘हे नारदा, या कामिका एकादशीपेक्षा पवित्र आणि पापांचा नाश करणारी दुसरी एकादशी नाही, हे तू जाणून घे. कारण तसे मला भगवंतांनी पूर्वी स्वत: सांगितले आहे. अध्यात्मविद्येत मग्न असलेल्या मनुष्याला जे फळ मिळते त्याहूनही जास्त पुण्यफळ या एकादशीच्या व्रताने मिळते. हे व्रत करणार्‍याने एकादशीला रात्री जागरण करावे. त्यामुळे त्याला रौद्र, यमदूत पहावे लागत नाहीत. त्याला वाईट गती मिळत नाही. नीच व हलक्या योनीत त्याला कधीही जन्म घ्यावा लागत नाही. योगी लोकांनी कामिका व्रतानेच मुक्ती मिळवली. म्हणून स्वत:वर नियंत्रण ठेवणार्‍या मनुष्यांनी सर्व प्रयत्न करुन हे व्रत करावे.
या एकादशीच्या दिवशी तुळशीपत्रांनी भगवंताची पूजा करावी. म्हणजे कमळाचे पान जसे पाण्यापासून अलिप्त असते, त्याप्रमाणे तो पापापासून अलिप्त राहतो. आठ हजार तोळे सोने किंवा बत्तीस हजार तोळे चांदी भगवंताला अर्पण करुन पूजा केली असता जे फळ मिळते ते फळ तुलसीदलाच्या पूजनाने जितके संतुष्ट होतात, तितके हिरे, माणिक, पोवळी, मोती, पाचू वगैरे रत्ने अर्पण करुन केलेल्या पूजनाने संतुष्ट होत नाहीत. जो तुलसीमंजिरींनी भगवंताची पूजा करतो. तो त्याने जन्मापासून केलेल्या पातकांचे लेख पुसून टाकतो.
तुळशीचे दर्शन घेतले असता ती अखिल पातकांचा समुदाय नष्ट करते. तुळशीला स्पर्श केला तर शरीर पवित्र करते. तुळशीला वंदन केले तर ती रोगांचे निरसन करते. तुळशीला पाणी घातले तर यमाचे भय नष्ट होते. तुळस अंगणात लावली म्हणजे भगवान कृष्णाचे वास्तव्यच आपल्या घरात झाल्याप्रमाणे होते. भगवंताच्या चरणावर तुळशीदले अर्पण केली असता मुक्ती मिळत असते. अशा तुळशीला नमस्कार असो !
जो मनुष्य या एकादशीच्या दिवशी देवघरात किंवा मंदिरात रात्रंदिवस दिवा लावतो, त्याच्या पुण्याची संख्या चित्रगुप्तालाही मोजता येत नाही. एकादशीचे दिवशी ज्याचा दिवा भगवंतापुढें जळतो, त्याचे पितर स्वर्गात राहतात व अमृताने तृप्त होतात. एकादशीच्या दिवशी जो मनुष्य तुपाचा किंवा तेलाचा दिवा देवापुढे लावतो, तो कोटी-कोटी दिव्यांच्या प्रकाशात सूर्यलोकाला जातो. मी कामिका एकादशीचा महिमा तुला आता सांगितला आहे. मनुष्यांनी सर्व पापांचा नाश करणार्‍या या कामिका एकादशीचे व्रत जरुर केले पाहिजे. ही कामिका एकादशी ब्रह्महत्या किंवा भ्रूणहत्या यांचेही पाप नाहीसे करते. ती स्वर्गाची प्राप्ती करुन देते. व महापुण्याचे फळ मिळवून देते. जो या कामिका एकादशीचे माहात्म्य श्रध्देने ऐकतो तो सर्व पापांतून मुक्त होऊन विष्णुलोकाला जातो.

॥ याप्रमाणे ब्रह्मवैवर्त पुराणातील कामिका एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले. ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2021

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP