अभंग - ८४२१ ते ८४३०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥८४२१॥
देवालय बांधिलें सुंदर । कळाकुशलीं चित्राकार ॥१॥
मुख्य पहावा तो कळस । पिका आला ब्रह्मरस ॥२॥
ध्यावें सर्वाचें तें सार । बहु सिंधु जेणें पार ॥३॥
मुख्य पहावा० ॥४॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय । अक्षर द्वादश मुख्य पाहे ॥५॥
सद्गुरुघरचा निज बीज कळस । पिका आला ॥६॥
गीता भागवत ज्ञानेश्वरी । रामायण विवेकीसिंधुची आत्मलहरी ॥७॥
पहावा अवघ्याचा कळस । पिका आला०॥८॥
योग क्षेम चालवी तत्क्षणीं । ही तों श्रीमुखेंची वाणी ॥९॥
अवघ्या गीतेचा कळस । पिका आला० ॥१०॥
मुक्तिवरील गुरुभक्ति । उद्धवें मागितली प्रेमप्रीति ॥११॥
आज भागवताचा कळस । पिका आला०॥१२॥
माळीयें जेवूतें नेलें । तेवूतें उगेंचि निवांत गेलें ॥१३॥
हा तों ज्ञानेश्वरीचा कळस । पिका आला०॥१४॥
अहं तत्वं सोहं श्रीरामरामाय । हा विश्वनामाचा जय पाहे ॥१५॥
मुख्य रामायणाचा कळस । पिला आला०॥१६॥
याचि देहीं याचि डोळां । पाहे मुक्तिचा सोहळा ॥१७॥
नको जाऊं मनाचे मागें । मुनी जयत्पाळा सांगे ॥१८॥
हाच ज्ञानाचा कळस । पिका आला०॥१९॥
अंबरीष प्रल्हाद अंगद । उद्धव नामया नामाचा बोध ॥२०॥
हाच भक्तीचा कळस । पिका आला०॥२१॥
संकल्प शतकोटी केलासे । तुका ह्मणे लाभले शेष ॥२२॥
झाला अवतारांचा कळस । पिका आला०॥२३॥
॥८४२२॥
अविनाश दिगंबरु । सोय लाविली हरीहरु ॥
मंत्र सांगेन बीजाकारु । पर उपकारु लोक तिन्ही ॥१॥
सांबापासून चारी योग । सांबापासुन चारी जोग ॥
सांबापासून चारी मार्ग । प्रेमरंग सद्गुरुचा ॥२॥
एक गंगा मस्तकीं होती । तेथें गोदा भागिरथी ॥
माध्यांकिनी स्वर्गाप्रती । भोगावती शेषाची ॥३॥
एकाचे कैवाडें । जगमीं बहुताचें कोडें ॥
एक एकाचे आवडे । प्रेमरस जोडे आनंदें ॥४॥
नायकांत चैतन्य नंद । चौघां सारखाचि बोध ॥
आपले आवडे प्रेमानंद । प्रेमधुंद प्रेमातें ॥५॥
शक्ति उपदेशासाठीं । गेला सिंधुचिया भेटी ॥
कल्पद्रुमाचिया तळवटी । साध्य गोष्टी साधली ॥६॥
विष्णु मत्स्याचे उदरी । शुक ब्रह्म पक्षावरी ॥
शक्ति रस घेऊनि मांडीवरी । बीज निर्विकारी सांगत ॥७॥
समाधी लागली भवानी । शुकें पाहिली लोचनीं ।
किल्कारी देऊन परी जागी । क्रोध मनीं सांबाचा ॥८॥
खाकरा टाकुनी त्वरीत । सुत निर्मिला जालींद्रकांत ॥
पार्वती कानींचा मळ काढीत । कानीफा तेथें निर्मिलें ॥९॥
कानीफा करी जालींद्रसेवा । चारा विसरला रावा ॥
त्रिशूळ टोंचुनियां देवा । भुमी ठावा पाडिला ॥१०॥
हें देखोनी विपरीत । शक्ति मागें मुख फिरवित ॥
ब्रह्मवेत्त्या गुरुपुत्राचा घात । हत्या त्वरित पडियेली ॥११॥
सांब विचारितसे मनीं । ह्मणे विपरीत झाली करणी ॥
शोणित वाजवा पुसोनी । सावध तत्क्षणीं तो केला ॥१२॥
कृपा द्रवला आदिनाथ । नांव नंद त्या ठेवित ॥
मत्स्य अवलोकुनियां तेथ । मत्सेंद्रनाथ काढिला ॥१३॥
कृपा द्रवला सद्गुरुराय । एकचि निश्चय काढिला भाव ॥
चौघां ठेवियलीं चार नांवें । नायकांत चैतन्य नंद ॥१४॥
द्वादश अक्षरांचा मंत्र । एक एका सांगितला सार ॥
मूळ बीज एकचि थोर । नांवें चार ठेवियलीं ॥१५॥
हेचि चार जोग । हेचि चार सद्गुरुमार्ग ॥
तुका ह्मणे प्रेमरंग । अवचित ओघ उपटला ॥१६॥
॥८४२३॥
होतों निर्गुण निर्विकार । मज नव्हता आकार ॥
भक्तांसाठीं हे विकार । येवढा पसारा ॥१॥
साधु माझें दैवत । भक्त माझे हे तात ॥
काय बोलूं त्यांची मात । नाहीं जात तयांला ॥२॥
भक्तांसाठीं साहाकार । भक्तांसाठीं हा विस्तार ॥
भक्तांसाठीं क्षीरसागर । वेदउच्चार भक्तांसाठीं ॥३॥
भक्तांसाठीं केलें वैकुंठ । भक्तांसाठीं क्षेत्रपीठ ॥
भक्तांसाठीं झाले जळचर । भक्तांसाठी वनचर ॥
भक्तांसाठीं राज्यधर । पाळक पोर गवळियांचा ॥५॥
भक्तांसाठीं निर्विकारी । भक्तांसाठीं ब्रह्मचारी तरी ।
भक्तांसाठीं तरी । दंड करीं घेऊन उभा ॥६॥
भक्तांसाठीं लेतो लेणीं । भक्तांसाठीं कौस्तुभमणी ॥
भक्तांसाठीं कमळा कामिनी । घरस्वामिणी रमा केली ॥७॥
भक्तांसाठीं गदा चक्र । भक्तांसाठीं चाप शर ॥
भक्तांसाठीं आयोध्ये भार । करावया संहार दुष्टांचा ॥८॥
भक्त निश्चय निधडे । भक्त ब्रहाचे हे कुडे ॥
भक्त सुधारसाहुन गोडे । पुरविती कोडे चित्ताचे ॥९॥
भक्त नामाचे भांडारी । भक्त तारक नौका तरी ॥
तुका ह्मणे आले विश्वंभरा घरीं । खोळंबेल वारी पंढरीची ॥१०॥
॥८४२४॥
धन्य भंडार्या डोंगर । धन्य संताचें माहेर ॥
देवें दिधलें निज घर । कीर्तनगजर करावया ॥१॥
अंगीं येऊनियां अनंत । गरुड लक्ष्मीसमवेत ॥
गेले बल्लाळाच्या वनांत । वस्ती केली रहावया ॥२॥
अंगीं घेऊनियां हरी । जागा नेमिलिया करीं ॥
समस्त सुरवरीं । सनकादिकीं येऊनि ॥३॥
सिद्ध टेंकडी सिद्ध विनायक । आपण साक्षीभूत देख ॥
सुरवर सनकादिकीं येऊनि । सिद्ध टेंकडी सिद्ध विनायक ।
आपण साक्षीभूत देख ॥ सुरवर सनकादिक । वृक्षपाषाणरुपें रहाती ॥४॥
जन्मभूमी वसता ठाव । कीर्तनीं न धरती भाव ॥
ह्मणोनी त्यागुनियां गांव । दूर देशीं कीर्तन ॥५॥
जुना कोट देहू गांव । अलकावती पुण्य ठाव ॥
किर्तनाला भाव । दिला ठाव नेमूनियां ॥६॥
पर्वकाळ हरिदिनी । कीर्तन किजे समरंगणीं ॥
तुका ह्मणे सांगितलें कानीं । देवें वाणी आपुलिये ॥७॥
॥८४२५॥
निर्धूत व्हावे निर्विकारी । अंतर बाहेर ब्रह्मचारी ॥
तेणें राहावें अलकापुरीं । ज्ञानेश्वरीपारायण ॥१॥
द्रव्यदारांच्या खटपटा । समूळ मोडावया तो तंटा ॥
तेणें राहावें जगद्रुरुमठा । ब्रह्मनिष्ठा ब्रह्मव्रत ॥२॥
आत्मबोध भरावा पोटीं । तेणें जावें पैठणा भेटी ॥
नाथाच्या सदनीं राहावें मठीं । होईल भेटी भाविका ॥३॥
आत्मज्योत उजळावी ज्योति । तेणें न्हावें चक्रतीर्थी ॥
सिद्ध जेठा देऊनी वसती । अखंड वस्ती सुखी राहावें ॥४॥
द्वादश धनुष्य आकृत । चार राते पांच हात ॥
चौघी रहा भुमीका पवित्र । वैकुंठपीठ ते स्थळ ॥५॥
तें तळ तर पाताळ ही पुरी । हेटकेश्वराची नगरी ॥
विष्णुला चक्र लाधलें करीं । निज निर्धारी तें स्थळ ॥६॥
तेथें राहावें पवित्र नेम । मनीं चिंतूं नये काम ॥
किंचित होतां ना भ्रम । वज्रलेप पातक तें ॥७॥
गंगा भागिरथी ओघ दोन । त्रिवेणीसंगमीं करी स्नान ॥
अश्वत्थाखालीं कीर्तनमान । पवित्र स्थान अजानंत ॥८॥
पंढरी क्षेत्रा जाती जाण । वारी चालवावी मान्य ॥
कर्मा धर्मा त्यागाचा शिण । व्हावें लीन संतपदीं ॥९॥
पंढरी क्षेत्र द्वारावती जाण । अलंकापुरीं प्रतिष्ठान ॥
तुका ह्मणे ऐकवी मन । पवित्र स्थान मोक्षाचें ॥१०॥
॥८४२६॥
नायक विश्वाचा ब्रह्मांड गोसांवी । तो केला पांडवीं ह्मणियागत ॥१॥
भावाचा लंपट भक्तीच्या आधीन । न सोडी अभिमान अनाथांचा ॥२॥
भाजीचेनि पानें तृप्त झाला हरी । जयाच्या उदरीं भुवनें चवदा ॥३॥
जनक शुकदेव धरिय्ले करीं । दोघांचिया घरीं घेतो पूजा ॥४॥
पुंडलीकें दिली बैसावया विट । तेथें भुवैकुंठ वसतें केलें ॥५॥
तुका म्हणे शरण रिघतां एक्या भावें । कैवल्य भोगावें नाममात्रें ॥७॥
॥८४२७॥
एका तरुच्या शाखा चार । पृथक ह्मणूं नये सत्वर ॥
जें मोक्षाचें निज घर । पवित्र सार सकळांचें ॥१॥
होतें सांबाचिया पोटीं । तें निज बीज केली वृष्टि ॥
त्रिजग तारावया सृष्टि । कृपा धुर्जटी वर्षाव ॥२॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय । हें निजबीज चैतन्या देय ॥
जप करोनियां तोयें । भगवंतें सोय लाविली ॥३॥
अहं तत्व सोहं श्रीरामरामाय । हे तंव नाथालागीं देय ॥
मत्सेंद्रा लाविली सोय । जप तो हे करीतसे ॥४॥
दत्त दत्तात्रय निरंजनो दत्त । हे तंव कांतालागीं देत ॥
जप करी जालींद्रकांत । उपदेशित कानीफा ॥५॥
श्रीराम जयराम जय जय राम । नंदा उपदेशिला सप्रेम ॥
निज बीज अंतरीचें ब्रह्म । नाशियले श्रम विषदोषा ॥६॥
ऐसे पुत्र हे चार । निज बीज सांबाचें तें सार ॥
भिन्न भाविक जे काम नर । गाढव खर जाणावे ॥७॥
आतां येऊं कोण्या रागें । उपटला ओघ फिरेना मागें ॥
आलों परोपकारा लागें । घडला संग सद्गुरुचा ॥८॥
चाळीस अक्षरांची टीका । बयाजवा रंगें ऐका ॥
स्मरण करितांना मुखा । येरे सखा जिवलग ॥९॥
काशीक्षेत्र वाराणशी स्थान । दत्त निरंजन साहेबराम ॥
गंगा तुलसी शालिग्राम । आणिक जिव्हा न करी काम ॥१०॥
ही चाळीस ते अठेचाळीस । अठयायशींचा ब्रह्मरस ॥
अठयायशीं सहस्त्र ऋशी करिती घोष । पापदोष जाळिती ॥११॥
याजमध्यें आहे सार । येणेंचि तिन्ही लोक पार ॥
यज्ञ होमाचें जें सार । निर्विकार नि:संग ॥१२॥
सहा दर्शनीं प्रबंध । नव सोळा सिद्ध ॥
चराचर खाणी वाणी जंगम । स्थावर स्थितिवेद गोविंद ॥१३॥
ऐसा सद्गुरुचा महिमा । काय वर्णवे त्याचा महिमा ॥
तुका ह्मणे जपतां नेमा । हरील श्रमा जन्मदु:ख ॥१५॥
॥८४२८॥
संकल्प ही सेवा पूर्ण झाली देवा । निरोप मज द्यावा केशवराज ॥१॥
कोणी केला लेख ह्मणाल गणीत । गजवदनीं मात जागविली ॥२॥
पांच देहीं पोटीं एकतीस लक्ष । बाकी एकतीस साक्ष पहिलेचि ॥३॥
सात कोटी अभंग येथें झाले जाण । मौन्यें लिहिले गणपतीने ॥४॥
साडे सहा कोटी लंबोदराची लेंखणी । साताचे पूर्णपणीं मनु आले ॥५॥
एकुणहत्तर लक्ष एक कोटी आगळा । अभंग वरती सोला अधिक झाले ॥६॥
सोळाचा तो झाडा सांगतों निवाडा । ब्रह्मरस कोडा आइकावा ॥७॥
आलोंसे परतोन कान्होबाचे भेटी । अभंग टाळापाठीं तीन केले ॥८॥
गंगाबाई कुमारी लेंकरुं अज्ञान । दोन अभंगांनीं समाधान केलें तिचें ॥९॥
भागिरथीतटीं विमान उतरत । अभंग केले सात क्रिया क्रमा ॥१०॥
झालें गयावर्जन फिटलें पितृॠण । केलें समाधान सकळांचें ॥११॥
चारही अभंग तेलिया मुठमाती । देऊन आह्मी रात्रीं गेलों तेव्हां ॥१२॥
तुका ह्मणे ऐसे अभंग हे सोळा । सत्रावी जीवनकळा सत्रावा हा ॥१३॥
॥८४२९॥
मज नाहीं मोह माया । नाहीं काया नाहीं देहा ॥
लक्ष सद्गुरुच्या पायां । जातों ठाया अजिरावर ॥१॥
सारें साधन आपलें साधा । पांचां दिवसांचा वायदा ॥
परतून भेटी नोहे कदा । जातों पदा आपुलिया ॥२॥
नाहीं वृत्तीचा हा गांव । नाहीं समाधीस ठाव ॥
अवघा माझा पंढरीराव । भरला डोह गंगेचा ॥३॥
मनानें कांहो केली जलदी । मागें सांगितली नाहीं कधीं ॥
रात्रीं कळली ही शुद्धि । ह्मणून बुद्धि पालटली ॥४॥
पर्वकाळ एकादशी निर्धारी । कीर्तन होतें महाद्वारीं ॥
आली योगीराजाची फेरी । नवलपरी सांगूं पाहे ॥५॥
काय बोलूं आतां बोली । कीर्तनीं कांता आवली आली ॥
ब्रह्मरुप होऊन गेली । चढली मोली कौसल्ये ॥६॥
॥८४३०॥
मेळ गडियांचा नारायणें केला । डाव तो मांडिला चेंडुफळी ॥१॥
बळीरामयुक्त ह्मणती श्रीहरी । डाव तुजवरी आला बापा ॥२॥
माग चेंडु तेणें पायीं लाथाळीला । जाऊनी गुंतला कळंबावरी ॥३॥
तुका ह्मणे देव धांवोनियां जाय । अवघडा पाहे ठाव तेथें ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : August 01, 2019
TOP