अभंग - ८३०१ ते ८३१०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥८३०१॥
देवा न भजे जीव । आतां याची कोण करी कींव ॥
कांहीं नुपजे भाव । उत्तम ठाव नरदेह ॥१॥
कोण सुख धरिलें संसारीं । हरी उच्चारीं उच्चारीं ॥
माप हें लागलें शरीरीं । झालियावरी दीन इंद्रियें ॥२॥
बापुडीं होतील शेवटीं । आयुष्या झालिया तुटी ॥
मग मागें पुढें कोटी । होईल भेटी जन्मासी ॥३॥
जुंतिले घालिती हे डोळे । मागें जोडी आर्त तेणें ही पोळे ॥
चालिलों किती हें न कळे । जहर बोले भुक तान्ह ॥४॥
एवढें जयाचें निमित्य । प्रारब्ध किंचित संचित ॥
तें हें देह मानुनी अनित्य । न करी नित्य हरिस्मरणीं ॥५॥
तुका ह्मणे न वेंचतां मोल । तो हा यासी महाग विठ्ठल ।
वेंचितां फुकाचेचि बोल । केवढें खोल अभागिया ॥६॥
॥८३०२॥
आलिया संसारा । तुह्मी भक्तिमार्ग धरा ॥
काळ दंड कुंभपाक यातना थोरा । कां रे अघोरा दचकांना ॥१॥
नाहीं त्या यमासी करुणा । बाहेर काढितां कुडींतुनी प्राणा ॥
ओढाळ सांपडे जैसें धान्या । चोरिये तव परी जेतां ॥२॥
नाहीं दिलें पाववील कैसा । चालतां पंथें तेणें वळसा ॥
नसेल ठावें ऐका तें कैसा । नेतां बांध जैसा धरुनियां ॥३॥
क्षण एक आगीच्या पायीं । न चलवे तया करिती कायी ॥
ओढिती कांटवणा सोयी । अग्निखांब बाहीं कंवटाळिती ॥४॥
दुखुनी अंग कां फेलुती । तये दरीमाजी चालविती ॥
ठाव न लागे बुडती । वरी मारिती यमदंड ॥५॥
तहान भुक नसावे वेळा । तों राखिती किती एक काळा ॥
पिंड पाळुनी केला शितळा । तो तप्तभूमिज्वाळा लोलविती ॥६॥
ह्मणउनी करा कांहीं सायास । होवेल तरी होउनी दास ॥
करवेल तरी करा गुरुदास्य । वैराग्य भक्तिरस तुका ह्मणे ॥४॥
॥८३०३॥
लपालासी तेंही कळलें देवा । लाजसी आपुलिया वैभवा ॥
मी नाहीं घालीत गोंवा । भीड केशवा कासयाची ॥१॥
आतां उतरी आपुला हा भार । मजसी बोलोनी उत्तर ॥
तुज माझा नव्हे अंगिकार । मग विचार करीन मी ॥२॥
दातया आणि मागत्यासी । धर्मनीति बोलिली ऐसी ॥
यथानुशक्ति ठाकेल तैसी । बाधी दोघांसी विन्मुखता ॥३॥
ह्मणउनी मी करितों वास । तुझिया वचनाची आस ॥
धीर हा करुनी सायास । न टळें नेमास आपुलिया ॥४॥
तुझें मी घेतल्यावांचून । न वजे येथूनि वचन ॥
हा माझा नेम सत्य जाण । आहे नाहीं तुका ह्मणे ॥५॥
॥८३०४॥
संत सुखाचे सागर । संत अनाथां माहेर ॥
संत ज्ञानाचें आगर । भवसिंधु उतार यांचेनि ॥१॥
संत करुणाकर सिंधु । संतसंगें तुटे भवबाधु ॥
संतप्राप्ती निज बोधु । लागे छंदू स्वरुपीं ॥२॥
संतसंग पाप नाशी । उद्धरिले महादोषी ॥
संतसंगती तेचि काशी । तीर्थ तीर्थासी जें होय ॥३॥
संतसंगें वसे देव । संत तेचि माना भावें ॥
संत साक्षेसी सर्वस्वें । संत सहा वेद देव हे ॥४॥
संत भक्तीचें भांडार । मुक्तीचें निज घर ॥
वर्णू शिणले अपार । धरामर संत हे ॥५॥
संत साक्षी सर्वाभूतीं । अधीष्ठान परंज्योती ॥
सकळा कारण मूर्ती । होती जाती ब्रह्मांडें ॥६॥
संत देवांचाही देव । संत तीर्था तीर्थराव ॥
संतसंगें वासुदेव । दास्य करी निजांगें ॥७॥
संत सर्वासी आधार । संतीं तारिले अपार ॥
संत तुकयाचे दातार । हा आधार पायांचा ॥८॥
॥८३०५॥
कौतुकाची वाणी बोलूं तुज लाडें । आरुष वांकुडें करुनी मुख ॥१॥
दुजेपणीं भाव नाहीं हे अशंका । जननी बाळकामध्यें भेद ॥२॥
सलगी दुरुनी जवळी पाचारुं । धांवोनियां करुं अंगसंग ॥३॥
धरुनी पाऊल मागतों भातुकें । आवडीचें निकें प्रेमसुख ॥४॥
तुका ह्मणे तुज आमुचीच गोडी । ऐसी हे आवडी कळों आली ॥५॥
॥८३०६॥
विष्णुचिया दासां मुख्य धर्म साचा । भेद तो भ्रमाचा आणूं नये ॥१॥
गीता नित्य नेम निष्ठा भागवत । कराल तें हित भक्ति होय ॥२॥
पुराण श्रवण शास्त्रावलोकन । श्रेष्ठ वर्म जाण हरिकीर्ति ॥३॥
सर्वत्र जीवाचा देखणा जो आत्मा । जाणोनियां प्रेमा नमस्कार ॥४॥
तुका ह्मणे एका मृत्तिकेचे घट । दिसती पालट नानाभेद ॥५॥
॥८३०७॥
संदेह बाधक । त्याग केला सकळिक ॥१॥
शुद्ध होवोनी सोंवळा । झालों कल्पने निराळा ॥२॥
ह्मणूं गोविंदाचें । नाम बैसविलें वाचे ॥३॥
तुका ह्मणे भावें । संध्या केली हरिनांवें ॥४॥
॥८३०८॥
समुद्रवलयांकित पृथ्वी जाणा । तीर्थ क्षेत्र नाना पुण्य भूमी ॥१॥
नमस्कार केला संतजनां । तेव्हां फळ जाणा आलें त्याचें ॥२॥
करुं प्रदक्षणा साम्य जीव झाले । सार्धक्य तें झालें जन्मा आलों ॥३॥
न मनाच कांही आणीक साधन । देहासी दंडण कष्ट थोर ॥४॥
तुका ह्मणे केला निश्चयो विधान । तेव्हांचि कारण साध्य होय ॥५॥
॥८३०९॥
बहु पुण्य होतें गांठीं । झाली संता पायीं मिठी ॥१॥
धन्य लाभ झाला आजि । गात्रें तृप्त झालीं माझीं ॥२॥
पाप ताप नुरे कोठें । सरलीं संसाराचीं झटें ॥३॥
तुका ह्मणे साचें । वचन तें अमृताचें ॥४॥
॥८३१०॥
देह झाले गळीत । हें लळीत वाटतसे ॥१॥
आतां आलों अवसानीं । रुप मनीं राहिलें ॥२॥
वाहियलें नाम पायीं । स्थिर ठायीं मन राहे ॥३॥
तुका ह्मणे धालों पूर्ण । नारायणा आठवें ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : August 01, 2019
TOP