अभंग - ८३६१ ते ८३७०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥८३६१॥
ज्ञानियांचे घरीं चोजवितां देव । तेथें अहंभाव पाठी लागे ॥१॥
ह्मणोनियां ऐसें सांडिले उपाय । धरियेले पाय दृढ तुझे ॥२॥
वेदपरायण पंडित वाचक । न मिळती एक एकामधीं ॥३॥
पाहों गेलों भाव कैसी आत्मनिष्ठा । तेथें देखे चेष्टा विपरीत ॥४॥
आपुलिया नाहीं निवाले जे अंगें । योगी करिती रागें गुरगुर ॥५॥
तुका ह्मणे कोणाचा पांगिला । नको बा विठ्ठला करुं आतां ॥६॥
॥८३६२॥
नमो नमो तुज माझें हें कारण । काय झालें उणें करितां स्नान ॥१॥
संतांचा मारग चालतो झाडूनि । हो कां लाभ हानि कांहीं तरी ॥२॥
न करिसी तरी हेंचि कोडें मज । भक्ति गोड काज आणिक नाहीं ॥३॥
करीं सेवा कथा नाचेन रंगणी । प्रेम सुख धणी पुरेल तों ॥४॥
महाद्वारीं सुख वैष्णवांचे मेळीं । वैकुंठ जवळी वसे तेथें ॥५॥
तुका ह्मणे नाहीं मुक्तिसवें चाड । हेंचि मन्म गोड घेतां मज ॥६॥
॥८३६३॥
दैन्य दु:ख आह्मां न येती जवळी । दहन हे होळी होती दोष ॥१॥
सर्व सुखें येती माने लोटांगणीं । कोण यांसीं आणी दृष्टीपुढें ॥२॥
आमुची आवडी संतसमागम । आणीक त्या नाम विठोबाचें ॥३॥
आमचें मागणें मागों त्याची सेवा । मोक्षाची निर्दैवा कोणा चाड ॥४॥
तुका ह्मणे पोटीं सांठविला देव । न्यून तो हा भाव कोण आह्मां ॥५॥
॥८३६४॥
आह्मी देतों हाका । कांरे झालासी तूं मुका ॥१॥
न बोलसी नारायणा । कळलासी क्रियाहीना ॥२॥
आधीं करुं चौघाचार । मग सांडूं भीडभार ॥३॥
तुका ह्मणे सेवटीं । तुह्मा आह्मां घालूं तुटी ॥४॥
॥८३६५॥
शेवटली पाळी तेव्हां मनुष्यजन्म । चुकलीया वर्म पडे फेरा ॥१॥
याचि देहीं येथें वळखा आत्माराम । संसार सुगम लेखूं नका ॥२॥
संसारीं असावें असोनि नसावें । भजन करावें वेळो वेळा ॥३॥
तुका ह्मणे पडे शुद्धस्वरुपीं गांठीं । मग आटाआटी करणें नलगे ॥४॥
॥८३६६॥
संग्रामाचे अंतीं जुंझावया जाती । मागें पुढें घेती जीवा भ्यानें ॥१॥
तरवारीच्या वेळे वोहळाकडे पळे । बोलतो सबळ मैदानांत ॥२॥
मनाचा करार पाहिजे निर्धार । जैसा दीपावर पतंग नीट ॥३॥
तुका ह्मणे शूर कैचे घरोघरीं । अवघे फजितखोरी पोटासाठीं ॥४॥
॥८३६७॥
नाम ह्मणतां मोक्ष नाहीं । ऐसा उपदेश करिती कांहीं ॥
बधिर व्हावें त्याचे ठायीं । दुष्ट वचन वाक्यतें ॥१॥
जयाचे राहिलें मानसीं । तेचि पावले तयासी ॥
चांचपडतां मेलीं पिसीं । भलतैसीं वाचाळें ॥२॥
नवविधीचा निषेध । जेणें मुखें करिती वाद ॥
जन्मा आले निंद्य । शूकर याती संसारा ॥३॥
काय सांगों वेळोवेळां । आठव नाहीं चांडाळा ॥
नामासाठीं बाळा । क्षीरसागरीं कोंडिलें ॥४॥
आपुलिया नामासाठीं । लागे शंखासुरापाठीं ॥
फोडोनियां पोटीं । वेद चारी काढीले ॥५॥
जगीं प्रसिद्ध हे बोली । नामें गणिका तारिली ॥
आणिकें हीं उद्धरिलीं । पातकी महादोषी ॥६॥
जे हे पवाडे गर्जती । नाम प्रल्हादाच्या चित्तीं ॥
जळतां बुडतां घातीं । राखे हातीं विषाचे ॥७॥
काय सांगो ऐशीं किती । तुका ह्मणे नामख्याती ।
नरक्राप्रती जाती । निषेधिती ती एकें ॥८॥
॥८३६८॥
सत्यचक्रस्थानीं राहतो गणपती । चतुर्दल आहेती तयालागीं ॥१॥
मातृकाहि चार ययालागीं असती । दुसर्याची गति नसे तेथें ॥२॥
मुख्य अधिपत्य मेरुचें तें मूळ । निर्गुणाचें फळ जाणतसे ॥३॥
तुका ह्मणे आहे थोडकीच कळा । जाणे तो वेगळा योगीराज ॥४॥
॥८३६९॥
आधारचक्रस्थानीं राहतो गणपती । चतुर्दल आहेती तयालागीं॥१॥
मातृकाहि चार ययालागीं असती । दुसर्याची गति नसे तेथें ॥२॥
मुख्य अधिपत्य मेरुचें तें मूळ । निर्गुणाचें फळ जाणतसे ॥३॥
तुका ह्मणे आहे थोडकीच कळा । जाणे तो वेगळा योगीराज॥४॥
॥८३७०॥
स्वाधिष्ठान चक्रीं असे ब्रह्मदेव । तोचि जाणा ठाव सत्य लोक ॥१॥
सहा मातृकांअचा असे अधिकारी । प्रजा झाली सारी तेथूनियां ॥२॥
स्वामी तो विश्वाचा सावित्रीसहित । जाणतां सहित होय तेणें ॥३॥
तुका ह्मणे गुरुघरची आहे कळा । अंजन हें डोळां घाला तुह्मी ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : August 01, 2019
TOP