अभंग - ८३९१ ते ८४००

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥८३९१॥
अंधारानें दीपा आणियेली शोभा । माणिकासी प्रभा कोंदणाची ॥१॥
रोगियानें वैद्य आणिला उजेडा । नाहीं तरी द्वाडा कोण पुसे ॥२॥
कल्पतरुची कीर्ति कैसेनि वाढती । कल्पना नसती वाचकासी ॥३॥
परिसाचा महिमा वाढतो कशानें । लोह निरमाण नसतें जरी ॥४॥
तुका ह्मणे आह्मी असोनियां जन । तुज देवपण आणियेलें ॥५॥

॥८३९२॥
देह देवपाट हृदयसंपुष्ट । आंत कृष्ण मूर्त बैसविली ॥१॥
प्रेमाचें हें पाणी प्रक्षाळीन तूज । आत्मा सखा निज पांडुरंग ॥२॥
भाव करुनी गंध भक्तीच्या अक्षता । लाविल्या अनंता निढळासी ॥३॥
मन केलें मोगरा चित्त केलें शेवंतीं । सत्वाच्या तुळसी अर्पियेल्या ॥४॥
जळो क्रोध धूप उजळो ज्ञानदीप । ओंवाळूं स्वरुप पांडुरंग ॥५॥
षड्रस पक्वान्नें केलीं कृष्णार्पण । इच्छिलें भोजन समर्पिलें ॥६॥
तुका ह्मणे पूजा केली मनभावें । पंच प्राणासंवें समर्पिली ॥७॥

॥८३९३॥
आपुल्या हातीं तुह्मी कापा माझी मान । जगांत अपमान करुं नका ॥१॥
वैर्‍याहातीं वर्म नका देवूं देवा । अभिमान केशवा राखी माझा ॥२॥
तुजविण कवणा यावें काकुळती । कोण कामा येती अंत काळीं ॥३॥
तुका ह्मणे झालों लहानाहुनी लहान । पायींचा मी दीन दास तुझा ॥४॥

॥८३९४॥
सेतीं बिज नेतां थोडें । मोठे आणिताती गोड ॥१॥
एक्या नामें हरि जोडे । फिटे जन्माचे सांकडें ॥२॥
बाळे भोळे जन । सर्व तरती कीर्तनें ॥३॥
तुका ह्मणे तेणें मुढें । नाम स्मरावें साबडें ॥४॥

॥८३९५॥
जासी तरी जाई संतांचिये गांवा । होईल विसांवा मना तेथें ॥१॥
करिसी तरी करी संतांची संगत । आणिकांची मात नको मना ॥२॥
बैससी तरी बैस संतांचिये मधीं । आणिकांची बुद्धि नको मना ॥३॥
तुका ह्मणे संत कृपेचे सागर । मना निरंतर घ्यावी धणी ॥४॥

॥८३९६॥   
कलियुगीं साधन नामाविण नाहीं । यासाठीं लवलाही नाम घ्यावें ॥१॥
नामस्मरणी कांहीं न करावा अळस । कैलासीं महेश नाम घ्यावें
पाताळीच्या शेषा नामाचा आधार । नामेंचि समुद्र शिळा तारी ॥३॥
तुका म्हणे नाम साधनाचें सार । विष हें अमर नामें झालें ॥४॥

॥८३९७॥
निरंजनभवनीं देखियेली गाय । तीन तिसी पाय चार मुखें ॥१॥
सहस्त्र शोभती डोळे नौ तिसी कान । सत्रावीचें स्थान संग एक ॥२॥
ऐसी कामधेनु व्यासांनीं पाळिली । शुकांनीं वळिली जनकाघरीं ॥३॥
तुका ह्मणे गाय भाग्यें नरा भेटे । अभाग्य करंटे वांया गेले ॥४॥

॥८३९८॥
सत्वाचें शरीर भवाचें कीर्तन । प्रेम जनार्दन उभा तेथें ॥१॥
अहिंसा मृदंग अद्वैताची टाळी । प्रेमाची आरोळी हरिनाम ॥२॥
सप्रेमाचा विणा नि:संगाच्या तारा । आणिला दरारा पातकांसी ॥३॥
जगत्रयजीवन योगियांचा राणा । ध्यानीं मनीं आणा तुका ह्मणे ॥४॥

॥८३९९॥   
मनुष्य संसारीं उदंड अन्यायी । ह्मणोनियां नाहीं भेटी देवा ॥१॥
ऐसें जरी मनीं धरिसील कांहीं । मग सर्वथा ही नव्हे भेटी ॥२॥
वायां दवडूं नको आवड भेटीची । सई आनाथाची न विसरें ॥३॥
तुका म्हणे दिली नामाची आवडी । तैसी घाली उडी भेटावया ॥४॥

॥८४००॥   
पहिलाच जरी असतों अज्ञान । तरी कांहीं सीण न वाटता ॥१॥
नामाचें चिंतन दिलें दारीं घरीं । चित्त भेटीवरी रात्रंदिस ॥२॥
अगा जरी मन कठीण कराल । बहुत होतील कष्ट मज ॥३॥
तुका म्हणे आतां देऊं नको सीण । पहिलें वचन दिलें आहे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : August 01, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP