अभंग - ८४०१ ते ८४१०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥८४०१॥   
रंकाची विनंती तूंच पक्षपाती । मज दीनाप्रती पाव वेगीं ॥१॥
वर्णिताति वेद शास्त्रें आणि शेष । अवतारवेष भक्तांसाठीं ॥२॥
दासांचा कैवारी जाणोनी साचार । आलों मी पामर पायांपासी ॥३॥
कायावाचामनें अनन्यशरण । निशिदिनी ध्यान तुझें मज ॥४॥
तुका म्हणे तुज विनवितों देवा । नाहीं सुख जीवा आणिक कांहीं ॥५॥

॥८४०२॥   
होत जात सर्व संचिताप्रमाणें । चाखोनियां कोणें रांधियेलें ॥१॥
उदंड उपाय संपत्तीकारणें । सकळ ही जन करिताती ॥२॥
परी जैसी जैसी संचिताची रेखा । अचल ब्रह्मादिका पूर्व पुण्य ॥३॥
तुका म्हणे कळला निर्धार । लाविलें अंतर पांडुरंगीं ॥४॥

॥८४०३॥   
पुंडलीकें केली विमान पंढरी । अनंत श्रीहरी नामें तुझीं ॥१॥
पावे पांडुरंगा बुडतों भवसागरीं । काढी झडकरी मज आतां ॥२॥
तुका म्हणे थोर होय गर्भवास । पाहतसें वास अखंडित ॥३॥

॥८४०४॥   
झणी मुक्ति देसी जरी पांडुरंगा । मग संत संगा पाहूं कोठें ॥१॥
मग पंढरीचा आनंदसोहळा । पाहूं मग डोळां कोणाचिया ॥२॥
तुका म्हणे असो तुजी कृपादृष्टी । नलगे वैकुंठीं वास आम्हा ॥३॥

॥८४०५॥
कोण्या तरी योगें तुझा छंद लागो । मन माझें जागो भजनीं तुझ्या ॥१॥
कोण्या तरी योगें पश्चात्ताप घडो । चित्त हें मुरडे स्वरुपीं तुझ्या ॥२॥
कोण्या तरी योगें घडो संतसेवा । येवो अनुभवा निज सुख ॥३॥
तुका ह्मणे ऐसा योग कोण वेळ । राहेन निश्चळ तुजपासी ॥४॥

॥८४०६॥
जंव नव्हे सारग्राही । भारवाही पशुची ॥१॥
जो तो करी यातायाती । साच चित्तीं धरीन ॥२॥
खर्‍या देवा पाठ केली । खेटे ह्मसोबा ॥३॥
देवी देव्हारा जाखाई । फुलें लावी मुंज्यासी ॥४॥
कोण्या गुणें जडली भक्ती । स्वार्थ चित्तीं नेणें मी ॥५॥
तुका ह्मणे देखीलें डोळा । ऐसी कळा विपरीत ॥६॥

॥८४०७॥
भक्ति काय ह्मणजे जनीं जनार्दन । आलंकार सोनें भिन्न नसे ॥१॥
सर्व भूतीं देव आपणासकट । जाणोनी निकट भजा येणें ॥२॥
ज्ञान ह्मणजे काय आपणा जाणणें । जाणुनी नेणणें विज्ञान तें ॥३॥
एक पूजा करी दूजा तोंडावरी । मारीतां अंतरीं क्रोध नये ॥४॥
शांतींचें हें रुप बोललों प्रकार । या गुणें निर्धार ज्ञानी ह्मणूं ॥५॥
विरक्ति ते विष विषयाचा त्याग । इहामूत्र सोंग निरसणें ॥६॥
सर्व भूतीं आत्मा असावी करुणा । परदु:ख प्राणा साऊं पाहे ॥७॥
याहि गुणें युक्त धन्य तोचि ज्ञानी । तयांचे चरणीं लोळे तुका ॥८॥

॥८४०८॥
मागें झाल्या कीर्ति ऐकोनियां कानीं । तैसा का निशाणीं द्याना डंका ॥१॥
अहल्या द्रौपदी तारा दमयंती । मंदोदरी सती सीता माता ॥२॥
पार्वती सावित्री रुक्मिणी अनुसूया । मदालसा माया मैनावती ॥३॥
देवकी यशोदा कयाधु चांगुणा । संध्यावळी जाणा जिचा डंका ॥४॥
माता शुद्धमती ज्ञाती ती मिराई । जगाची मुक्ताई मुक्त झाली ॥५॥
तुका ह्मणे आतां जनीतें आइका । तैशा व्हागे सत्या बाइयांनो ॥६॥

॥८४०९॥
हनुमंत जानकिकिंकर । चाळोनी गेला लंकेवर ॥१॥
गेला अशोक वनाला । तेथें देखिली सीतेला ॥२॥
फराळाचे मिषें । केला बागेचा विध्वंस ॥३॥
तुका ह्मणे जंबुमाळी । रगडीला महीतळीं ॥४॥

॥८४१०॥
अहो अंजनीच्या पुता । नांव तया हनुमंता ॥१॥
जेणें सीताशुद्धि केली । रामसीता भेटविलीं ॥२॥
आणोनियां द्रोणगिरी । सौमित्र वांचविला निर्धारीं ॥३॥
ऐसा परोपकारी सखा । तया शरणागत तुका ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : August 01, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP