अभंग - ८३११ ते ८३२०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥८३११॥
काय उपचार करुं पांडुरंगा । ऐसें मज सांगा निवडुनी ॥१॥
कोण तो पदार्थ उणा तुह्मापाशीं । बोलाया वाचेसी मौन पडे ॥२॥
शंकर शेषाद्री करिती स्मरण । तेथें माझें गाणें पुरों शके ॥३॥
इंद्र सुरवर वाहाती सुमनें । तेथें म्यां वाहणें काय एक ॥४॥
परी आवडीनें जोडूनी अंजुळ । बुका वाहूं माळ तुळसीची ॥५॥
उणें पुरें तुम्ही करुन घ्यावें सांग । जिवालागीं मग सुख तेव्हां ॥६॥
तुका ह्मणे माझी ऐकावी प्रार्थना । तुह्मी नारायणा सेवकाची ॥७॥

॥८३१२॥
नमस्कार तया माझा । नाहीं भाव ज्यापें दुजा ॥१॥
संदेहाचे नांवें शून्य । वाढतां हा मार्ग पूर्ण ॥२॥
सोंवळी ते झाली । शुद्ध वासना चांगली ॥३॥
तुका ह्मणे पाय चित्तीं । ध्यातों सदा त्यांचे प्रीति ॥४॥

॥८३१३॥
पुराणीं बैसावया नाहीं रिकामटी । खेळतो सोंगटी अहोरात्र ॥१॥
राजद्वारीं वेंची द्रव्याचिया राशी । नासरी द्विजासी देवूं न शके ॥२॥
विषयाच्या गोष्टी सांगतां उल्हासे । नाम घेतां त्रास मनीं कैसा ॥३॥
हातें मोर्‍या शोधी करी कष्ट नाना । देवाच्या पूजना कंटाळतो ॥४॥
तुका ह्मणे धिग्‍ ऐशीं त्यांचीं जिणीं । श्वान शूकराहुनी हीन लोकीं ॥५॥

॥८३१४॥
प्रपंचाची बेडी । तुजवीण कोण तोडी ॥१॥
ऐसा दुजा नाहीं कोणी । मज काढी भयांतुनी ॥२॥
संसाराचें ओझें । बहु पीडा करी मज ॥३॥
येणें बहु केला बाधु । बुडवुनी भवसिंधु ॥४॥
तुझें नाम दीनानाथा । आह्मां संसाराची व्यथा ॥५॥
तुका ह्मणे बळ प्रोढीए । आम्हां भयांतुनी काढी ॥६॥

॥८३१५॥
पापी तो नाठवी आपुली करणी । देवासी निंदोनी बोलतसें ॥१॥
करितां भिईना दोषांचे पर्वत । दुर्बुद्धि अभक्त दुराचारी ॥२॥
खळवादी नेणे आपुल्या उचिता । बोल त्या अनंता लावितसे ॥३॥
तुका म्हणे त्याच्या तोंडा लागो कांटी । नाहीं जगजेठी आठविला ॥४॥

॥८३१६॥
मानो न मानो तुज माझें हें करणें । काय झालें उणें करितां स्नान ॥१॥
संतांचा मारग चालतों झाडणी । हो कां लाभ हाणी कांहीं तरी ॥२॥
न तारिसी तरी हेंचि कोड मज । भक्ति गोड काज आणीक नाहीं ॥३॥
करीन सेवा कथा नाचेन अंगणीं । प्रेमसुख धणी पुरलें तें ॥४॥
महाद्वारीं सुखें वैष्णवांचे मेळीं । वैकुंठ जवळी वसे तेथें ॥५॥
तुका ह्मणे नाहीं मुक्तिसवें चाड । हेंचि जन्म गोड घेतां मज ॥६॥

॥८३१७॥
भिंवरेचे तिरीं मन माझें जाय । तेथें माझी माय पांडुरंग ॥१॥
पांडुरंग माय पाहे जन्म जोडी । मनासी आवडी लागलीसे ॥२॥
भेटीलागीं माझा झाला आहे हेत । पाहीन अनंत डोळे भरी ॥३॥
डोळियासी तेव्हां वाटे समाधान । देखेन निधान पांडुरंगा ॥४॥
तुका ह्मणे देई संगती शेजार । सर्व माझा भार वागवणें ॥५॥

॥८३१८॥
मोक्ष कैंचा नाम घेतां । अवघा श्रमचि मागुतस ॥
कैंचा देव कैंची चिंता । काय दुश्चिता होउनी ॥१॥
ऐसें संगती तरी कोणी । चित्त न घालावें भल्यांनीं ॥
भजनी विक्षेप घडे क्षणीं । पापा दुणी होतसे ॥२॥
बधीर तया ठायीं बापा । व्हावें दुष्ट शब्द आरोपा ॥
तेव्हां चुकती जन्मखेपा । संसार सोपा तेणेंचि ॥३॥
जया चित्ताची वासना । तेचि अंतीं मति ये जाणा ॥
स्वगतीच्या ऊण खूणा । यावांचून न कळती ॥४॥
धरुनियां बळेंसी धीर । चित्त करुनियां एकाग्र ॥
तुका ह्मणे पैल पार । नाम एक पाववी ॥५॥

॥८३१९॥
नामें तारिला वाल्मीक । जीवन्मुक्त झाला शुक ॥
धुरु उपमन्युबाळक । नामें निष्कळंक तारिले ॥१॥
नामें तारिला अजामेळ । नष्ट दुष्ट गणिका चांडाळ ॥
गज नक्र मदें आंधळे । नेले कृपाळें वैकुंठा ॥२॥
नामें तारिल्या सिंधुशिळा । नामें रक्षिलें गोलांगुळा ॥
जळीं नेलिया पाताळा । नाम माळा सोडीना ॥३॥
नामें तारिल्या गोपाळ गाई । शिळा मुक्त झाल्या पायीं ॥
भीष्म शरपंजर घायीं । सामास राखिला ॥४॥
नामें तारिली द्रौपदी । नाम तारक हें अनादि ॥
तुका ह्मणे अक्षयपदीं । नाम सिद्धी पाववी ॥५॥

॥८३२०॥
नाम स्मरे प्रल्हाद । नाम जपे नारद ॥
नामनिष्ठ रुक्मांगद । शेष गरुड हे दोन्ही ॥१॥
नामें तरला बिभीषण । नाम स्मरतसे अर्जुन ॥
उद्धवासी नारायण । आत्मज्ञान प्रबोधी ॥२॥
परिक्षिती दिवसां साता । पांडवांसी स्मरण करितां ॥
नाना संकटें पडतां । होय रक्षिता महादोषी ॥३॥
याचि देहीं यया डोळां । नाम भेटवी गोपाळा ॥
नाम सर्व साधनकळा । नाहीं आगळा याहुनी ॥४॥
नाम शस्त्र हें निर्वाणीं । सर्व साधनकळा ।
नाहीं आगळा याहुनी ॥४॥
नाम शस्त्र हें निर्वाणीं । नाम नौका हेचि निदानीं ॥
तुका ह्मणे चक्रपाणी । जीवदानी तारक ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : August 01, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP