अभंग - ८३७१ ते ८३८०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥८३७१॥
नाभिस्थानचक्रीं विष्णुचा तो वास । मातृका तयास पूर्ण दहा ॥१॥
लक्षुमीसहित मेघवर्ण ध्यान । वैकुंठभुवन तेंचि जाणा ॥२॥
अशा ह्या युक्तीनें पहावें देवासी । तरीच दृष्टीसीं येईल तो ॥३॥
लक्षातीत चार होतां हस्तगत । तुका ह्मणे मात काय सांगूं ॥४॥

॥८३७२॥
हृदयस्थानचक्रीं सांबाची ही वस्ती । सर्वकाळ करिती तेथें वास ॥१॥
बारा मातृकेचा धणी तो समर्थ । पुरवी मनोरथ सकळांचे ॥२॥
पार्वतीसहित श्वेत वर्ण ज्याचा । स्वामी कैलासींचा भोळानाथ ॥३॥
तुका ह्मणे त्याचें देणें रावणासी । दातृत्व कोणासी येईना तें ॥४॥

॥८३७३॥
षोडशदळचक्रा जीव आत्मा राहतो । कौतुक पाहतो सकळांचें ॥१॥
सोळा मातृकेचा आकार तयासी । स्मरतो शिवासी सर्वकाळ ॥२॥
चैतन्याचा खेळ तयाचे स्वाधीन । ओघ तो तेथून सत्रावीचा ॥३॥
इडा पिंगळेचा त्रिवेणीसंगम । तुका ह्मणे नेम गुरुघरिंचा ॥४॥

॥८३७४॥
भ्रुकुटीचक्रामाजी राहतो परमात्मा । साक्षभूत आत्मा आहे त्यासी ॥१॥
दोन मातृकेची अनुहात ध्वनी । श्रवण ते ज्ञानी करिताती ॥२॥
योगियाचा योग सिद्धीचा हा खेळ । सांगतों निर्मळ सर्वत्रांसी ॥३॥
तुका ह्मणे माझी असे शूद्र वाणी । नका ह्मणूं कोणी खोटें यासी ॥४॥

॥८३७५॥
सहस्त्रदळचक्रीं राहतो श्रीगुरु । तुर्येच्या तें वरु तेंचि स्थळ ॥१॥
दोन मातृकेचा लागेना तो पार । गुरुपद थोर सर्वाहूनि ॥२॥
गुरुविणें प्राणी नसे त्याला गति । जातां आधोगति अध:पाता ॥३॥
तुका ह्मणे मुख्य गुरु चतुष्टयीं । चिंतन हरिपायीं असों द्यावें ॥४॥

॥८३७६॥
एकवीस सहस्त्र आणीक सहाशें । जप होत असे निरंतर ॥१॥
साक्षेपें करावें ह्मणजे त्यांचे फळ । अजपाचें मूळ ऐसें जाणा ॥२॥
सत्य तेंचि सार पहावें सर्व भूतीं । हरिपायीं भक्ति असों द्यावी ॥३॥
तुका म्हणे ज्याचा भावार्थ निर्मळ । त्याला त्याचें फळ प्राप्त असे ॥४॥

॥८३७७॥
तत्वांलागी तत्वें ग्रासकचि झालीं । ह्मणती गेलीं मेलीं तयांलागीं ॥१॥
पांच आणि पंचवीस व्यालीं एक गोळ । सहज मोडी चाल आपणचि ॥२॥
मायीक तुतुकीं निघोनियां गेलीं । गेलीं परी ठेलीं जैशीं तैशीं ॥३॥
येणें जाणें नाहीं आत्मा अविनाश । सहजचि असे व्यापकत्वें ॥४॥
जन्ममरणाचा जेथें ठाव नाहीं । तुका तया ठायीं लीन झाला ॥५॥

॥८३७८॥
ब्रह्म तें पाहिलें आनंदें देखिलें । अद्वय कोंदलें दृष्टिमाजि ॥१॥
दृष्टिमाजि भरलें सर्व कोंदाटलें । न जाय लोटिलें दोहीं हातें ॥२॥
दोहीं हातें यासी गेलों धरायासी । तंव तें अंगासी आदळलें ॥३॥
आदळलें अंगीं सव्य वाम भागीं । आणि अंतरंगीं मायेपुढें ॥४॥
मायेपुढें ब्रह्म अरुप अनाम । पाहतां सुगम गुरुकृपा ॥५॥
गुरुकृपा ब्रह्म पाहतां निरंजनीं । वस्तुचि भरुनी राहिलासे ॥६॥
राहिलासे धांव खुंटलीसे धांव । झाला स्वयमेव तुका ह्मणे ॥७॥

॥८३७९॥
विज माथां चमकली । नेत्र बाहुली हांसली ॥१॥
ओघ वाहे सत्रावीचा । हिरा स्थापीला देहींचा ॥२॥
सप्त पाताळा खालुता । एकविस स्वर्गाचे वरुता ॥३॥
तेथें दीप उजळला । तुका ज्योतीसी मिळाला ॥४॥

॥८३८०॥
प्रणववाचक श्वासोश्वास । तोचि तारक उपदेश ॥१॥
परि हे गुरुकृपेचें देणें । विरळा भाग्यवंत जाणे ॥२॥
तार घोर आणि मंद । जाणे तीनी स्वर भेद ॥३॥
अनुहाताचिया ध्वनी । जाणे नवनादाच्या खुणीं ॥४॥
औट श्रीहाट गोल्हाट । भ्रमर गुंफेचें कचाट ॥५॥
सोडोनियां पुढें गेला । तुका ह्मणे योगी त्याला ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : August 01, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP