अभंग - ८३४१ ते ८३५०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥८३४१॥
दिवा घालवितां ठायीं । जैसा प्रकाश घेऊनि जाई ॥१॥
तैसें झालें मज सहज । मनबुद्धि अर्पिली तुज ॥२॥
रवी जातां अस्तमाना । घेऊनी जाई आपुल्या किरणां ॥३॥
तुका ह्मणे देहीं । आतां कांहीं उरलें नाहीं ॥४॥

॥८३४२॥
अगत्य तो राम । पोटापुरते करी काम ॥१॥
तया म्हणावें कीं भला । प्रिय आवडे देवाला ॥२॥
माझें घर नये वाचे । तेचि भक्त विठोबाचे ॥३॥
तुका ह्मणे देहगेहीं । ठेवियलें देवापायीं ॥४॥

॥८३४३॥
कैसा निष्ठुर देवराया । नाहीं तुज कांहीं दया ॥१॥
तुह्मा उद्देशें ब्राह्मणा । तृप्त केलें महायज्ञा ॥२॥
कळों आलें देवराया । छळें दाखविसी माया ॥३॥
मयुरध्वज राजा भला । सत्वा न टळे नेमाला ॥४॥
पतिव्रता कांता कुमरा । कापविलें त्याच्या शिरा ॥५॥
करवतीला देह । त्यानीं निधी केला साह्य ॥६॥
तुका ह्मणे चक्रपाणी । न कळे कोणासी करणी ॥७॥

॥८३४४॥
दारिद्रानें विप्र पीडिला अपार । तया पोटीं पोर एक असे ॥१॥
बाहेरी मिष्टान्न मिळे एके दिशीं । घेऊनी छंदासी त्याचि बैसे ॥२॥
क्षुधाकाळीं रडे देखिलें तें मागे । कांहीं केल्या नेघे दुजें कांहीं ॥३॥
सहज कौतुकें बोले बापमाये । देवापाशीं आहे मागशी तें ॥४॥
तेव्हां तुजलागीं स्मरे नारायणा । जीवींच्या जीवना पांडुरंगा ॥५॥
लागली हे क्षुधा जात असे प्राण । काय हें निर्वाण पहातोसी ॥६॥
ब्रम्हांडनायका विश्वाचा पाळक । वरी तिन्ही लोक पोसितोसी ॥७॥
प्राण हा उत्कर्ष जाहला विव्हळ । तेव्हां तो कृपाळ धांव घाली ॥८॥
सोडुनी वैकुंठ धांव घाली तई । आळंगिला बाहीं कृपावंतें ॥९॥
तुका म्हणे दिला क्षीराचा सागर । राहे निरंतर तयापाशीं ॥१०॥

॥८३४५॥
देह आणि प्रारब्धा घालोनियां गांठी । आह्मी उठा उठी वेगळे झालों ॥१॥
भोगाचिया हातीं दिलें कलिवरा । मोडोनियां थारा संचिताचा ॥२॥
सन्मानाचे ठायीं भोगाची अपेष्टा । विटोनियां नष्टा पंचभूतां ॥३॥
तुका ह्मणे ऐसें झालिया अंतर । तयाचा आदर तोचि जाणे ॥४॥

॥८३४६॥
दोघे सारिखे सारिखे । शिव आणि विष्णु सखे ॥१॥
एक बैसे नंदीवरी । एक बैसे गरुडावरी ॥२॥
एक ओढी व्याघ्रांबर । एका कांसे पीतांबर ॥३॥
एका गळां रुंडमाळा । वैजयंती माळ गळां ॥४॥
तुका ह्मणे ऐक । भेद नाहीं दोघे एक ॥५॥

॥८३४७॥
हुजुरा हुजुर पायांपें सादर । नव्हें हरामखोर चाकर आह्मी ॥१॥
हरामिकी केली सडया त्वां लाविली । मागें भोगविलीं बंदीखानीं ॥२॥
आतां करुं हरिकीर्तनाची रासी । बाकी बकायासी झाडा झुडां ॥३॥
तुझें नाम मुखीं तेणें आह्मी सुखी । गुदस्तांची बाकी हल्लीं साल ॥४॥
प्रारब्धाप्रमाणें जमाबंदी झाली । बेरीज पाहिली चौर्‍यासीची ॥५॥
खर्चासुद्धां झाडा अदृष्टानें केला । खंड किती झाला मागें पुढें ॥६॥
लांच लुचपत हवाले टवाले । त्यावरी फिरलें अणु च हें ॥७॥
अवघी ही ऐसी रसद पोंहचली । प्रमाण कीं झाली हुजुराची ॥८॥
चौर्‍यासीची फर्द आणुनी दरबारीं । वरी फांटा मारी युगायुगीं ॥९॥
सांडुनियां बाकी तुका झाला सुखी । गर्जे तिहीं लोकीं कौल झाला ॥१०॥

॥८३४८॥
तेजापासुनी ओंकार । एक आत्मा तो साकार ॥१॥
ओंकार वेदाचें जें मूळ । दुजी माया ती प्रबळ ॥२॥
माया प्रसवली त्रिगुण । चतुष्टय देह महाकारण ॥३॥
पंच तत्वां आकार झाला । साही षड्विकार पावला ॥४॥
सप्तधा कारण । अष्ट लोकपाळ रक्षण ॥५॥
नव इंद्रियें दशम द्वार । एकादश तें निर्धार ॥६॥
दाही अवतार संपूर्ण । शून्याशून्यमय न जाण ॥७॥
मथनीं निर्विकार झाला । तुका ह्मणे आह्मी देखिला ॥८॥

॥८३४९॥
ज्ञान सांगूं काय नाहीं हात पाय । जाणीवेसी जाय ओलंडोनी ॥१॥
तेथोनियां पुढें अवघड घांट । अहंता दुर्घट मारेकरी ॥२॥
चुकवोनी घांट निघालें बाहेरा । ज्ञाना तया हरिभेटी झाली ॥३॥
तुका ह्मणे हरिपायीं एकवेळ । मिळतां प्रांजळ ज्ञानतेंचि ॥४॥

॥८३५०॥
ज्ञानगंगेमाजी स्नान । करी गुरुपुत्रा जाण ॥१॥
गंगा भरली आपार । निवृत्तीचें पैल तीर ॥२॥
हरीचरणीं उगम । त्रैलोक्यांत जिचें नाम ॥३॥
तुका ह्मणे पवित्रता । गंगा हेंचि बोले गीता ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : August 01, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP