अभंग - ८३२१ ते ८३३०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥८३२१॥
अच्युता अनंता सगुणा निर्गुणा । येगा नारायणा सोइरिया ॥१॥
सांवळ्या गोवळ्या कृपेच्या कोंवळ्या । नंदाचिया पिल्या पाव मज ॥२॥
दीनांच्या दातारा भक्तांच्या माहेरा । येगा विश्वंभरा लागवेगीं ॥३॥
तुका ह्मणे नको करुं बा उशीर । येवून सत्वर भेट मज ॥४॥

॥८३२२॥
तुझिया नामाचा न पडे विसर । ध्यानीं निरंतर पांडुरंगा ॥१॥
सांगितला मंत्र श्रीरामनामाचा । सर्वकाळ वाचा वेंचि बोलें ॥२॥
उफराटें नाम वाल्मीक बोलीला । तोहि वंद्य केला नारायणें ॥३॥
तुका म्हणे मज तुझाची भरंवसा । धांउनियां कैसा येसी देवा ॥४॥

॥८३२३॥
अच्युता अनंता गोविंदा केशवा । मुकुंदा माधवा नारायणा ॥१॥
वसुदेवसुता गोपिकारमणा । भक्तउद्धरणा पांडुरंगा ॥२॥
मकर कुंडलें श्रवणीं शोभती । मनोहर दिसती एकावळी ॥३॥
तुका ह्मणे हरी कृष्णा तूं गोपाळा । पाळिसील लळा पांडवांसी ॥४॥

॥८३२४॥
सदा मनीं वसे तेंचि स्वप्नीं दिसे । जग सर्व ऐसें ह्मणतें कीं ॥१॥
असें तरी काय झालें नारायणा । कां माझी करुणा नये तुज ॥२॥
कृपेच्या वचनें कांहीं तरी बोल । किती धरिसील राग पोटीं ॥३॥
तुका ह्मणे जरी सहस्त्र अन्यायी । तरी विठाबाई कोपूं नये ॥४॥

॥८३२५॥
माझिया इंद्रियां लागलें भांडण । ह्मणती हे कान रसना धाली ॥१॥
करिती तळमळ हस्त पाद भाळ । नेत्रांसी दुकाळ पडियेला ॥२॥
गुण गाये मुख ऐकताती कान । आमुचें कारण तैसें नव्हे ॥३॥
दर्शनें फिटे सकळांचा पांग । जयाचा जो भोग घेईल तें ॥४॥
तुका ह्मणे ऐसें करी नारायणा । माझी ही वासना ऐसी आहे ॥५॥

॥८३२६॥
दाटोनियां करी दोष । शिव्या देऊनि उपदेश ॥१॥
नाहीं स्वहित तें ठावें । नसता जना करि गोवें ॥२॥
नाहीं ठावा पांडुरंग लटिकें दावितसे सोंग ॥३॥
तुका ह्मणे पुढें दगा । आला नकळे हे देगा ॥४॥

॥८३२७॥
पुढिलांची नेणे सोय । बळें अपाय जोडित ॥१॥
काय सांगूं ऐशा जना । अवगुणा न सोडी ॥२॥
करोनियां अघोर जप । नसतां पाप संचिती ॥३॥
तुका ह्मणे अप्रमादी । पडे बंदीं यमाच्या ॥४॥

॥८३२८॥
ओंगळ अधमाचे चित्त । पराचा घात करितसे ॥१॥
मुखें बडबडी नर्क । वादि छळीले भाविक ॥२॥
कीर्तनाचा राग । करी मनोदय भंग ॥३॥
तुका ह्मणे पापें । जाती नर्का अकल्पें ॥४॥

॥८३२९॥
साधुनियां अघोर जप । जोडी पाप सांचिलें ॥१॥
छेदी भाविकांचें प्रेम । बोले वर्म दाटोनी ॥२॥
छळोनियां मोडी भक्ति । जना विरक्ति दाविती ॥३॥
तुका ह्मणे नर्का जाती । घात चित्तीं पराचा ॥४॥

॥८३३०॥
सद्गुरुनें सत्य केला अनुग्रह । निरसुनी संदेह भेदबुद्धि ॥१॥
जिवा शिवा सेज रचिली आनंदी । औटाविये पदीं आरोहण ॥२॥
निजीं निजरुपीं निजविला तुका । अनुहात बाळका हालवूं गाती ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : August 01, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP