अभंग - ८२९१ ते ८३००
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥८२९१॥
यावो या चला जावुं सकळा । पाहो हा सोहळा वृंदावनींचा ॥१॥
वाइला गोपाळ वेणुनाद पडे कानीं । धिर नव्हे मनीं चित्त झालें चंचळ ॥२॥
उरलें तें सांडा काम नका करुं गोवी । हेची वेळ ठावी मज कृष्णभेटीची ॥३॥
निवतील डोळे याचे श्रीमुख पाहतां । बोलती तें आतां घरीचें सोसूं वाईट ॥४॥
कृष्णभेटी आड कांहीं नावडे आणीक । लाज तरी लोक मन झाले उदास ॥५॥
येका येकी चालीयेल्या सादावीत सवें ॥ तुका ह्मणे देवें रुपें केल्या तन्मय ॥६॥
॥८२९२॥
मन तारक मन मारक । मन भोगी सुख दु:ख ॥
मन जोडी मनीं हरिख । पवित्र एक हें होय ॥१॥
मन सांची अघोर पाप । मन साधी पुण्य आक्षेप ॥
मन ठेवि सुखरुप । निज रुप दाउनी ॥२॥
मन भेटवी विठ्ठल । असाध्य मन साधील ॥
देखिलें ठायीं हें जाईल । पाखेंविण त्या ठाया ॥३॥
मन पापी करी दीन । भरे सांदीं भोवंडी रान ॥
जाण देवाचें वर्म खूण । वर्ते अन्योन्य सैराट ॥४॥
मन चाले शुद्ध चाली । वैकुंठासी नेउनी घाली ॥
मन वासना चांगली । मन माउली साधकां ॥५॥
मन तपिया करी घात । मना संगें होतीं आघात ॥
बळिया साधनीं अनर्थ । न कळे पदार्थ कोण हे ॥६॥
मन जयवंत राहे तयी । तुका ठेवी विठ्ठलपायीं ॥
मग तया भवभय कैंचें कायी । तया सोयी लागतां ॥७॥
॥८२९३॥
आरक्त परकुट मध्यें स्वेत ग्राम । तया मध्यें शाम गृह एक ॥१॥
त्यामध्यें मसुरेसारिखें राउळ । पहातां तेज निळ झळकतसे ॥२॥
त्याच्यामध्यें आहे पांडुरंग मूर्ति । पहातां श्रीपती वर्णातीत ॥३॥
तुका म्हणे पहा अनुभवें करुनी । बाहेर धांवूनी श्रमूं नका ॥४॥
॥८२९४॥
नामाचें साधन वैकुंठ पावन । तेथें ब्रह्मज्ञान कोण पुसे ॥१॥
धन्य ते दैवाचे विष्णु दास जगीं । जया पांडुरंगी भाव ज्याचा ॥२॥
नामधारकांच्या लोळावें मोरीसी । न जावें घरासी अभक्तांच्या ॥३॥
तुका ह्मणे आह्मा नलगे ब्रह्मज्ञान । आमुचें निधान पांडुरंग ॥४॥
॥८२९५॥
आमुचें हे धन विठ्ठलाचें नाम । चांगलें उत्तम नलगे मोल ॥१॥
कदा हे सरेना न नेती तस्कर । अथवा राजे थोर नेईतना ॥२॥
वार्यानें उडेना न बुडे पाण्यांत । न जळे अद्भुत अग्निमाजी ॥३॥
नव्हे डांकलग कोटी सूर्य प्रभा । त्रिभुवनींचा गाभा देवराव ॥४॥
तुका ह्मणे त्याचें नाम हिरे ज्योती । सदा तुह्मी हातीं घेत जावें ॥५॥
॥८२९६॥
सुखाचिये पेठे घातलें दुकान । मांडियले केणें । हरिनाम ॥१॥
सुखाचें फुकाचें सार सकळांचें । तारक भवसिंधूचें हरिनाम ॥२॥
मागें मागें झाले थोर सावकार । त्याणींच हा फार सांठा केला ॥३॥
तुका ह्मणे हाचि उदीम केला । जोडिलें विठ्ठला जन्मोजन्मीं ॥४॥
॥८२९७॥
नाहीं सरले कारण । पुढें अवतार घेणें ॥१॥
कलियुग हें जाईल । तूंचि कलंकी होशील ॥२॥
अवश्यक दास दासी । युगायुगीं कां पाळिशी ॥३॥
नाहीं आमची गरज । आज्ञा देई आतां मज ॥४॥
तुका ह्मणे आह्मी जाऊं । विठो मागुती न येऊं ॥५॥
॥८२९८॥
रामचंद्र अवतारीं । माझी घेतली चाकरी ॥१॥
साक्ष आहे तुझ्या मना । चुकी पडली वचना ॥२॥
कृष्ण अवतारीं नाहीं । दिलें विचारुनी पाही ॥३॥
देऊं देऊं ह्मणऊन । कांहो चाळवितां जान ॥४॥
तुका ह्मणे बोद्धया देई । बरें आठवी हृदयीं ॥५॥
॥८२९९॥
कलियुगीं देसी जरी । शेष आमची चाकरी ॥१॥
नाहीं तरी बरें नाहीं । कल्पूं नये माझ्या देहीं ॥२॥
अनावर काय असे । देणें तुजलागीं न सोसे ॥३॥
झाली माझी पराकाष्ठा । धिग पापिया अदृष्टा ॥४॥
तुका ह्मणे जगदिशा । सोडवत नाहीं आशा ॥५॥
॥८३००॥
जयावरे नाहीं ऋण । त्याचे घरीं जाय कोण ॥१॥
जेथें लागे तेथें मागे । दारीं धरणीं अनेक ॥२॥
ऋणबुड तो सुतकी । जगीं ह्मणती पातकी ॥३॥
देणें अल्प माझें द्यावें । फार नाहीं कीं ठेवावें ॥४॥
तुका ह्मणे थोरपणा । बट्टा नये नारायणा ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : August 01, 2019
TOP