अभंग - ८३५१ ते ८३६०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥८३५१॥
देव अंतरींचे आहे । प्रेमळासी भेटताहे ॥१॥
तारुं केला गुरुराज । सांडियेली सर्व लाज ॥२॥
गुरुगम्य धरियेलें । असार तें मोकळीलें ॥३॥
तुका ह्मणे भावबळें । तया भेटलें सोंवळें ॥४॥
॥८३५२॥
पायीं प्रीति जया । तेणें त्यजावें विषया ॥१॥
हे सारे देहभाव । मुळींहुनी पुसा ठाव ॥२॥
मी हे वस्तु आहे काय । गुरुमुखें करा सोय ॥३॥
तुका ह्मणे भावें देव । प्राप्त होय सदाशिव ॥४॥
॥८३५३॥
कोणे देशीं जातां कोण पंथ तुमचा । बोलणें ही वाचा एकचि गा ॥१॥
एका वाचेविण दुजें नाहीं काय । कैशी वाचा होय सांग बापा ॥२॥
वाचेचीं अक्षरें किती हो प्रवासी । नेम निश्चयेंसी गुरु पुत्रा ॥३॥
कोणे दिवशीं वाचा फुटली तुह्मासी । कोण ती घटिका नक्षत्र तें ॥४॥
तया दिवसाचें नाम तुह्मी सांगा । सत्य ह्मणती गा तुह्मालागीं ॥५॥
आणिली ती वस्तु कोठें बा ठेविली । किंवा गमाविली सांग बापा ॥६॥
तयाचे कारण लागलें तुजसी । मग कोठें जासी शोधावया ॥७॥
तुका ह्मणे वस्तु आहे किंवा नाहीं । हेंचि लवलाही सांगा आतां ॥८॥
॥८३५४॥
दिवस माझा कांहीं ऐक लवलाही । बोलणेंही कांहीं नाम त्याचें ॥१॥
ॐकार माझा दिवस माया ही घटिका । सोम नक्षत्र देखा साधियेलें ॥२॥
चार शब्द तेचि प्रहर जाण बापा । मोजुनी घेईपां तूंचि आतां ॥३॥
व्यापार माझा सोम घेऊनियां आलों । आनंदें खेळलों शिव फुलें ॥४॥
तुका ह्मणे माझा दिवस हा पूर्ण । घ्यावें उमजून गुरुपुत्रा ॥५॥
(कोण्या कारणासी आलां तुह्मी येथें या अभंगाचे उत्तर)
॥८३५५॥
कारण ही वस्तु पुसलीसे खूण । घेई ओळखून गुरुपुत्रा ॥१॥
बाहेर निघतां ओंकार शब्द झाला । त्यानें ठाव दिला जावयासी ॥२॥
व्यापार माझा सोम घेउनियां आलों । आनंदें खेळलों शिवफुलें ॥३॥
तुका ह्मणे वस्तु घेई पारखूण । आनंदे शरण तुझे पायीं ॥४॥
॥८३५६॥
प्रथम हा जोगी निराकारी आला । भस्म हा लाविला प्रथम त्यानें ॥१॥
होम हा गुरुनें उपदेश दिला । मंत्र शिकविला होम सोम ॥२॥
ऐशिया स्थळासी झाला हा विस्तार । ऐकुनियां घेई गुरुपुत्रा ॥३॥
तुका ह्मणे तुह्मी ऐकुनियां घ्यावें । नाहीं तरी जावें गुरुपाशीं ॥४॥
॥८३५७॥
ऐसें पाहिलें माझिया संचिता । दृढ देखोनी बळिवंता ॥
पळसी पंढरीनाथा । भेणें आतां तयाच्या ॥१॥
तरी मज कळलासी । नव्हता भेटी जाणवेसी ॥
एक वर्म संपादिसी । मान करिसी एकाचा ॥२॥
झालें प्रारब्ध हें गाढें । कांहीं न चले तयापुढें ॥
काय तुज म्यां कोरडें । हें सांकडें घालावें ॥३॥
भोगाधिपती क्रियमाण । तें तुज नाटोपे अजुन ॥
तरी कांहो वांयावीण । तुज म्यां शीण करावा ॥४॥
तुज नव्हतां माझें कांहीं । तरी न संडी भक्ती सोयी ॥
हो कां मज भलते ठायी । कुळ जन्म भलतेसा ॥५॥
तूं भितोसी माझ्या दोषा । कांहीं मागेन हे आशा ॥
तुका ह्मणे मनीं ऐसा । कांही न धरी संकोच ॥६॥
॥८३५८॥
लेंकराची आळी न पुरवी कैसी । काय तयापाशीं उणें झालें ॥१॥
आह्मां लडिवाळां नाहीं तें प्रमाण । कांहीं ब्रह्मज्ञान आत्मस्थिति ॥२॥
वचनाचा घेईन अनुभव पदरी । जें हें जनाचारीं मिरवलें ॥३॥
तुका ह्मणे माझी भोळिवेची आटी । दावीन शेवटीं कौतुक हें ॥४॥
॥८३५९॥
इच्छिती तयांसी व्हावें जी अरुप । आह्मांसी स्वरुपस्थितिचाड ॥१॥
आतां नव्हे माझा भाव अनारिसा । पाउलांनीं इच्छा गोवियेली ॥२॥
लेंकरासी कोठें जाण त्याची परी । करुं येते दुरी धरावया ॥३॥
लागली न सुटे नामाची आवडी । माझी भाव जोडी भंगूं नका ॥४॥
घेसील वेढे मुक्तीच्या अभिळासें । चाळवी जा पिसे ब्रह्मज्ञानी ॥५॥
तुका ह्मणे माझा कोठें भक्तिरस । पाडावया ओस चाळविसी ॥६॥
॥८३६०॥
करुनि राहों जरी आत्माचि प्रमाण । निश्चळ नव्हे मन काय करुं ॥१॥
जेवलियाविण काशाचें ढेंकर । शब्दाचे प्रकार शब्दचि ते ॥२॥
पुरे पुरे आतां तुमचें ब्रह्मज्ञान । आह्मासी चरण न सोडणें ॥३॥
विरोधें विरोध वाढे पुढतो पुढती । वा सनेचे हातीं गर्भवास ॥४॥
सांडी मांडी अंगीं वसे पुण्यपाप । बंधन संकल्प याचि नांवें ॥५॥
तुका ह्मणे नाहीं मुक्तता मोकळी । ऐसा कोण बळी निरसी देह ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : August 01, 2019
TOP