मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|विविध अभंग|
७१५७ ते ७१६०

पाळणे अभंग - ७१५७ ते ७१६०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥७१५७॥
जननिया बालका रे घातलें पाळणा । पंचत्वीं जडियेल्या वारतिया चहुं कोणा ॥
अखंड जडियेल्या तया ढाळ अंगणा । वैखरी धरुनी हातीं भाव दावी खेळणा ॥१॥
निजी रें निजीं आतां । म्हणोनि परिये दे माता ॥ खेळतां कष्टलासी बाळा तूं रे नेणतां ॥
निजी रे निजी आतां ॥२॥
खेळतां बाहेरी रे मुला लोकांच्या सवें । बागुल काळतोंडा नाहीं नेतो ते ठावें ॥
खेळतां दुश्चिता रे देखोनी तें न्यावें । ह्मणोनि सांगें तुज शीघ्र वचन पाळावें ॥३॥
संचित मागें तुज शुद्ध होतें सांगाती । तेणें तुज वांचविले वेरझारिया हातीं ॥
आणीक नेलीं मागें काय जाणों ती कीती । आलासी येथवरी थोरपुण्य़ें बहुती ॥४॥
खेळतां शुक देवा तो रे लागला पाठीं । लपाला वरुषें बारा तिये मातेचे पोटीं ॥
रिघतां बाहेरी रे पळे घेऊनि कासोटी । तेचि परी झाली स्वामी भेणें रिघें कपाटी ॥५॥
खेळतां चक्रवर्ती जनका लागला धाक । पडिला अग्नीमाजी पाव जळत एक ।
भरलासे कांपे अंगीं सुख नाठवे दु:ख । आप पर तें ही नाहीं देहभाव सकळीक ॥६॥
सिबीया चक्रवर्ती कव पडिली अवचितीं । धीट तो न भेतया मास कापिलें हातीं ।
टाकिलें तयावरी खुणें गोविला अंतीं । पावला मायबाप हिरोन घेतला हातीं ॥७॥
बांधलें अजामेळा वेश्यागणिका कैसी । मारिली हाक धाकें कळलें मायबापासी ।
घातली धांव नेटें वेगीं पावला त्यासी । हिरोनि नेलीं दोघें आपणयां तीं पासीं ॥८॥
धरुनी आठवूं रे बाळा राहे निश्चळ । खेळतां दुश्चिता रे नको जाऊं बरळ ।
टोंकताहे तुजलागीं दिवस लेखूनी काळ ॥ मग नेदी आठवूं रे नेत्रीं घालीं पडळ ॥९॥
ऐसीं तीं कृपावंतें बाळा मोहिलें चित्त । सुस्वरें कंठ गाय मधुर आणि संगीत ।
तेणें तेंचि चित्त राहे होऊनियाम निवांत । पावती तुका ह्मणे नाहीं विश्वास ते घात ॥१०॥

॥७१५८॥
उभा अंगणी घननीळा । बाऊ आला बाळा ॥ निज काचे पा उगा जाश्वनीला । रडूं नये गोपाळा ॥
नेईल धरुनीयां तुजला । अकळ तयाची लीळा ॥१॥
जो जो रे निज कृष्णा नेत्र झांकी कान्हा ॥ जोगी आलासे निजांगीं । पार्वती अर्धागीं ॥
दहा भुजांचा तो योगी । ध्यानीं ध्याती योगी । कंठीं भूषणें वाउगीं । सुनिळ अंग जोगी ॥
पंचवदन त्या शशिभागीं । अगम्यलीला अंगीं ॥२॥
दिसे साजिरा सुंदर । मस्तकीं जटाभार ॥ गळां रुंड माळांचे हार । आसन व्याघ्रांबर ॥
गजचर्मीचें परिकर । प्रावर्ण पांघरे ॥ सर्व भूषणें अगोचर । लावण्य मनोहर ॥३॥
व्यक्त चांगला घननीळ । त्रिलोचन भाळ ॥ मस्तकीं गंगा वाहे झुळ झुळ । वाहे निर्मळ जळ ॥
हातीं आयुध त्रिशूळ । शंख घंटा घोळ ॥४॥
वृषभारुढ जो पशुपती । वाजवी डमरु हातीं ॥ मुखीं वर्णितां बहु स्तुती । श्रीरामाची कीर्ति ॥
तुजला भेटवी श्रीपति । नाचे गाये प्रीति ॥ तुका जोडुनियां दो हातीं । करितो विनंती ॥५॥

॥७१५९॥
जो जो जो जो रे मधुसुदना । कृष्णा मनमोहना ॥ यशोदा हालविते पाळणा । निज बा नारायणा ॥
बाळा जोजोरे ॥ध्रु०॥
पाळणा घडविला सोन्याचा । नानाप्रकार गतीचा ॥ वरता जडाव तो रत्नांचा । वर घोंस मोत्यांचा ॥
दुरुनी लखलखितो हिरकणीचा । प्रकाश रविचंद्राचा ॥ बाळ खेळविती देवकीचा । पुत्र वसुदेवाचा ॥
खेळे निधाना जीवना । निज बा नारायणा ॥ बाळा जो जो रे ॥१॥
पाळणा टांगिला अंबरीं । उजेड पृथ्वीवरी ॥ बाळ सोज्वळ भीतरीं । कोमल काया सारी ॥
वरत्या चांदण्या कुसरी । सुंदर प्रकाश मारी ॥ खेळे निधाना जीवना । निज बा नारायणा बाळा जो जो रे ॥२॥
अवघ्या गोपिका मिळोनी । पहाती नयनीं ॥ दुर्लभ कवतुक करोनी । गाती आनंदानें । दोरी पाळण्या बांधोनी ।
हालविती हौसेनें ॥ खेळे निधाना जीवना । निज बा नारायणा ॥ बाळा जो जो रे ॥३॥
काना मनपुरीं बैसला । दहावे दिनीं बिंबला ॥ आठ मातृका फिरला । षड्‍चक्रीं मिळाला ॥
सोळा राज्यें हो बैसला । सत्राविस स्थिर झाला ॥ तुकया सन्यासी बोलिला । अवतारी प्रकटला ॥
गातो तयाचा पाळणा । निज बा नारायणा ॥ बाळा जो जो रे ॥४॥

॥७१६०॥
जो जो रे श्रीरामा । निज बाळा सुखधामा ॥ निद्रा लागूं दे घन:श्यामा । योगी मन विश्रामा ॥
जो जो जो जो रे ॥ध्रु॥
झाला उदय रविवंशा । जन्म तुला परेशा ॥ थोर दैवाची ही दशा । आजी हृषिकेशा ॥ जो जो ०॥१॥
द्वारा याचक मागती । तुजला श्रीपती ॥ उभा अंगणीं पशुपती । वर्णिती श्रीपती
आले विरंची वासव । गण समुदाव ॥ यमधर्म हे वासव । आले सर्व देव ॥ जो जो०॥३॥
शेष वासुकी वाल्मीकि । सुदेव याज्ञवल्कि ॥ वामदेव कपिल उद्दालकी । गौतम भृगु शमी कीं ॥ जो जो०॥४॥
गंगा भागिरथी श्रीकृष्णा । तापी तप्ती यमुना भामा सरस्वती पुष्करणा । करा कावेरी हे पूर्णा ॥ जो जो०॥५॥
पुंडरीक अंबऋषी नारद । जनक प्रल्हाद ॥ सिबी श्री सोम हरिश्चंद्र । आले सर्व ही वृंद ॥ जो जो० ॥६॥
तुका ह्मणे दाता स्तुती । ओळला रघुपती ॥ नामीं जडली हे प्रीति । सर्वासी सुखप्राप्ती ॥ जो जो० ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : June 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP