मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|विविध अभंग|
७०३२ ते ७०५३

रामचरित्र अभंग - ७०३२ ते ७०५३

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥७०३२॥
रामा वनवास । तेणें वसे सर्व देश ॥१॥
केलें नामाचें जतन । समर्थ तो नव्हे भिन्न ॥२॥
वनांतरीं रडे । ऐसे पुराणीं पवाडे ॥३॥
तुका ह्मणे ऋषिनेम । ऐसा कळोनी कां भ्रम ॥४॥

॥७०३३॥
राम ह्मणे ग्रासोग्रासीं । तोचि जेविला उपवासी ॥१॥
धन्यधन्य तें शरीर । तीर्थव्रताचें माहेर ॥२॥
राम ह्मणे करितां धंदा । सुखसमाधि त्या सदा ॥३॥
राम ह्मणे वाट चाली । यज्ञ पाउलापाउली ॥४॥
राम ह्मणे भोगीं त्यागीं । कर्म न लिंपें त्या अंगीं ॥५॥
ऐसा राम जपे नित्य । तुका ह्मणे जीवन्मुक्त ॥६॥

॥७०३४॥
तारी ऐसे जड । उदकावरी जो दगड ॥१॥
तो हा न करी तें कायी । कां रे लीन नव्हां पायीं ॥२॥
सीळा होती मनुष्य झाली । ज्याच्या चरणाचे चाली ॥३॥
वानरां हातीं लंका । घेवविली म्हणे तुका ॥४॥

॥७०३५॥
राम चालले लंकेसी । अहो सीता आणायासी ॥१॥
पुढें समुद्र देखिला । नळराजा बोलविला ॥२॥
शिळासेतू बांधोनी । राम गेले उतरुनी ॥३॥
अहो तुका ह्मणे नळ । भक्त आहे हो प्रेमळ ॥४॥

॥७०३६॥
राम ह्मणतां रामचि होईजे । पदीं बैसोन पदवी घेइजे ॥१॥
ऐसें सुख वचनीं आहे । विश्वासें अनुभव पाहे ॥२॥
रामरसाचिया चवी । आन रस रुचती केवीं ॥३॥
तुका ह्मणे चाखोनी सांगें । मज अनुभव आहे अंगें ॥४॥

॥७०३७॥
रामराम उत्तम अक्षरें । कंठीं धरिलीं आपण शंकरें ॥१॥
कैसी तारक उत्तम तिहीं लोकां । हळाहळ शीतळ केलें शिवा देखा ॥२॥
हाचि मंत्र उपदेश भवानी । तिच्या चुकल्या गर्भादियोनि ॥३॥
जुनाट नागरनीच नवें । तुका ह्मणे म्यां धरिलें जीवें भावें ॥४॥

॥७०३८॥
राम ह्मणतां तरे जाणतां नेणतां । हो का यातिभलता कुळहीन ॥१॥
राम ह्मणतां न लगे आणीक सायास । केले महा दोष तेही जळती ॥२॥
राम ह्मणे तया जवळी नये भूत । कैंचा यमदूत ह्मणतां राम ॥३॥
राम ह्मणतां तरे भवसिंधुपार । चुके वेरझार म्हणतां राम ॥४॥
तुका म्हणे हें सुखाचें साधन । सेवी अमृतपान एका भावें ॥५॥

॥७०३९॥
पैल आला राम रावणासी सांगती । काय निदसुरा निजलासी भूपति ॥१॥
अवघे लंकेमाजी झाले रामाचे दूत । व्यापिलें सर्वत्र बाहेरी भीतरी आंत ॥२॥
अवघे अंगलग तुझें वधियेले वीर । होई शरणागत किंवा युद्धासी सादर ॥३॥
तुका ह्मणे एक्या भावें रामासी भेटी । करुनी घेई आतां संबंधेसी तुटी ॥४॥

॥७०४०॥
समरंगणा आला । रामें रावण देखिला ॥१॥
कैसे भीडतील दोन्ही । नांव सारुनियां रणीं ॥२॥
प्रेमसुखाचें संधान । बाणें निवारिती बाण ॥३॥
तुकयास्वामी रघुनाथ । वर्म जाणोनी केली मात ॥४॥

॥७०४१॥
केला रावणाचा वध । अवघा तोडिला संबंध ॥१॥
लंकाराज्य बिभीषणा । केली चिरकाळ स्थापना ॥२॥
औदार्याची सीमा । काय वर्णू रघुरामा ॥३॥
तुका म्हणे माझा दाता । रामें सोडविली सीता ॥४॥

॥७०४२॥
रामरुप केली । रामें कौसल्या माउली ॥१॥
राम राहिला मानसीं । ध्यानीं चिंतनीं जयासी ॥
राम होय त्यासी । संदेह नाहीं हा भरंवसा ॥२॥
अयोध्येचे लोक । राम झाले सकळीक ॥३॥
स्मरतां जानकी । रामरुप झाले कपि ॥४॥
रावणेंसि लंका । राम आपण झाला देखा ॥५॥
ऐसा नित्य राम ध्याय । तुका वंदी त्याचे पाय ॥६॥

॥७०४३॥
आनंदले लोक नरनारी परिवार । शंखभेरीतुरें वाद्यांचे गजर ॥१॥
आनंद झाला अयोध्येसी आले रघुनाथ । अवघा जयजयकार आळंगिला भरत ॥२॥
करिती अक्षवाणें ओंवाळिती रघुवीरा । लक्ष्मीसहित लक्ष्मण दुसरा ॥३॥
झालें रामराज्य आनंदलीं सकळें । तुका म्हणे गाईवत्सें नरनारीबाळें ॥४॥

॥७०४४॥
झालें रामराज्य काय उणें आह्मांसी । धरणी धरी पीक गाई वोळल्या ह्मैसी ॥१॥
राम वेळोवेळां आह्मी गाऊं ओवियें । दळितां कांडितां जेवितां गे बाइये ॥२॥
स्वप्नींही दु:ख कोणी न देखे डोळां । नामाच्या गजरें भय सुटलें काळा ॥३॥
तुका ह्मणे रामें सुख दिलें आपुलें । तयां गर्भवासीं येणें जाणें खुंटलें ॥४॥

॥७०४५॥
अहल्या जेणें तारिली रामें । गणिका परलोका नेली नामें ॥१॥
रामहरे रघुराजहरे । रामहरे महाराजहरे ॥२॥
कंठ शीतळ जपतां शूळपाणी । राम जपतां अविनाश भवानी ॥३॥
तारक मंत्र श्रवण काशी । नाम जपतां वाल्मीक ऋषि ॥४॥
नामजप बीजमंत्र नळा । सिंधु तरती ज्याच्या प्रतापें शिळा ॥५॥
नामजप जीवन मुनिजना । तुकयास्वामी रघुनंदना ॥६॥

॥७०४६॥
मी तो अल्पमतिहीन । काय वर्णू तुझे गुण ॥
उदकीं तारिले पाषाण । हें महिमान नामाचें ॥१॥
नाम चांगलें चांगलें । माझे कंठीं राहो भलें ॥
कपिकुळ उद्धरिलें । मुक्त केले राक्षसां ॥२॥
द्रोणागिरि कपि हातीं । आणविला सीतापति ॥
थोर केली ख्याती । भरतभेटीसमयी ॥३॥
शिळा होती मनुष्य झाली । थोर कीर्ति वाखाणिली ॥
लंका दहन केली । हनुमंतें काशानें ॥४॥
राम जानकीजीवन । योगियांचे निजध्यान ॥
राम राजीवलोचन । तुका चरण वंदितो ॥५॥

॥७०४७॥
साही शास्त्रां अतिदुरी । तो परमात्मा श्रीहरि ॥
तो दशरथाचे घरीं । क्रीडतो राम ॥१॥
शिवाचें निजध्येय । वाल्मीकाचें निजगुह्य ॥
तो भिल्लटीचीं फळें खाय । श्रीराम तो ॥२॥
योगियांचे मनीं । नातुडे चिंतनीं ॥
तो वानरांचे कानीं । गोष्टी सांगे ॥३॥
चरणें शिळा उद्धरी । नामें गणिका तारी ॥
तो कोळिया घरीं । पाहुणा राम ॥४॥
क्षण एक सुरवरा । नातुडे नमस्कारा ॥
तो रिसा आणि वानरा । क्षेम दे राम ॥५॥
राम सांवळा सगुण । राम योगियांचें ध्यान ॥
राम राजीवलोचन । तुका चरण वंदितो ॥६॥

॥७०४८॥
सीतावल्लभाच्या गुणा । कोण करील गणना ॥१॥
शीववरद रावण । ऐश्वर्य ज्याचें पूर्ण ॥२॥
रावणासी निवटुनी । सीता आणिली सोडुनी ॥३॥
बिभीषण लंकापती । केला बंधुसमप्रीति ॥४॥
तुका ह्मणे दयावंत । राम दशरथसुत ॥५॥

॥७०४९॥
जैसा राम दयावंत । ऐसा नाहीं त्रैलोक्यांत ॥१॥
अपराध कागऋषी । तेणें छळिलें सीतेसी ॥२॥
दर्भ हिरवा लागे पाठीं । झाला काग तो हिंपुटी ॥३॥
झाला हरीसी शरण । रामें दिलें वरदान ॥४॥
तुका ह्मणे माझा राम । पतीताचे हरी श्रम ॥५॥

॥७०५०॥
श्रमहारक श्रीराम । भक्त काम कल्पद्रुम ॥१॥
ज्याचें नाम तिहीं लोकीं । वंदियेलें तिहीं लोकीं ॥२॥
पूर्ण महिमा नामाचा । अंत पुरे न वेदाचा ॥३॥
तुका म्हणे नाम थोर । वेदशास्त्रांचे जिव्हार ॥४॥

॥७०५१॥
रामचंद्रा दयाळुवा । रावणारी सीताधवा ॥१॥
रामचंद्र भक्तसखा । अनाथांचा पाठीराखा ॥२॥
रामचंद्र पांडुरंग । आदिअनादि श्रीरंग ॥३॥
रामचंद्र जीवप्राण । भक्ता प्रेमळाचा जाण ॥४॥
रामचंद्र आदि अंतीं । तुका म्हणे सर्व भूतीं ॥५॥

॥७०५२॥
रामचंद्र आराधन । ज्याचे वंशीं तोचि धन्य ॥१॥
रामचंद्र जया मुखीं । तोचि होय सर्व सुखी ॥२॥
रामचंद्र जनीं वनीं । पाहे तोचि महामुनी ॥३॥
रामचंद्रीं नाहीं मन । तुका म्हणे तो पाषाण ॥४॥

॥७०५३॥
अणुमाजी राम रेणुमाजी राम ॥
तृणकाष्ठीं राम वर्ततसे ॥१॥
ब्रम्हाविष्णुरुद्र राममूर्ती ध्याती ॥
अखंड तपती राम राम ॥२॥
बाहेर भितरीं सर्व निरंतरीं ॥
विश्वीं विश्वाकारीं व्याप्य राम ॥३॥
रामाविण स्थळ रितें कोठें नाहीं ॥
वर्ततसे ठायीं बाप माझा ॥४॥
परिसा भागवत कायावाचामनीं ॥
श्रीरामावांचोनी तुका नेणे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : June 09, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP