भेटोनि व्यास म्हणे पौत्रांसि, ‘ तुम्हा सुखाब्धिमज्जन हो;
तुमच्या सत्कीर्तीनें बहु लज्जित अन्य कीर्तिमज्जन हो. ॥१॥
ऐका सुकथा, कोणी ऋषिकन्या तप करूनि अत्यर्थ,
शंभुप्रति आराधी बहुकाळ तपोवनांत पत्यर्थ. ॥२॥
दर्शन देउनि हर ‘ वर माग ’ असें वचन तो अगाध वदे.
तो पांचदा म्हणे, ‘ मज देवा ! वरदेश्वरा ! अगा ! धव दे. ’ ॥३॥
शंभु म्हणे, ‘ पांच दिले; त्यांची जन्मांतरांत नवरी हो. ’
ती प्रार्थूनि, म्हणे ‘ हें काय ? सती बहुवरांसि न वरी हो ! ’ ॥४॥
देव म्हणे, ‘ तूं पति दे ऐसें वदलीस पांचदा साचें,
करणें लागे प्रार्थित मज टाकुनि पेंचपांच दासाचें. ’ ॥५॥
वर दे वरदेश जिला, झाली ती द्रुपदकन्यका, नातें
य्तें तुम्हांकडे हें, जवूं द्यावें न अन्य कानातें. ॥६॥
द्रुपदपुरीं च रहा, जा, तेथ तुम्हांला वरील नवरी ती;
तोंवरि हे चि असों द्या, बुध हो ! दावूं नका चि नव रीती. ॥७॥
पृषतकुळनंदनींच्या व्हाल वरुनि त्या सभाग्य वल्लीला
बहु लाजतील तुमच्या लीलेला सर्वभाग्यवल्लीला. ’ ॥८॥
मुनि गेल्यावरि चिंतिति त्या, सेवी यत्पदांबुजा मा ते,
मग तेथूनि निघाले, व्हाया पांचालराज - जामाते. ॥९॥
मार्गासि अहोरात्र क्रमितां रात्रौ धरूनि कोलीत,
चाले धनंजय पुढें स्व - पथींच्या धनतमासि सोलीत. ॥१०॥
त्या उल्मुकें, कुठारें घनवनसें, निबिड तिमिर भंगे तें;
आले जों ते पांडव रात्रौ मार्ग क्रमूनि गंगेतें, ॥११॥
कोपे गंधर्वांचा राजा अंगारपर्ण पाहूनीं,
दापूनि म्हणे, ‘ वांचा मागें परतोनि, दूर राहूनीं. ॥१२॥
इच्छित असाल व्हाया जरि खगपतिगृहविलेशयासम या.
नाहीं लंघीत कधीं, जे मुनिवर, ते हि लेश या समया. ॥१३॥
गंधर्व - यक्ष - राक्षस - भाग निशा, नर - विभाग दिन, याला
वेदप्रमाण, रक्षिति बुध मर्यादा धरूनि विनयाला. ॥१४॥
गंधर्वराज मीं, या करिति क्रीडा जळांत मज्जाया,
वालिश हो ! येतां कां प्राणव्यसनाब्धिमाजि मज्जाया ? ’ ॥१५॥
जिष्णु म्हणे, “ रे ! मंदा ! गंगास्नानासि नियम काळाचा ?
कोण करील स्वांबाभिगमीं उत्साहभंग बाळाचा ? ॥१६॥
‘ रात्रौ थान न प्यावें, प्यावें, दिवसा चि, ’ जो असें वदता
त्यालागि पशुत्वाची साची साजे सुधीमतें पदता. ॥१७॥
हो दूर मार्ग सोडुनि रविचा तम होतसे जसें दूर.
गृध्र नव्हेचि अरुणाख, आनखशिख विखरितां हि सेंदूर. ” ॥१८॥
गंधर्वराज कोपे, सोडी शर, जे शिस्त्री च तिखटपणें.
दाविति तें, जें भेकीं दाखविति श्रुधित उग्रविख टपणें. ॥१९॥
खंडि शरासि अर्जुन लीळेनें फिरउनी अलातातें,
धरि मोहुनि अग्न्यस्त्रें; नकुळ ह्मणे, ‘ जिंकिला भला तातें. ’ ॥२०॥
केशीं धरुनि त्यातें ओढुनि धर्मासमीप जों आणी
पत्यभयार्थ प्रार्थी जोडूनि कुंभीनसी सती पाणी. ॥२१॥
धर्म म्हणे, “ हे याची मज म्हणत्ये नमुनि बायको, ‘ पावें,
सोडीं, ’ सिंहें शशकीं, मशकीं गरुडें हि काय कोपावें ? ” ॥२२॥
जिष्णु म्हणे, ‘ गंधर्वा ! देतो तुज अभय आर्य, जा वांचें.
न सुरा त्वदायु, न सरे जेंवि विवाहांत कार्य जावांचें. ’ ॥२३॥
गंधर्व म्हणे, ‘ त्यजिलें म्यां निज अंगारपर्ण हें नाम.
चित्ररथ म्हणा, मज तूं मान्य तसा, जेंवि भार्गवा राम. ॥२४॥
मीं चाक्षुषी स्व - विद्या देतों, घ्या दिव्य पांचशत वाजी;
श्रीपद्म हो ! तुम्हीं निजसख्यरसीं हा द्विरेफ तरवा ! जी. ॥२५॥
घेउनि फळाद्युपायन हर्षवितो तात पदनतापत्या,
तैसें करीं, म्हणो, ‘ हूं ’ मात्र तुझें दानि वदन, तापल्या ! ’ ॥२६॥
जिष्णु म्हणे, “ सख्य असो, माझें मज ‘ हूं ’ म्हणों न दे शील;
अस्त्रविनिमयें घेऊम विद्या, जरि ‘ हूं ’ म्हणोन देशील. ॥२७॥
पुसतों तें हि वद खरें आम्हीं कवणा गुणें उने गमलों ?
धर्षण कां त्वां केलें ? धर्मपथीं तों न लेश हि भ्रमलों. ॥२८॥
भारत पौरव कौरव आम्हीं, तापत्य, वद, कएस ? वदतां
उच्चारिलें सख्या ! हें ‘ तापत्य ’ असें नवेंचि कीं पद तां. ” ॥२९॥
चित्ररथ म्हणे, “ आश्रमरहित अहां, एक हें तुम्हांत उणें,
आणि पुरोहित हि नसे, धर्षण केलें कळोनि या चि गुणें. ॥३०॥
असतें पुरोहितकवच, लागों देतें न हा उपद्रव तें,
ब्राह्माहिमें घन, अल्पें अहितोष्णें क्षात्र हें तुप द्रवतें. ॥३१॥
वाढो भुजसागरजळबळ, तुमचें वांछिलें पुरो, हित हो;
शक्रें बृहस्पति तस,अ विजयार्थ्बरा वरा पुरोहित, हो ! ॥३२॥
वदलों ‘ तापत्य ’ असें तें सत्य चि, तत्कथा तुम्हीं परिसा.
तुमचा पूर्वज होता संवरण महायशा बळी हरिसा. ॥३३॥
साधुमतिमक्षिकांला झाली स्थिति शुद्ध शर्करा ज्याची,
भक्ति सदा वाखाणी निजभक्तजनांत अर्क राज्याची. ॥३४॥
अनुरूप वर मिळावा, या कामें तीव्र जी करी तप, ती
अर्क म्हणे, ‘ संवरणा द्याया स्वसुता असे बरी तपती. ’ ॥३५॥
मृगयेसि एकदा तो जाय मृगानुसरणें, चुके कटका,
अश्व हि मरे गिरिवनीं, हिंडे मार्ग भ्रमोनि एकटका. ॥३६॥
त्या समयीं एकांतीं दर्शन दे त्या नृपासि ती तपती,
यत्सख्यार्थ सुरसुता स्वांबशिवातें उपासिती, तपती. ॥३७॥
भूप म्हणे, ‘ जन्मुनि जें कुळ केलें धन्य, सांग सुंदरि ! तें.
मत्कर्णांनीं केलें वृत्तरस भरावया स्वतुंद रितें. ॥३८॥
त्वन्माता जी, साजे रत्नाकर बंधु, आयताक्षि ! तिला.
स्वर्गशताधिक महिमा आला आतां चि आयता क्षितिला. ॥३९॥
नयनद्वय, भूरितृषा, त्वद्वपु पीयूषवर्षि सुतनो ! हें.
हळहळतों बहु, कीं, मीं दशशतदृक् कश्यपर्षिसुत नोहें. ’ ॥४०॥
विनवी असें, परि न ती उत्तर दे भानुजा, अदर्शन दे.
तो समय जसा त्याला, ताप चकोरासि तेंवि दर्श न दे. ॥४१॥
संवरणीं होय तिचा, सीतेचा विरह तो जसा रामीं.
सांगों काय बहु ? असो; कथितों तुज ती कथा चि सारा मीं. ॥४२॥
नृप मूर्छित पडतां, ती भेटोनि म्हणे, “ अहो ! पहा हे मीं;
कोण कुशळ जन मनिला न म्हणेल ‘ जडोनियां रहा हेमीं. ’ ॥४३॥
मीं तपनसुता तपती, विनवा माझ्या मदर्थ जनकास.
तरती मनोरथातें निजधर्माची धरूनि जन कास. ॥४४॥
धर्मेंकरूनि भजतां होताहे विषलता हि सोम - लता;
त्यजितां धर्मपथातें धरित्ये पीयूष - वल्लि सोमलता. ” ॥४५॥
‘ गांधर्वें मजला भज ’ ऐसें विनवी नृपाळ, परि तपती
पितृसंकोचें गेली; पडला तीचा विलाप करित पती. ॥४६॥
शोधीत सचिव आला, झाला कश्मळ समस्त हरिता तें.
करुणा करी तयावरि, जेंवि करावी स्वसू नुवरि तातें. ॥४७॥
सचिव म्हणे, ‘ रविला चि प्रार्थीं, दुसरा उपाय न करावा. ’
करितां तसें चि भेटे आपव, सरतां चि दिवस अकरावा. ॥४८॥
ज्याचें तेज न तापद, ज्या लोपविलें नसे चि चरमागें,
तो अपर अद्भुत अपन, नरपतिस म्हणे, ‘ अभीष्ट वर मागें. ’ ॥४९॥
भेटोनि जेधवां त्या अभयवरातें मुनींद्र आपव दे,
यापरि संवरण तया प्रभुला कळवूनि आत्मताप वदे :- ॥५०॥
‘ आंगें चि वारिला त्वां प्रणतार्तांचा न ताप वारविला;
यास्तव मदर्थ कन्यारत्नातें माग आपवा ! रविला. ’ ॥५१॥
कार्यार्थ व्योम - पथें गेला हो ! तो रविप्रतिम हर्षी.
श्रीमान् वसिष्ठ भेटे, दुसरा रविसा रविप्रति महर्षी. ॥५२॥
सूर्य म्हणे, ‘ वद तुज जें व्हावें, देतों असंशय मुने ! तें.
म्यां सन्मतितें पुरवुनि आळ सुखविलें, तसें न यमुनेतें. ’ ॥५३॥
मुनितिलक म्हणे, ‘ झाली पावुनि धात्री अनामया ज्यातें,
तपती मागों आलों मीं त्या संवरणनाम याज्यातें. ’ ॥५४॥
रवि आणवूनि हर्षें मुनिहस्तीं दे तदैव तनयेतें.
नित्याराधि जें कां कामा वर देत दैवत न ये तें ? ॥५५॥
गुरुनें दिली जसी ती सद्विद्या कीं सदोषधी रमणी;
तीणें सुखमय केला, जो होता तो सदोष धीरमणी. ॥५६॥
पावोनि निवे तीतें तो नृप रोगी जसा नवसुधेतें.
भुलला तिला चि राजा, द्वादश वर्षें भजे न वसुधेतें. ॥५७॥
तपतीस पुत्र झाला कुरु, तद्वंशीं तुम्हीं म्हणोनि असें
तापत्यनाम, ‘ पौरव ’ ‘ कौरव ’ इत्यादि वंशनाम जसें. ” ॥५८॥
जिष्णु वसिष्ठमुनीचा महिमा गंधर्वपतिमुखें परिसे,
ज्याचे वर्णन - वर्ण त्रास - द दुरितासि, करि - कुळा हरिसे. ॥५९॥