मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|आर्याभारत|आदिपर्व|
अध्याय दहावा

आदिपर्व - अध्याय दहावा

मोरेश्वर रामजी पराडकर (१७२९–१७९४), हे महाराष्ट्रात मोरोपंत अथवा मयूर पंडित नावाने ओळखले जातात.


कच सिद्ध होय जों, तों शुक्रसुता त्या मनोहरा, उचिता,
स्वकरग्रहार्थ विनवी; बहु आवडली सुविद्यता शुचिता. ॥१॥
जें गुरुचें, तेंचि तिसीं, पूज्यत्वाचें धरूनि कच नातें,
ठेवूनि दृष्टि धर्मीं, तो न तिच्या मान्य होय वचनातें. ॥२॥
पडतां गळां, म्हणे कच, ‘ भगिनीला वरुनियां न भाउ तरे.
करितां अधर्म, सद्यः स्वपितृसुहृज्जनमुखप्रभा उत्तरे. ॥३॥
सुख व्हावें, तरि धर्माप्रति ‘ म्हण माथां वसें, नसें दूर;
पूजा कैंची लोकीं ? जरि दगड शिरीं धरी न सेंदूर. ॥४॥
धर्म अनंत असो, परि तो करितां कीर्तन स्वसे ! वेचे;
सांग प्रकार याहुनि दुसरे कांहीं मज स्वसेवेचे. ॥५॥
ज्या उदरीं वास तुझा, तेथें माझाहि, हें असें नातें.
केंवि करग्रहण करूं ? संमत धर्मासि जें असेना तें. ’ ॥६॥
बहु दिवसांची आशा तत्काळ च्छेदितां कचें, रुष्टा
शुक्रसुता त्यासि म्हणे, ‘ रे कपटपटो ! भला भला दुष्टा ! ॥७॥
ऐक कृतघ्ना ! जरि मीं, ‘ उठवाचि मदर्थ या हता ’ शतदा
ऐसें गुरुसि न म्हणत्यें, कैसा उठतासि तूं हताश ! तदा ? ॥८॥
मलिन, कुटिल, नीरस, जड, अजड, पुनर्भवपणेंहि कचसाच;
धरिला शिरींहि न स्वप्रकृतिगुण त्यजिसि; नाम कच साच. ॥९॥
न करी विफळ मदाशा; आशा भंगूं नयेचि साधूनीं;
जरि भंगिसीच, विद्यासिद्धि नसो, जीस नेसि साधूनीं. ’ ॥१०॥
कचहि म्हणे, ‘ गुरुवेदानुज्ञा नाहीं; म्हणोनि या कर्मा
मान्य नसें मीं; शापीं; कीर्तिकरचि शाप, न चुकतां धर्मा. ॥११॥
पढवीन ज्यासि विद्या, ही त्यासि फळेल; तूंहि घे शाप;
परि कोण्हीहि ऋषिसुत न वरिल तुज; फळो तुझें तुला पाप. ’ ॥१२॥
जातां स्वर्गीं मिरविति निजगुरुसुतरत्न देव यानीं तें.
वर्णिति किति दैत्यांतें, किति कवितें, कितिक देवयानीतें. ॥१३॥
विद्यालाभमुदितसुर हरिसि म्हणति, ‘ विक्रमासि यासम, या.
पूर्वीं, न पावलोंचि; प्रभुजी ! टाळूं नकाचि या समया. ॥१४॥
आम्हां न दिसेचि दुजा सुखदायक शत्रुनाशसम यज्ञ.
समयीं पराक्रमातें करिति शुभयशोधनाश, समयज्ञ. ॥१५॥
‘ वृषपर्वतडागाचा होऊं नेदी विनाश कविरोध.
पाडावा यांत यशःसंपज्जीवनविनाशक विरोध. ’ ॥१६॥
करुनि विचार असा हरि जेथें वृषपर्वदैत्यपतिराज्य,
त्या देशीं जाय, म्हणे, ‘ जरि मिलतें रंध्न लघुहि, तें प्राज्य. ’ ॥१७॥
तों रम्यवनीं शक्रें जलकेलिरता, सखीयुता, धन्या
अवलोकिल्या, कविसुता एक, दुजी सर्वदैत्यपतिकन्या. ॥१८॥
विप्रासुरवरकन्या पाहुनि, हर्षें मनीं ह्मणे बळहा,
‘ भगवंत पावला; या दोघींत प्रथम लावितों कलहा. ’ ॥१९॥
उदकीं क्रीडत होत्या; त्यांचीं वस्त्रें सरस्तटीं होतीं.
मारुतरूपें शक्रें मिश्रित केलीं परस्परें हो ! तीं. ॥२०॥
राजसुता शर्मिष्ठा जळकेलि करूनियां तटीं आली.
होती जळाशयींच श्रीमत्कविकन्यका तिची आली. ॥२१॥
शर्मिष्ठा कविजांबर नेसे झडकरि; कळों न वासव दे.
तों तीस देवयानी, ओढुनि तत्परिहितात्मवास, वदे :- ॥२२॥
‘ असुरसुते ! मच्छिष्या होउनि, मद्वस्त्र नेससी कां ? गे !
बहु मातलीस ऐसें मज समुदाचारलोप हा सांगे. ’ ॥२३॥
‘ मर्यादा पाळावी, निजशिव गुरुचेचि पाय, रीतीतें
सोडू नये, ’ म्हणति कवि, ‘ साधुपदाचीच पायरी, तीतें. ’ ॥२४॥
शर्मिष्ठा तीस म्हणे, ‘ बैसावें जैं सभेंत मत्तातें,
त्वत्तातें व्हावें तैं बंदी; तूं विसरलीस मत्ता तें. ॥२५॥
सिंहासनीं विराजे मद्गुरु, न सहस्रकरहि, परि सविता;
बैसे खालें त्वद्गुरु कवि, कविता करुनि, त्यासि परिसविता. ॥२६॥
तूं तों कन्या, जो स्तुतिकर, याचक, दान घे सदा, त्याची;
मी कन्या स्तव्याची, भव्याची, सर्वसेव्यदात्याची. ’ ॥२७॥
माझी न पाविजे त्वां, मत्ताताची तुझ्या न सरि तातें;
जें जन्हुकन्यकेचें भाग्य न पावेल अल्पसरिता तें. ॥२८॥
होती महेंद्रनयनें, पाहुनि राजेश्वरा जया, चकितें,
मत्तातभाग्य कैंचें त्वत्ताता भिक्षुकासि, याचकि ! तें ? ॥२९॥
मत्ताताची जी श्री, कीर्ति, कवीला नयेचि भिक्षुकि ! ती.
अमृतरसासीं व्हाया सम माधुर्यें समर्थ इक्षु किती ? ॥३०॥
राजसुतेचें यश जें, तुज येइल काय गे ! दरिद्रे ! तें ?
पाहसि विकावया तूं केसरमूल्यें कसें हरिद्रेतें ? ’ ॥३१॥
निर्भर्त्सना करी बहु; संपादी द्वेष, पाप; गाढ कली
करुनि, कविजेसि कूपीं ती कोपाची महापगा ढकली. ॥३२॥
मेलीच असें मानुनि, शर्मिष्ठा आपुल्या घरा गेली.
कूपीं कविजा होती, जैसी नागी मनांत रागेली; ॥३३॥
तों मृगयाश्रांत, तृषित, तोयार्थ, ययाति तेथ एकाकी
आला, शर्मिष्ठा ज्या कूपीं त्या देवयानिला टाकी. ॥३४॥
कूपीं पाहे सहसा सत्कन्यारत्न तो ययाती तें.
‘ कोणाची कोण ? ’ असें मंजु पुसे, करुनियां दया, तीतें. ॥३५॥
सांगे ‘ तज्जा मीं, ‘ कवि ’ म्हणति द्विजनायका, ययाते ! ज्या. ’
नरवर म्हणे, ‘ प्रसवला तो भगवान् काव्य काय या तेज्या ? ’ ॥३६॥
कविजा म्हणे, ‘ नरेंद्रा ! स्वतपें, तुझिया यशेंहि, तुज जाणें;
मज दक्षकर धरुनियां वर घेउनि, करुनि धन्य भुज, जाणें. ’ ॥३७॥
क्षुधितापुढें सुधेची पात्री दैवेंचि वाढिली; वरिती
झाली मनें; गुरुभुजें दक्षिणकर धरुनि, काढिली वरिती. ॥३८॥
भूप म्हणे, ‘ धिक् ! चित्ता ‘ क्षत्रा विप्रात्मजा न सेव्या ही. ’
तीहि म्हणे, ‘ नहुषेतर कविला ’ चित्ता ‘ जनीं नसे व्याही. ’ ॥३९॥
नृप गेला; मग आली शोधाया घूर्णिका तिला, ‘ हां गे !
जा, सांग पित्याला, म्यां त्यजिलें वृषपर्वपुर ’ असें सांगे. ॥४०॥
वृत्त कथुनि कविसि म्हणे ती,‘ निष्ठुरता पहा निरोपाची.
छाया कराचि; न करो अतिनिष्ठुर ताप हानि रोपाची. ’ ॥४१॥
भेटोनि, तितिक्षेचे गुण सांगे साधु बाप तनयेतें;
कीं कोपाच्या संगें स्वविभागा सर्वथा पतन येतें. ’ ॥४२॥
शर्मिष्ठोक्ति पित्यातें कथुनि, म्हणे, ‘ तूं असाचि अससील;
सोसुनि अपमान सुखें, वाटे या दुर्जनांत वससील. ’ ॥४३॥
शुक्र म्हणे, ‘ विधि वदला मजला ‘ तूं विश्ववृष्टिपति ’ तनये !
स्वमुखें काय वदों ? मज पाहों तो शरण केंवि पतित न ये. ॥४४॥
अज्ञ मुलें कलह करिति; न वदावें तेंचि बोलति स्वैर;
तें चित्तांत धरूनि, प्राज्ञें पुरुषें करू नये वैर. ’ ॥४५॥
सुरयानी गुरुसि म्हणे, ‘ वा ! नेणति थोर थोर कवि ज्यातें,
धर्माचें तत्व बरें जाणतसे हे सुबुद्धि कविजा तें. ॥४६॥
धर्माधर्मबळाबळवार्ता तों दुर्लभाचि अन्या या;
कन्या या पायांची जाणे न्याया, तथैव अन्याया. ॥४७॥
त्यांत पळहि न वसावें, ज्यांत दुरितभीति, धर्म, नय, नाहीं.
तृणचरमुखें सुखें अवलोकावीं, खळमुखें न नयनाहीं. ॥४८॥
दुरजनसहवास सदा तापद; हा काय नरक सामान्य ?
होईल यासि दाटुनि मानधन प्राज्ञनर कसा मान्य ? ’ ॥४९॥
वृषपर्व्यासि म्हणे कवि, ‘ मीं विप्रचि कीं अविप्र ? मत्तनया
पीडावी ? हरिसि हसति वाटे सोडुनि अवि प्रमत्त नया. ॥५०॥
त्यजितों तुला, अतिक्रम साहे ऐस अनव्हें पुरोधा मीं.
वृत्यर्थ तापसा मज शाक पुरो, वा न वा पुरो, धामीं. ’ ॥५१॥
असुरपति म्हणे, ‘ स्वामी ! नमितों मीं सर्वथैव अपराधी.
पहिली एकाचि असो या दासाजनीं, नसोचि अपरा धी. ॥५२॥
जरि सिंधु जीवनाचीं, क्षणहि न दे, करुनियां दया दानें,
तरि वांचावें कैसें ? रक्षावें बा ! स्वयाद यादानें ? ॥५३॥
त्यजितां मरेल हा जन; न प्रभुवर लाविला मळा सुकवी.
स्वयशासि सकृप - अकृपत्वाच्या लागों न दे मळा सु - कवी. ’ ॥५४॥
काव्य म्हणे, ‘ मीं जातों; व्यसनांत तुम्हीं तरा, बुडा, लोल,
आतां सुर येतील; क्षिप्र पळा हो ! मला नसे बोल. ॥५५॥
तुमचें प्रिय, कन्येचें अप्रिय, मज हा न दोष करवेल.
लावाल शत सुरांचे, अजिरीं, परि ते न तोषकर वेल. ॥५६॥
वृषपर्वा नमुनि म्हणे, ‘ श्रीचा, माझाहि नाथ तूं, देवा !
हो सुप्रसन्न; आम्हां दासांपासूनि घे सदा सेवा. ’ ॥५७॥
शुक्र म्हणे, ‘ जरि म्हणसि, स्वश्रीचा, आपुलाहि नाथ मला,
तरि, कन्याचि मदात्मा, प्रार्थूनि करा प्रसन्न जो श्रमला. ’ ॥५८॥
राजा म्हणे, ‘ बहु बरें ’; मग सुरयानीकडे तयासहित
जाय कवि; तदुक्त कथी, जें तीस, तया कृताश्रयास, हित. ॥५९॥
परिसुनि तातोक्त म्हणे, ‘ म्हणतो तुज ‘ आत्मवित्तनाथ ’ मुखें;
राजा मज ‘ माग ’ म्हणो; मग मीं मागेन इष्टकाम सुखें. ’ ॥६०॥
राजा म्हणे, ‘ गुरुसुते ! देतों, जें मागसील तें नमुनी.
आम्हां तूं तसि पूज्या, पूज्य, जसा हा तपोनिधान मुनी. ’ ॥६१॥
कविदुहिता त्यासि म्हणे, ‘ दशशतकन्यायुता तुझी तनया
शर्मिष्ठा मद्दासी व्हावी; कामासि इच्छितें मन या. ॥६२॥
यावें मजसह मत्पतिसदनासि, त्यजुनि भाउ, दासीनें.
दास्य करावें भावें, न असावें मानसें उदासीनें. ॥६३॥
राजा धात्रीस म्हणे, ‘ हेंचि शिव; तुझीच आण; जागे हा
श्रीगुरु अस्मत्राणीं; कन्येला शीघ्र आण; जा गेहा. ’ ॥६४॥
धात्रीनें समजावुनि जावुनि कथितांचि पितृमुखाज्ञा, ती
शिबिकेंत वसोनि निघे, कीं पात्र असोत जयसुखा ज्ञाती. ॥६५॥
गुरुतनयेसि म्हणे, ‘ तुज देयील तुझा जयासि बा, धामीं
त्याच्याहि तुझी दासी येत्यें, न गणूनि दास्यबाधा, मीं. ’ ॥६६॥
स्मित करुनि, देवयानी, राजवधूगल्ल व्हावया ओले,
टोले शर्मिष्ठेच्या माथां हाणावया, असें बोले :- ॥६७॥
‘ मज्जनक तव पित्याचा बंदी; स्थिति रीति हे असी; गाई
घेतो याचक; माझी दासी होसील तूं कसी ? गाई ! ’ ॥६८॥
शर्मिष्ठा उत्तर दे, ‘ जी बहु आग्रह करील, अज्ञा ती.
कुळजेनें व्यसनकरीं प्राणहि द्यावे, परंतु न ज्ञाती. ’ ॥६९॥
सुरयानी गुरुसि म्हणे, ‘ विद्यातेजें, विवेकविज्ञानें,
बापा ! सत्य निवाल्यें निववूनि जना, निवे कवि, ज्ञानें. ॥७०॥
चाला, आला चित्ता आतां मुनिनायका ! पुरा वास.
वास तुझ्याचि यशाचा मधुर; असा काय कापुरा वास ? ॥७१॥
जाय पुरीं, उत्सव दे मुनि शिष्यां; जेंवि अर्क राजीवां.
वांटी मधुरा आशी कवि वृषपर्वाहि शर्करा जीवां. ॥७२॥
त्यावरि, एका समयीं त्याच वनीं शुक्रकन्यका गेली,
संगीं सहस्र दासी, शर्मिष्ठा; काननीम करी केली. ॥७३॥
तेथें मृगानुसारी आला राजा ययातिहि तसाच;
पूर्वीं जेणें केलें कूपोद्धारेंकरूनि हित साच. ॥७४॥
दासीसहस्रमध्यस्थित कन्याद्वय विलोकुनीं रुचिर,
नरपति निववी नयनें तल्लावण्यामृतह्रदीं सुचिर. ॥७५॥
पुसतां नृपें, हराया निजमधुरोक्तें तदीय खेदासी,
सांगे ‘ मीं शुक्रसुता; माझी असुरेंद्रजाहि हे दासी. ’ ॥७६॥
‘ राजसुता त्वद्दासी हें कैसें ? ’ नृप पुसे; म्हणे कविजा,
‘ पुससी काय ? जग असे वश कर्मा, हस्त जोडिती कवि ज्या. ’ ॥७७॥
‘ त्वांहि कथावें मज निजकुळनाम, ’ असें सती अकुत्स वदे.
नृप आपणहि तिला, तें स्वमुखें सांगोनि, फार उत्सव दे. ॥७८॥
‘ शशिकुलज, नहुषसुत जन हा, नाम ययाति, येथ तोया मीं
आलों मृगानुसारें; आपृच्छे त्वां तदहमितो यामि. ’ ॥७९॥
त्यासि म्हणे सुरयानी, ‘ परम मनोहर तुझें जगीं यश गा !
सत्य सखा भर्ता हो; झाल्यें तुज मीं मनोरमा ! वशगा. ॥८०॥
हे शर्मिष्ठा दासी; दासी विंशतिशतेंहि कन्या या;
अंगीकारावें मज, जाणसि तूं धर्मपाळक न्याया. ’ ॥८१॥
नृपति म्हणे, ‘ सिंधूसि त्यजुनि, दया करुनिही, नदी नातें
लावील सरासीं, तरि तें हित त्या शक्तिहीनदीनातें. ॥८२॥
तुज व्हावें पात्र, असीं कैंचीं पुण्यें सहाय या तितुकीं ?
विप्रवरसुते ! क्षत्रिय उतरेल तुझ्या न हा ययाति तुकीं. ’ ॥८३॥
‘ ब्रह्मक्षत्रविमिश्रिततत्त्वें तूंही ऋषीच, सन्महित;
वर्णाश्रमधर्मांच्या अवनें, लोकीं तुझेंचि जन्म हित. ॥८४॥
त्यांतहि मींच असें तुज म्हणत्यें; नाहींच तुजकडे दोष;
मजवरि गुरुचा प्रेमा बहुतचि; न करील लेश तो रोष. ॥८५॥
शिवलासि मत्करा तूं; शिवतां अन्याय या तिज्या; माता,
स्त्री, गुरु कीं तूं; साजे कविसि, न अन्या, ययाति जामाता. ॥८६॥
धरिला करीं कुलीनें जो, तो त्या होय योग्य अत्यागा.
कर सोडिसी कसा हा ? धर्मज्ञा ! न करितांहि अत्यागा. ’ ॥८७॥
नृपति म्हणे, ‘ मज तुजही मान्य, तुझा गुरु करील आज्ञा, ते.
वृष्टिप्रति चातकसे, करिताति गुरूक्तिलाचि आ ज्ञाते. ’ ॥८८॥
जेव्हां असा निजाशय नृपरत्नानें वधूसि जाणविला;
धात्री धाडुनि, कळउनि वृत्त, पिता त्या वनांत आणविला. ॥८९॥
कविनें येतांचि, दिली पादप्रणता नृपासि रुचिराशी;
धर्मालोपवरासह; मग विधिनें निजसुताहि रुचिराशी. ॥९०॥
कथिलेंहि असें मग, कीं, ‘ सुरयानीचा धरूनि शय नातें,
शर्मिष्ठेसीं हि न हें लावीं, योग्या करूनि शयनातें. ’ ॥९१॥
बहु सत्कारुनि मुनिनें वृषपर्व्यानेंहि भूप बोळविला.
असकृन्नृपें प्रयाणीं गुरुपादरजांत मुकुट लोळविला. ॥९२॥
गेला पुरासि घेउनि, बसवूनि मनुष्यदेव यानीं; तें,
श्रीतें पद्म तसें, वरसद्म सुखद होय देवयानीतें. ॥९३॥
स्त्रीरत्नीं बहु रमला नृप, सरसीं रसिक काय तो कवनीं ?
बहुपुण्यवंत रमतो जैसा सानंद देवलोकवनीं. ॥९४॥
सदनीं करी ययाती, जे कांहीं सुखविलास तीस हित;
रायें स्वात्मा तैसा, जेंवि हरें सुखविला सतीसहित. ॥९५॥
कविजासुत यदु पहिला; त्याचें गुरुलोचना, मना तुंड
निववी; शशिबिंब जसें, करि कविचें मुदित धाम, नातुंड. ॥९६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP