होता महावनांत स्त्रीसख नृप पांडु, तत्कथा परिसा.
अरिसामंतनमितपद तो मृगयार्थें फिरे वनीं हरिसा. ॥१॥
तेणें मैथुनसमयीं हरिणीसह हरिण देखिला पुष्ट;
वधिला पंचशरानीं सस्त्रीक अदुष्ट तो, जसा दुष्ट. ॥२॥
तो ऋषिपुत्र, तपोधन, भार्येसीं काननांत मृगरूपें
रतिकेलिसक्त होता, वधिला सहसा मृगभ्रमें भूपें. ॥३॥
किंदमनामा तो ऋषि भूमिवर पडोनि पांडुला गांजी.
कर जोडुनि नृपहि म्हणे, ‘ भ्रमलों; मृगरूप घेतलें कां ? जी ! ’ ॥४॥
किंदम म्हणे, ‘ अरे ! म्यां, व्हावा सुत ऋष्यशृंगसा मातें,
हें मात्र वांछिलें रे ! मन वश होवू दिलें न कामातें. ॥५॥
जनलज्जेस्तव मृगतनु घेउनि, रमतां वनी मृगीसहित,
केला कसा तुवां वध ? केलें नसतांहि लेश म्यां अहित. ॥६॥
मृगयाधर्म तुज, मजहि आहेतचि विदित; परि सुरतशर्म
अनुभवुनि, कसें केलें हनन ? अरे ! काय हें उचित कर्म ? ॥७॥
ब्रह्मवधें दुरित नसो; नकळत घडला तुला, परंतु नृपा !
सुरतसुखज्ञा तुजला यावी, आली कसी न लेश कृपा ? ॥८॥
दुष्टोचित शासन कीं; सोसावें काय तापसानें हें ?
काम निरपराध वधिला ? राया ! वद काय पाप सानें हें ? ॥९॥
घे शाप तापसाचा, तुजही करितां मनःप्रियासंग
मृत्यु घडॊ; या माझ्या शापाशनिचा कधी न हो भंग. ’ ॥१०॥
शापवचन मलिन तया करि, कज्जळ जेंवि पांडुरमणीतें.
मुनि गेल्यावरि येउनि तें कळवी साश्रु पांडु रमणींतें. ॥११॥
‘ व्यसनें तात बुडाला, मींही; भोगील काय मंद रसा ?
झालों स्वगुरुसुहृज्जनहृत्सागरमथनहेतु मंदरसा. ॥१२॥
कामेंचि बुडविलें जग, हें ऐकावेंहि न व्यसन कानें.
इतर किति ? पाविजेलचि विषयें भय नित्य नव्य सनकानें. ॥१३॥
झालों विचित्रवीर्यक्षेत्रीं मीं पांडु कृष्णसुत; पाला
भक्षीन, करीन सुखें, होउनि संगीं वितृष्ण, सुतपाला. ॥१४॥
मीं नाठवीन राज्य, स्वजन, स्त्री, शयन, वसन, अन्न, मनें.
जा हस्तिपुरासि तुम्हीं, सांगा भीष्मादिकांसि मन्नमनें. ’ ॥१५॥
म्हणति स्त्रिया, ‘ करूं तप आम्हींही, अधिक काय संन्यासीं ?
येथें तपोनि, भोगा स्वर्गीं सुख कुंतिमद्रकन्यांसीं. ॥१६॥
भार्या न त्यागाव्या, विरहज्वलनांत या न भाजाव्या;
अंतीं स्वर्गासि तुम्हांसह, तेजें शोभवुनि नभा, जाव्या. ’ ॥१७॥
दारोदारोक्ति करी मान्यचि, कीं प्रेम शुद्ध, निष्कपट.
काढी अंगद, कुंडल, कटकयुगुळ, मौलिरत्न, निष्क पट. ॥१८॥
तीं भूषणें, सुवस्त्रें अर्पुनि विप्रांसि, तो म्हणे, ‘ स्वामी !
जाउनि नागपुरीं हें सांगावें, मागतों वरा या मीं. ’ ॥१९॥
वल्कल नेसोनि, म्हणे दासांसि, ‘ पुरासि जा सखे ! खग हो !
जळला शापदवें हा; आश्रय सर्वांसि भीष्म सन्नग हो. ॥२०॥
दुर्दैवग्रीष्मानें गेला आटोनि पांडुकासार.
जा भीष्ममानसाप्रति दासमधुप हो ! विचार हा सार. ॥२१॥
भीष्म, धृतराष्ट्र, विदुर, स्वर्द्रुम तुमचे; तदाश्रयें वर्ता.
हा पांडु, आजपासुनि, झाला यति, भूमिचा नव्हे भर्ता. ’ ॥२२॥
सस्त्रीक पांडु गेला पूर्वीं राघव तपोवना जेंवीं;
वाढुनि शोकविष, समय तो, सकळांच्या म्हणे मना, ‘ जेंवीं, ’ ॥२३॥
सेवकजन बहु रडला; समजावें केंवि त्या अनाथानें ?
पांडुपदें जसि त्याच्या, शिशुच्याहि न तृप्ति तसि मना थानें. ॥२४॥
त्यानीं नागपुरीं ती नेली बहु शीघ्र तापदा वार्ता.
अंगारवृष्टिनें तसि केली सर्व प्रजा तिणें आर्ता. ॥२५॥
आजी, माय बहु रडे; भीष्म विदुर फार जाहले कष्टी.
धृतराष्ट्र म्हणे, ‘ विधिनें केंवि पळविली अचक्षुची यष्टी ? ’ ॥२६॥
तो पांडु हिमगिरीतें लंघुनियां, गंधमादना गेला.
इंद्रद्युम्नसराप्रति जावुनि, शतशृगपर्वतीं ठेला. ॥२७॥
तेथें पांडु, तप करुनि, पावे सुमहर्षितुल्यता सुकृती.
काय न साधील, पथा साधूंच्या अनुसरोनि, सासु कृती ? ॥२८॥
तेथील महर्षिनिकर अन्योन्यातें म्हणे. ‘ उठा, चाला; ’
श्रीब्रह्मदेवदर्शन घ्यायास्तव सिद्ध एकदा झाला. ॥२९॥
पांडु म्हणे, ‘ मीं येतों; ’ मुनि म्हणती, ‘ वायु कीं महर्षिजन
जाया समर्थ, न इतर विधिलोकपथीं करावया व्रजन. ’ ॥३०॥
समजे पांडु तदाशय, कीं झालों जरिहि अनृण इतरांचा,
तरिहि अनपत्यतेस्तव आहेंचि ऋणी समस्त पितरांचा. ॥३१॥
पितरांच्या फेडाया न समर्थ, करुनि महातप, रिणा मीं.
घडतां अधःपतन, मज पुण्यें देतिल न हात परिणामीं. ॥३२॥
त्यांसि म्हणे, ‘ स्वामी हो ! तारावा संकटांत हा भक्त;
अनपत्यत्व स्वर्गद्वारनिरोधासि हेतु, हें व्यक्त. ॥३३॥
जेंवि पितृक्षेत्रीं मीं, मत्क्षेत्रींही तसेंचि संतान
होतें, तरि तरतों; हा काम पुरविते तुम्हींच संतान. ’ ॥३४॥
मुनि म्हणति, ‘ भारता ! हा काम तुझा देवताप्रसादानें
होईल पूर्ण, ऐसें दिसतें आम्हांसि पाहतां ज्ञानें. ’ ॥३५॥
मुनि गेल्यावरि, पांडु ज्येष्ठस्त्रीतें म्हणे, “ प्रिये ! कांहीं
कथितों, तें मान्य करीं; तुज तों अमृतहि मदुक्त्यधिक नाहीं. ॥३६॥
मद्वचनें संपादीं सन्मुनिपासूनि शुद्ध संततिला.
संततिलाभचि लाभ; ‘ स्वर्निःश्रेणी च ’ म्हणति संत तिला. ॥३७॥
शरदंडायनभार्या, पतिच्या आज्ञेकरूनि, सन्मुनितें
भजली पूर्वीं; तारी सदपत्यत्रय तयांसि, जन्मुनि, तें. ” ॥३८॥
कुंती म्हणे, “ तुम्हीं मज कथितां ज्या काय आजि कार्यातें,
व्युषिताश्वकथा जाणुनि, मग मान्य करील कोण आर्या तें ? ॥३९॥
व्युषिताश्व भूप मेला; त्याची भद्रा वधू सती, पतिचें
शव आलिंगूनि, करी विलाप बहु; न गणि मत सुहृन्मतिचें. ॥४०॥
स्वपदीं दृढ भाव तिचा जाणोनि, नभांत बोलिला वाणी,
सोडीनाचि शवाला, संततिचा काम धरुनि, जैं राणी, ॥४१॥
‘ न करीं विलाप सति ! घे वर; ऋतुकाळीं तुवां मदंगातें
रक्षुनि घ्यावें शयनीं; देईन अपत्यहेतुसंगातें. ’ ॥४२॥
भद्रा तैसेंचि करी; झाले तिस शाल्व, मद्र सुत सात.
हें ऐकिलें असेल व्युषिताश्वचरित तुम्हींहि विख्यात. ॥४३॥
शापप्रतिबंध खरा; परि अस्मद्भाव, भाग्य - पुण्यबळें,
स्वामी तुम्हींच कल्पद्रुम द्याल स्वस्त्रियांसि पुत्रफळें. ॥४४॥
तेंवि, मनःसंकल्पें, दिव्यतपोयोगसिद्धिमंतानें,
माझा ठायीं देवा ! निर्मावी त्वांचि शुद्ध संतानें. ” ॥४५॥
पांडु म्हणे, ‘ गे ! साध्वि ! व्युषिताश्व जसा, तसा नसे अन्य.
तो साक्षाद्देवोपम; लोकीं सन्मान्य, योगनिधि, धन्य. ॥४६॥
मज आहे श्रुत ऐसें, कीं कामविहारिणि स्त्रिया स्ववशा
पूर्वीं होत्या, भजती भलत्यासि, जशा वनीं गजास वशा. ॥४७॥
उद्दालकमुनिपुत्रें रीति तयांची विलोकिली खोटी;
केली हे मर्यादा, जे आतां चालत्ये जगीं मोटी. ॥४८॥
उद्दालकपत्नीतें एक ब्राह्मण धरी करीं, कामी.
‘ क्रीडों चाल ’ म्हणे, जर्हि देखत होता तिचा पती धामी. ॥४९॥
तें पाहुनि उद्दालकमुनिसूनु म्हणे, तयासि, ‘ कर सोडा;
भव्यार्थ, आजिपासुनि, या दुष्टा दंडकासि कर जोडा. ’ ॥५०॥
तात म्हणे, ‘ वत्सा ! हे रीति पुरातन, तुवां न कोपावें.
स्त्रीप्रियकामविहारीं; विघ्न किमपि तूं करूं नको. पावें. ’ ॥५१॥
तें मात्र वचन न करी मान्य श्रीश्वेतकेतु बापाचें;
स्पष्ट म्हणे, ‘ हें कारण होइल नरकप्रदोग्रपापाचें. ॥५२॥
यावरि ती भ्रूणघ्नी, परपुरुषाला भजेल जी असती;
भ्रूणघ्न सतीत्यागी पुरुषहि; नरकीं घडो तयां वसती. ॥५३॥
पुत्रोत्पत्यर्थ धवें आज्ञा देतांहि, जीहि आज्ञा ते
न करिल, तसीच तीही; भंगितिल न धर्मसेतु हा ज्ञाते. ’ ॥५४॥
असि मुनिकृत मर्यादा लोकीं अद्यापि चालत्ये कांते !
जाणसि मदुद्भवासहि; मान्य करीं वचन कनकनिभकांते ! ॥५५॥
कल्माषपादपत्नी मदयंती, जाणताति संत तिला;
ती पावली वसिष्ठापासुनि गतिकीर्तिहेतुसंततिला. ॥५६॥
त्वांहि तसेंचि करावें; म्यां रचिला आजि सफळ अंजलि हो.
मन्नाम पुत्रवंतांमाजि यमामात्यपाणिकंज लिहो. ’ ॥५७॥
जनमेजयासि सांगे मुनि, कीं वाणीसही, करुनि पण जी
जिंकूं शके सुभाषणनिपुणत्वें, ती वदे तुझि निजपजी. ॥५८॥
‘ मत्पितृसदनीं होता श्रीदुर्वासा महोग्र, परि चरण
म्यां अर्चिले सदाही; केलें, साहोनि कष्ट, परिचरण. ॥५९॥
तेणें प्रसन्न होउनि मंत्र मला एक शिकविला आहे.
पुत्रार्थ सुराकर्षण कथिलें, वेळाहि पातली त्या हे. ॥६०॥
श्रीगुरुदत्तमनुबळें सांगाल तया सुरासि वाहे.
परपुरुषाला, तुमच्या वचनें, पुत्रोद्भवार्थ पाहेन. ’ ॥६१॥
पांडु म्हणे, धर्मातें बाहें, वाहें तयासि हें काय.
तज्ज न सज्जनमतपथ सोडिल, अगुणें सुविग्रहें काय ? ॥६२॥
पतिस नमुनि, गुरुचरणस्मरण करुनि, मंत्रजप करी विधिनें;
तत्काळ दिलें दर्शन धर्में, मंत्राहृतें, दयानिधिनें. ॥६३॥
परिसुनि धर्म वदे, ‘ अयि ! सति ! कुंति ! मतं ददामि किं ते ? ‘ तें ’
परिसुनि म्हणे पृथा, ‘ जें सुतरत्न हरील सर्व चिंतेतें. ’ ॥६४॥
धर्में तसाचि दिधला सुत, करुणा करुनि पांडुभूपाळीं.
इषशुक्लपंचमीतिथि होती, तज्जनन होय ज्या काळीं. ॥६५॥
तो उपजतांचि, झाली वाणी अशरीरिणी अशी व्योमीं,
‘ हा कुरुकुळीं युधिष्ठिर हित सकळां, अमृतरस जसा सोमीं. ॥६६॥
हा पांडुपुत्र सत्यव्रत, सुज्ञ, अजातशत्र, भूतरणी;
हा मूर्त धर्म, भूपतिपति, यश जोडील परम पूत रणीं. ’ ॥६७॥
सुतमुखशशिरुचि सेवुनि, पांडु निवाला; परंतु एकानें
तृप्त नव्हेचि; जसा मरुतरुप सकृत्प्राप्तवारिसेकानें. ॥६८॥
पुनरपि म्हणे तिला, ‘ बळशाली सुत आणिखी असावा गे !
सबळचि वीरखळबळीं, विपिनीं समरुद्दवा असा, वागे. ’ ॥६९॥
कुंती; मंत्रजप करुनि, चिंती मनिं कीं, ‘ समीरदेवा ! यो. ’
तोही तसाचि आला; त्यासि म्हणे ती, ‘ सुपुत्र दे वायो ! ’ ॥७०॥
पवनापासुनि झाला सुत बळनिधि भीमसेन, तज्जननीं
होय गगनगी, हर्षे भूमिहि, केवळ न एक तज्जननी. ॥७१॥
‘ हा बळजळधि खळांचा समरीं उतरील सर्व हा रेंच.
चूर्ण करील शिलादृढशत्रूरें मुष्टिच्या प्रहारेंच. ’ ॥७२॥
अंकीं निजला असतां, व्याघ्रभयें ती पृथा उठे तूर्ण.
तों घनसा भीम पडे, होय तनुभरें तळीं शिळा चूर्ण. ॥७३॥
‘ तिसराहि पुत्र लोकश्रेष्ठ असावा ’ असें मनीं आणी.
उग्र तप करी राजा पांडु; तदुक्तें तसीच ती राणी. ॥७४॥
आराधिला सुरेश्वर; भेटोनि म्हणे तयासि, ‘ माग वर. ’
पांडु म्हणे, ‘ दे मजला आत्मसम कुमार भूरिभाग, वर. ’ ॥७५॥
इंद्र म्हणे, ‘ मत्सम तुज पुत्र दिला सर्ववीरवर हो तो.
हो तूंहि पुत्रिवर; बहुगुण सुजनीं अर्पिला सुवर होतो. ’ ॥७६॥
हरि गेल्यावरि, पांडु स्त्रीस म्हणे, ‘ एक वर्ष तपलीस
ज्या अर्थें तूं देवि ! स्वरतनियमासि फार जपलीस, ॥७७॥
तें तप फळलें; तुज सुत देणार हरी, म्हणोनि, गुरुदत्ता
विद्या तुवां जपावी, जीची साची जगत्त्रयीं सत्ता. ’ ॥७८॥
कुंतीनें शुभदिवसीं, एकांतीं, इष्टकाम जाणविला.
आत्रेयदत्तविद्यादूती योजूनि शक्र आणविला. ॥७९॥
इंद्रापासुनि अर्जुन होतां, तद्गुण मनोरम नभोगी
वर्णी, तच्छ्रवणें सुख बहु कुंतीपांडुसाधुमन भोगी. ॥८०॥
‘ हा रंजवील गुरुजनचित्तातें; श्रुतिरहस्य कवळील;
दुग्धाब्धिपेनधवळें स्वयशें कुरुच्या कुळासि धवळील; ॥८१॥
लीळेनें सुरदुष्कर कर्म करिल; संगरीं न आटेल;
फाटेल भयें याच्या द्विषदुर; हा मूर्त काळ वाटेल; ॥८२॥
हा तोषवील युद्धीं त्यासहि, जो काळकंपट पिनाकी.
पावेल पाशुपतही, ज्या पात्र न, जर्हि कृती तदपि नाकी; ॥८३॥
किंबहुना विष्णु जसा सुखद अदितिला, तसाचि हा तुजला;
धन्याऽसि कुंति ! पांडो ! त्वत्क्षेत्रीं कल्पवृक्ष कीं रुजला. ’ ॥८४॥
ऐसी अंबरवाणी झाली, शुभकुसुमवृष्टि बहु मोटी;
वाद्यध्वनि बहु झाले; आले आदित्यरुद्रमुनि कोटी. ॥८५॥
पावे दशरथगृह जें यश, पांडूटजहि जिष्णुजननीं तें;
बहु मानिलें सतीनीं कुंतीतें जेंवि विष्णुजननीतें. ॥८६॥
पांडु पुन्हांहि प्रार्थी, त्यातें कुंती म्हणे, ‘ पुरे, लोभें
होईन बंधकी मीं; क्षोभें न मनीं, इहींच बहु शोभें. ’ ॥८७॥
माद्री पतिप्रति म्हणे, “ झाले माझ्या कुमार जावेला;
सुख गमलें; म्हणत्यें मीं, ‘ वृद्धीतें यापरीस जा वेला ! ’ ॥८८॥
दोघीं वंध्या होतों, परि फळला सत्प्रसाद एकीला.
झाला तुम्हांसि संततिलाभ, जसा वृष्टिलाभ केकीला. ॥८९॥
मीं मात्र मंदभाग्या; सांत्वुनि म्हणतां, ‘ रहा सुखें, न रडें. ’
परि मुनिशापवृकें या हरिणीचें कवळिलें मुखें नरडें. ॥९०॥
मत्संतानार्थ तुम्हीं दयितेला भीड घालितां, तरि ती
आज्ञा न मोडिती, या सवतीवरिही सती दया करिती. ” ॥९१॥
पांडु म्हणे, ‘ माझ्याही चित्तीं आहे असेंचि; पदर तिला
पसरीन; करील वचन; भंगील न ती मदिय पदरतिला. ’ ॥९२॥
कुंतीस म्हणे, ‘ देवि ! त्वद्भजनीं सादरा तुझी आली
माद्री त्वां तारावी; हे चि न दुःखाब्धिच्या तटा आली. ॥९३॥
यश बहु वाढेल तुझें; हें चि भल्यानीं जपोनि सांचविलें;
सर्वस्व वेचिलें, परि एक भलेपण जगांत वांचविलें. ’ ॥९४॥
आज्ञा स्वीकारुनि, ती, मंत्रजप करुनि म्हणे तिला, ‘ जावें;
पुत्रार्थ सकृत् दैवत चिंतावें त्वां; सये ! न लाजावें. ’ ॥९५॥
ती दस्रांतें चिंती, तों ते पावोनि म्हणति, ‘ हे माद्री !
द्यावें काय तुज ? तुवां स्वावयवें जिंकिलाचि हेमाद्री. ’ ॥९६॥
माद्री हांसोनि म्हणे, ‘ जाणुनि हृद्रोग, त्यासि अगदानें
दूर करा, जी ! रोगी न निवे कनकाचियाहि अगदानें. ॥९७॥
त्यांपासुनि ती पावे अत्यंत मनोरमांग यमळांतें;
नकुळ सहदेव ते बहु सुखविति त्या पांडुनेत्रकमळांतें. ॥९८॥
अणखी माद्रीविषयीं पांडु प्रार्थी पृथेसि एकांतीं.
मान्य न करी; गमे ती वृष्टि उघडली मयूरकेकांतीं. ॥९९॥
कुंती बोले, ‘ माझा उपमर्द करील ती, असें गमतें;
द्वंद्वाव्हानें पुत्रद्वंद्व जिणें सहज साधिलें स्वमतें. ’ ॥१००॥