मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|आर्याभारत|आदिपर्व|
अध्याय तिसावा

आदिपर्व - अध्याय तिसावा

मोरेश्वर रामजी पराडकर (१७२९–१७९४), हे महाराष्ट्रात मोरोपंत अथवा मयूर पंडित नावाने ओळखले जातात.


गृह जळतां पौर म्हणति, ‘ हा ! ’ कळलें त्यांसि कर्म फटकळ तें.
गुप्त करो, सदसत्कृत, तत्काळ दहाजणांस अटकळतें. ॥१॥
अग्नि विझवितां, करितां शोध पुरजनीं, शिरोनि खनकानें
बिळ भस्में भरिलें, बुध भरि सूचकवदन, जेंवि कनकानें. ॥२॥
ते सा प्राणी पाहुनि पौर म्हणति, ‘ हाय ! काय हें कर्म ?
हा ! धृतराष्ट्रा ! पांडवघातीं त्वां कोण देखिला धर्म ? ॥३॥
यवना ! युक्तचि तुज हें, न विलंब फळासि साधुहानीच्या;
जा नरका; कां वधिले वदान्य विश्वस्त साधु हा ! नीचा ? ’ ॥४॥
तें ऐकोनि सासुत धृतराष्ट्र रडे, म्हणुनि विदुर तोहि रडे;
कीं अंधें अमृतफळें टाकुनि पदरांत घेतले हिरडे. ॥५॥
करवी क्रिया, नृप रडे, पुत्रहि दुर्योधनादि सोंगाळा.
विदुरनयनें म्हणति, ‘ जळ द्या खळ दुर्योधना दिसों, गाळा. ’ ॥६॥
दुःख तिहीं अनुभविलें जें कोण्हींही कधींहि न वनीं तें.
अति सुकुमार शरीरें त्यांचीं जैसीं नवीन नवनीतें. ॥७॥
दक्षिणदिशेसि जातां, रवि उगवे मावळे, वनीं पळतां
भय बहु कीं, खळ येइल दैवें जगला असेल जरि जळतां. ॥८॥
सायान्हीं माय म्हणे, ‘ तग न निघे तोय पाज, सुतराया !
बा ! तूंचि सेतु आम्हां या तृड्व्य्सनाब्धिला हि उतराया. ’ ॥९॥
धावे तरु मोडित तो, सुटला गिरिवरुनि थोर पाथरसा;
श्रमतां त्या गुरुभक्ता दे विद्याज्ञानसेंचि पाथ रसा. ॥१०॥
पात्र नसे म्हणवुनि घे भिजउनि तो उत्तरीयवास वन.
वास वनव्याघ्रा दे भय त्याच,अ तेंवि अरिस वासव न. ॥११॥
धांवत ये, पाहे तों श्रमनिद्रा लागली स्वमातेतें.
वातें दवार्चिसें त्या दैन्यें गहजांत दुःख माते तें. ॥१२॥
निजला सानुज धर्महि कल्पुनि सुखशयन भूमितळ मळला.
तें पाहुनि शुष्कर्‍हदमीन तसा फार भीम तळमळला. ॥१३॥
चोळी खळांतकर कर, करकर रद खाय, ‘ हाय ! हाय ! ’ करी,
गुंते गुर्वाज्ञेनें; पंकीं पडला करील काय करी ? ॥१४॥
अश्रु पुसोनि म्हणे, ‘ रे ! दुष्टा दुर्योधना ! कुळकळंका !
पोषू भू तव संगें< दशवदनाच्या जसी पुलक लंका. ॥१५॥
तुमचा पिताचि, कुरुकुळविपिनाच्या अग्नि हो ! त्रपा प्याला.
लोभाच्या तेजस्वी बंधु नको, अग्निहोत्र पाप्याला. ॥१६॥
शोकीं, अयशीं, नरकीं केला कां मग्न दुष्ट हो ! तात.
अविचारितोक्त करितां बालिश हो ! आर्य रुष्ट होतात. ॥१७॥
गजही साहूं न शकति ज्यांच्या स्वमदांततत्परा गंधा,
ते केले दुर्विधिहृतमति शशकानीं हरी परागंधा. ॥१८॥
काका ! ते तुज रुचले, करिति महत्वासि भस्म रासभ जे.
न गुणज्ञ तूं, धरि शिरीं विधु, न उमावल्लभ स्मरास भजे. ’ ॥१९॥
ऐसें जों भीम वदे, चिंती कृष्णा भयापहा, जागे.
भगिनीस हिडिंब म्हणे, ‘ ते कोण मनुष्यसे, पहा, जा गे ! ’ ॥२०॥
ती राक्षसी हिडंबा धांवे कीं चरचरां नरा खावें.
रक्षील व्याघ्री क्षण, परि पलहि जिणें जिणें न राखावें. ॥२१॥
भुलली वनीं हिडिंबा भीमाची पाहतांचि सुंदरता.
तत्काळ सुंदरी ती होय जसी दिव्ययोनि सुंदरता. ॥२२॥
भीमासि म्हणे, ‘ कां जी ! शिरलां या काननांत तापससे,
येथें जन बहु पावति, मृगराजबिळांत जेंवि ताप ससे. ॥२३॥
माझा हिडिंब राक्षस सोदर, तुमचा करील वध; मातें
तेणेंचि धाडीलें परि तुज वश मीं, त्या त्यजूनि अधमातें. ॥२४॥
स्वीकार करीं साधो ! स्मर बाधो न मज, मींहि टाळीन
मरण, पळवीन तुजला, वरुनि सतीव्रत न तें विटाळीन. ॥२५॥
हो मत्पति, ये स्कंधीं बैस, विमानीं अमर्त्यसा धांवें.
त्वांही म्याही रक्षुनि अन्योन्यातें स्वकार्य साधावें. ’ ॥२६॥
भीम म्हणे, ‘ निद्रित हे माता भ्राते त्यजूं वनीं ? तुजला
जोडूं ? तोडूं प्रीति ? स्त्रीसंगसुखासि कोण गे ! सुजला ? ’ ॥२७॥
तों ती म्हणे, ‘ पळवित्यें, सर्वांस करा तुम्हींच परि जागे. ’
भीम म्हणे, “ सुखसुप्तां उठवीना; करिल काय अरि ? जा गे ! ॥२८॥
साधावा स्वार्थ, असें भय दावुनियां भयातुरा मातें ?
समरीं देईलचि, दे जेंवि यशोलाभ यातु रामा तें. ॥२९॥
तो अंधकार, मीं रवि; तो रावण, मींहि पुष्कराक्ष; ससा
तो, हरि मीं; तन्मुख मीं करिन पळामाजि शुष्क राक्षससा. ॥३०॥
हें उर, हे बाहु पहा, त्याचा आम्हांसि काय गे ! लेखा ?
जा, त्याला म्हण, ‘ त्यांचे धाकेंचि गळोनि काय गेले, खा. ’ ”  ॥३१॥
होतां विलंब, राक्षर ये पाहे स्वस्वसाचरित्रास;
कोपोनि म्हणे, ‘ दुष्टे ! तुज नाहीं मृत्युचा परित्रास ? ॥३२॥
काळें मति तुज दिधली मर्त्यापसदास अनुसरायाची.
वांचेल कसी ? या सांसकट तुझी आजि तनु सरायाची. ’ ॥३३॥
ऐसें वदोनि धांवे सर्वांचाही करावया कवळ,
भीमें दटाविला तो करितां रदशब्द निद्रितांजवळ. ॥३४॥
परि भगिनीसि वधाया धावे तो यातुधान कोपानें,
भीम म्हणे, ‘ भू याच्या रक्तांच्या तृप्त आज हो पानें. ’ ॥३५॥
पांडव रागें मागें त्या पापाच्या महानगा ढकलीं.
द्वात्रिंशद्धस्तांवरि करिति महागजसमान गाढ कली. ॥३६॥
त्यांच्या युद्धध्वनिनें जागी झाली पृथा सुतांसहित;
तों निकट देखिली स्त्री, लावण्य जिचें जगीं तुळारहित. ॥३७॥
कुंति तिला पुसे, ‘ तूं कोणाची सांग बाइको, पातें
न लवेचि तुज पहातां, पुसिल्याच्या न धरिं बाई ! कोपातें. ॥३८॥
तूं काय अप्सरा ! कीं वनदेवी ! वद किमर्थ आलीस ?
कां एकली ? पतिकडे पाठविलें सुमुखि ! काय आलीस ? ’ ॥३९॥
कुंतीस ह्मणे ती, ‘ मीं रात्रिचरी या वनींच मद्वसती,
येथें प्राणी कोण्ही अस्मात्त्रासेंकरूनियां नसती. ॥४०॥
स्वाग्रजहिडिंबवचनें आल्यें मारावया तुह्मांला, जों
भुलल्यें नवहेमाभा एका मीं, काय हो ! तुह्मां लाजों ? ॥४१॥
वरिला मनें तुझा सुत, न्यावा येथूनि शीघ्र पळवावा,
मद्भाव असा कीं, हा स्वविचार तुह्मांसही न कळवावा. ॥४२॥
तुमची संगति सोडुनि तो वश जाला मला न वीरमणी,
आश्चर्य थोर हें कीं, प्रार्थी परि नावडे नवी रमणी. ॥४३॥
मज लागला परोपरि बहुत विनविता तुझ्या सुता वेळ;
तों सासुबाइ ! कोपी मद्भ्राता धावला उतावेळ. ॥४४॥
आधीं माझे घ्याया, मग तुमचे प्राण मूर्त अंतकसा
धांवे, परि मल्पति तव सुत असतां, तो करील अंत कसा ? ॥४५॥
तुमची सुखनिद्रा क्षणमात्रहि मोडूं नयेचि त्या अहितें,
या भावें मत्पति ने दूर तया पक्षिपति जसा अहितें. ॥४६॥
न धरील काय जी ! खगपतिनखकरवाळ लाज, सापाला
सपदि न वधितां, चुरिला असता खळ, वाळला जसा पाला. ॥४७॥
ते दोघे झगडति परि मत्पति मारील राक्षसापसदा.
गरुडापुढें तृणचि तो, इतरीं जर्‍हि असुहराक्ष साप सदा. ’ ॥४८॥
ऐसें ऐकुनि सायुध चौघेही बंधु धावले सहसा;
जिष्णु ह्मणे, ‘ वद आर्या ! जरि अरि भासत असेल दुःसहसा, ॥४९॥
तरि आज्ञा दे, वधितों, तुझियाचि दयेकरूनि यातूतें.
श्रमलासि पथीं, व्हावा न श्रम बहु अस्मदाश्रया तूतें. ’ ॥५०॥
भीम ह्मणे, ‘ होतो सुरसुदतीचा शस्त्रमथित नवरा, कीं,
भुजयुद्धींच मरो खळ: सोडावा त्वां स्वविशिख न वराकीं. ॥५१॥
मज यातु तसेंचि, जसें अमृतीं विजयाश तक्र; तुच्छा या
वधिन कुतुकें, करिल जर्‍हि यावरि आंगें शतक्रतु छाया. ’ ॥५२॥
ऐसें वदोनि भीम श्रितपीडांच्या निवारणारानीं
बाहूनीं करि अरिला व्यसु, जैसा सिंह वारणां रानीं. ॥५३॥
विजयी भीम ह्मणे, ‘ या खळभगिनीचाहि वध करावा; हें
वृंदावन भोग्य नव्हे, काय पहातोसि रे ! करा ! वाहें. ’ ॥५४॥
धर्म ह्मणे, ‘ रे ! बापा ! रक्षीं बळिनायका ! यश; स्त्रीतें
न वधीं; जें कर्म नव्हे सन्मत करितील काय शस्त्री तें ? ॥५५॥
खचरी म्हणे पृथेला, ‘ जाणसि दुःखासि तूंहि सासू ! या.
न करीं मदुपेक्षा सति ! मति कुळज्यांची नसेचि सासूया. ॥५६॥
आर्ये ! लोकद्वयहित सुतचि नव्हे काय वद नवा सून ?
काय मरावें क्षुधितें, कल्पलतेजवळि वदन वासून ? ॥५७॥
जो निःस्पृह संसारीं बहु विटला, तो यमी न संग मनीं
जरि धरि, तरि तळमळतां, यत्न करिल तोयमीनसंगमनीं. ॥५८॥
स्मरतां भेटेन पथीं, विषमीं पृष्ठीं तुह्मांसि वाहेन,
सेवा करितां तुमची मीं आत्मसुखाकडे न पाहेन. ’ ॥५९॥
धर्म म्हणे, “ दिधलें जें, मागसि वंदुनि पदास खेचरि ! तें;
परि आमुचे करावे त्वां प्रमुदितमति सदा सखे चरितें. ॥६०॥
क्रीडार्थ दिसा ने, परि सांजे या स्वप्रियावहा आण,
रक्षीं सत्य निशाचरि ! ‘ घात करीना ’ असी वहा आण. ” ॥६१॥
खचरी म्हणे, ‘ चुकेना गुरुभजनीं देह हा निभावो जी !
वचनातिक्रम करितां, क्षिप्र घडो देहहानि भावोजी ! ’ ॥६२॥
गुरुवचनें मारुति जें एकचि सदपत्यरत्न दे तीतें,
तन्नाम घटोत्कचं, दे सुख पितरां, शतहि सुख न देती तें. ॥६३॥
कार्पटिकांचा वेष स्वीकारुनि पांडुपुत्र ते, ज्यांतें
मिरवावेंचि, परि अरित्रासें आच्छादिति स्वतेजातें. ॥६४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP